हा लेख इंग्रजीमध्ये वाचण्यासाठी इथे क्लिक करा: Screen Time: How Much Is Too Much?
पालकत्व म्हणजे मुलांना जन्म देणे, वाढवणे, त्यांना खायला प्यायला देणे, चांगला कपडालत्ता देणे एवढ्यापुरते मर्यादित नाही. मुलांच्या आजारपणात रात्र-रात्र जागणे, मुलांना सुखदुःखाची जाणीव करून देणे, व्यवहारज्ञान शिकवणे, त्यांच्यातील विविध कौशल्यांचा विकास करणे, त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करणे, त्यांना प्रेरणा देणे असं बरंच काही. ह्या व्यतिरिक्त सध्याच्या धावपळीच्या स्पर्धात्मक युगात आधुनिक पालकांसमोर आणखी एक समस्या आहे. ती म्हणजे स्क्रीन टाईम! त्यामुळे पॅरेंटिंग ( पालकत्व) जास्तच आव्हानात्मक झाले आहे. नाण्याच्या दोन बाजू प्रमाणे स्क्रीन टाईमला सुद्धा दोन बाजू आहेत. अर्थातच एक वाईट आणि एक चांगली. मुलेच कशाला, मोठी माणसे सुद्धा स्क्रीन टाईमचा अति वापर करताना दिसतात.
बऱ्याच वेळेस स्क्रीन टाईम किती आणि कसा वापरावा ह्याबद्दल माहिती नसल्यामुळे त्याचा गैरवापर होतो आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. म्हणून ह्या लेखांमध्ये मी स्क्रीन टाईम बद्दल लिहीत आहे. तर पाहूया स्क्रीन टाईम म्हणजे काय. स्क्रीन टाईम म्हणजे आपण टीव्ही, स्मार्टफोन, व्हिडिओ गेम, टॅबलेट इत्यादी सारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणावर घालवलेला वेळ. स्क्रीन टाईमचा वापर माहिती मिळवण्यासाठी, ऑनलाइन लर्निंग साठी, मनोरंजनासाठी आणि सोशलायझेशन साठी होतो. मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी त्यांना शारीरिक व्यायाम, सकस आहार, पुरेशी झोप आणि पॉझिटिव्ह वातावरण असले पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आणि स्क्रीन टाईम याचा योग्य बॅलेंस असायला हवा. तंत्रज्ञान माणसासाठी आहे, माणूस तंत्रज्ञानासाठी नाही, हा फरक लक्षात घ्यायला हवा.
स्क्रीन टाईमचे फायदे:
- स्क्रीन टाईम मुळे आपले जगणे सोपे होते
- बरेच शैक्षणिक वेबसाईट आणि ॲपमुळे मुलांना लिहिणे, वाचणे, स्पेलिंग, ड्रॉईंग शिकायला मदत मिळते
- त्यांची भाषा, उच्चार आणि लिसनिंग स्किल्स विकसित होतात
- क्रिएटिव्हिटी, विश्लेषण करण्याची क्षमता आणि कल्पनाशक्ती वाढते
- मोबाईलचा उपयोग फोन करणे, गाणी ऐकणे, इंटरनेट सर्फिंग, चॅटिंग करणे, गेम्स खेळणे, व्हिडिओ बघणे इत्यादींसाठी करता येतो
- लोकांशी कनेक्ट होणे सोपे होते, मग ते जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असोत (टेक्स्ट मेसेज, ई-मेल, फॅक्स मशीन, व्हिडिओ चॅटिंग आणि सोशल मीडिया इत्यादी)
- काही ॲपद्वारे तुमचे टॅलेंट आणि कला इतरांशी शेअर करता येते
- खरेदी आणि करमणुकीसाठी सोपे साधन
- व्हिडिओ गेम्समुळे मोटर स्किल्स विकसित होतात
- शालेय विद्यार्थ्यांसाठी हे एक वरदानच आहे. गृहपाठ ऑनलाइन दिले जाऊ शकते. पूर्ण केलेले गृहपाठ ऑनलाइन सबमीट करता येते. शिक्षकांना आणि पालकांना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी हा सर्वात सोपा मार्ग आहे. वह्या-पुस्तकांनी भरलेल्या बॅकपॅकच्या ऐवजी एक क्रोम बुक नेता येते
- घरी बसून शारीरिक व्यायाम किंवा योगा शिकता येते. त्यामुळे वेळ आणि पैसा वाचतो
- डिस्टंट लर्निंगसाठी हे एक माध्यम आहे
- नोकरी शोधणे, ऑनलाइन मुलाखत देणे-घेणे, वर्क फ्रॉम होम करणे, मीटिंग अटेंड करणे, कॉन्फरन्स आणि वेबिनार जॉईन होणे अशा एक ना अनेक गोष्टी करता येतात
स्क्रीनच्या फायद्याची भली मोठी लिस्ट पाहून तुम्हाला वाटत असेल की तंत्रज्ञान जर इतके फायदेशीर आहे तर मग चिंता कसली? मोबाइल, इंटरनेट, सोशल मीडिया अशांचा चांगला आणि महत्त्वाच्या गोष्टींसाठी वापर नक्कीच केला जाऊ शकतो. आणि बरेच लोक याचा अशा प्रकारे वापर करतातही. त्यामुळे मोबाइल वाईटच कसा असं एकतर्फी बोलणं उचित ठरणार नाही. त्याचा अतिरेक झाला की त्याचे दुष्परिणाम दिसून येतातच. आणि हे दुष्परिणाम जीवावर बेतणारेही ठरले आहेत. एनीथिंग टू मच इज पॉयझन म्हणजे अति तिथे माती! कुठल्याही गोष्टीचाअतिरेक बरा नाही.
स्क्रीन टाईम दोन प्रकारचा असतो: अॅक्टिव/सक्रिय स्क्रीन टाईमआणि निष्क्रिय/प्यासीव्ह स्क्रीन टाईम.
निष्क्रिय/प्यासीव्ह स्क्रीन टाईम: ज्यामध्ये आपल्याला तयार माहिती मिळत जाते. विचार करावा लागत नाही. उदाहरणार्थ सोशल मीडियाचा वापर, यु ट्यूब वरती व्हिडिओ पाहणे, काही खेळ वारंवार खेळणे, काही कार्यक्रम पाहणे.
ह्याउलट अॅक्टिव/सक्रिय स्क्रीन टाईम मध्ये आपली कल्पकता, विचारशक्तीचा वापर होतो आणि आपण एंगेज राहतो. उदाहरणार्थ यु ट्यूब वरती क्रिएटिव व्हिडिओ बनवणे, शैक्षणिक खेळ खेळणे, चित्र रेखाटणे, वेबसाईटचे कोडींग करणे, पिक्चर एडिटिंग करणे इत्यादी. भाषा, सामाजिक आणि शारीरिक कौशल्य/स्किल्स विकसित होऊ शकतात. शैक्षणिक ॲपद्वारे मुलांना अक्षरे, संख्या, स्पेलिंगची प्रॅक्टिस करता येते.
स्क्रीन टाईमचे दुष्परिणाम:
ह्या टेक्नॉलॉजीमुळे प्रत्येकाचे स्वत:चं एक जग तयार झालं आहे. त्यात एकांत तर मिळाला पण त्याबरोबरच एकटेपणाही आला. असुरक्षितेची भावनाही आली. लहानांप्रमाणे मोठय़ांमध्ये अॅडिक्शनचं प्रमाण खूप आहे. ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त ही मंडळी वैयक्तिक आयुष्यात मोबाइलचा अतिवापर करतात.
- गाडी चालवताना मोबाइलचा वापर करणाऱ्यांच्या मृत्युचा आकडा वाढतच चालला आहे.
- मुलांमध्ये हट्टीपणा वाढताना दिसून येत आहे
- इमोशनल रेगुलेशन म्हणजे भावनिक नियमनावर नकारात्मक परिणाम होत आहे
- चेहऱ्यावरचे भाव आणि शाब्दिक संकेत ओळखण्याची क्षमता कमी होत आहे
- मुलांमध्ये एंग्जायटी (anxiety) वाढलेली दिसून येत आहे
- मुलांमध्ये आणि पालकांमध्ये संभाषण कमी होत आहे. त्यामुळे पालक आणि मुलांच्या नात्यांमध्ये दुरावा येत आहे
- स्क्रीनचा झोपेवर परिणाम होत आहे. आपल्या ब्रेनमध्ये मेलाटोनिन नावाचे एक संप्रेरक असते जे आपल्या झोपेसाठी आवश्यक असते. स्क्रीनपासून येणाऱ्या ब्ल्यू लाईटमुळे मेलाटोनिन व्यवस्थित तयार होत नाही आणि त्यामुळे झोप व्यवस्थित होत नाही. व्यवस्थित झोप न मिळाल्यामुळे त्याचे बरेच दुष्परिणाम दिसून येतात. मोबाइलमुळे मोठय़ांमध्ये स्लिप डिसऑर्डर या आजाराचं प्रमाण जास्त दिसतं
- स्क्रीन टाइममूळे मुलें जास्त वेळ घरात असतात. त्यामूळे मुलांना पुरेसे सूर्यप्रकाश मिळत नाही जे डोळ्यांच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असते. सतत स्क्रीनवर फोकस केल्यामुळे डोळे थकतात. डोळ्यांची उघड-झाप कमी झाल्यामुळे ते कोरडे होवून जळजळतात.
- मुलांच्या फोकस आणि अटेंशनवर परिणाम होऊन त्याचा शिक्षणावर वाईट परिणाम होत आहे
- स्क्रीनच्या व्यसनामुळे मेंदूचा काही भाग संकुचित होऊ शकतो
- उदासीनता/ डिप्रेशनची रिस्क वाढते
- अयोग्य जाहिराती, हिंसा, अयोग्य भाषेचा मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो
- सोशल इंटरॅक्शन कमी होत आहे
- आई-वडिलांनी मोबाईल काढून घेतल्यामुळे आत्महत्या केल्याची उदाहरणे आपण पाहतो
- सेल्फी काढायच्या नादात पाण्यात पडून मृत्यू पावल्याच्या घटना आहेत
- मुलं जेवताना पालक त्यांच्या हातात मोबाईल किंवा टॅबलेट देतात. असे केल्याने जेवण आणि मोबाईल असे समीकरण त्यांच्या डोक्यात पक्कं होते आणि स्क्रीन शिवाय ते जेवत नाहीत
- मुलांमध्ये उशिरा बोलण्याचे प्रमाण दिसत आहे
- मैदानी खेळ सुटल्याने मुलं शारीरिक व्यायामाला मुकत चालली आहेत. स्क्रीनच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा आणि मधुमेह आढळून येत आहे
- अॅडिक्शनमुळे नोकरी जाणे, जोडीदार सोडून जाणे, घटस्फोट होणे अशा टोकाच्या गोष्टी घडू शकतात
अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक (AAP) चे रेकमेंडेशन:
- 18 महिन्यापेक्षा लहान मुलांसाठी फक्त व्हिडिओ चॅटिंग योग्य आहे. त्या व्यतिरिक्त त्यांना स्क्रीन देऊ नये
- 18 ते 24 महिने वयाच्या मुलांसाठी ३० मिनिटे स्क्रीन टाईम सांगितले आहे. पालकांनी उच्च गुणवत्तेचे प्रोग्राम निवडले पाहिजेत आणि त्यांच्यासोबत बसून त्यांना मदत केली पाहिजे
- 2 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांसाठी दररोज एक तास स्क्रीन टाईम सांगितले आहे. पालकांनी त्यांच्या सोबत बसून त्यांना समजून घेण्यासाठी मदत करावी.
- 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी दररोज दोन तास स्क्रीन टाईम सांगितले आहे. त्यांना कोणत्या साईट वर जाण्याची परवानगी द्यावी हे सुज्ञ पालकांनी सुनिश्चित करावे. तसेच त्यांच्या शारीरिक व्यायाम, झोप, होमवर्क, आणि इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होत नाही ना याकडे लक्ष असू द्यावे
- 13+ वयोगटाच्या मुलासाठी पालकांनी नियम घालून दिले पाहिजेत.त्यांनी किती वेळ सोशल मीडियावर जावे, कोणते गेम्स खेळावे आणि कोणत्या वेब साईटवर जावे इ.
- पॅरेंटल कंट्रोल सारखे सॉफ्टवेर किंवा ऍप वापरून मुले काय पाहत आहेत त्यावर बारीक लक्ष ठेवावे आणि त्यांचा स्क्रीन टाइम कंट्रोल करावा.
रात्रीचे जेवण किंवा ड्रायव्हिंग सारख्या मीडिया-फ्री टाइम्स किंवा गॅझेट फ्री टाईम फिक्स करा.
मुलांना ऑनलाइन सुरक्षिततेबद्दल सावध करा
त्यांना इतरांशी ऑनलाइन आणि ऑफलाईन कसे वागावे याबद्दल शिकवा
स्क्रीन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. त्याला आपण टाळू शकत नाही. त्याचा सुज्ञपणे वापर करायला पाहिजे जेणे करून आपल्याला त्याचा फायदा जास्त आणि तोटा कमी झाला पाहिजे. थोडक्यात सांगायचे म्हणजे, शाप की वरदान हे ठरवणे तुमच्या हाती आहे!
छान आहे सावी लेख !
Thank you, dear 🙂