रहस्यभेद!


हा लेख इंग्रजीतून वाचण्यासाठी इथे क्लिक करा: Brain on Fire (Anti-NMDA Receptor Encephalitis)

अमेरिकेत आल्यानंतर माझ्या नावासमोर ‘एमडी/MD’ अशी दोन अक्षरे लावण्यासाठी आवश्यक असलेला अभ्यास, परीक्षा, पाच वर्षांची ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण करून चाइल्ड न्यूरोलॉजिस्ट झाले. त्यानंतर जे.एफ.के न्यूरोसायन्स इन्स्टिट्यूटला जॉईन झाले. गंमत अशी की माझी पहिली वहिली केस अतिशय रहस्यमय होती आणि त्याचा मी व्यवस्थितपणे रहस्यभेद केला. त्याकाळी ही कंडिशन दुर्मिळ समजली जायची. त्याबद्दल हवी तेवढी जागरुकता नव्हती. बऱ्याच वेळेस मानसिक आजार म्हणून चुकीचे निदान व्हायचे.

“न्यूयॉर्क पोस्ट” नावाच्या न्यूज एजन्सी मधल्या एका चोवीस वर्षाच्या वार्ताहराला ही दुर्मिळ कंडिशन झाली होती. ह्या कंडिशनचे नाव आहे अँटी एनएमडीए रिसेप्टर एन्सेफलाइटिस (Anti-NMDA Receptor Encephalitis),म्हणजे थोडक्यात ब्रेनचे इन्फ्लमेशन. तिचे नाव सुझाना केहलन असे असून तिने स्वतःच्या अनुभवावर आधारित एक पुस्तक लिहिले. त्याचे नाव आहे ब्रेन ऑन फायर: माय मंथ ऑफ मॅडनेस. त्यावर 2016 मध्ये एक इंग्लिश चित्रपट ब्रेन ऑन फायर तयार झाला. त्यामुळे आपोआपच मेडिकल फील्डमध्ये ह्या आजाराबद्दल जागरूकता निर्माण झाली आणि योग्य निदान झाल्यामुळे अशा पेशंटची संख्या वाढत गेली. मला मात्र ह्या पुस्तकाबद्दल आणि चित्रपटाबद्दल अलीकडेच समजले. माझ्या मुलीने लगेच हे पुस्तक माझ्यासाठी विकत आणले. हा चित्रपट पाहून मला माझ्या नऊ वर्षांपूर्वीच्या पेशंटचा अनुभव आठवला आणि तो तुमच्यासोबत शेअर करायचे ठरवले. चला तर मग जाणून घेऊ या माझ्या पहिल्या पेशंटची रहस्यकथा !

माझ्या पेशंटला अंकिता असे एक काल्पनिक नाव देऊ या. ती सतरा वर्षांची हुशार आणि आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. अमेरिकेत नववी ते बारावीला हायस्कूल म्हणतात. तिचे बारावीचे वर्ष सुरू झाले होते आणि ती कॉलेज अप्लिकेशनच्या प्रोसेस मध्ये होती. तिला थोडा स्ट्रेस आलेला होता. त्या दरम्यान तिला एका महिन्यात दोन फिट्स आलेल्या होत्या आणि आम्ही तिला औषध सुरु केले होते. काही आठवड्यांनंतर तिच्या वर्तणुकीत थोडासा बदल जाणवू लागला. अधूनमधून ती थोडे थोडे विचित्र बोलू लागली. आई-वडिलांच्या ते निदर्शनास आले पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांना वाटले ती स्ट्रेसमुळे अशी वागत आहे. तिचा विचित्रपणा वाढतच राहिला. मग आई वडिलांनी तिला सायकॅट्रीस्ट/मानसोपचार तज्ञाकडे नेले. सायकॅट्रीस्टने तिला ऍडमिट करून घेतले आणि ट्रीटमेंट सुरू केली. ती ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नव्हती. एके दिवशी तिने तिच्या आईला आवडीच्या पदार्थांची लिस्ट दिली. आईने सगळे पदार्थ बनवून आणले. मायलेकींनी त्या पदार्थावर ताव मारला, भरपूर गप्पा मारल्या आणि हसत खेळत दोन-तीन तास एकत्र घालवले. दुसऱ्या दिवशी जेव्हा तिची आई भेटायला आली तर अंकिता तिच्याशी भांडायला लागली. म्हणाली की तुझे माझ्यावर प्रेमच नाही. मी तुला माझ्या आवडीच्या पदार्थांची लिस्ट दिली होती. पण तू ते पदार्थ माझ्यासाठी बनवून आणले नाहीस. आईने तिला आठवण करून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण ती ऐकायला तयार नव्हती. अशा एक ना अनेक घटना घडत राहिल्या. मानसोपचार तज्ञाला काही कळेना. त्यांनी मग तिला आमच्या हॉस्पिटलला पाठवले. मी तिला ऍडमिट करून घेतले आणि आवश्यक असलेल्या सगळ्या टेस्ट करून घेतल्या. ब्रेन स्कॅन, ब्लड टेस्ट, ईईजी (ब्रेन वेव्ह स्टडी), पाठीतले पाणी (ब्रेन फ्लुईड) काढून त्याची टेस्ट इत्यादी केल्या. व्हायरस, बॅक्टेरिया, फंगस साठी कल्चर पाठवले. रिझल्ट येईपर्यंत तिला अँटिबायोटिक्स आणि अँटिव्हायरल औषधे सुरू केली. जेवढे टेस्ट शक्य होते तेवढे करून झाले होते. प्रत्येक टेस्ट नॉर्मल येत होती. काही कळायला मार्ग नव्हता. सगळी औषधे बंद करुन तिला घरी पाठवून दिले.

माझे विचार चक्र थांबतच नव्हते. तिला नेमके काय झाले असेल ह्या विचाराने मी अस्वस्थ झाले होते. माझ्यासमोर एक मेडिकल  मिस्टेरी, एक मोठे रहस्यमय कोडे पडले होते. ते उलगडल्या शिवाय मला चैन पडणार नव्हते. मग मी लिटरेचर सर्च करायला सुरुवात केली. दुर्मिळ अशा न्यूरोलॉजिकल केसेस बद्दल माहिती काढायला सुरुवात केली. मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी वाटायला लागले की तिला कदाचित ऑटोइम्युन एन्सेफलाइटिस असण्याची शक्यता आहे. आमच्या लॅबमध्ये तिचे ब्लड आणि ब्रेन फ्लुईडचे एक्सट्रा सॅम्पल्स होते. लॅबला कॉल करून ऑटोइम्युन एन्सेफलाइटिसचे अँटीबॉडी टेस्ट पाठवले. ही कंडीशन दुर्मिळ असल्यामुळे ह्या टेस्ट्स अमेरिकेत काही मोजक्याच लॅबमध्ये करण्याची व्यवस्था होती. आमच्या लॅबने तिचे सॅम्पल्स दुसऱ्या स्टेटमध्ये पाठवून दिले. तीन आठवड्यांनी आम्हाला रिपोर्ट मिळाला. ब्लड आणि ब्रेन फ्लुईड दोन्हीही पॉझिटिव्ह आले होते. माझा अंदाज खरा ठरला होता.

पुढची स्टोरी सांगण्या आधी मी तुम्हाला या कंडीशन बद्दल थोडी उकल करून सांगते. ह्या कंडिशनचे नाव आहे अँटी एनएमडीए रिसेप्टर एन्सेफलाइटिस (Anti-NMDA Receptor Encephalitis), म्हणजे थोडक्यात ब्रेनचे इन्फ्लमेशन. म्हणजेच ब्रेन ऑन फायर ! तुम्हाला माहीतच आहे की, जेव्हा आपल्याला व्हायरस किंवा बॅक्टेरियाचा संसर्ग होतो तेव्हा आपली इम्युन सिस्टीम त्याच्या विरोधात अँटीबॉडीज तयार करते. त्याचप्रमाणे ट्युमर आणि कॅन्सरच्या विरोधात सुद्धा अँटीबॉडीज तयार करते. कधी कधी चुकून स्वतःच्या शरीरातल्या पेशी विरुद्ध अँटीबॉडीज तयार होतात. मेंदूतल्या पेशीवर वेगवेगळ्या प्रकारचे रिसेप्टर्स म्हणजे विशिष्ट प्रकारचे प्रोटिन्स असतात. त्यापैकी एक आहे एनएमडीए (NMDA) रिसेप्टर. तरुण मुलींमध्ये ओवेरियन ट्यूमर आणि तरुण मुलांमध्ये टेस्टीज ट्यूमर झाल्यास शरीर त्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार करते. अशा ट्यूमरमध्ये काही प्रमाणात एनएमडीए (NMDA) रिसेप्टर असतात. जेव्हा त्याच्या विरोधात अँटीबॉडीज तयार होतात, ते मेंदूतल्या एनएमडीए (NMDA) रिसेप्टरवरही हल्ला करतात आणि ब्रेनचे इन्फ्लमेशन होते. ऑपरेशन करून ट्युमर काढून टाकल्यास असे पेशंट पूर्णपणे रिकव्हर होतात. काही केसेसमध्ये ट्यूमर नसूनही त्यांना ही कंडिशन होते. त्याचे कारण माहित नाही.

टेस्ट रिझल्ट आल्यानंतर आम्ही अंकिताला पुन्हा ऍडमिट केले. तिला इम्युनो-ग्लोबुलीनची ट्रीटमेंट दिली. सिटीस्कॅन मध्ये उजव्या बाजूच्या ओवरीत ट्यूमर आढळून आला. सतरा वर्षाच्या, लग्न न झालेल्या मुलीची एक ओवरी (अंडाशय) काढून टाकण्यात आली. त्यानंतर ती पूर्णपणे रिकवर झाली.

जर वेळेवर करेक्ट डायग्नोसिस झाले नसते तर तिचे शरीर सतत अँटीबॉडीज तयार करून मेंदूवर अटॅक करत राहिले असते. विनाकारण तिच्यावर वेगवेगळ्या औषधांचे आणि इतर ट्रीटमेंटचे प्रयोग सुरू राहिले असते. ही माझी पहिली केस असल्यामुळे खूप स्पेशल होती. जर माझ्याकडून करेक्ट डायग्नोसिस झाले नसते तर मला खूप वाईट वाटले असते. अशा ह्या रहस्यमय केसचा छडा लावून तिची न्यूरोलॉजिकल कंडीशन ट्रीट करेपर्यंत माझ्या डोक्याला झिणझिण्या आल्या होत्या !😃😬 

कसा वाटला तुम्हाला हा रहस्यभेद?😎


21 Replies to “रहस्यभेद!”

      1. माझ्या पत्नीला पण असच प्रकारे असू शकतो का
        तिला कोणते ही काम घरात करू वाटत नाही सारखी इतरांची काळजी करते कसं होईल सुसायट्ट करावं वाटत
        सारखा विचार करत राहते
        अगदी झोपेतून जागं झाल्या पासून
        तिला 9 मे 2023 ला सिझर आल होत
        डॉक्टर नी मला nmda आणि ana blot ही टेस्ट दिली आहे कृपया मार्गदर्शन करावे

      2. माझ्या पत्नीला पण असच प्रकारे असू शकतो का
        तिला कोणते ही काम घरात करू वाटत नाही सारखी इतरांची काळजी करते कसं होईल सुसायट्ट करावं वाटत
        सारखा विचार करत राहते
        अगदी झोपेतून जागं झाल्या पासून
        तिला 9 मे 2023 ला सिझर आल होत
        डॉक्टर नी मला nmda आणि ana blot ही टेस्ट दिली आहे कृपया मार्गदर्शन करावे

        1. कृपया, तुमच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आवश्यक चाचण्या करून घ्या. त्या लवकर बऱ्या होवोत त्यासाठी शुभेच्छा.

  1. ग्रेट savitra सवयी प्रमाणे खोलवर जाऊन तिचा इलाज केलीस तुझ्याकष्टाला फळ आले अभिनंदन

  2. तुझ्यासारखी विचार करुन निर्णय घेऊन उपचार करणारे फार कमी .कमाल आहे तुझी you are great 👍

  3. ग्रेट….खरंच ग्रेट !! परमेश्वर तुझ्या हाताला अधिकाधिक यश देवो…..

  4. Gr8… Gr8….
    God gives problems to people and at the same time…. Problem solving people like you….
    Amazing🤩😍

  5. खूप छान लिहिले, अवघड विषय सोपे करून लिहिले आहेस.खरं डाॅक्टरचे कर्तव्य पार पाडलेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *