आज मी माझ्या कॉन्टॅक्ट लेन्सची गोष्ट सांगणार आहे. माझं शाळेतलं दहावीचं वर्ष सुरू झालं आणि माझ्या लक्षात आले की मला फळ्यावरचं स्पष्ट दिसत नाही. त्यावेळेस आमच्या गावात डोळे तपासण्याची व्यवस्था नव्हती. मग माझ्या भावाने मला नांदेडला डोळ्यांच्या डॉक्टरकडे नेले. ज्या गोष्टीची भीती होती तेच झाले. मला चष्मा लागला! मग मी काळी फ्रेम असलेला चष्मा वापरायला सुरुवात केली.🤓 चष्मा वापरणाऱ्यांना ‘ढापण्या’,’चष्मेबद्दूर’,’चष्मीश’ अशा नावांनी चिडवल्या जायचे. बहुतेक कुणालाही ‘चष्मेबद्दूर’चा खरा अर्थ माहित नसावा. त्यामुळेच ते चिडवण्यासाठी वापरायचे. तसे पाहता मला चष्म्यावरून कोणी चिडवलेले आठवत नाही. त्या उलट मला म्हणायचे की, चष्मा लावून तू स्मार्ट दिसतेस, स्कॉलर दिसतेस. हळू हळू चष्म्याची सवय होत गेली. नंतर नंतर असे लक्षात आले की सतत चष्मा वापरल्यामुळे डोळ्याखाली फ्रेममुळे काळी रेघ उमटायला सुरुवात झाली. आधीच मी दिसायला सुमार. बऱ्याच लोकांनी त्याचे सर्टिफिकेट देऊन झालेले होते. आणि त्यात हा नवीन प्रॉब्लेम. मग मात्र चष्म्याचा राग येऊ लागला. पण वापरण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
एके दिवशी मासिक चाळता चाळता एका पानावर माझी नजर स्थिर झाली. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कॉन्टॅक्ट-लेन्स हा शब्द मी वाचत होते. त्या मासिकात कॉन्टॅक्ट-लेन्स बद्दल माहिती छापून आली होती. माहिती खूप संक्षिप्त होती. त्यावरून मला एवढेच कळले की डोळ्यावर चष्मा लावण्याऐवजी डोळ्यात अशी कॉन्टॅक्ट लेन्स घालता येते. मनाच्या कोपर्यात कुठेतरी आशा निर्माण झाली होती. मग मी कॉन्टॅक्ट-लेन्स बद्दल माहिती काढण्याचा चंगच बांधला. त्याकाळी माहिती मिळवण्यासाठी वर्तमानपत्रे आणि मासिके ह्या व्यतिरिक्त कोणतीही साधने नसायची. मग माझे वर्तमानपत्रे आणि मासिकांमधून मिळेल तेवढ्या माहितीची कात्रणे जमवणे सुरु झाले. माझी बारावी झाली. औरंगाबादला मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली आणि मी 1984 लाऔरंगाबादला गेले. मग तिथे काळी फ्रेम बदलून फॅन्सी फ्रेमचा चष्मा वापरायला सुरुवात केली. मन मात्र कॉन्टॅक्ट-लेन्सची आस लावून बसले होते.
हळूहळू कॉन्टॅक्ट-लेन्स प्रचलित होऊ लागले. एके दिवशी एका मैत्रिणीने मला सांगितले की, “अगं, तू आपल्या कॉलेजच्या ऑफथ्यालमॉलॉजि (नेत्ररोगविभाग) डिपार्टमेंटला जाऊन डॉ. वांगीकर सरांना भेट”. मग मी वांगीकर सरांना भेटले. त्यांनी मला कॉन्टॅक्ट लेन्सची माहिती सांगितली. त्या काळात फक्त हार्ड लेंसेस उपलब्ध होते. मग मी ठरवले की ट्राय करून पाहायचं. सरांनी मग डोळ्यांची तपासणी करून नंबर काढला, मापे घेतली (लेन्सची लांबी, परिघ आणि कर्व्हेचर इत्यादी) आणि फिक्या निळ्या रंगाच्या लेन्सची ऑर्डर दिली. काही दिवसांनी सरांचा निरोप आला की मुंबईहून लेन्स आलेले आहेत आणि तू फिटिंग साठी ये. लेन्स फिटिंग झाली आणि लेन्स घेऊन मी हॉस्टेलच्या रूमवर आले. आता इथून माझी खरी परीक्षा सुरू होती. आपल्या डोळ्यात एक छोटासा धुळीचा कण गेल्यास डोळे लाल होतात, डोळ्यात पाणी येते आणि किती त्रास होतो. आणि आता मला माझ्या डोळ्यात अख्खी हार्ड लेंस घालायची होती. मनात धाक धुक तर होतीच पण त्याही पेक्षा जास्त इच्छाशक्ती होती. मग सरांनी सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे कॉन्टॅक्ट लेन्स घालण्याचा प्रयोग सुरू झाला. पांढरा टर्कीशचा टॉवेल टेबलावर अंथरला. लेन्स हातातून पडल्यास पांढऱ्या टॉवेलवर लवकर सापडेल म्हणून. आरसा तयार ठेवला. हात स्वच्छ धुऊन एक लेन्स बोटाच्या चिमटीत धरला आणि दिलेल्या सोलुशनने स्वच्छ केला. दुसऱ्या हाताने खालची पापणी खाली ओढून धरून ठेवली आणि आरशात पहात लेन्स डोळ्याच्या बुबुळावर ठेवली. बापरे ! 😳😳😳असे वाटले की कोणीतरी माझ्या डोळ्यात चांगले चिमूटभर लाल तिखट घातले ! पुन्हा ट्राय करायची हिंमत झाली नाही. मग सगळं तसेच ठेवून दिलं. दुसऱ्या दिवशी कॉलेजमधून आल्यानंतर पुन्हा सगळं रिपीट केलं. पुन्हा तेच. म्हटलं, नको रे बाबा. माझा आपला चष्माच बरा. पण इतक्या दिवसांची सुप्त इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. माझ्या मनाला समजावले की, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. मनाला बहुतेक ते पटलं असावं. चार-पाच दिवसांच्या प्रयत्नानंतर तब्बल पाच मिनिटे लेंसेस डोळ्यात ठेवण्यात यश आले. मिनिटे तासात बदलत गेली आणि काही महिन्यातच दिवसभर लेन्सेस वापरण्यात यश आले. हुश्श वाटले. रोज वापरायच्या सोल्युशन व्यतिरिक्त एक्सट्रा क्लिनिंग साठी दुसरे सोल्युशन लागायचे जे औरंगाबादला उपलब्ध नव्हते. आमच्या क्लासमध्ये रश्मी नावाची मुंबईची मैत्रीण होती. तिने मला ते सोल्युशन मुंबईहून आणून दिल्याचे आठवते.
हळूहळू होस्टेल वरच्या सगळ्या मुलींना माझ्या कॉन्टॅक्ट-लेन्स बद्दल कळलं. बऱ्याच जणी माझ्याकडे येऊन माहिती विचारू लागल्या. त्यांच्यापैकी कित्येक जणींनी वांगीकर सरांकडे जाऊन कॉन्टॅक्ट-लेन्स बनवून घेतल्या. पण ते कंटिन्यू करणं जमलं नाही. थोडे दिवस ट्राय करून त्यांनी तो प्रयत्न सोडून दिला.
खरे पाहता कॉन्टॅक्ट-लेन्सचे फायदे कमी आणि तोटे जास्त होते. स्वच्छता न बाळगल्यास इन्फेक्शन व्हायचा धोका होता. लेन्स डोळ्यात असताना डोळे चोळता येत नाहीत. झोपण्याआधी आठवणीने काढून ठेवावे लागतात. डोळ्याला धक्का लागला की लेंस सहजपणे गळून पडते. अशीच एकदा माझी लेन्स ट्रेनमध्ये डोळ्याला धक्का लागल्यामुळे पडली आणि हरवली. मग पुन्हा मी वांगीकर सरांकडे धाव घेतली. नेमके सर सुट्टीवर होते. आता आली का पंचाईत ! मग पाटील मॅडम माझ्या मदतीला धावून आल्या आणि एक लेन्स मागवून घेतली. बाहेर फिरताना डोळ्यात धूळ जाऊन डोळे लाल व्हायचे. लेन्स असल्यामुळे डोळे चोळता पण यायचे नाहीत. डोके सुद्धा दुखायचे. दिवसभर लेन्स वापरल्यामुळे रात्री डोळे खूप थकून जायचे. डाव्या आणि उजव्या लेन्सेसची अदलाबदल होऊ नये ह्यासाठी प्रत्येकवेळी उजवी लेन्स प्रथम घालायची सवय लावून घेतली. लेन्स वापरण्याचा निर्धार इतका पक्का होता की त्यापुढे ही सगळी आव्हाने छोटी वाटायची. इतक्या साऱ्या मुलींनी लेन्सेस ट्राय केले आणि त्यापैकी मी एकटीच अशी होते की जीने सातत्याने त्याचा वापर सुरू ठेवला. त्यामुळे सर माझा उल्लेख ‘कॉन्टॅक्ट लेन्स गर्ल’ असा करू लागले आणि अश्याप्रकारे मी ‘कॉन्टॅक्ट लेन्स गर्ल’ बनले.😎😄
त्यानंतर सॉफ्ट लेंसेस आल्या. हार्ड लेंसेसच्या मानाने सॉफ्ट लेंसेस वापरायला खूप सोप्या होत्या. मग मी विचार केला की सॉफ्ट लेंसेस घेऊ या. पण माझ्या नशिबात सरळ, साध्या, सोप्या गोष्टी नव्हत्याच बहुतेक! मला सांगण्यात आले की, माझ्या डोळ्यांचा जो नंबर आहे, त्याला हार्ड लेंसेसच वापरायला हवेत. आता 36 वर्षानंतरही हार्ड लेंसेसच वापरत आहे. अर्थात, आता त्याची सुधारित आवृत्ती म्हणजे गॅस परमियेबल सेमी रिजिड लेन्सेस आहेत. ते माझ्या जीवनाचे अविभाज्य घटक झालेले आहेत. आता इतकी सवय झाली आहे की डोळ्यात लेन्स नसतानासुद्धा मी डोळे चोळण्याची हिम्मत करत नाही.😁
भारि चिकाटी म्हणतात याला.
हो ना 🙂
हा लेख वाचून माझ्या मनात सुद्धा कॉन्टॅक्ट लेन्स घेण्याची इच्छा प्रबळ झाली
हो का! आता खूप सोपे आहे. लहान लहान मुले सुध्दा डिस्पोजेबल लेन्सेस सहजरित्या वापरत आहेत.
I remember dear about your contact lens..
You are using since 36 years, that is a proof about ur scrupulous behavior.. Really not a joke यार.
Thank you, dear. I thought about LASIK, scheduled appointment for twice and then cancelled.
Chaan Likhan .. Junya college chya Athawani…
Thanks for Sharing …
Nostalgic, right? Thank you!
वाटले नव्हते इतके त्रास होईल अस
तुझ्यात सहन शिलता आणि जिद्द असल्यामुळे लेन्स घेतलीस सगळ कस इतक्यातच झाल्यासारखे लक्षात आहेः तुझ्या ग्रेट आहेस
हो गं. तेव्हा काळच तसा संघर्षाचा होता. त्यावेळेस वाटायचे कि हे सगळं असच अवघड असतं. आत्ता मागे वळून पाहिल्यानंतर आणि सध्याच्या परिस्थितीशी तुलना केल्यावर कळते कि आपण अगदी लहान सहान गोष्टींसाठीसुद्धा किती संघर्ष केला आहे. खूप धन्यवाद!
आयुष्यातले छोटे छोटे अनुभव बारिकसारीक तपशीलासह वर्णन करावेत तर ते तुझ्याच लेखणीने !! चष्मा ते कॉन्टॅक्ट लेन्स प्रवास….
देगलूर ते अमेरिका प्रवास ….
जि.प्र.कन्या प्रशाला ते न्यु जर्सी प्रवास ….
दहावी मेरीट लिस्ट ते चाईल्ड न्युराॅलाॅजिस्ट प्रवास….
हे सर्व प्रवास चिकाटीने व जिद्दीने करणाऱ्या तुला आणि तुझ्या लेखणीला सॅल्युट !!
प्रिय ऋता, तू नेमक्या शब्दात माझ्या पूर्ण आयुष्याचे वर्णन केलेस. माझ्या जीवनप्रवासात तुझ्यासारख्या व्यक्तींमुळे सतत प्रेरणा आणि उमेद मिळत राहिली आणि विविध टप्प्यात अनेक संघर्षांचा सामना करून पुढे जाता आले. त्याशिवाय शक्यच नव्हते. खूप खूप धन्यवाद!