हा लेख इंग्लिशमध्ये वाचण्यासाठी इथे क्लीक करा: Guillain-Barre Syndrome (GBS) Awareness
जेव्हा आपल्या शरीरावर एखाद्या रोगाचा हल्ला होतो, तेव्हा आपली रोगप्रतिकार शक्ती शरीराचा बचाव करण्यासाठी सक्रिय होते. परंतु गीयन बारे सिंड्रोम (GBS) मध्ये हीच रोगप्रतिकार शक्ती चुकून स्वतःच्या शरीरावर हल्ला करते.
गियान बारे सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मिळ पण गंभीर न्यूरोलॉजिकल आजार आहे. GBS बद्दल जागरूकता वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यामुळे लवकर निदान, वेळेवर उपचार आणि त्यामुळे रिकव्हरी होण्याचे चान्सेस वाढतात. म्हणूनच हा लेखप्रपंच! असे आढळून आले आहे की अमेरिकेचे 32 वे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रूझवेल्ट यांचे 39 व्या वर्षी निधन पोलिओमुळे नव्हे तर GBS मुळे झाले होते.
गियान बारे सिंड्रोम म्हणजे काय?
गियान बारेसिंड्रोम हा एक ऑटोइम्यून विकार आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून मज्जातंतूंवर हल्ला करते. यामुळे मज्जातंतूंच्या संरक्षक आवरणाला (मायेलिन शिथ) नुकसान होते आणि मेंदू व शरीराच्या संवादामध्ये अडथळा निर्माण होतो.
GBS ची कारणे
GBS हा अनुवांशिक नसून प्रामुख्याने खालील संसर्गांमुळे ट्रिगर होतो:
- कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी (ज्यामुळे अतिसार होतो)
- सायटोमेगालोव्हायरस (CMV)
- एप्स्टीन-बार व्हायरस (EBV)
- झिका व्हायरस
- कोविड-19
- भारतात डेंग्यू आणि चिकुनगुनिया
क्वचित प्रसंगी, लसीकरण किंवा शस्त्रक्रियेनंतरही GBS उद्भवू शकतो. GBS संसर्गजन्य नाही; तो संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीच्या हल्लेमुळे होतो.
GBS ची लक्षणे:
GBS सहसा पायांमध्ये कमकुवतपणा किंवा मुंग्या येण्याने सुरू होते, जे हळू हळू शरीराच्या वरच्या दिशेने पसरते. इतर लक्षणे:
- बोलायला आणि गिळायला त्रास होणे
- शरीर कमजोर झाल्यासारखे वाटणे
- मूत्राशय किंवा आतड्याच्या कार्यावर नियंत्रण गमावणे
- खांदे आणि मांड्यांमध्ये तीव्र वेदना
- चालताना किंवा जिना चढताना तोल जाणे
- हृदयाच्या गती आणि रक्तदाबामध्ये चढउतार
- पक्षाघात (गंभीर प्रकरणांमध्ये)
- अत्यंत गंभीर अवस्थेत, GBS मुळे श्वास घ्यायला त्रास होऊन व्हेंटिलेटरची गरज लागू शकते.
लक्षणे पहिल्या २ ते ४ आठवड्यात प्रोग्रेस होतात. पूर्णपणे रिकव्हर होण्यास काही आठवडे ते काही महिने लागू शकतात तर काही लोकांना खूप जास्त वेळ लागतो.
GBS चे निदान आणि उपचार
GBS चे निदान करण्यासाठी खालील चाचण्या आवश्यक असतात:
- लंबर पंक्चर (पाठीतले पाणी/CSF/ स्पायनल फ्लुइडचे विश्लेषण)
- इलेक्ट्रोमायोग्राफी (EMG)
- नर्व कंडक्शन स्टडीज
GBS साठी कोणताही विशिष्ट रक्त तपासणी उपलब्ध नाही. GBS साठी नवीन उपचार पद्धती उपलब्ध आहेत:
- प्लाझ्मा एक्सचेंज: हानिकारक अँटीबॉडीज रक्तातून काढून टाकणे.
- इंट्राव्हेनस इम्युनोग्लोब्युलिन थेरपी (IVIg): निरोगी अँटीबॉडीज वापरून हानिकारक अँटीबॉडीज रोखणे.
- सपोर्टिव्ह केअर: फिजिकल थेरपी आणि पेनकिलर.
रिकव्हरी
- 80% लोक 6 महिन्यांत स्वतंत्रपणे चालण्यास सक्षम होतात.
- 15–20% लोकांना दीर्घकालीन कमकुवतपणा किंवा वेदना जाणवते.
- 5% लोकात गुंतागुंतींमुळे जीवघेणी ठरू शकतात.
गियान बारे सिंड्रोम (GBS) टाळण्यासाठी उपाय :
गियान बारे सिंड्रोम (GBS) टाळणे कठीण आहे कारण याचे नेमके कारण अद्याप ज्ञात नाही. हा आजार प्रामुख्याने संसर्गामुळे ट्रिगर होतो. त्यामुळे संसर्ग टाळण्यावर भर द्यावे.
- नियमितपणे हात धुणे,
- स्वच्छता राखणे,
- पिण्याचे पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घ्यावी,
- नेहमी स्वच्छ आणि ताजं अन्न खावे,
- रस्त्यावरचे किंवा उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे आणि
- अन्न (विशेषतः कोंबडीसारखे पोल्ट्री) व्यवस्थित शिजवून खाणे यामुळे या संसर्गांपासून बचाव करता येतो.
- रोगप्रतिकारशक्ती मजबूत करा: संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यासह निरोगी जीवनशैली स्वीकारल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा: इ…इम्युनीटीचा
या उपायांद्वारे GBS चा धोका कमी करता येऊ शकतो, परंतु पूर्णपणे टाळणे कठीण आहे. लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
Chan mahiti