“आकाशवाणी” आणि मी


मी शाळेत असताना मला आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावर जाऊन समूह गीताच्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली होती. त्याची आठवण या लेखामध्ये शेअर करत आहे.

आमच्या लहानपणी TV नव्हता. त्याकाळी मनोरंजन आणि माहितीचे साधन म्हणजे रेडिओ. दिवसाची सुरुवातच रेडिओने व्हायची. सकाळी सहाच्या सुमारास आमच्याकडे रेडिओ लागायचा. रेडिओची प्रसिद्ध ट्यून लागली की डोळे खाडकन उघडायचे. आकाशवाणीची ही सिग्नेचर ट्यून वॉल्टर कॉफमॅन यांनी तयार केली होती. १९३०च्या सुमारास कॉफमॅन हे मुंबई आकाशवाणी केंद्राच्या पाश्चिमात्य संगीत विभागात संगीतकार म्हणून काम करत होते. त्या वेळी त्यांनी ही सिग्नेचर ट्यून तयार केली असल्याची माहिती आहे. तंबोरा आणि व्हायोलिन या वाद्यांचा वापर यात करण्यात आलेला आहे. ऑल इंडिया रेडिओ (संक्षिप्तपणे AIR) चे अधिकृतरीत्या ’आकाशवाणी’ हे नाव १९५७ साली ठरविण्यात आले. ते प्रसिद्ध हिंदी कवी पं. नरेंद्र शर्मा यांनी सुचविले होते.

सकाळी सकाळी रेडिओवर सुमधूर भक्तीगीतांचा कार्यक्रम सुरू व्हायचा. आजी सोनियाचा दिनू, रामा रघुनंदना, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, क्षणभर उघड नयन, जगी ज्यास कोणी नाही, आवडे हे रूप, उठी श्रीरामा अश्या लताबाई, आशाताई, माणिक वर्मा, सुमन कल्याणपूर यांची रसाळ भक्तीगीते कानी पडायची. त्यानंतर सुधा नरवणे यांच्या आवाजात बातम्या सुरू व्हायच्या. अशाप्रकारे सकाळची शाळेची तयारी रेडिओ सोबत होत असे.

माझे शालेय शिक्षण एका तालुक्याच्या गावी जिल्हा परिषद शाळेत झाले. गाव जरी लहान असले तरीही आमची शाळा कोणत्याही क्षेत्रात मागे नव्हती. आमच्या शाळेत खूप सारे ऍक्टिव्हिटीज सुरूअसायचे. मी आणि माझ्या मैत्रिणी जमेल तेवढ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घ्यायचो. आम्हा मुलींचा एक ग्रुप होता जो पार्श्वगायन करायचा आणि प्रार्थनेच्या वेळेस संत तुकडोजी आणि साने गुरुजींची गाणी गायचा. बोधनकर सर हार्मोनियम वाजवायचे आणि पोतदार सर हाताला घुंगरू बांधून तबला वाजवायचे. असा आमचा दोन व्यक्तींचा आर्केस्ट्रा होता.

एके दिवशी आमच्या शाळेकडे एक पत्रक आले. देशभक्तीपर समूह गीतांची स्पर्धा होती. त्यासाठी अट अशी होती की, आम्हाला औरंगाबादच्या आकाशवाणी केंद्रावर जाऊन लाईव्ह रेकॉर्डिंग करायचे होते. आमच्या वर्गशिक्षिका सौ. उत्तरवार बाई होत्या. आमच्या सगळ्यांच्या लाडक्या आणि आम्हाला सतत प्रोत्साहन देणाऱ्या होत्या. त्यांनी या स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती सांगितली आणि आपापल्या पालकांना विचारून यायला सांगितले. येण्या-जाण्याचा आणि राहण्या-खाण्याचा सगळा खर्च आपापल्याला करायचा होता. सरते शेवटी आम्ही पाच-सहा मुली त्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तयार झालो. आम्ही मुली, उत्तरवार बाई, बोधनकर सर आणि पोतदार सर औरंगाबादला जायचे ठरले. मग आमच्या तयारीचा श्रीगणेशा झाला. आम्हाला मुंबई आणि पुण्याच्या शाळांना टक्कर द्यायची होती. त्यामुळे एक प्रकारचे दडपण आलेले होते. शिक्षकांनी खूप विचार करून गाणी निवडली. त्यापैकी एक गाणे हिंदी तर दुसरे मराठी असे ठरले. हिंदी गाणे होते

ग म रे सा नी ध नी सा….
देश हमारा देश हमारा,उज्वल गगन का तारा,
जीसके बल पर मानवताने
अपना शिष उभारा, अपना शिष उभारा..
.

मराठी देशभक्तीपर गीत पुढे पुढे आम्ही जाऊया, क्रांती गीतची गाऊया… हे बोधनकर सरांनी खूप मेहनत करून अशा पद्धतीने बसवले की गाण्याचे प्रत्येक कडवे वेगवेगळ्या रागात! मग तिथून आमची गाण्यांची प्रॅक्टिस सुरू झाली. आम्ही सगळ्या मुलींनी अतिशय मनापासून आणि मेहनतीने प्रॅक्टिस केली आणि दोन्हीही गीते उत्तम रीतीने आत्मसात केली.

बघता बघता जाण्याचा दिवस उजाडला. मला आकाशवाणी हा शब्द खूप भारी वाटायचा. लहानपणापासून आईने सांगितलेल्या देवांच्या गोष्टीत आकाशवाणीचा उल्लेख असायचा. आकाशवाणी म्हणजे देवांची वाणी. त्यामुळे जेव्हा आकाशवाणी औरंगाबाद परभणी केंद्रावर जाऊन गाणी म्हणायची होती असे ठरले, तेव्हा स्वतःबद्दल अभिमान वाटू लागला.

गप्पा-गोष्टी-गाणी करत करत आमचा औरंगाबादचा प्रवास सुखकर झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी 10:00 वाजता आम्हाला आकाशवाणी केंद्रावर उपस्थित राहायचे होते. आम्ही सगळे तयार होऊन निघालो. सिटी बसने आम्ही केंद्रावर पोहोचलो. इमारतीच्या बाहेर मोठा फलक लागलेला होता ज्यावर आकाशवाणी औरंगाबाद असे लिहिलेले होते. त्या लोकांनी आम्हाला एका हॉलमध्ये बसायला सांगितलं. त्यानंतर त्यांनी आवश्यक असलेल्या सूचना दिल्या. त्यांनी सांगितलं रेकॉर्डिंग रूम मध्ये गेल्यानंतर कुणीही बोलायचं नाही. रेकॉर्डिंग सुरू होण्याच्या आधी तिथला लाल दिवा सुरू होईल. लाल दिवा सुरू होताच आम्हाला पहिले गाणे सुरू करायचे होते. आम्ही सगळे सज्ज झालो होतो. ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आला. लाल दिवा लागला आणि आम्ही प्राण पणाला ओतून गायला सुरुवात केली. पहिले गाणे यशस्वी रित्या रेकॉर्ड झाले. त्यानंतर आम्हाला दुसऱ्या रूम मध्ये ब्रेक साठी नेले.आवाज साफ होण्यासाठी तोंडात खडीसाखर घेऊन पाणी पिऊन आम्ही दुसऱ्या गाण्यासाठी सज्ज झालो. पुन्हा आम्हाला रेकॉर्डिंग रूम मध्ये नेण्यात आले आणि आमचे दुसरे गाणे सुद्धा व्यवस्थितपणे रेकॉर्ड झाले. ब्रेकरूम मध्ये आलो. सगळ्यांना हुश्श वाटले. तो एक स्वर्गीय अनुभव होता.आमची गाणी इतकी सुरेख झालेली होती की आम्हाला प्रथम क्रमांक मिळवण्यापासून कोणीही अडवू शकत नव्हते. प्रथम क्रमांक मिळवण्याची अपेक्षा घेऊन आम्ही परतलो. शाळेत आणि नातेवाईकांत आमचे कौतुक होत होते.

काही दिवसांनी स्पर्धेच्या निकालाचे पत्र आमच्या मुख्याध्यापकांकडे आले. आम्ही प्रथम क्रमांकाची अपेक्षा ठेवली होती पण आम्हाला द्वितीय पण नाही तर तृतीय पारितोषिक मिळाले होते. त्यादिवशी आमची निराशा तर नक्कीच झाली होती. माझे बालमन खट्टू झाले होते. अपरिपक्व वयामुळे त्यावेळी मन फक्त निकालावर केंद्रित झालेले होते. त्याची दुसरी बाजू लक्षात येत नव्हती. रेडिओ केंद्रावर जाऊन स्पर्धेसाठी देशभक्तीपर गाणी गाण्याची एक अलभ्य संधी मिळालेली होती आणि एक मौलिक आठवण पदरी पडली होती.

आयुष्याच्या या टप्प्यावर मागे वळून त्या अनुभवाकडे पाहिल्यानंतर जाणवले की, किती अलौकिक अनुभव होता तो. किती लोकांना असा अनुभव मिळतो? ज्या रेडिओ बरोबर आमचा दिवस सुरू व्हायचा त्याच रेडिओ केंद्रावर जाऊन गाणी सादर करण्याचा मान मिळाला होता. तेही एका छोट्याशा तालुक्यातल्या मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळेतून! माझ्या जीवनातल्या या सोनेरी अनुभवासाठी माझ्या शाळेचे तसेच माझ्या शिक्षकांचे शतशः आभार!


6 Replies to ““आकाशवाणी” आणि मी”

  1. सावित्रा, मी पण होते गाण्याच्या ग्रूप मधे. अतिषय अविस्मरणीय आठवण आहे ती माझ्या पण आयुष्यातली….
    काय दिवस होते ते शाळेचे…हाडाचे शिक्षक होते सर्व.खूप तयारी करून घ्यायचे आपल्याकडून.मला भारावून जायला होतं त्या आठवणींनी…..
    तुझे कौतुक करावे तितके कमीच आहे, एवढं सगळं व्यवस्थित जोपासलस

    1. अगदी खरंय गं. आपण खूप भाग्यवान होतो. अशी शाळा आणि असे शिक्षक आपल्याला लाभले.
      प्रतिभा, तुझा आवाज किती सुरेल होता. आणि तुला त्या गाण्याच्या काही ओळी आठवतात हे खूप ग्रेट आहे. थँक यु.

  2. Savi as usual great presentation of article. That tune of Akashwani is so nostalgic!
    So true our day used to start with all those songs and the same time school preparation.

  3. खूपच सुंदर अनुभव सावि, मी ही अश्या माध्यमातून आकाशवाणी वर गेलो होतो, नंतर मला स्वतंत्र तबला वादन सुद्धा करायला मिळाले, नंतरच्या काळात अनेक कलावंतां सोबत तबला संगत करायला मिळाली माझे गुरुजी रमेश सामंत हे आकाशवाणी औरंगाबाद वर तबला वादक होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *