Money मंदिर


पाच-पाच पैश्यांच्या नाण्यांचे Money मंदिर (पैश्याचे मंदिर) आणि आईसफ्रुट (म्हणजे पॉप्सीकल) चा एक मजेशीर किस्सा ह्या लेखातून तुमच्याशी शेयर करत आहे.

१९७६ ला आमचे नवीन आरसीसी (RCC) चे घर बांधून तयार झाले होते. त्या काळी बांधलेल्या नवीन घरांच्या बैठकीच्या खोलीत मुख्य भिंतीवर शोकेस असायचे. त्याला काचेचे दार असायचे. नावाप्रमाणे शोकेसमध्ये शोभेच्या वस्तू ठेवलेल्या असायच्या. आमच्याही बैठकीच्या खोलीत असे मोठे शोकेस होते आणि त्यात सगळ्या शोभेच्या वस्तू ठेवलेल्या होत्या. त्या शोभेच्या वस्तूंपैकी एक म्हणजे पैशाचे मंदिर म्हणजेच मनी मंदिर. त्या मंदिराशी निगडित असलेली ही एक मजेशीर गोष्ट! 

लग्नाच्या वेळी रुखवतात ठेवण्यासाठी बऱ्याच वस्तू आमच्या घरी सुध्दा बनायच्या. मोठ्या बहिणीच्या रुखवतात ठेवण्यासाठी असेच एक मंदिर बनवलेले होते. त्याकाळी एक-एक पैशाची छोटी चौकोनी आकाराची नाणी वापरात होती. अशी नाणी जमा करून स्टिकफास्टच्या मदतीने एक छोटेसे मंदिर मोठ्या बहिणीने बनवलेले होते. एक पैश्याची नाणी आकाराने लहान असल्यामुळे ते मंदिरापेक्षा तुळशी वृंदावनासारखे वाटायचे. काही वर्षांनी एक पैशाच्या ऐवजी पाच पैशांची नाणी वापरून असे मंदीर बनवलेले होते. त्यासाठी बँकेतून चकचकीत नाणी आणून त्याचा वापर केला होता. त्या मंदिराला चार भिंती, पुढे दाराची चौकट, वरती चार-पाच पायऱ्या आणि त्यावर कळस होता. कळसावर छोटासा भगव्या रंगाचा झेंडा होता. चकचकीत नाण्यांमुळे मंदिर अतिशय सुंदर दिसायचे. त्यावर ऊन पडले की चमकायचे. तर असे हे सुंदर मनी मंदिर आमच्या शोकेसमध्ये विराजमान झालेले होते.

हा फोटो माझा नसून नेटवरचा फोटो वापरला आहे.

उन्हाळा सुरू झाला की कानावर “आईस फ्रुटsss” अशा आरोळ्या पडायच्या. बऱ्याचदा ते “आईस क्रेट” असेच ऐकायला यायचे. आईस फ्रुटच्या फॅक्टरीत रंगीबेरंगी, थंड आणि गोड असे आईस फ्रुट बनायचे. एका दीड फूटाच्या फ्लास्कच्या डब्यात असे रंगीबेरंगी आईस फ्रुट घेऊन तरुण मुले गल्लो-गल्ली विकायचे. त्याला भरपूर मागणी असायची. त्याकाळी पाच पैशाला एक आईस फ्रुट मिळायचे. सगळी लहान मुले त्याची वाटच पाहायची. तो आला रे आला कि आपापल्या आयांकडून पाच पैसे घेऊन आपल्या आवडीच्या रंगाचे मस्त गोड आणि गार गार आईस फ्रुट विकत घ्यायचे. बघता बघता तो फ्लास्कचा डबा रिकामा व्हायचा. माझी दोन लहान भावंडे- राम लखन आईस फ्रुट घेण्यासाठी नेहमी सज्ज असायचे. आईकडे जाऊन, झटपट पैसे घेऊन आईस फ्रुट विकत घेणे असा त्यांचा दिनक्रम असायचा.

हा मजेशीर किस्सा घडला त्या वर्षीची गोष्ट. उन्हाळा सुरू झाला. नेहमीप्रमाणे राम लखनचे आई कडून पैसे घेणे आणि आईस फ्रुट विकत घेणे असा क्रम सुरू होता. का कोण जाणे पण काही दिवसानंतर ते आईकडे पैसे मागेनासे झाले. आईला वाटले की मुले कदाचित कंटाळली असतील. पण त्याचे रहस्य थोड्याच दिवसात उलगडले.

आईच्या एका मैत्रिणीच्या मुलीचे लग्न ठरले होते. त्या काकूंना मुलीच्या लग्नात रुखवतात देण्यासाठी असेच पैशाचे मंदिर बनवायचे होते. त्यासाठी त्या आमच्याकडे आल्या. त्यांना जाणून घ्यायचे होते कि एकूण किती नाणी लागतात आणि नेमके मंदिर कसे बनवायचे. त्यासाठी ते मंदिर जवळून पाहण्यासाठी आमच्याकडे आल्या होत्या.आईच्या आणि त्यांच्या गप्पा झाल्या. चहापाणी झाले. काकूंना दाखवण्यासाठी म्हणून आईने शोकेसच्या काचेचा दरवाजा उघडून मंदिर बाहेर काढले. मंदिराचा मागचा भाग पाहून आई चक्रावली. ज्याप्रमाणे औरंगजेबाने हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली होती तसेच आमच्या मनी मंदिराचे झालेले होते. मंदिराच्या मागच्या भागातली जवळपास सगळी नाणी गायब झालेली होती. ते पाहून आई आणि काकूंना हसू आवरेना. थोड्या वेळाने काकू निघून गेल्या. आईने आम्हाला तो सगळा किस्सा सांगितला. आम्ही सगळे त्या मंदिराकडे पाहून हसतच राहिलो. हे काम छोट्याशा राम लखनच्या जोडीचे असणार याबद्दल तिळमात्र शंका नव्हती. आम्ही त्यांना रंगेहात पकडून मजा घ्यायची असे ठरवले.

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे गल्लीत आईस फ्रुट विकणारा मुलगा आला. त्याची आरोळी कानावर पडताच ठरल्याप्रमाणे आम्ही सगळे शो केस व्यवस्थित दिसेल अशा ठिकाणी लपून बसलो. थोड्याच वेळात राम लखनची जोडी चोर पावलाने शोकेश जवळ आली. इकडे तिकडे पाहून खात्री करून घेतली की कोणी आपल्याला पाहात नाही. एकाने पाळत ठेवली आणि दुसर्‍याने स्टुलावर चढून हळूच शोकेसचे दार उघडून मंदिराच्या मागच्या भागातली दोन नाणी काढून घेतली. नाणी खिशात घालून ते पळणार कि आम्ही सगळे तिथे प्रकट झालो. चोरी पकडल्या गेल्यामुळे ते दोघे कावरेबावरे झाले. आम्हाला हसू आवरत नव्हते. त्या दोघांनी कबुली दिली की, त्यांनीच एक एक करत नाणी घेऊन आईस फ्रुट विकत घेत होते. त्याचे कारणही मजेशीर होते. एके दिवशी आईस फ्रुटवाला गल्लीत आला तेव्हा ह्या दोघांनी आईकडे पैशाची मागणी केली होती. आई कामात व्यस्त असल्यामुळे त्यांना लवकर पैसे मिळाले नाहीत आणि पैसे मिळेपर्यंत आईस फ्रुटवाला निघून गेला होता. त्यामुळे त्यांनी आईवर विसंबून न राहण्यासाठी ही आयडिया शोधून काढली होती. त्या दिवसापासून रोज दोन-दोन करत मंदिराची नाणी घेऊन आईस फ्रुट विकत घेत होते. कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून मंदिराच्या मागच्या भागातली नाणी काढत राहिले होते.

आईने पुन्हा बँकेतून पाच-पाच पैशांची चकचकीत नाणी मागवली. त्या नाण्यांनी आम्ही आमच्या मनी मंदिराचे जीर्णोद्धार केले. 😂 राम-लखनला सक्त ताकीद दिली की यापुढे मनी मंदिराचे पैसे काढायचे नाहीत. त्या ऐवजी एक छोटी मनी बँक म्हणजे गल्ला त्यांच्या सुपूर्द करण्यात आला.


13 Replies to “Money मंदिर”

  1. फारच छान, अश्या गोष्टी तुन खूप आनंद मिळतो त्याचे मोल करता येत नाही

  2. वाचून लहानपणीचे दृश्य.डोळ्यासमोरून तरळूनन गेले..खुपच मस्त.. वास्तव घटना व मजेशीर किस्से..

  3. सावि, नेहमी प्रमाणे अतिशय सुंदर लिखाण

  4. 😂😂😂किती छान. अजुनही तसेच नटखट आहेत का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *