कमल आणि कलम


माझी थोरली बहिण अनुसूया. तिला आम्ही आक्का म्हणतो. तिच्या लहानपणीचा एक मजेदार किस्सा “कमल आणि कलम” तुम्हाला सांगणार आहे.

मोठी बहीण म्हणजे आईचं एक रूपच. कारण आईनंतर पाठीशी तिचा आशिर्वाद सतत असतो. दोन मुलांनंतर झालेली पहिली मुलगी म्हणून आक्का आई-बाबांची विशेष लाडकी होती. ती अभ्यासात खूप हुशार. पण बाबांनी सातवीनंतर तिला शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आणि ती पुढे शिकू शकली नाही. तिच्या मैत्रिणीचे बाबा आमच्याकडे येऊन बाबांना म्हणाले कि, तुमची मुलगी हुशार आहे. ती पुढे शिकून मोठी बनेल. ते गमतीने असेही म्हणाले कि, माझ्या मुलीला शाळा आणि शिक्षण अजिबात आवडत नाही. माझ्या मुलीला तुम्ही दत्तक घ्या आणि तुमची अनुसूया मला दत्तक द्या. मग मी तिला खूप शिकवेन. 

एकदा शाळेतल्या बाईंनी आक्काच्या वर्गात सांगितले कि उद्या सगळ्यांनी मोत्यासारख्या अक्षरात स्वतःचे नाव लिहून आणा. तिने त्याचा अक्षरशः अर्थ काढला आणि चक्क सुई-दोऱ्यात मोती ओवून मोत्याच्या अक्षरात स्वतःचे नाव लिहिले. दुसऱ्या दिवशी बाईंनी तिची वही वर्गात दाखवल्यानंतर हशा पिकला. 

शाळा संपवून लग्न होईपर्यंतच्या काळात आईच्या हाताखाली घरकामात तरबेज झाली होती. आईला तिचा खूप आधार होता. ती आम्हां लहान भावंडांना सांभाळायची. वयाचे अंतर असल्यामुळे माझी दोन्ही लहान भावंडे तिच्या अंगा-खांद्यावर वाढली. झी मराठीच्या ‘होणार सून मी ह्या घरची‘ ह्या सिरिअलमधल्या जान्हवी प्रमाणे पाच सासवांच्या घरात नांदायला गेली. सासरी एकत्र कुटुंब असल्यामुळे भरपूर सण-समारंभ-लग्नें, बाळंतपणे असे खूप सारे कार्यक्रम तिच्या वाटेला आले आणि ती कामात एकदम एक्स्पर्ट बनली. माझी एंगेजमेंट असो, लग्न असो, बाळंतपण असो कि मुलांचे बारसे असो, ती धावून यायची आणि कार्य यशस्वीरीत्या पार पाडण्यास मदत करायची. तिला शिकायला मिळाले नाही म्हणून जिद्दीने दोन्ही मुलांना डॉक्टर-इंजिनियर बनवले. 

मी औरंगाबादच्या मेडिकल कॉलेजच्या मुलींच्या हॉस्टेल वर ४.५ वर्षे राहिले होते. आम्हाला जेवणाची मेस होती. त्यात रोज लंच आणि डिनर मिळायचे. एखादा सण असला कि फीस्ट (मेजवानी) असायची. शेवयाची खीर किंवा गुलाबजामून असे सकाळच्या जेवणात देऊन त्याला मेजवानी म्हणायचे 😛 आणि त्या रात्री मेस बंद असायची. मग मॅग्गी नूडल्स, खिचडी किंवा क्रांती चौकातली पाव-भाजी आमच्या मदतीला धावून यायची. कुठलातरी सण होता. आम्हाला फीस्ट मध्ये गुलाबजामून होते. सगळ्यांची जेवणे आटोपली आणि ४-५ तासानंतर एक एक करत सगळ्या मुलींना उलट्या-जुलाब आणि पोटदुखी सुरु झाली. हॉस्टेलवर एकानंतर एक ऍम्ब्युलन्स यायला सुरुवात झाली. गुलाबजामून बनवण्यासाठी वापरलेल्या खव्यातून फूड पॉइजनिंग म्हणजे विषबाधा झाली होती. गुलाबजामून न खाल्लेल्या आणि खाऊनही विषबाधा न झालेल्या माझ्यासारख्या काही मुली होत्या. मग आम्ही सगळ्यांना जमेल तेवढी मदत करत राहिलो. त्याकाळी टेलिफोन नव्हते. आम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ऍडमिट झालेल्या मुलींच्या पालकांना टेलिग्राम पाठवून कळवत राहिलो. संध्याकाळपर्यंत सगळीकडे बातमी पसरली कि मुलींच्या हॉस्टेलवर विषबाधा झाली. फूड इन्स्पेक्टर वगैरे आले, चौकशी झाली आणि आमच्या मेसला सील लागले. मी MBBS च्या फायनल इयरला होते. माझी फायनलची परीक्षा एका महिन्यावर आलेली होती. त्याकाळी बाहेरून फूड मागवण्याच्या सुविधा नव्हत्या. सगळेजण आपापल्या घरून आई, काकू, मावशी, आज्जी असे जमेल त्यांना बोलावून घेतलं. त्यावेळी माझ्या मदतीला आक्का धावून आली. तिने एक महिना माझ्या हॉस्टेलवर राहून, त्या छोट्याश्या रूममध्ये विविध प्रकारचे डिशेस करून मला खाऊ घातले. तिच्या मदतीने मी निर्धास्तपणे अभ्यास करून MBBS पास होऊ शकले. अमेरिकेला आल्यानंतरही दिवाळीला तिच्या हातच्या फराळाचे पार्सल पाठवून मला गोड सरप्राईज दिले होते.

तिने स्मार्ट फोन घेऊन व्हाट्सअँप सेट केल्यानंतर तिच्या मुलाने तिचा कॉन्टॅक्ट नम्बर मला फॉरवर्ड केला. त्याने “आई” असा सेव्ह केलेला होता. अजूनही माझ्या फोनमध्ये तिचा नम्बर “आई” ह्या नावानेच सेव्ह आहे. तिला फोन करताना कुठेतरी मन सुखावते कि मी “आई” ला फोन करत आहे. त्यामुळे मी ते तसेच ठेवले आहे. 

आईने आणि आक्काने सांगितलेला एक मजेदार किस्सा आहे. आमच्या घराशेजारी एक तेलुगू जोडपे राहायचे. सत्यव्वा आणि गुंडय्या. त्यांना मूल-बाळ नसल्यामुळे भाचीला आणून घेतले होते. ती आक्काच्या वयाची होती. तिचे नाव कमल. तिला कमली म्हणायचे. त्यांनी तिला आक्कासोबत तिच्या शाळेत पाठवायचे ठरवले. मग आक्का आणि कमल रोज शाळेत एकत्र जायच्या, एकाच बेंचवर बसायच्या आणि घरी येताना पण मिळून यायच्या. त्यांची छान जोडी जमली होती. कधी भांडायच्या, कधी एकमेकींवर रुसायच्या तर कधी गोडी गुलाबीने राहायच्या. त्यांचे दप्तर म्हणजे एक कापडी पिशवी आणि त्यात पाटी-कलम.

आमचे गाव मराठवाडा-तेलंगणा-कर्नाटकच्या सीमेवर असल्यामुळे कदाचित पाटीवरच्या पेन्सिलला कलम म्हणायचे (हिंदी/उर्दू शब्दाचा वापर करत असावेत). त्यामुळे ह्या लेखात वापरलेला कलम शब्द म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून पाटीवरची पेन्सिल असा आहे. कलम वेगवेगळ्या प्रकारचे असायचे. साधी कलम, दुधी कलम, रंगीत कलम असे. कोणाकडे किती कलमा आहेत ह्याबद्दल स्पर्धा असायची. खेळात हरण्या-जिंकण्यावरून कलमांची देवाण घेवाण व्हायची. साहजिकच त्यावरून भांडणे ही तितकीच व्हायची.

एके दिवशी कहरच झाला. शेवटचा तास सुरु होता. मागच्या बेंचवर आक्का आणि कमल बसल्या होत्या. कलमांच्या देण्या-घेण्यावरून त्यांच्यात वाद सुरु झाला. हळू हळू वादाचे स्वरूप भांडणात झाले. भांडत भांडत त्या दोन बाकांच्यामध्ये फरशीवर बसल्या. तिकडे बाईंचा तास संपला आणि त्या वर्गातून निघून गेल्या. शाळेची शेवटची घंटा वाजली आणि एक एक करत सगळ्या मुली निघून गेल्या. ह्या दोघींना कलमा मोजण्यात बाकी कशाचेच भान नव्हते. त्या भांडणात इतक्या मग्न झाल्या होत्या कि शिपाई दादाने इतर वर्गासारखे ह्यांच्या वर्गाचे दार बंद करून बाहेरून कुलूप लावलेलेही लक्षात आले नाही. त्या दोघीं वर्गात मागच्या भागात आणि दोन बेंचच्या मध्ये बसलेल्या असल्यामुळे शिपाई दादांचे त्यांच्याकडे लक्ष गेले नाही. नेहमीप्रमाणे शिपाई दादांनी शाळेच्या मुख्य दाराला कुलूप घातले आणि त्यांच्या घरी निघून गेले. संध्याकाळ झाली. मुली घरी आल्या नाही म्हणून आमच्या आईने आणि सत्यव्वाने गल्लीत शोधाशोध सुरु केली. कोणत्या तरी मैत्रिणीच्या घरी खेळत बसल्या असतील म्हणून तिच्या सगळ्या मैत्रिणींकडे चौकशी केली. बाकीच्या सगळ्या मुली आपापल्या घरी आलेल्या होत्या. आमची तीन दुकाने होती. सोन्या चांदीचे, किराणा आणि जनरल स्टोअर्स. तिन्हींकडे चौकशी केली तर त्या तिथेही गेल्या नव्हत्या. मग मात्र आईची काळजी वाढायला सुरुवात झाली. नको ते विचार मनात यायला लागले. तिने मग बाबांना घरी बोलावून घेतले. मुली कुठे हरवल्या असतील ह्याचा अंदाज येत नव्हता.

गाव तसे लहानच. सगळीकडे शोधून झाले होते. अंधार पडायला लागला. आई बाबांच्या डोळ्यातून गंगा-जमुना वाहत होत्या. आजूबाजूची मंडळी जमा झाली. वेगवेगळे अंदाज बांधणे सुरु होते. त्यातल्या एकाने एक शंका व्यक्त केली कि जर त्या शाळेतूनच आल्या नाहीत तर मग तिकडेच अडकल्या असतील तर…आई बाबांच्या मनात एक आशा निर्माण झाली. ती शक्यता नाकारता येत नव्हती म्हणून त्या दिशेने पाऊल उचलायचे ठरले. शेजारच्या काकांना शिपाई दादांचे घर माहित होते. त्यांनी बाबांना त्यांच्याकडे नेले. शिपाई दादा म्हणाले कि मी कोणत्याच मुलींना पहिले नाही. खात्री केल्यावरच सगळे वर्ग बंद केले आणि शाळेला कुलूप घातले. पण बाबांना खात्री करून घ्यायची होती. बाबांच्या विनंतीला मान देऊन ते किल्ल्यांचा जुडगा घेऊन शाळेकडे निघाले.

तिकडे वर्गात थोडा अंधार पडायला लागला तेव्हा आक्का आणि कमल भानावर आल्या. त्यांनी दार वाजवले, खूप आरडा ओरडा केला, जोरात बेंच आपटले. पण त्यांचा आवाज कुणालाच ऐकू जात नव्हता. त्यांना तहान-भूक लागली होती. आईची आठवण येत होती. दोघीही रडायला लागल्या. रडून घामाघूम झाल्या आणि थकल्या. अंगात त्राण राहिला नव्हता आणि मलूल होऊन तश्याच फरशीवर निपचित पडून राहिल्या.

शाळेत दिवे (लाईट्स) नव्हते. शिपाई दादांनी टॉर्च घेऊन शाळेचे मुख्य दार उघडले आणि अंधारात चाचपडत ह्यांच्या वर्गापर्यंत पोहोचले. वर्गाचे दार उघडून टॉर्चच्या प्रकाशात शोधल्यानंतर ह्या दोघी अर्धवट ग्लानीत सापडल्या. त्या दोघींना घरी आणून खाऊ-पिऊ घालून कमलीला सत्यव्वा कडे सोपवले. कलमासाठीच्या भांडणामुळे सगळं रामायण घडलं होतं. दोघींना चांगला धडा मिळाला होता. पालकांनी दोघींना ताकीद दिली कि यापुढे भांडण करायचे नाही. त्यानंतर जवळपास महिनाभर त्या दोघी भांडल्या नाहीत. 😀 असा हा आक्काच्या बाबतीत घडलेला कमल आणि कलमचा किस्सा.

प्रिय आक्का, तू नेहमी आनंदी, निरोगी आणि दीर्घायुषी राहावीस अशी ईशचरणी प्रार्थना!


16 Replies to “कमल आणि कलम”

  1. वाचुन डोळे भरून आले…!! नाते बनवने आणि टिकवून ठेवणे ही तितकेच महत्वाचे..!!

  2. mast varnan kelas kamal v kalam cha kissa…..dolyasamor anusayatai ubhi rahili….yevdhe hubehub varnan keles…..

  3. खूपच छान लिहलेस वाचताना जिज्ञासा वाढतच होती अगदी हुबेहूब घटना डोळ्यासमोर येत होती
    अनुसया ताई पण प्रेमळ आहेत खूपच छान savitra

  4. डॉ. सावी,
    बालपणीचा खजिना अगदी आजीच्या गाठोड्यातली छान (सत्य) कथा.
    छान कथा कथन / लेखन.
    उत्तम मराठी शब्द संचय.
    अभिनंदन!

  5. खुपच सुनंदर तुझ्या बहीनीच्या प्रेमाला व तुझ तीच्याव आईसारख प्रेम खरच द्रीश्टलागुने ह्या बहीनीच्या प्रेमाला सलाम 👏🏻👏🏻🌹🌹

  6. खुप सुंदर लेख वाचतांना हुबेहुब दृश्य डोळ्यासमोर उभे राहत होते
    मी पण लेख वाचेपर्यंत मग्न झाले होतेच 👌👌🎊🎉💐💐👏👏

  7. सावित्रा लेख भारी मनाला मोहन देनारा🎊🎉🥳खुपच मस्त👌👌👏

  8. Savitra तुझ्या आठवणी तू लेखा मार्फत सर्वांशी शेअर करतेस…खूप छान वाटते वाचताना….भाषा शैली …आणि लिहिण्याची कला तुझ्याजवळ आहेच ग, पण तुझ्या बिझी schedule मधून तू वेळ काढून लिहितेस आणि शेअर करतेस… खरचं सलाम तुला…🎉👏👏🤝🤝💐

  9. छान लेख ! तुझी लेखनकला वाखाणायला पाहिजे ! !
    अगदी प्रसंग हुबेहूब डोळ्यासमोर उभा राहिला ! !

  10. एक similarity. मी पण माझ्या अक्काचा नंबर आई अक्का असा सवे केला आहे
    बाकी कथा छान लिहिली आहे. शाळेत गेल्यासारखे आणि पाटी कलम आठवले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *