ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर


हा लेख इंग्रजीतून वाचण्यासाठी इथे क्लिक करा: Autism Spectrum Disorder

आत्मकेंद्रीपणा किंवा स्वमग्नता ही एक न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. इंग्रजीत त्याला ‘ऑटिझम’ किंवा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (एएसडी) म्हणतात. अशा व्यक्तीमध्ये सोशल स्किल्स, संवाद साधणे, भाषा आणि देहबोलीचा योग्य वापर करणे इत्यादींचा अभाव आणि त्याच त्याच गोष्टी करत राहणे अशी लक्षणे आढळून येतात. प्रत्येक मुलामध्ये लक्षणे आणि त्याची तीव्रता वेगवेगळी असू शकते. काही मुलांमध्ये कमी तीव्रतेची कमी लक्षणे असतात तर काही मुलांमध्ये खूप सारी लक्षणे असतात आणि त्याची तीव्रता पण जास्त असते. त्यामुळे ह्या कंडिशनला स्पेक्ट्रम असे म्हणतात.

  • लिओ केनर यांनी सन १९४३ मध्ये पहिल्यांदा ऑटिझमचा शोध लावला.
  • सुरुवातीच्या मानसशास्त्रज्ञांनी असा अंदाज केला होता की मातेच्या दुर्लक्षपणामुळे (रेफ्रिजरेटर मदर थियरी) मुले ऑटिस्टिक बनतात. 1979 मध्ये हा सिद्धांत खोटा ठरला. पालकांच्या चुकीमुळे किंवा दुर्लक्षपणामुळे ऑटिझम होत नाही असे सिद्ध झाले.
  • ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर मुलींपेक्षा मुलांपेक्षा चारपट जास्त आढळतो.
  • मुलींमध्ये ऑटिझमच्या लक्षणांची स्पष्टता कमी असते.
  • साधारणतः ऑटिझमचे निदान दोन ते तीन वर्षापर्यंत होते.
  • काही मुलांमध्ये सुरुवातीची डेव्हलपमेंट नॉर्मल होते आणि त्यानंतर काही स्किल्सचा ऱ्हास होतो .

तुम्हाला कदाचित ऑटिस्टिक डिसऑर्डर,अस्पर्जर सिंड्रोम, पेर्व्हेसिव्ह डेव्हलपमेंटल डिसऑर्डर (पीडीडी-एनओएस) ही नावे ऐकून माहिती असतील. 2013 पासून ह्या सगळ्या कंडीशनना एकत्रित ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असे म्हणत आहेत.

सीडीसी (CDC 2020) नुसार सद्यपरिस्थितीत 36 पैकी एका मुलांमध्ये ऑटीझम असल्याचे आढळून येत आहे. ऑटिझमचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे. याची कारणे म्हणजे त्याबद्दलची वाढणारी जागरूकता तसेच निदान करण्याच्या पद्धती मधले बदल असू शकतात. 2006 पासून अमेरिकन ॲकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स (AAP) ने सगळ्या बालरोगतज्ञांना 18 आणि 24 महिन्याच्या मुलांना ऑटिझम स्क्रीनिंग करायला सांगितले आहे. ह्या सगळ्या घटकाव्यतिरिक्त ऑटिझमचे खरोखर प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ऑटिझम ही लाइफ लॉंग कंडिशन आहे. तरीही बरीच मुले स्वतंत्र आणि परिपूर्ण आयुष्य जगतात.

ऑटिझम कशामुळे होतो?

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की ऑटिझमचे कारण हे जेनेटिक आणि पर्यावरणातील घटक ह्याचे कॉम्बिनेशन आहे.

जेनेटिक/अनुवंशिकता: काही कुटुंबांमध्ये एकापेक्षा जास्त मुलांना ऑटीझम झाल्याचे दिसून येते. जुळ्या मुलांपैकी एकाला जर ऑटिझम असेल तर दुसऱ्याला असायची शक्यता ७०% ने वाढते. जीन्स मधल्या विशिष्ट बदलांमुळे ऑटिझम होण्याची रिस्क वाढते. एखाद्या पालकाला ऑटीझम नसतो पण त्याच्याकडून विशिष्ट बदल झालेले जीन्स मुलांमध्ये जातात आणि मुलाला ऑटीझम होऊ शकतो. बऱ्याच वेळेस दोन्ही पालकांचे जीन्स नॉर्मल असतात पण गर्भामध्ये काही जनुकीय बदल होतात आणि त्यामुळे ऑटिझमचा धोका वाढतो.

पर्यावरणातील घटक: जनुकीय बदल आणि खालील घटकामुळे ऑटीझम होण्याची शक्यता वाढते.

  • वडिलांचे वय 40 वर्षांपेक्षा अधिक
  • आईचे वय एकतर किशोरवय किंवा 30 वर्षांपेक्षा अधिक
  • दोन्ही पालकांच्या वयामध्ये मोठा गॅप
  • प्रेग्नेंसीमध्ये औषधी, अल्कोहोल, स्मोकिंग, ड्रग्सचा वापर आणि कीटकनाशकांचा संपर्क
  • प्रेग्नेंसीमध्ये फॉलिक ऍसिडची कमतरता
  • प्रेग्नेंसीमध्ये व्हायरस किंवा बॅक्टेरियाचा संसर्ग
  • जेस्टेशनल डायबिटीस (प्रेग्नेंसीमध्ये मधुमेह होणे)
  • प्रेग्नेंसीमध्ये स्ट्रेस/ताण-तणाव
  • प्रीमॅच्युअर बर्थ, बाळाचे वजन कमी असणे, जन्मा दरम्यान काही कारणामुळे बाळाच्या मेंदूला ऑक्सिजनची कमतरता होणे
  • लेड/शिसे, मरक्यूरी/पारा (मासे, सौंदर्यप्रसाधने यांच्याद्वारे ), जन्मानंतर विषाणूजन्य संक्रमण
  • गोवर, गालगुंड आणि रुबेला (एमएमआर/MMR) लसीकरण किंवा कोणत्याही लसीमुळे ऑटिझम होत नाही!

जेनेटिक बदल आणि पर्यावरणातील घटकांच्या प्रभावामुळे मेंदूच्या संरचनेत बदल होतात. असे म्हटले जाते की ऑटिझमचे ब्रेन हायपर कनेक्टेड म्हणजे नको असलेली कंनेक्शन्स तशीच राहून जातात. त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता नॉर्मल मुलांपेक्षा वेगळी असते.

ऑटिझमचे निदान कसे करतात? ह्यासाठी ब्लड टेस्ट, सिटीस्कॅन, एमआरआय (MRI) स्कॅन किंवा इइजी (मेंदूच्या विद्युत लहरींचा अभ्यास) ची गरज नसते. मुलांमध्ये दिसणाऱ्या लक्षणावरून निदान करतात. त्यामुळे ऑटिझमचे डायग्नोसिस आव्हानात्मक असू शकते. तज्ञ मंडळी पालकांना काही प्रश्न विचारून तसेच मुलांमध्ये दिसणार्‍या लक्षणांचा अभ्यास करून योग्य निदान करतात.

लक्षणे: 

  • बोलताना व्यक्तीच्या चेहऱ्याकडे न बघणे, नजरेला नजर न देणे (पुअर आय कॉन्टॅक्ट)
  • दुसऱ्याकडे बघून स्मितहास्य न करणे
  • स्पीच डीले (उशिरा बोलणे) किंवा मुकेपणा
  • सुरुवातीला मूल नॉर्मल बोलायला सुरुवात करतो आणि १५ ते १८ महिन्या नंतर त्या स्पीचचा ऱ्हास होतो आणि काही वेळेस मुले पूर्णपणे म्यूट होतात.
  • उत्तर देण्याऐवजी समोरच्याने बोललेलेच पुन्हा बोलणे (इकोलेलिया)
  • स्वत:तच मग्न असणे (स्वमग्नता)
  • इतर मुलांशी न खेळता एका कोपर्‍यात जाऊन खेळत बसणे
  • मैत्री करता न येणे
  • संवादासाठी बोट दाखवणे, खाणाखुणा करणे, टाटा करणे, मान हलवून होकार-नकार देणे यांचा अभाव
  • दुसऱ्यांचे अनुकरण करता न येणे
  • डोळ्यांची, हातांची विचित्र हालचाल करणे (हॅन्ड फ्लॅपिंग)
  • संपूर्ण वस्तूऐवजी तिच्या एखाद्या भागाकडेच बघत राहणे (उदा. गाडीची फिरती चाके)
  • फिरत्या वस्तूंकडे (पंखा, चाके) तासन तास एकटक पाहात बसणे
  • काल्पनिक खेळांत न रमणे
  • मी व तू या सर्वनामांचा चुकीचा वापर करणे. (उदा. ‘मला भूक लागली’ च्या ऐवजी ‘राजुला भूक लागली’)
  • इतरांच्या भावनांची जाणीव नसणे
  • एकट्यानेच तोच-तोच खेळ खेळत राहणे
  • परिस्थितीत बदल झाल्यास अस्वस्थ होणे (ट्रबल ट्रान्झिशनिंग)
  • एखादी गोष्ट पसंत नसल्यास रडून गोंधळ घालणे
  • एकाच गोष्टीत नको इतका रस घेणे
  • सामान्य ज्ञान कमालीचे तोकडे असणे
  • अतिक्रियाशील वा अतिमंद असणे
  • प्रकाश, आवाज, स्पर्श, वास व चव यांबाबत कमालीचे संवेदनशील असणे
  • डोके आपटून घेणे (हेड बँगिंग)
  • प्रत्येक वस्तूंचा वास घेणे
  • परिचित व्यक्तीनेही जवळ घेतल्यास, मिठी मारल्यास विरोध दर्शवणे

ऑटिझमच्या बऱ्याच मुलांमध्ये नॉर्मल बुद्धिमत्ता (IQ) असते तर बरीच मुले मतिमंद असतात. ऑटिझम असलेल्या काही लोकांना पचन संस्थेच्या समस्या देखील होतात, जसे की बद्धकोष्ठता, ओटीपोटात (पोटात) वेदना किंवा उलट्या. काही संशोधन असे सूचित करतात की ऑटिझम नसलेल्या लोकांपेक्षा ऑटिझम ग्रस्त लोकांमध्ये पाचक समस्या अधिक वेळा उद्भवतात, परंतु अद्याप या विषयावर संशोधन चालू आहे.

ऑटिझमची ट्रीटमेंट काय असते?

  • जन्मल्यापासून मेंदूचा विकास सुरू होतो. जर ऑटिझमचे निदान लवकरात लवकर होऊन थेरपी सुरू केल्यास त्याचा खूप फायदा होतो.
  • त्यासाठी स्पीच थेरपी, ऑक्यूपेशनल थेरपी, फिजिकल थेरपी, बिहेविअरल थेरपी, एबीए (अप्लाइड बिहेविअरल अनालिसिस), सेंसरी इंटिग्रेशन थेरपी अशा थेरपीचा वापर करतात.
  • काही वेळेस ऍनिमल असिस्टेड थेरपी ज्यामध्ये कुत्रा, डॉल्फिन, किंवा घोड्यांचा वापर (हिप्पोथेरपी) केला जातो.
  • म्युझिक/संगीत थेरपी: भावना व्यक्त करण्यास आणि संवाद साधण्यासाठी ही थेरपी वापरतात 
  • मसाज/मालिश थेरपी
  • पिक्चर एक्सचेंज कम्युनिकेशन सिस्टीम (PECS) एक कम्युनिकेशन साठी पर्यायी पद्धत आहे. यामध्ये पालक, शिक्षक आणि समवयस्कांशी संवाद साधण्यासाठी दृश्य चिन्ह (चित्रे) वापरतात. ह्यासाठी महागड्या साहित्याची आवश्यकता नसते आणि ती शाळेत, घरात किंवा समाजात सहजपणे वापरली जाऊ शकते. हे विशेषतः अशा मुलांसाठी उपयुक्त आहे जी मुकी असतात किंवा त्यांची स्पीच मर्यादित असते. स्पीच थेरपिस्ट मुलाला PECS कसे वापरावे हे शिकण्यास मदत करू शकतात. आता कार्ड/चार्टच्या जागी ऍप्स तसेच स्पीच जनरेटिंग डिव्हाईस वापरली जातात.
  • एका रिसर्चमध्ये असे दिसून आले की ज्या ऑटिझमच्या मुलांनी ओमेगा थ्री फिश ओईलचा वापर केला त्यांचा आय कॉन्टॅक्ट वाढला, झोप सुधारली, एकाग्रता वाढली आणि  बऱ्याच स्किल्समध्ये चांगला फरक दिसून आला. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा: ओमेगा थ्री फिश ओईल
  • उंटीणीचे दूध (कॅमेल मिल्क): ह्यामध्ये असलेल्या अँटी-ऑक्सिडेंटमुळे ऑटिझमच्या मुलांमध्ये सुधारणा दिसून आली आहे. पण किती दूध आणि ते किती काळापर्यंत घेत राहिले पाहिजे ह्याबद्दल पूर्ण संशोधन झालेले नाही.
  • ऑटिझम असलेल्या मुलांमध्ये प्रोबियॉटिक्सचा फायदा दिसून आलेला आहे. इडली, डोसा, दही, ताक, पनीर, ढोकळा, किमची आणि इतर आंबवलेले पदार्थ इत्यादीद्वारा प्रोबियॉटिक्स मिळू शकतो. ते सप्लिमेंट्सच्या स्वरूपात विकतही मिळतात. 

खाली दिलेले थेरपी प्रचलित आहेत पण त्याला वैज्ञानिक पुरावा नाही:

  • हेवी मेटलसाठी किलेशन (chelation) थेरपी: शरीरातील हेवी मेटल्स काढून टाकण्याच्या प्रक्रियेला किलेशन म्हणतात. संशोधनांती याचा फायदा तर नाहीच पण उलट नुकसानच दिसून आले.
  • एचबीओटी (हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपी)
  • स्टेम सेल थेरपी (अजूनही संशोधन सुरू आहे)
  • ग्लूटेन फ्री डाएट किंवा केसिनफ्री डाएट यासारखे विशेष डाएट
  • व्हिटॅमिन बी 12 चे इंजेक्शन्स

ऑटिझम साठी कोणतेही औषध उपलब्ध नाही, पण त्यांच्यामध्ये दिसून येणाऱ्या समस्यांसाठी औषधांचा वापर करता येतो जसे की झोपेच्या समस्या, एपिलेप्सी/अपस्मार, अग्रेशन/आक्रमकता, एडीएचडी (अतिचंचलता), मूड डिसऑर्डर, चिंता (अँक्सिएटी) इत्यादी. रिस्पेरिडॉन, ऍबिलिफाय, क्लोनिडीन, एडीएचडी ची औषधे, मेलॅटोनीन सारखी औषधे वापरतात.

थोडक्यात सांगायचे झाल्यास ऑटिस्टिक मुलांमध्ये वेगळी कौशल्ये असतात आणि ते जगाकडे आणि आजूबाजूच्या परिस्थितीकडे खूप वेगळ्या पद्धतीने पाहतात. त्यामुळे ते सामान्य लोकांपेक्षा वेगळे असतात.

ऑटिझम असलेल्या प्रसिद्ध व्यक्ती: जरी ऑटिझममुळे दैनंदिन जीवनात आव्हाने आणि अडचणी निर्माण होतात, पण त्यांच्यामध्ये जगाला आश्चर्य करण्यासारखी प्रतिभा असू शकते. उदा.:

  • बिल गेट्स- मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे सह-संस्थापक
  • टेम्पल ग्रँडिन – प्राणी शास्त्रज्ञ
  • स्टीव्ह जॉब्स – ॲपलचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी
  • एलोन मस्क- टेस्लाचे संस्थापक
  • सतोशी ताजिरी- पोकेमॉनचे निर्माते आणि अशी खूप सारी मंडळी!

२ एप्रिल हा जागतिक स्वमग्नता जनजागृती दिन (ऑटिझम अवेरनेस डे) म्हणून ओळखला जातो.

ऑटिझमकडे एक स्टिग्मा/ काळीमा म्हणून न पाहता तसेच त्याबद्दल जनजागृती व्हावी ह्या उद्देशाने सेसमी स्ट्रीट (गली गली सिम सिम) ह्या अमेरिकन टीव्ही शो ने जुलिया नावाचे एक पात्र तयार केले आहे. तिला ऑटिझम असल्याचे दाखवले आहे.

ऑटिझमवर आधारित काही हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपट आहेत:

पालकांसाठी टिप्स:

  • ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरबद्दल जास्तीत जास्त जाणून घ्या
  • जर मुलांमध्ये काही रेड फ्लॅग दिसल्यास विलंब न करता स्पेशालिस्टकडे घेऊन जा.
  • लवकरात लवकर निदान झाल्यामुळे मुलाला थेरपी आणि इतर ट्रीटमेंट मिळून त्याचा चांगला फायदा दिसून येतो
  • मुलाच्या ऑटिझमसाठी स्वतःला दोष देऊ नका
  • माझ्या मुलाला ऑटिझम आहे हे कळल्यास लोक काय म्हणतील असा विचार सोडून द्या
  • ऑटिझम असणाऱ्या मुलांच्या पालकांच्या संपर्कात राहा आणि विचारांची देवाण-घेवाण करा. म्हणजे त्याचा फायदा होईल
  • गरज पडेल तेव्हा स्पेशालिस्टची मदत घ्या
  • ऑटीझम असणार्‍या मुलांना वाढवणे सोपे नसते. पूर्ण कुटुंबावर त्याचा ताण येऊ शकतो. त्यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. म्हणून स्वतःसाठी कुटुंबातील इतर सदस्यांसाठी वेळ काढा आणि काळजी घ्या.

17 Replies to “ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर”

  1. Very nice article, khupach Chan and changalo mahiti ahe.vishesh ki Autism mule khup pudhe jau shakatat because they are unique

    1. Thank you. Pan saglich mule pudhe jaau shakat nahit. Ji mule spectrumchya higher end la mhanje jyanchi speech changli and good IQ asto, ti mule barich pragati karu shaktat. Mulanchi spectrum ver chi position mahatvachi aste.

  2. This information is really helpful for teacher because every child has having trouble with some other things and for that type of students we should be aware

    1. That is very true. Here in America, many times teachers suggest parents to get their child evaluated for autism. Many parents are either unaware of autism or are in denial. I am glad that you found my article useful! Thank you.

  3. खूपच छान माहिती.अनेक शंका कुशंकांचे निरसन.मेहेनत करू व ऊत्तम पिढी तयार होवो.अभिनंदन.

  4. खूप छान माहिती आहे लहान मुलांचं लवकर समजत नाही पण हे वाचल्या वर समजते मुलांमध्ये काय बदल आहे त्या प्रमाणे वागता येतेधन्यवाद savitra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *