कधी येणार कोरोनाची लस?


ह्या लेखाचे युट्यूब विडिओ आणि ऑडिओ क्लिप खाली दिलेले आहे.

संपूर्ण मानव जातीला जणू कोरोना विषाणूचा शाप मिळाला आहे. लस म्हणजे त्या शापावरचा उ:शाप म्हणायला हरकत नाही. आपण सगळे कोरोनावरच्या लसीकडे डोळे लावून बसलेले आहोत. मीडिया ह्याचा गैरफायदा घेत आहे आणि टीआरपी वाढवण्यासाठी लसीबद्दल चुकीची माहिती पसरवत आहे. जसे कि पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी लस उपलब्ध होईल आणि कोरोनापासून मुक्ती मिळेल आणि असे बरच काही. मला खूप लोकांचे मेसेज येत आहेत कि हे खरे आहे का? त्यामुळे मी हा लेख लिहिण्याचा घाट घातला आहे. मराठी वाचकांसाठी हा मराठी लेख ज्यामध्ये लसीबद्दल आवश्यक तेवढी सगळी माहिती आणि लसीचे काम कुठपर्यंत आलेले आहे ह्याबद्दल लिहिले आहे. ह्या महामारी मुळे लसीचे महत्व वाढले आहे. लस तयार करणे हे खूप खर्चिक असते आणि त्याला भरपूर वेळ लागतो1.

सर्वप्रथम पाहू या लस म्हणजे काय?

लस म्हणजे  एक रसायन ज्यात त्या रोगाचे मेलेले किंवा अर्धमेले केलेले जंतू अथवा त्या जंतूंचा अंश एका पद्धतीने वापरले जातात. लस शरीरात गेली तर जणू काही त्या रोगाची रंगीत तालीमच होते. लसींत सबळ जंतू नसल्याने रोग तर होत नाही पण शरीराला त्या रोगजंतूंशी लढण्याचा अनुभव प्राप्त होतो.

लसीकरण: प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या लसीचे शरीरात देणे म्हणजे लसीकरण होय. लसीकरणामुळे आजाराची तीव्रता कमी केली जाते किंवा काही आजार टाळले जातात.

एकदा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास त्यापासून बचाव करण्याऐवजी रोगाच्या प्रतिबंधासाठी लसांची रचना केली गेली आहे. आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी लसी महत्वाची भूमिका बजावतात. ते आपल्याला गंभीर आणि कधीकधी प्राणघातक आजारांपासून संरक्षण करतात. लस ही रोगाची प्रतिकारशक्ती सुरक्षितपणे विकसित करण्यासाठी शरीराच्या नैसर्गिक संरक्षणासह कार्य करून संसर्गाची शक्यता कमी करते2.

लसी कशा कार्य करतात याबद्दल शिकण्यापूर्वी, आपले शरीर आजाराशी कशा प्रकारे लढा देते3 हे समजून घेणे उपयुक्त ठरेल. जेव्हा बॅक्टेरिया किंवा विषाणूसारखे सूक्ष्मजंतू शरीरावर आक्रमण करतात, ह्याला संक्रमण/संसर्ग म्हणतात. त्यामुळे आपण आजारी पडतो. आपल्या रक्तामध्ये पांढऱ्या रक्त पेशी (डब्ल्यूबीसी), लाल रक्तपेशी आणि प्लेटलेटस असतात. डब्ल्यूबीसी आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचा एक महत्त्वाचा भाग आहे. ते जीवाणू, विषाणू आणि सूक्ष्मजंतूंवर हल्ला करून संक्रमणास प्रतिकार करण्यास मदत करतात.

प्रामुख्याने तीन प्रकारच्या पांढर्‍या पेशी प्रतिकारशक्ती प्रणालीत कार्यरत असतात: मॅक्रोफेजेस, बी-लिम्फोसाईट्स आणि टी-लिम्फोसाईट्स.

मॅक्रोफेजेस रोगजंतूंना गिळून टाकतात आणि पचवतात. त्या रोगजंतूंचा काही अंश शरीरात राहून जातो. त्याला अँटीजेन असे म्हणतात. आपल्या प्रतिकार संस्थेला ह्या अँटीजेनचा धोका जाणवतो आणि त्याच्यावर हल्ला करण्यासाठी अँटीबॉडीज तयार करायला सुरुवात करते.

बी-लिम्फोसाईट्स हे संरक्षक पांढऱ्या पेशी असतात. ते अँटीबॉडीज तयार करतात.

टी-लिम्फोसाईट्स  हे आणखी एका प्रकारच्या बचावात्मक पांढऱ्या रक्तपेशी असतात. आधीच संक्रमित झालेल्या पेशींवर ते हल्ला करतात.

जेव्हा शरीर एखाद्या रोगाने संक्रमित होते, तेव्हा शरीरात अँटीबॉडीज तयार होण्यास काही दिवस लागतात. एकदा आजारातून बरे झाल्यानंतर आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला त्या रोगापासून शरीराचे संरक्षण कसे करावे याविषयी अनुभव मिळालेला असतो. शरीरात काही टी-लिम्फोसाइट्स राखून ठेवल्या जातात ज्याला मेमरी सेल्स म्हणतात. जर शरीरात पुन्हा त्याच रोगजंतूंचा संसर्ग झाला तर त्वरीत बी-लिम्फोसाइटस त्यांच्यावर आक्रमण करण्यासाठी अँटीबॉडीज तयार करतात.

आता पाहू या लस कशी काम करते3.

जेव्हा एखाद्या व्यक्तीला लस दिली जाते, तेव्हा त्यामध्ये असलेले जिवंत, मृत किंवा अर्धमेले जंतू शरीरातील पांढऱ्या पेशींना एक प्रकारची रंगीत तालीमच देतात. अँटीबॉडीज तयार होतात आणि एकदा अनुकरण संक्रमण संपल्यानंतर, शरीरात “मेमरी”टी-लिम्फोसाइट्स राखून ठेवली जातात. त्यामुळे जेव्हा खरोखर रोगाचे संक्रमण होते, तेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती त्वरित अँटीजेनला ओळखून त्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार करून रोगजंतूंचा पाडाव करतात आणि शरीराचे त्या रोगापासून संरक्षण करतात.

सहसा, कोणतीही लस विकसित करण्यास बरीच वर्षे लागतात. त्यामानाने कोरोनाव्हायरस लसीचे काम अतिशय वेगाने सुरु आहे. जर आपल्याला 12 ते 18 महिन्यांत लस मिळाल्यास हा जागतिक विक्रम ठरेल.

लस कशी बनवतात पाहू या.

ह्या प्रक्रियेत बरेच स्टेप्स असतात. प्रिक्लिनिकल स्टेज मध्ये प्राण्यावर लसीचा अभ्यास केला जातो. जर तो यशस्वी झाला तर मग पुढची स्टेज म्हणजे क्लिनिकल ट्रायल ज्यात माणसांवर लसीचा अभ्यास केला जातो. त्यात तीन फेजेस/ टप्पे असतात: १, २, आणि ३. खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे त्या फेजेस असतात. एकदा तीनही फेजेस व्यवस्थित पार पडल्या कि मग त्या देशातल्या नियामक केंद्राकडून मान्यता मिळवावी लागते.

प्रत्येक देशाचे स्वतःचे नियामक केंद्र असते. उदाहरणार्थ, यूएसएमध्ये अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) आहे, जे अमेरिकेत लसींचे नियमन करण्यास जबाबदार आहे.

सगळ्या फेजेस मध्ये साईड इफेक्ट्सची नोंद केली जाते. तिसऱ्या फेज नंतर लस बाजारात आणली जाते आणि ती निरनिराळ्या देशात देण्याचे कार्य सुरु होते. ह्याला फेज ४ म्हणतात. अनेकदा फेज ४ मध्ये आल्यानंतर सुद्धा लस फेल होऊ शकते. इतर औषधांपेक्षा लसीची अधिक कसून तपासणी केली जाते4 कारण लसीच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये हजारो लोकांना लस दिली जाते. त्यामुळे जास्त सावधानता बाळगावी लागते. सध्याच्या आपत्कालीन स्थितीमुळे, वेळ वाचविण्यासाठी आणि लस लवकर विकसित करण्याच्या प्रक्रियेस वेग देण्यासाठी काही क्लिनिकल चाचणी टप्पे  एकत्र केल्या जातात. महामारीच्या काळात आपत्कालीन मान्यता पण दिली जाते.

आजच्या तारखेला, म्हणजे १५ ऑगस्ट २०२० ला जगातल्या १६५ कंपन्या कोरोनाव्हायरस लसीवर कार्यरत आहेत. त्यापैकी ३१ कंपन्या मानवी क्लिनिकल चाचण्या करत आहेत. काही चाचण्या अयशस्वीपण होऊ शकतात तर काही लसीचे काम परिणामकारक नसल्याने रद्द होऊ शकतील. तसेच काही कंपन्या यशस्वीरीत्या व्हायरसविरूद्ध प्रभावी लस बनवण्यात यश मिळवतील. जर सर्व काही सुरळीत सुरु राहिल्यास ह्या वर्षाच्या अखेरीस लस उपलब्ध व्हायची शक्यता आहे. आणि 2021 च्या सुरुवातीस लोकांसाठी लस उपलब्ध होईल5.

कोरोना लसीवर कोणत्या कंपन्या, कोणते देश काम करत आहेत आणि त्यांचे संशोधन कोणत्या टप्प्यात आहे हे जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:

https://www.nytimes.com/interactive/2020/science/coronavirus-vaccine-tracker.html

हर्ड इम्मुनिटी म्हणजे झुंड रोग प्रतिकारशक्ती म्हणजे काय5?

जेव्हा ६०-७०% लोकांना एखाद्या विशिष्ट संसर्गजन्य रोगासाठी प्रतिकारशक्ती विकसित झाल्यास त्याला हर्ड इम्मुनिटी असे म्हणतात. याचा अर्थ असा की जगभरातील कोट्यावधी लोकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती विकसित झाली पाहिजे. उदाहरणार्थ, अमेरिकेची लोकसंख्या सुमारे ३९ करोड आहे, याचा अर्थ असा आहे की ६०% म्हणजे पुढील ३ वर्षे दररोज किमान २००,००० नवीन केसेसची आवश्यकता असेल. सध्या आरोग्य सेवा त्यातील एक १/४  (म्हणजे रोजी ४०,००० ते ७०,००० नवीन केसेस) म्यानेज करताना नाकी नऊ येत आहे. तसे झाले तर आरोग्य सेवा कोलमडून पडेल. लोकांना कोविड किंवा बाकीच्या आजारावर वैद्यकीय मदत मिळू शकणार नाही. मृत्यू दरही भरपूर वाढेल. त्यामुळे लसीशिवाय हर्ड इम्मुनिटी शक्य नाही.

एक लक्षात घ्या. लस उपलब्ध होऊन जगात सगळ्यांचे लसीकरण व्हायला बराच काळ लागणार आहे. तोपर्यंत आणि त्यानंतरही प्रतिबंधात्मक उपायांना पर्याय नसेल. त्यामुळे खाली दिलेल्या गोष्टींचा अवलंब करा.

  • मास्क वापरा
  • सोशल डिस्टंसिंगचे पालन करा
  • हात स्वच्छ धुवा
  • सोशल मीडियाच्या थापांना बळी पडू नका
  • सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मानसिक आरोग्य राखा (इथे क्लिक करा)
  • सकस आहार घ्या (इथे क्लिक करा)
  • नियमितपणे शारीरिक व्यायाम करा (इथे क्लिक करा)
  • पुरेशी झोप घ्या (इथे क्लिक करा)
  • कोणत्याही काढा, गुळण्या, हळदीचे दूध, जिंदा तिलस्मात किंवा वाफ घेण्याला शास्त्रीय पुरावा नाही. त्यामुळे चोंदलेले नाक किंवा खवखवणारा घसा बरा होईल पण कोरोना व्हायरस मरत नाही हे लक्षात घ्या.
  • स्वतःच्या मनाने कोणतीही औषधे घेऊ नका. अझिथ्रोमायसिन, हैड्रोक्सिक्लोरोक्वीन किंवा तत्सम औषधी कोरोनाला थांबवू शकणार नाहीत.
  • सध्या प्रत्येक जण डॉक्टर होऊन सोशल मीडियावर मनाला येईल ते उपाय छाती ठोकपणे सांगत सुटला आहे. बरेच जण तश्या चुकीच्या माहितीला बळी पडून सगळे उपाय करत आहेत आणि त्याचे दुष्परिणाम भोगत आहेत. कोणत्याही माहितीवर लगेच विश्वास न ठेवता आधी योग्य व्यक्ती/वेब साईट/संस्था कडून पडताळून पहा आणि मगच त्याचा अवलंब करा.
  • शरीरात कमतरता असेल तरच व्हिटॅमिन्स घ्यावेत. नाहीतर त्याचे ही साईड इफेक्ट्स असतात. जास्त माहितीसाठी इथे क्लिक करा.
  • कोरोना व्हायरसच्या अधिक माहितीसाठी मराठी (इथे क्लिक करा) आणि इंग्लिश (इथे क्लिक करा) लेख.
  • कोरोनाची लागण होऊ नये ह्यासाठी टिप्स (इथे क्लिक करा)
  • एक सोपी गोष्ट सांगू का? आपल्याला जर माहित असेल कि समोरची व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे तर लगेच आपण थोडे वेगळे वागायला लागतो आणि जास्त काळजी घेतो कि आपल्याला त्या व्यक्तीकडून कोरोनाची लागण व्हायला नको. जर तुम्ही स्वतः आणि तुमच्या आजूबाजूचे सगळेच लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत असे समजून वागलात तर थोडे सोपे जाईल. या गोष्टीची सवय करून घेतली तर ह्या महामारीतून सुखरूपपणे बाहेर पडू शकू.

अश्या भ्रमात राहू नका कि मी तरुण आणि निरोगी आहे आणि कोरोना लागण झाली तरी ही मी त्यातून बरा होईन आणि माझ्या शरीरातले अँटीबॉडीज माझे रक्षण करतील. अजूनही आपल्याला कोविडचे दूरगामी परिणाम माहित नाहीत. कोण जाणे आजच्या सौम्य रोगाचे पडसाद काही वर्षांनी उमटतील. त्यामुळे जास्त शहाणपणा रोग होऊ न देण्यात आहे. त्यासाठी आवश्यक काळजी ह्यापुढे बराच काळ घ्यायला लागणार आहे. तर ह्या ‘न्यू नॉर्म लाईफस्टाईल’ चा स्वीकार करा. काळजी घ्या पण काळजी न करता जमेल तसे निरोगी आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा!

रेफरेन्सेस:

https://www.weforum.org/agenda/2020/06/vaccine-development-barriers-coronavirus/

2. https://www.cdc.gov/vaccines/index.html

3. https://shotatlife.org/2019/04/24/wiw-2019-how-vaccineswork-part-1/

4. https://www.michigan.gov/documents/mdch/Waiver_Ed_Vaccine_Safety_How_Vaccines_are_Made_479886_7.pdf

5. https://www.nytimes.com/interactive/2020/science/coronavirus-vaccine-tracker.html

6. https://www.mdanderson.org/cancerwise/what-is-covid-19-coronavirus-herd-immunity-when-will-we-achieve-herd-immunity.h00-159383523.html


23 Replies to “कधी येणार कोरोनाची लस?”

  1. खूप छान माहिती, चला आपण चांगली अपेक्षा करूया, यातून निश्चित बाहेर पडू, धन्यवाद माहिती बद्धल

      1. V.nice informative article, Savitra. You have given information on what is Corona n how to take care …v.nice

  2. लोकांच्या मनात ईतका संभ्रम निर्माण झाला आहे की,कोणी काढा सांगत आहे कोणी Arsenic Album कोणी वाफ कोणी गरम पाणी कोणी A/C/E vitamin कोणी योगा व्यायम कोणी 8/10तास झोप कोणी सोशल डींस्टंग/मास/सॅनेटायझर/स्टेहोम कोणी ऑक्सीजन कमी झाली आहे सर्वच जन डॉक्टर बनुन सोशल मीडीयावर आपले ज्ञान पाजळत आहे तरीपण काही लोक सर्वच गोष्टी करत आहे तरीपण पॉझीटीव्ह होत आहे याचा का अर्थ होतो मेडीकल सायंन्स ऐवढे प्रगत झाले तरी पण शेवटी ईश्वरीय शक्ती पुढे हात टेकावेच लागतात जीथे सायंन्स संपते तीथे अध्यात्म ईश्वरीय शक्ती सुरू होते हे मानावेच लागेल मृत्यु अटळ आहे

    1. एवढे निराश होऊन कसे चालेल. तुम्ही तर डॉक्टर आहात. मी माझा अनुभव सांगते. मार्च-मे दरम्यान आमच्या हॉस्पिटल मध्ये ५०० + कोविड पेशंट्स होते आणि आम्ही एकही दिवस न चुकता हॉस्पिटलला जात आहोत. मी एकदाही काढा, वाफ, व्हिटॅमिन सी किंवा कोणतीही औषधे घेतली नाही. फक्त सोशल डिस्टंसिंग, हॅन्ड वॉशिंग, मास्कचा वापर केला. सकस आहार+ व्यवस्थित झोप+भरपूर पाणी+व्यायाम (हे सगळे नेहमीच करते, महामारी म्हणून वेगळे काही केले नाही) सुरु ठेवले. माझी स्वाब आणि अँटीबॉडी टेस्ट नेगेटिव्ह आली. त्यामुळेच मी सांगत आहे कि, शास्त्रीय पुरावा नसेल तर त्या गोष्टी करू नयेत. व्यवस्थित काळजी घ्यावी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. तरच ह्या महामारीच्या संकटाला तोंड देता येईल. बेस्ट विशेस!

  3. खूपच सुंदर व उपयुक्त माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  4. खुप छान, कोरोणा आणि लसीबद्दल एवढी सखोल माहिती माझ्या वाचनात आली नाही, खूप धन्यवाद

  5. THANKS SAVI AUNTY…. खुप छान माहिती वजा सल्ला दिल्या बद्दल. धन्यवाद..🙏🙏🙏

  6. Very nice and useful information.
    It clears all doughts &confusions about covid-19disease & vaccine…..

  7. अतिशय सुंदर आणि ऊपयोगीक माहिती

  8. खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे

  9. आदरणिय डॉ.सावित्रा मँडम….महामारी बद्दल संभ्रम दूर केले….उपयुक्त अशी माहिती दिली….
    आपण अशा कठीण काळात ही जिवाची परवा न करता शेकडों रूगणांची जिव वाचविले प्रशंसा बद्दल शब्दाने काय….ईश्वरच आपले संरक्षण करेल व चांगले फळ देवो….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *