रम्य ते बालपण


बालपण किती निरागस असते ना? आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे बालपणीचे रम्य दिवस आणि त्या सुखद आठवणी असतात. आपल्या बरोबर आपल्या लहान भावंडांचे, भाचे मंडळींचे आणि नंतर आपल्या मुलांचे असे आठवणीत राहिलेले क्षण असतात. बोबड्या बोलातल्या गमती जमती असतात. मी एकत्र कुटुंबात वाढले. माझ्या पेक्षा पाच भावंडे मोठी असल्यामुळे मला भरपूर भाचे-भाची मंडळी आहेत. आज मी तुम्हाला त्या सगळ्या गोड गमती जमती सांगणार आहे. माझे लग्न होऊन मुले झालीत तेव्हा माझ्या लहान भावांची लग्नें झालीत. त्यांच्या मुलांसोबत जास्त सहवास मिळाला नाही. त्यामुळे काही लहान भाच्यांचे गमतीदार किस्से अनुभवण्याचा प्रसंग आला नाही.

मोठ्या बहिणीची मुलगी आरती. लहान आरतीला घेऊन आम्ही काही जण गावातल्या एका नातेवाईकांच्या घरी सहज भेटायला म्हणून गेलो होतो. आम्ही गप्पा मारत असताना काही कामासाठी त्या घरच्या काकू उठल्या. आरतीला वाटले कि त्या आता किचन मध्ये जाऊन आमच्यासाठी चहा-पाणी करायला उठल्या असतील. तिने लगेच त्यांना सांगून टाकले कि, “माझ्यासाठी दूध आणि बाकीच्यांसाठी चहा”. असे म्हणताच आम्ही सगळे हसत सुटलो. त्या काकूंना चहा करावाच लागला. आरतीला खूप आत्या आहेत (सख्ख्या आणि चुलत मिळून). त्यातली एक आत्या खूप कडक शिस्तीची होती. दिवाळी किंवा एखाद्या समारंभाला तिचे वडील जेव्हा सगळ्या बहिणींना बोलावणे पाठवायचे तेव्हा आरती त्यांना सांगायची कि “त्या” आत्याला अजिबात बोलावणे पाठवू नका. आरतीचा अजून एक किस्सा. एके दिवशी ती कोणालातरी खूप जोरात शिव्या घालत होती. म्हणत होती, एवढे मोठे झालात की रे… चड्डी न घालायला काय झाले … लाज वाटत नाही का रे असे शी करायला? तिच्या आईला कळेचना कि हि एवढ्या पोट तिडीकीने कुणाला शिव्या घालत आहे. तिने जेव्हा जाऊन पहिले तर ती गोठ्यातल्या जनावरांना रागावत होती. इतके करून थांबली नाही. तीच्या वडिलांना जाऊन सांगितले की, ऊद्याच्या उद्या ह्या सर्वांना कपडे शिवून आणा.

अभिजितला लाडाने पप्पू म्हणायचे. त्याने शाळेच्या नाटकात पंपूशेठची भूमिका केली होती. मग आम्ही त्याला पंपूशेठ म्हणायचो. लहान अभिजित गल्लीतल्या सगळ्या मुलांना जमवून शाळा शाळा खेळायचा. अर्थातच गुरुजी तो स्वतः असायचा. एकदा एका मुलाने एका शब्दाचा अर्थ विचारला कि प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे काय? अभिजित गुरुजींनी क्षणाचाही विलंब न करता त्याला सांगितले कि, त्यात काय एवढे! पराकाष्ठा म्हणजे दुसर्यांचा काष्टा. त्याच्या बालबुद्धीला आजीच्या नऊवारीचा काष्टा तेवढा माहित होता.

त्याला खाऊ साठी पैसे दिले कि तो कॉमिक्स विकत घ्यायचा. त्याने एक छोटी लायब्ररीच तयार केली होती. माझ्या चिंटूला त्याची लायब्ररी खूप आवडायची आणि तो अभिदादाला सांगायचा कि मी अमेरिकेला जाताना त्या लायब्ररीला दोरा बांधून ते विमानाला बांधून घेऊन जाणार. एकदा अभिजीतचा शर्ट त्यांच्या नेहमीच्या “सुपर टेलर” कडून शिवून आला. त्याला काही तो शर्ट व्यवस्थित आला नाही. अभिजित चिडला आणि म्हणाला, कसा बेकार शर्ट शिवलास रे, सुपल्या (म्हणजे सुपर).मोठ्या भावाची तीन मुले: रूपा, योगेश आणि राकेश. माझ्या बहिणीचे नाव नर्मदा. रूपा तिला नमादा आंटी म्हणायची आणि ते आम्हाला ‘तमाता/टमाटा’ आंटी असे ऐकायला यायचे.

आमच्याकडे पहिल्यांदा लँडलाईन फोन आला होता. फोन नंबर्स एक ते दोन अंकी असल्यामुळे लहान मुलांना फोन लावणे खूप सोपे जायचे. चाळा म्हणून फोनशी खेळत बसायचे. एकदा गम्मत म्हणून योगेशने बस स्टॅन्डला फोन लावला आणि विचारले कि, “नांदेडची बस कितीला (म्हणजे किती वाजता) आहे?”. तिकडचा माणूस गमतीशीर होता. लहान मुलाचा आवाज ऐकून तो म्हणाला, नांदेडची बस दोन लाखाला आहे. त्यानंतर योगेशने तीन चार दिवस फोनला हात लावला नाही. योगेश खूप खोडकर होता. त्याच्यावर नजर राहावी म्हणून त्याच्या कमरेला एक छोटेसे घुंगरू बांधलेले होते. पण तो शेरास सव्वाशेर होता. बाहेर पळायचे असेल तर तो घुंगरू हातात घट्ट धरून ठेवायचा. त्यामुळे त्याचा आवाजच यायचा नाही आणि मग त्याला जिथे जायचे असेल तिथे चुपचाप पळायचा. आमच्या घरापासून बस स्टॅन्ड जवळच होते. योगेश एकदा असाच एकटा बस स्टॅन्डला जाऊन एका बस मध्ये बसला. थोड्याच वेळात बस दुसऱ्या गावाला जाण्यासाठी निघणार होती. योगायोगाने आमची कामवाली मावशी कोणालातरी पाठवण्यासाठी बस स्टॅन्डला आलेली होती. सहजच तिचे लक्ष योगेश कडे गेले. तिला वाटले त्याच्यासोबत त्याच्या घरचे असतील म्हणून ती आजूबाजूला पाहू लागली. तिला आमच्या घरचे कोणीच दिसेना. तिने हेरले कि हा एकटाच चुकून आला आहे. तिने कंडक्टरला सांगून योगेशला बस मधून उतरवून घेतले आणि आमच्या घरी सुखरूप आणून सोडले. ती जर त्या दिवशी तिथे गेली नसती तर काय झाले असते कुणास ठाऊक!राकेश, पियुष आणि संकेत ही तीन भावांची मुले. त्यांच्या वयात जास्त फरक नसल्यामुळे ह्या त्रिकुटाचे चांगलेच जमायचे आणि भांडणे पण बरीच व्हायची. उन्हाळ्यात घराजवळच्या रसवंती मध्ये हे तिघे जाऊन ‘वन बाय थ्री’ असे उसाचा रस पिऊन यायचे. त्यांना माहित होते कि रोज रोज प्रत्येकाला स्वतःच्या आईंकडून पैसे मिळणे कठीण. मग त्यांनी एक युक्ती शोधून काढली होती. एकमेकांच्या आयांना न कळू देता दररोज एक जण त्याच्या आई कडून पैसे मिळवायचा आणि त्यांची रसाची पार्टी व्हायची. ह्या गोष्टीचा उलगडा तेव्हा झाला जेव्हा माझ्या भावाने त्यांना त्या रसवंतीत नेले आणि त्या रसवंतीवाल्याने सांगितले कि ही तीन मुले तर रोजच इथे येत असतात.अंकुश आणि अनुप ही माझ्या दुसऱ्या बहिणीची मुले. मी माझी एम. बी. बी. एस. ची इंटर्नशिप त्या बहिणीकडे सहा महिने राहून केली होती. त्यामुळे त्या भाच्यांसोबत सहा महिने घालवायला मिळाली होती. एके दिवशी गम्मत म्हणून मी अंकुशची रॅपिड फायर घेतली. त्याला सांगितले कि मी एका नंतर एक प्रश्न विचारेन आणि तू पटापट उत्तरे द्यायची. चार पाच प्रश्नानंतर मी विचारले कि पंधरा ऑगस्ट कोणत्या महिन्यात येते आणि त्याने गडबडीत उत्तर दिले “जानेवारीत” (तो १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीमधे कन्फयुज झाला होता). अंकुश मोठा झाल्यावरसुद्धा विठ्ठल आणि पांडुरंग हे देव एकमेकांचे चुलत भाऊ आहेत असे समजायचा. त्याला प्रश्न पडायचा कि आषाढीला विठ्ठलाची पूजा करायची कि पांडुरंगाची!

अंकुशला त्याच्या नांदेडच्या घरचा पिन कोड सहित पूर्ण पत्ता तोंडपाठ होता. त्याबरोबरच त्या वेळचा त्यांच्या घरचा चार अंकी फोन नंबर “तू येत नाईन फोल” म्हणजे २८९४ तो व्यवस्थित सांगायचा. त्यामुळे त्याचा आत्ताचा फोन नंबर कोणाला लक्षात असेल किंवा नसेल पण ३५ वर्षानंतरही तो चार अंकी फोन नंबर आमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे. अंकुश आणि अनुपनी अंडरवियर आणि बनियान साठी “अंडू-बंडू” नावाचा कोड वर्ड तयार केला होता. एकदा त्यांच्याकडे कोणीतरी दूरचे पाहुणे आलेले होते. सकाळची गडबड होती. त्यांची आई पाहुण्यासाठी नाश्ता बनवत होती. इकडे अंकुश-अनुपची शाळेत जाण्याची तयारी सुरु होती. त्या दोघांनी “आई, अंडू-बंडू कुठे आहेत? आम्हाला शाळेत जायला उशीर होतोय.” असा गोंधळ घातला होता. त्या पाहुण्यांना वाटले कि ह्यांना एकूण चार मुले आहेत: अंकुश-अनुप-अंडू-बंडू!!

मी एकदा औरंगाबादहुन नांदेडला येत होते. प्रवासात एक ज्योतिषी काका भेटले. प्रवास लांबचा होता. गप्पा मारता मारता त्यांनी माझ्या हस्त रेषा पाहून माझे भविष्य सांगायला सुरुवात केली. वेळ मजेत गेला. मी नांदेडला बहिणीकडे येऊन त्यांनी सांगितलेले भविष्य सांगत होते आणि चार वर्षाचा अनुप बाजूलाच खेळत होता. त्या ज्योतिषाने मला सांगितले होते कि, तू भविष्यात अमेरिकेला जाशील आणि तिथे असे काहीतरी करून दाखवशील कि ते लोक तुझे पाय धुवून पाणी पितील. हे ऐकल्याबरोबर छोट्या अनुपने लगेच मला बजावले कि, आंटी, तुझे पाय नेहमी स्वच्छ ठेव. कारण ते लोक तुझे पाय धुवून पाणी पिणार आहेत. आमची हसून हसून मुरकुंडी वळली. अनुपला जेव्हा जास्त बोलता येत नव्हते तेव्हा तो वेगवेगळ्या युक्त्या करायचा. बोटाची चिमटी वापरून लहान आणि मोठे असे सांगायचा. जसे कि चिमटीची बोटे जवळ धरून “हू” मामा म्हणजे छोटा मामा आणि तसेच चिमटीची बोटे दूर धरून “हा” मामा म्हणजे मोठा मामा असे सांगायचा. त्याची आई पीठ चाळताना तिला मदत म्हणून तो ही चाळणीत पीठ घालून चाळणी हलवण्या ऐवजी स्वतःची कंबर हलवत राहायचा. त्याला प्रश्न पडायचा कि चाळणीतून पीठ खाली का पडत नाही!

माझा भाचा, पियुषला घरापेक्षा बाहेर जास्त आवडायचे. डॅडी सोबत दुकानात जाण्यासाठी रोजचा हट्ट असायचा. त्याच्या डॅडीला त्याची नजर चुकवून बाहेर पडावे लागायचे. मग पियुषने शक्कल लढवली. त्याला माहित होते कि चप्पल घातल्याशिवाय डॅडीला बाहेर जाता येणारच नाही. मग तो चप्पल घेऊन बसायचा. त्याच्या डॅडीला त्याला घेऊन जाण्याशिवाय पर्यायच नसायचा.

फायबरचे कप बाजारात मिळू लागले होते. आमच्या घरी बरीच बच्चे कंपनी असल्यामुळे आम्हीही फायबरचे कप वापरायला सुरुवात केली होती. लंच झाले कि आम्ही सगळे गप्पा मारत बसायचो. गप्पात चहाची वेळ झालेली पण कळायची नाही. मग चहा व्हायचा. कप बराच वेळ तसेच तिथे राहायचे. मग हळू हळू आमच्या लक्षात आले कि आमचा छोटा संकेत दोन दोन करत कप किचन कडे घेऊन जायला लागला होता. सुरुवातीला आम्ही जास्त लक्ष दिले नाही. मग मात्र आम्हाला शंका आली कि संकेतला कप किचन मध्ये नेण्यात एवढा इंटरेस्ट का आला आहे? काय कारण असेल. आम्ही शोधून काढले कि तो कप घेऊन जाऊन दाराच्या मागे जाऊन त्यात राहिलेला चहा प्यायचा. त्याला चहाची गोडी लागली होती. आम्ही त्या गोड चोराला रंगे हाथ पकडले होते.

माझी भाची, ऋता एक-दीड वर्षाची होती. ती सारखी माझ्या क्लिनिकमध्ये खेळत असायची. तिच्या कानावर मी माझ्या पेशंटला सांगितलेल्या औषधांची नावे पडायची. एके दिवशी तिला कुणीतरी तिचे नाव विचारले तर तिने चक्क कु. क्रोसीन रेखावार म्हणून सांगितले.माझा मुलगा चिंटू आणि मुलगी चिक्की. आमचा चिंटू त्याची मामेबहीण, सोनलची मस्त फिरकी घ्यायचा. चिंटू त्याच्या पाच मामांची नावे अनुक्रमे सांगताना हाताची पाच बोटे वापरायचा. जसे कि अंगठा म्हणजे मोठा मामा आणि करंगळी म्हणजे छोटा मामा असे. सोनलचे पप्पा म्हणजे सगळ्यात छोटा मामा. तिला सतावण्यासाठी चिंटू पहिल्या चार मामांची नावे व्यवस्थित सांगायचा आणि पाचव्या मामाचे नाव आठवत नसल्याचा अभिनय करायचा. सोनल बिचारी त्याला हिंट देत राहायची कि ते माझे पप्पा आहेत…. माझे पप्पा आहेत. तिला बिचारीला वाटायचे कि ह्याला बाकीचे चार मामा आठवतात आणि नेमके माझेच पप्पा का आठवत नाहीत. खूप वेळ सतावल्यानंतर मग एकदाचे तिच्या पप्पाचे नाव सांगायचा आणि मग सोनलची काळजी मिटायची. आम्ही सगळे मात्र मस्त मजा घ्यायचो.छोट्या तेजसला पाण्यात खेळायला खूप आवडायचे. एके दिवशी गम्मत झाली. बराच वेळ झाला तेजस आसपास दिसला नाही म्हणून शोधाशोध सुरु झाली. सगळीकडे शोधून झाले पण त्याचा पत्ता लागत नव्हता. शेवटी तो सापडला. तो बाथरूम मध्ये कोपऱ्यात बसून शांतपणे पाण्याशी खेळत होता. त्याला गरम गरम पोळी खायला खूप आवडायची. त्याला वाटायचे कि पोळीवर तूप पडले कि पोळी थंड होते.गार्गीची मज्जा तर वेगळीच असायची. गल्लीतल्या मैत्रिणींना जमवायची आणि छोट्या सायकलवर बसून कुठे कुठे फिरून यायची. हरवून जायची भीतीच नसायची. एकदा तिने केळे खाल्लं आणि साल शेळी समोर टाकली. शेळीने ते खाल्ले नाही. मग गार्गी त्याच्यावर ओरडली, “ए शेळी, मी खाल्ले..तू पण खा.” गार्गी लहान असताना सुरुवातीला बसने आजोळी जायची. त्यानंतर टॅक्सिकारने जायला सुरु केले होते. एकदा तिच्या पप्पानी तिला विचारले कि तुला बसने जायला आवडते की कारने. तिने उत्तर दिले की कारने. कारण विचारले असता ती म्हणाली, कारमध्ये कंडक्टर नसतो त्यामुळे आपल्याला पैसे देऊन तिकीट घ्यावे लागत नाही. फुकट प्रवास करता येतो.

आम्ही बंगळुरूला होतॊ. चिंटू अडीच वर्षाचा होता. एके दिवशी गम्मतच झाली. सकाळची वेळ होती. माझा नवरा ऑफिसला गेलेला होता. घरी मी आणि चिंटू दोघेच होतॊ. मी अंघोळीला गेले. चिंटूला काहीतरी हवे होते. तो बाथरूमच्या दाराशी येऊन कडीशी चाळा करू लागला. तसे करताना दाराची कडी लागली आणि मी आत कोंडल्या गेले. सुरुवातीला त्याने कडी उघडण्याचा त्याच्या परीने प्रयत्न केला पण यश आले नाही. मग तो कंटाळला आणि टी व्ही पाहात बसला. माझा नवरा संध्याकाळ शिवाय ऑफिस मधून येणार नव्हता. पंचाईतच झाली. तेव्हा मी प्रेग्नन्ट होते आणि जवळपास दोन तास बाथरूम मध्ये अडकून पडले होते. कसे बसे शेजारच्या वहिनीशी संवाद झाला. त्या वाहिनी त्यांच्या नवऱ्याला आणि दिराला घेऊन माझ्या मदतीसाठी धावल्या. त्यांना आत येण्यासाठी घराचे दार कोणीतरी काढायला हवे. त्यांनी चिंटूला दार उघडायला सांगितले तर हा पट्ठ्या म्हणाला, तुम्ही स्ट्रेन्जर (अनोळखी) आहात, मी दार उघडणार नाही. चिंटूला कार राईड खूप आवडायची ते त्यांना माहित होते. त्यांनी त्याला कार राईड ऑफर केली तर हा म्हणे मला तुमच्या कारचा रंग आवडत नाही. त्यांनी खेळणीचे अमिष दाखवले तर म्हणे माझ्याचकडे भरपूर खेळणी आहेत. त्याला पेप्सी आवडायची म्हणून ते घेऊन देते म्हणाल्या तर हा म्हणे पेप्सी अशी सकाळी प्यायची नसते. अशी बराच वेळ जुगलबंदी सुरु होती. दाराच्या बाजूला मोठी खिडकी होती. त्यांनी कसे बसे खिडकी उघडून त्यातून हात मध्ये घालून दार उघडले आणि माझी सुटका केली. बंगळुरूला असताना चिंटूला एका बेबी-सीटरकडे ठेवायची. त्या चिंटूशी इंग्लिश मधेच बोलायच्या. तिथे तो नव-नवीन शब्द शिकून यायचा आणि माझ्यावर त्याचा प्रयोग करायचा. काहीही कारण नसताना माझे डोळे खोटे खोटे पुसत “नो क्राईन्ग” म्हणायचा किंवा ‘दत्ती बॉय’ म्हणजे ‘डर्टी बॉय’ असे म्हणायचा. चिक्की जन्मली त्या दिवशी चिंटूने शाळेला दांडी मारली. दुसऱ्या दिवशी पण त्याला शाळेत जायचे नव्हते. कारण काय तर काल चिक्की झोपलेली होती. त्यामुळे तिने त्याच्याकडे पहिले नाही. गल्लीत सगळ्यांना सांगत सुटला कि आमच्याकडे मुगली (म्हणजे मुलगी) जन्मली आणि मी दादा झालो.आमची चिक्की सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्र होती. पूर्ण घर तिच्या भोवती फिरायचे. मूर्ती लहान आणि कीर्ती म्हणजे खोड्या महान असे होते.एका मामीकडचे सगळे डिंकाचे लाडू संपवायची. दुसऱ्या मामीने एक तास मेहनत करून काढलेली रांगोळी हळूच मोडून यायची तर तिसऱ्या मामीच्या किचन मधली भांडी अश्या ठिकाणी लपवायची कि तिच्याशिवाय ते कोणालाही सापडत नसायचे. तिच्या गोष्टीतला राजा म्हणजे आमच्या शेजारी राहणारा राजा नावाचा मित्र. एकदा ती मामाच्या दुकानात गेली. थोड्या वेळाने तिला कंटाळा आला आणि ती चक्क घरी यायला निघाली तेही मामाचे लक्ष नसताना. तिचे वय आणि घरी यायचा रस्ता पाहता तिचे हरवणे अटळ होते. रस्त्यात भाजी मार्केट आणि तिथे बरीच जनावरे म्हणजे शेळ्या, कुत्री, गायी, म्हशी असायची. मोठ्यांनाच त्या रस्त्यावरून वावरायला कठीण जायचे. आमची चिक्की चक्क कमी वेळात आणि सुखरूप घरी पोहोचली होती. आम्हाला तिचे खूप कौतुक वाटले. अवघड शब्द वापरून देशभक्तीवर छान भाषण करायची. चिक्कीला चुकवून मी हॉस्पिटलला जायची. खेळता खेळता जेव्हा तिला माझी आठवण यायची, ती सगळीकडे माझा शोधाशोध करायची. माझा गाउन दिसायचा आणि तिची खात्री व्हायची कि मम्मी बाहेर गेली आहे. मग ती तो गाउन घेऊन आज्जीकडे यायची आणि तिच्यासमोर गाउन टाकून त्याकडे बोट दाखवत रडायची. तिला बहुतेक असे म्हणायचे असावे कि ह्या गाउन मधली मम्मी कुठे गेली? मग तिची समजून घालता घालता तिच्या आज्जीची दमछाक व्हायची. ती आज्जीसोबत सकाळी लवकर उठायची आणि ब्रश न करता आज्जीकडे चहासाठी हट्ट करायची. जेव्हा मी तिला रागवायची कि एकतर ब्रश केलेला नाही आणि वरून दुधाऐवजी चहा पितेस तर ती चक्क आज्जीवर नाव टाकायची. म्हणायची कि तिनेच मला आग्रह केला म्हणून मी चहा पीत आहे.

आता सगळी मंडळी मोठी झालीत. बऱ्याच जणांची लग्न झालीत आणि त्यांना मुलेही झालीत. आम्ही सगळे जमलो कि अजूनही त्यांच्या लहानपणीच्या खोड्या आठवून एन्जॉय करतो.


2 Replies to “रम्य ते बालपण”

  1. Chhan lihiles Savitra, mast manoranjak vatle. Khare tar athavani sarvana astat pan tya shabdat utaravne prattekala jamat nahi, tula te skill ahe, sundar…..
    Keep on writting.

  2. I am reading at 2:30am as my sleep got disturbed! Do much entertaining article. I am sure to see some funny dreams now 🙂

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *