डॉक्टर (आणि) नवरी


या लेखात माझ्या लग्नात घडलेला भावना आणि कर्तव्य म्हणजेच नवरी आणि डॉक्टर याबाबतचा किस्सा तुमच्याशी शेअर करत आहे.

माझे एमबीबीएस आणि ऍनेस्थेशिओलॉजि मध्ये स्पेशलायझेशन झाले आणि माझे लग्न ठरले. अरेंज्ड मॅरेज होते. आमच्यासारखे सासरकडचे पण मोठे कुटुंब. लग्न आमच्या गावी करण्याचे ठरले. 25 डिसेंबर 1994 असा लग्नाचा दिवस ठरला.

ह्या लग्नपत्रिकेतला मजकूर मी स्वतः तयार केला होता.

लग्न ऐन तोंडावर आलेले असताना माझ्या होणाऱ्या नवऱ्याचे मोठे बंधू विठ्ठल भाऊजी यांचा एक्सीडेंट झाला. डोक्याला, चेहऱ्याला आणि मानेला बऱ्याच जखमा झाल्या होत्या. जबड्याला इजा झाल्यामुळे तोंडाने गोळ्या घेणे कठीण जात होते. त्यामुळे त्यांना रोज अँटिबायोटिक आणि पेनकिलरची इंजेक्शनं सुरू होती.

त्याकाळी वेडिंग प्लॅनर्स नसायचे. माझ्या आईचा पाठचा भाऊ, श्री संगमेश्वर मामा हे आमच्याकडच्या तसेच इतर नातेवाईकांच्या लग्नामध्ये वेडिंग प्लॅनरसारखी भूमिका करायचे. आमच्याकडे लग्न ठरले कि ते येणार, ते सांगणार, कामे वाटून देणार आणि बाकीचे त्यांचे ऐकणार असा नियमच बनला होता. त्यांचा अतिशय दरारा असायचा. त्यांच्यासमोर बोलायची कुणाची हिम्मत नसायची. अगदी माझ्या आईची सुद्धा.

लग्नाचा दिवस उजाडला. माझ्या लग्नाचा मुहूर्त सकाळी 9:31 चा होता. सकाळचे 8:30 वाजले असतील. माझ्या सासरकडच्या मंडळींची जवळच्याच मंगल कार्यालयात राहण्याची सोय केलेली होती. आमच्या घरापासून जेमतेम तीन मिनिटांचे अंतर होते. माझी इकडे हेअर स्टाईल सुरू होती. तेवढ्यात संगमेश्वर मामा आले आणि मला म्हणाले की, “चल, आपल्याला कार्यालयात जायचे आहे. ताबडतोब!!” आम्हाला कळेच ना की ते असे का म्हणत आहेत. कारण लग्नाला तर अजून अवकाश होता. ते म्हणाले की तुला कार्यालयात जाऊन विठ्ठल भाऊजीना इंजेक्शनं द्यायची आहेत. आम्ही सगळे एका सुरात ओरडलो.. काsssय.??? आई म्हणाली, “गावात एवढे डॉक्टर्स आणि कंपाउंडर्स असताना हिला जायची काय गरज आहे?”  मामा म्हणाले, “आपली मुलगी डॉक्टर असताना दुसऱ्या डॉक्टरांची काय गरज?” मी मामांना सांगायचा खूप प्रयत्न केला की असे बरे दिसणार नाही. मला अजून तयार व्हायचे आहे. लग्न घटिका जवळ आलेली आहे. या इंजेक्शनमुळे अर्धा तास तरी वाया जाणार आहे. पण संगममामांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. आम्ही सगळे विरोध करत होतो आणि मामांच्या रागाचा पारा चढत होता. त्यांच्यापुढे आमचे काहीही चालले नाही आणि मला माझी तयारी बाजूला ठेवून त्यांच्यासोबत कार्यालयात जावे लागले. दुसरा पर्यायच नव्हता.

मी कार्यालयात पाऊल ठेवताच कुणीतरी आरोळी ठोकली.“नवरी मुलगी आली, नवरी मुलगी आली”. मग काय. सासरची सगळी मंडळी हातातली कामे बाजूला ठेवून मला पाहायला जमली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि कुतूहल स्पष्टपणे दिसत होते. मला खूप संकोच वाटत होता. एक तर माझी हेअर स्टाईल, मेकअप सगळं अर्धवट राहिलेलं होतं आणि मला नवीन मंडळींसमोर भाऊजींना इंजेक्शन द्यायचे होते. भाऊजी आतल्या खोलीत आराम करत होते. आम्ही सगळे तिथे गेलो. सगळीकडे पिनड्रॉप सायलेन्स होता. सगळ्यांच्या नजरा माझ्यावर खीळल्या होत्या. सगळेजण बारकाईने माझ्या प्रत्येक हालचालीचे निरीक्षण करत होते.

मी स्वच्छ हात धुतले. इंजेक्शन आणि सिरिंज हातात घेतली आणि त्यापुढे काय झाले मला कळलेच नाही. काहींच्या मनातही आले असेल कि हि आता गोंधळून जाईल, सिरिंज पाडेल किंवा हिचे हात थरथरतील वगैरे वगैरे. पण तसे काहीच झाले नाही. माझ्यातल्या नवरीची जागा एका डॉक्टरने घेतली होती. माझ्यातल्या डॉक्टरपुढे त्यावेळेस फक्त कर्तव्य दिसत होते. त्यांच्या दोन्ही दंडावर हळुवारपणे दोन इंजेक्शनं दिली. मी माझी डॉक्टर असण्याची जबाबदारी व्यवस्थितपणे निभावली आणि तिथून परत आले. परत आल्यानंतर पुन्हा नवरीच्या भूमिकेत गेले आणि उरलेली तयारी केली. लग्न सोहळा व्यवस्थितपणे आणि ठरलेल्या मुहूर्तावर पार पडला. त्यादिवशी मामांचा थोडा रागच आला होता. तासाभरात बोहल्यावर चढणाऱ्या नवऱ्या मुलीच्या मनात काय काय विचार सुरू असतात आणि भावनांचा कल्लोळ माजलेला असतो. तशा परिस्थितीत मामांनी मला एका विचित्र संकटात टाकले होते ज्याची काहीही आवश्यकता नव्हती. पण लग्नानंतर त्याच गोष्टीचे सासरच्या लोकांकडून भरभरून कौतुक झाले होते. जो तो त्याबद्दलच बोलत होता. तेव्हा मामांबद्दलचा राग कमी होऊन त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला होता.

डॉक्टर बनणे म्हणजे फक्त एक डिग्री घेणे नसून ती एक सामाजिक जबाबदारी असते ह्याची तीव्रतेने जाणीव झाली होती. भावनेपेक्षा कर्त्यव्याला प्राधान्य द्यावे लागते ह्याचा अनुभव आला होता.


20 Replies to “डॉक्टर (आणि) नवरी”

    1. खूप सुंदर वर्णन केलस,त्या मजेदार प्रसंगाचं.तुझ्यावर काय बेतलं असेल त्या वेळेला……
      लग्नाचा फोटो पण टाकलास,खूप छान वाटले….

  1. खूप छान सावि आपण नेहमीच तारेवरची कसरत करत असतो घरी आलं की घरची स्त्री ची भूमिका आणि हॉस्पिटल ला आपल्या profession ची भूमिका.

  2. Brilliant!! Loved to read this story…
    As usual nicely written , great presentation!
    Cover picture is so beautiful!!

  3. Beautifully narrated Event Savitra aunty.!!🫶 Yes, everyone expects from a doctor her/his duty even outside hospital , may it be any function or market.!!
    Doctor in us won’t leave us a moment..always reminds us about our social responsibility.!! N there is at least one “Sangameshwar mama” in every doctor’s life , who deserves thank you.!! 😊

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *