अनमोल पत्र


स्वाध्याय परिवाराचे प्रणेते प.पू.पांडुरंगशास्त्री आठवले ह्यांनी आमच्या परिवाराला पाठवलेल्या अनमोल पत्राची आठवण ह्या लेखात शेयर करत आहे.

मी स्वाध्याय किंवा प.पू. पांडुरंगशास्त्री आठवलेजीं बद्दल सांगणे म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यासारखे आहे. पण ज्यांना स्वाध्यायबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे. 🙇‍♀️

पू. पांडुरंगशास्त्री आठवलेजीं अर्थात दादा किंवा दादाजी हे मराठी तत्त्वज्ञ होते. त्यांनी १९५४ मध्ये स्वाध्याय परिवारची स्थापना केली. स्वाध्याय चळवळ ही श्रीमद् भगवद्गीतेवर आधारित आत्मज्ञानाची चळवळ आहे. स्वाध्याय या शब्दाचा अर्थ “स्वतःचा अभ्यास” असा होतो. स्वाध्याय परिवार हा एक वैश्विक परिवार आहे. प्रत्येक कार्यकर्ता “स्वाध्यायी” म्हणून ओळखला जातो. योगेश्वर भगवान हे स्वाध्याय परिवाराचे आराध्य दैवत आहे.

पू. पांडुरंगशास्त्री आठवलेंजींचा जन्म १९ ऑक्टोबर, १९२० रोजी रोहे या कोकणातील गावात झाला. भगवंत केवळ आकाशात नाही, मंदिरात नाही तर माणसा-माणसाच्या ह्रदयात आहे. माणसातल्या या ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याचा संदेश देत त्यांनी अंधश्रध्दा, फसवा ईश्वरवाद, व्यसने आणि परिस्थितीपुढे हतबल झालेल्या समाजाला गीताविचारांची दिशा दिली. त्यांचा जन्मदिवस वैश्विक स्वाध्याय परिवार ‘मनुष्य गौरव दिन’ या सार्थ नावाने साजरा करतो. त्यांना रेमन मॅगसेसे, टेंम्पलटेंट पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, पद्मविभूषण, अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्यांचे कार्य भारतातील अनेक राज्यांत व कॅरिबियन, अमेरिका, आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, मिडल-ईस्ट, मध्य पूर्व आणि आफ्रिका यासह ३५ पेक्षा जास्त देशांमध्ये पसरले आहे. ठाण्याला त्यांनी तत्वज्ञान विद्यापीठाची स्थापना केली. २५ ऑक्टोबर २००३ रोजी त्यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने देहावसान झाले. ते आज शरीररूपाने आपल्यात नसले तरी त्यांचे जीवन व कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या पश्चात त्यांची मानसकन्या, श्रीमती धनश्री तळवलकर (दीदी) यांनी पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या विचाराला आणि कार्याला वाहून घेतले आहे.

दादाजींनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत जी सगळ्यांना मार्गदर्शक आहेत. लेखक राजेंद्र खेर यांनी पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘देह झाला चंदनाचा’ ही कादंबरी लिहिली आहे.

दादाजींनी लिहिलेले साहित्य जवळपास माझे वाचून झालेले आहे. देह झाला चंदनाचा वाचायचे राहिले होते जे मागच्या महिन्यात झाले. माझ्या भावाने यूट्यूबवरच्या ऑडिओ बुक बद्दल सांगितल्यावर रोज हॉस्पिटल मध्ये जाताना आणि घरी येतानाचा ड्राइविंगचा वेळ सदुपयोगी लावून ऑडिओ बुक ऐकले. ऑडिओ बुक बनवणाऱ्या दीपिका ठाकूर ताईंना धन्यवाद. खाली लिंक देत आहे जर कोणाला ऐकायचे असेल तर.

जगभरातले असे लाखो करोडो स्वाध्यायी लोक ज्यांनी त्यांना प्रत्यक्ष कधी पाहिलेले नाही पण केवळ त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेले आहेत. असे असताना जर मी सांगितलं कि दादाजींनी त्यांच्या दोन्ही भेटीत आमच्याकडे वास्तव्य केले होते तर तुमची प्रतिक्रिया कशी असेल?

माझे माहेर देगलूर, जे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातले एक तालुक्याचे गाव. माझे बाबा श्री.गोविंदराव रेखावार, एक प्रतिष्ठित व्यापारी होते. माझे आई-बाबा देवभोळे, निगर्वी, सरळमार्गी आणि सगळ्यांना जमेल तशी मदत करणारे होते. आमचे एकत्र कुटुंब होते. गावात कोणतेही महाराज, संत, गुरु आले कि लोक त्यांना सरळ आमच्या घरी घेऊन यायचे. अनेक संतांचे पाय आमच्या घराला लागले आहेत. देगलूरचे वारकरी सांप्रदायाचे गुंडा महाराज मठ हे एक खूप प्रतिष्ठेचे अध्यात्मिक शक्तीपीठ. तिथल्या सगळ्यांशी बाबांचे खूप जवळचे संबंध होते. प. पु. धुंडा महाराजांशी त्यांच्या खूप गप्पा रंगायच्या.

तेलंगणातल्या निझामाबाद जिल्ह्यातल्या आरमुरहुन विठोबाजी नावाचे स्वाध्यायी दर आठवड्याला देगलूरला यायचे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूरला स्वाध्यायचा पाया रोवला गेला. बघता बघता गावातली कित्येक कुटुंबे स्वाध्यायी बनली. माझ्या आई-बाबासोबतच सगळे भाऊ-भावजया स्वाध्यायी झाले होते. आई-बाबांच्या पश्चात त्यांनी त्यांचे कार्य अजूनही सुरू ठेवले आहे. भाचे मंडळी सुद्धा त्याच वातावरणात वाढली आहेत.

दादाजींनी देगलूरला दोनदा भेट दिली होती. पहिल्यांदा १९८३ मध्ये आणि दुसऱ्यांदा १९८४ मध्ये. दादाजींच्या स्वागतासाठी आणि सेवेसाठी पूर्ण गाव सज्ज झाले होते. कोणत्याही गावाच्या भेटीत ते सहसा कोणाच्या घरी राहत नसत. पण त्यांच्या दोनही भेटीत त्यांनी आमच्या घरी वास्तव्य केले होते. आमच्यासाठी केवढी अभिमानाची आणि भाग्याची गोष्ट होती! माझ्या आई बाबांची पुण्याई! दुसरे काय. त्यांच्या पुण्य पदस्पर्शाने आमची वास्तू पावन झाली होती. त्यामुळे सगळा स्वाध्याय परिवार आमच्या घराला एका मंदिरासारखे मानायचे. ते घरी आल्यानंतर माझ्या आईने चक्क त्यांची दृष्ट काढली. तेव्हा ते म्हणाले कि त्यांना त्यांच्या आईची आठवण झाली. आमच्या परिवाराला त्यांना जवळून पाहण्याचे आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचे भाग्य लाभले होते. माझ्या एका महिन्याच्या भाच्यासाठी त्यांनी योगेश असे नाव सुचवले होते. माझ्या बाबांनी शाल पांघरून दादाजींचे स्वागत केले होते. तीच शाल त्यांनी आशीर्वाद म्हणून छोट्या योगेशला पांघरली होती. आमच्याकडे राहणे-नाश्ता आणि जेवण गुंडा महाराज मठात म्हणजे ह. भ. प. धुंडा महाराज यांच्याकडे असे ठरले होते. माझ्या आईच्या हातच्या रुचकर उपम्याचा आणि माझ्या साऊथ इंडियन वहिनीच्या हातच्या इडली-सांबाराचा त्यांनी आस्वाद घेतला होता.

ह.भ.प.धुंडा महाराज यांची नात, ऋता ही माझी जिवलग मैत्रीण. त्यांच्याकडे दादाजींच्या जेवणाची व्यवस्था केलेली होती. ऋताने माझ्याशी शेयर केलेल्या काही आठवणी इथे शेयर करत आहे. दादाजींसोबत पू.अनंत महाराज आठवलें सुद्धा पंगतीला होते. ऋताच्या सुगरण आईने म्हणजे सुमती काकुंनी तेव्हा पंचपक्वान्नाचा बेत केला होता. त्याचबरोबर मराठवाडा स्टाईलची मुद्दा भाजी पण केली होती. मुद्दा भाजी म्हणजे अळू (चमकुरा) किंवा मेथी किंवा पालकची बेसन घालून केलेली भाजी. दादाजींना त्या भाजीचे नाव आणि चव खूपच आवडले होते. जेव्हा काकू पक्वान्नाचा आग्रह करत होत्या, तेव्हा दादाजी म्हणाले, “अहो वहिनी, त्यापेक्षा तुमचा मुद्दा आणा मुद्दा”! पंगतीतली मंडळी हसू लागली. अश्याप्रकारे हसत खेळत जेवणे उरकली आणि सगळ्यांच्या गप्पा रंगल्या.

ऋताचे बाबा तिच्याकडून, तिच्या बहिणीकडून आणि लहान भावाकडून रोज पाठांतर करून घेत असत. रोज संध्याकाळी विविध स्तोत्रं, अष्टकं, गीता शिकवत असत. त्यावेळी नूकतेच त्यांनी शिवताण्डवस्तोत्र हे अवघड असे स्तोत्र शिकवले होते. जेवणानंतर ऋताच्या आजोबांनी त्यांच्या स्तोत्रपठणाविषयी दादाजींना कौतुकाने सांगितले. तिचा भाऊ, चैतन्य, सर्वात लहान म्हणून त्याला स्तोत्र म्हणायला सांगितले. त्याने नुकतेच मुखोद्गत झालेले शिवताण्डवस्तोत्र खड्या आवाजात म्हटले. दादाजींना ते खूपच आवडले. ते आजोबांना म्हणाले, हे स्तोत्र मलादेखील पाठ नाही. परंतु पुढच्यावेळी येताना मी नक्की हे मुखोद्गत करून येईन. आणि खरंच त्या वयात त्यांनी ते मुखोद्गत केले व नंतर जेव्हा पुन्हा ते देगलूरला आले तेव्हा त्यांनी आवर्जून सांगितले कि, मलाही आता ते स्तोत्र पाठ झाले आहे. धन्य ती चिकाटी आणि तो उत्साह !! 🙏 तो खड्या आवाजात शिवताण्डवस्तोत्र म्हणणारा १२ वर्षांचा चुणचुणीत मुलगा चैतन्य म्हणजेच आत्ताचे ह.भ.प.चैतन्य भानुदासमहाराज देगलूरकर, जे वेदान्ताचे गाढे अभ्यासक, तसेच विवेकचूडामणी, ब्रह्मसूत्रभाष्य आणि महाभारतासोबत ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, श्रीमद्भगवतगीता, श्रीमद्भागवत अशा श्रेष्ठ ग्रंथाचे अभ्यासक आणि विसाव्या शतकातल्या तरुण पिढीतील नामवंत कीर्तनकार आहेत.

२५ डिसेंबर १९८५ रोजी माझे बाबा इहलोकाची यात्रा संपवून आम्हाला सोडून गेले. त्यांनी त्यांच्या जीवनात हजारो लोकांना मदत केली होती. मार्गदर्शन करून त्यांचे जीवन बदलून टाकलेले होते. त्यांच्या जाण्याने आमचा परिवार, सगळा गाव, आणि नातेवाईक शोकसागरात बुडून गेले होते. त्या दुःखमय काळात एक अनपेक्षित गोष्ट घडली. मुंबईहून दादाजींचे तत्वज्ञान विद्यपीठाचे सील असलेले एक पत्र आले. सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. कोणाचे पत्र? काय लिहिले असेल त्यात?

माझ्या मोठ्या भावाने थरथरत्या हाताने लिफाफा उघडून पत्र वाचायला सुरुवात केली. त्याच्या चेहऱ्यावर संमिश्र भावना स्पष्ट दिसत होत्या. ते चक्क दादाजींचे सांत्वन पर पत्र होते. तो एक एक ओळ वाचत होता आणि सगळ्या ऐकणाऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वहात होते. तो एक वेगळाच अनुभव होता. बाबा गेल्याचे दुःख होते आणि खुद्द दादाजीनी पत्राद्वारे आम्हा सगळ्यांना संदेश पाठवला होता. दिलासा दिला होता. त्यांचा एक एक शब्द थेट हृदयाला स्पर्श करत होता. असे वाटत होते कि ते स्वतः येऊन आमच्या डोक्यावरून सांत्वनाचा हात फिरवत होते. दादाजींच्या करोडो अनुयायींमध्ये एका छोट्याश्या गावातल्या माझ्या बाबांच्या निधनाची दखल घेऊन त्यांनी सांत्वन पत्र पाठवले होते. आमचे किती अहोभाग्य! ते आशीर्वादरूपी पत्र म्हणजे आमचा अमूल्य ठेवा आहे.

ज्या आई-बाबांच्या पुण्याईमुळे खुद्द दादाजी दोन वेळेस आमच्याकडे आले आणि बाबा गेल्यानंतर सांत्वनपर पत्र पाठवले अश्या भाग्यवान आणि पुण्यवान माता-पित्याची मी मुलगी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.💖 जय योगेश्वर!🙏


26 Replies to “अनमोल पत्र”

  1. छान लिहिले आहे. देगलूरकडील सर्व आठवणी जाग्या झाल्या.

    1. जय योगेश्वर,
      Dr Savitra, many thanks for sharing such a great memories of Dadaji with your family.
      – Greetings from London
      Vivek Mamidwar

  2. तुम्ही तुमच्या आठवणी सांगितल्या मुळे त्या आम्हाला कळल्या. दादांचा भावस्पर्श तुम्ही छान शब्दात मांडलात. खूप खूप आभार.

  3. लेखन शैली खूपच छान !!
    वाचून मन गहिवरून आलं.

  4. जय योगेश्वर,
    Dr Savitra, many thanks for sharing such a great memories of Dadaji with your family.
    – Greetings from London
    Vivek Mamidwar

  5. खुपच अनमोल आहे हा दादांच्या पत्राचा ठेवा, तसेच तुझे त्याविषयीचे लिखाण.

  6. Great .. memories of Dadaji .. it shows us that still Dadaji with us.. He was such a great man. U have got real treasure of life .His love, thought, and his work will always inspire to next many generation.
    Thanks for sharing

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *