गिफ्ट आणि रिटर्न गिफ्ट 


ह्या लेखात माझ्या बालपणीच्या राखीच्या गिफ्टची एक गंमत सांगणार आहे.

आम्ही तिघी बहिणी. मी सगळ्यात लहान. माझ्यापेक्षा तीन भाऊ मोठे. आमचे थोरले बंधू, त्याला आम्ही पेद्दाण्णा म्हणायचो. पेद्दाण्णा म्हणजे तेलुगूमध्ये मोठा भाऊ. माझ्यात आणि त्याच्यात दहा वर्षांचे अंतर. तो बाबांसोबत आमच्या सोन्या-चांदीच्या दुकानात बसायचा. राखी पौर्णिमा जवळ आली की आम्हाला काय गिफ्ट मिळणार ह्याची उत्सुकता असायची. आम्ही तिघी बहिणी बाजारातून निवडून छान छान राख्या आणायचो आणि सगळ्या भावांना एकेक करून राखी बांधायचो. मग आम्हाला छान छान  गिफ्ट्स मिळायचे.

आमच्या सोन्या-चांदीच्या दुकानात मुंबईहून अंगठीत बसवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची रत्ने, मोती, खडे यायचे. प्रत्येक मोती-खडा आणि रत्न वितभर रंगीबेरंगी, पातळ कागदामध्ये गुंडाळलेला असायचा. त्याकाळी फुलासारख्या आकाराची दोन पैशाची नाणी चलनात होत्या. पेद्दाण्णा दोन-दोन पैशांची 100 नाणी घ्यायचा. 20- 20 नाणी घेऊन त्या रंगीबेरंगी कागदात गुंडाळून चॉकलेट सारखे गिफ्ट बनवायचा. आम्ही राखी बांधल्यानंतर प्रत्येकी 5- 5 गिफ्ट्स द्यायचा. म्हणजे प्रत्येकी दोन रुपये. ते १९७० चे दशक होते. त्याकाळी दोन रुपयात बरंच काही मिळायचं.

बाकीचे भाऊ आम्हाला दोन-दोन रुपयांचे गुलाबी रंगाचे कागदी नोट ओवाळणी म्हणून द्यायचे. कागदी नोटेपेक्षा माझ्या बालमनाला नाण्यांचे गिफ्ट भारी वाटायचे. खूप श्रीमंत झाल्यासारखे वाटायचे. पण ही श्रीमंती फार काळ टिकत नसे.

पेद्दाण्णा आम्हा तिघी बहिणींसोबत एक गेम खेळायचा. एक मोठी बादली घ्यायचा. त्यात अर्ध्याहून कमी पाणी टाकायचा. बादलीच्या मध्यभागी एक छोटी वाटी ठेवायचा. त्याने राखीला दिलेली 100 नाणी आम्हाला घेऊन यायला सांगायचा. आळीपाळीने आम्हाला हा गेम खेळायला सांगायचा. नियम असा होता की, एक एक करत नाणी त्या वाटीत टाकण्याचा प्रयत्न करायचा. वाटीत पडलेली नाणी आमची आणि वाटी बाहेर पडलेली नाणी त्याच्या मालकीची. आम्ही बादलीच्या डाव्या बाजूने, उजव्या बाजूने, हात उंचावून, जवळून, दुरून नाणी वाटीत टाकण्याचा आटोकाट प्रयत्न करायचो. पण तरीही मोजकीच नाणी वाटीत पडायची. आम्ही हिरमुसले होऊन गेम थांबवायचो. एका आठवड्यानंतर पुन्हा आम्ही हा गेम खेळायला तयार व्हायचो. आमच्याकडची 100 नाणी संपेपर्यंत आम्ही हा गेम खेळत राहायचो.

अशाप्रकारे आम्हाला मिळालेली राखी गिफ्ट भाऊबीजेच्या आधीच त्याच्याकडे रिटर्न जायची. अशी ही गिफ्ट आणि रिटर्न गिफ्टची गोड आठवण. ❤


9 Replies to “गिफ्ट आणि रिटर्न गिफ्ट ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *