हा लेख इंग्रजीतून वाचण्यासाठी इथे क्लिक करा: Epilepsy
मेंदू हा कोट्यावधी पेशींनी बनलेल्या असतो. त्या पेशींना न्यूरॉन्स म्हणतात जे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी विद्युत सिग्नल तयार करतात. जेव्हा ॲबनॉर्मल आणि अनियंत्रित विद्युत सिग्नल तयार होतात, तेव्हा व्यक्तीला फिट किंवा आकडी किंवा सिझर येते. फिट वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही फिट्समध्ये पूर्ण शरीराला झटके येतात, तोंडातून फेस येतो, शुद्ध हरपते तर काही मध्ये व्यक्ती स्टेरिंग म्हणजे एकटक शून्यात पहात हरवून जाते आणि रिस्पॉन्स देत नाही. काही फिट्समध्ये व्यक्तीला पूर्वसंकेत मिळतो जसे की एक विशिष्ट प्रकारचा वास येणे, तोंडात खराब टेस्ट येणे किंवा दृश्य-भास होणे. अशा वॉर्निंग साइनला आभा किंवा ऑरा म्हणतात.
सीझर येण्याची बरीच कारणे असू शकतात:
- झपाट्याने वाढणारा ताप (फ़ेब्राइल सीझर किंवा फिवर सीझर)
- रक्तातील साखरेची पातळी अत्यंत कमी होणे
- मेंदूची शस्त्रक्रिया किंवा डोक्याला दुखापत
- अल्कोहोल, प्रिस्क्रिप्शन औषध किंवा ड्रग्स विथड्रॉवल
- संसर्ग, जसे मेंदुज्वर किंवा एन्सेफलायटीस
- पॅरासाईट संसर्ग, जसे की टेपवर्म किंवा टॉक्सोप्लाज्मोसिस
- रक्तातील सोडियम किंवा कॅल्शियमची पातळी कमी होणे
वारंवार फिट येण्याच्या प्रवृत्तीला इंग्रजीमध्ये एपिलेप्सी आणि मराठी मध्ये अपस्मार फेफरे येणे किंवा मिरगीचा आजार असे म्हणतात. ह्या आजाराला वेळीच ट्रीटमेंट द्यायला हवी. नाही दिल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि जीवावर बेतू शकते. सीझर काही सेकंद किंवा 5 मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकू शकते.
एपिलेप्सी असलेल्या जगभरातील लोकांची संख्या: 65 दशलक्ष
अमेरिकेत अपस्मार असलेल्या लोकांची संख्या: 3.4 दशलक्ष
अमेरिकेत दरवर्षी एपिलेप्सीच्या नवीन प्रकरणांची संख्या: 150,000
सीझरचे तीन टप्पे असतात:
प्री-इक्टल: सीझरपूर्वीचा कालावधी. व्यक्ती नेहमीपेक्षा वेगळी वागू लागते.
इक्टल: सीझर प्रत्यक्षात घडत असतानाचा टप्पा.
पोस्ट-इक्टल: सीझर थांबल्यानंतरचा कालावधी. व्यक्ती गोंधळलेली/ कन्फ्युज्ड असणे, त्याचे नाव किंवा तो कुठे आहे हे माहित नसणे, आणि त्याला विश्रांतीची किंवा झोपेची आवश्यकता असते.
सीझरचे प्रकार:
1. फोकल सीझर– हे मेंदूच्या एका भागातून येतात.
- सिम्पल फोकल सीझर– ह्या प्रकारात ट्विचींग येणे किंवा विचित्र प्रकारची चव किंवा वास ह्याचा भास होणे.
- कॉम्प्लेक्स फोकल सीझर: ह्या प्रकारात व्यक्ती गोंधळून जाते/कन्फ्युज्ड होते किंवा चकित होते. काही मिनिटांसाठी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यास असमर्थ असतात.
- सेकंडरी जनरलाईज्ड सिझर्स– हे मेंदूच्या एका भागात सुरू होऊन सगळीकडे पसरतात.
2. जनरलाईज्ड सिझर्स– हे मेंदूच्या दोन्ही भागातून येतात. याचे अनेक प्रकार आहेत
- जनरलाईज्ड टॉनिक क्लोनिक सीझर्स (जीटीसी/GTC)- ज्याला ग्रँड मॉल सीझर्स देखील म्हणतात. एखाद्या व्यक्तीला कोणतीही पूर्वकल्पना न मिळता अचानक आकडी येते, शुद्ध हरपते, शरीराचे स्नायू ताठरतात आणि झटके येतात.
- मायोक्लोनिक सीझर-अचानकपणे काही सेकंदासाठी एका हाताला किंवा एका पायाला झटके येतात
- एटोनिक सीझर किंवा ड्रॉप अटॅक– अचानकपणे स्नायू लुळे पडतात आणि व्यक्ती जमिनीवर पडते
- एबसान्स सिझर्स किंवा पेटिट माल – काही सेकंदांसाठी कुठेतरी टक लावून पाहणे आणि सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव नसणे.
- टॉनिक सीझर– हात आणि पाय ताठ होणे
एपिलेप्सीची कारणे: जवळपास पन्नास टक्के केसेसमध्ये अपस्माराचे कारण अनाकलनीय असते, ज्याला इंग्रजीमध्ये इडियोपथिक असे म्हणतात. बाकीच्या केसेस मध्ये खालील कारणे असू शकतात:
- अनुवंशिकता: बर्याच प्रकारच्या एपिलेप्सीमध्ये अनुवंशिकता दिसून आली आहे. काही विशिष्ट प्रकारच्या जनुकामुळे त्या व्यक्तीचा मेंदू संवेदनशील असतो आणि त्यांना सहज रित्या सिझर्स येतात. जर फॅमिलीमध्ये कोणाला एपिलेप्सी असेल तर त्या व्यक्तीला एपिलेप्सी होण्याची रिस्क असते.
- ब्रेन इंजुरी: अपघातामुळे किंवा इतर कारणामुळे जर डोक्याला दुखापत झाली असेल तर परिणामी एपिलेप्सी उद्भवू शकते.
- ब्रेन ट्यूमर किंवा मेंदूत गाठ येणे, स्ट्रोक मुळे एपिलेप्सी उद्भवते. स्ट्रोक हे 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांमध्ये एपिलेप्सीचे प्रमुख कारण आहे.
- संसर्गजन्य रोग: मेनिंजायटीस, एड्स आणि व्हायरल एन्सेफलायटीस सारख्या संसर्गजन्य रोगांमुळे अपस्मार होऊ शकतो.
- आईच्या पोटात असताना किंवा जन्मजातच मेंदूला दुखापत झाल्यामुळे, किंवा काही कारणामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होणे इत्यादी कारणांमुळे एपिलेप्सी संभवते.
- डेव्हलपमेंटल डिसऑर्डरस: कधीकधी ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर आणि न्यूरोफिब्रोमाटोसिससारख्या कंडिशनमध्ये एपिलेप्सी होऊ शकते.
एपिलेप्सीचे निदान कसे करतात?
एलेक्ट्रोईन्सिफलोग्रम किंवा ई-ई-जी (EEG) द्वारे ब्रेन वेव्ह्जची स्टडी करतात. ह्यामध्ये डोक्यावर वीसेक इलेक्ट्रोड्स लावतात आणि ते कॉम्प्युटरला कनेक्ट करतात. लाँग-टर्म-व्हिडिओ-ई-ई-जी जास्त उपयुक्त असते.
सिटीस्कॅन (CT scan) किंवा एम आर आय (MRI) करतात. बऱ्याच केसेसमध्ये ब्रेन स्कॅन नॉर्मल असतात. काही ठराविक केसेस मध्ये रक्ताच्या चाचण्या, जेनेटिक टेस्ट, मेंदूतील पाणी (सेरेब्रोस्पायनल फ्लुईड) टेस्ट करतात.
एपिलेप्सीचा इलाज: त्या व्यक्तीला पुन्हा सीझर येऊ नये म्हणून त्याला ट्रीटमेंट दिली जाते.
औषधे: ह्या औषधांना अँटी एपिलेप्टिक ड्रग्स म्हणतात. हि औषधे दररोज घ्यावी लागतात. जवळपास तीस प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. त्यांची नावे खाली इंग्रजी मध्ये दिलेले आहेत. काही एपिलेप्सी प्रकारात अशा औषधांची गरज नसते. काही एपिलेप्सी प्रकारात त्या व्यक्तीला आयुष्यभर औषधांची गरज लागते. पण बहुतांश केसेसमध्ये औषधांनी सीझर कंट्रोल झाल्यास काही वर्षांनी औषध बंद करतात.
इमर्जन्सी सीझर मेडीकेशन्स– जर सीझर पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ सुरू राहिल्यास फिट थांबण्यासाठी अशा इमर्जन्सी औषधांची गरज असते. लहान मुलांना गुदद्वारा मार्गे (जसे एनिमा देतात) सिरींजने औषध देतात. काही प्रकारचे नेझल स्प्रे वापरतात. नाकात स्प्रे मारून सीझर थांबवतात.
वेगस-नर्व्ह-स्टिम्युलेटर: हे नाण्याच्या आकाराचे एक डिवाइस असते. छातीच्या त्वचेखाली बसवले जाते. यातून निघणारी बारीक वायर मानेच्या त्वचेखालच्या वेगस नर्व्हला अटॅच करतात. ह्या डिवाइसमधून निघणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे वेगस नर्व्ह सीझरचा कंट्रोल करते.
किटोजेनीक डायट: ह्या स्पेशल डायटमध्ये कमी कार्बोहाइड्रेट आणि जास्त फॅट पदार्थ असतात. त्यामुळे ऊर्जेसाठी मेंदू ग्लुकोज ऐवजी फॅटचा वापर करतो.
एपिलेप्सी सर्जरी: काही ठराविक केसेसमध्ये जर मेडिसिन्स काम करत नसतील तर सर्जरी करतात.
एपिलेप्सीचे कॉम्प्लिकेशन्स:
- स्टेटस एपिलेप्टीकस– पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ आकडी येणे किंवा एकानंतर एक आकडे येणे ह्याला स्टेटस एपिलेप्टीकस म्हणतात. अशा केसेसमध्ये परमनंट ब्रेन डॅमेज किंवा मृत्यू होऊ शकतो.
- सडन अनएक्सप्लेन्ड डेथ इन एपिलेप्सी (SUDEP)– ही एक रेअर कॉम्प्लिकेशन आहे. एका वर्षात 4500 मुलांमध्ये एक मृत्यू होतो. ज्यांना एका वर्षात तीन किंवा जास्त जनरलाईज्ड सीझर येतात, तसेच ज्यांना झोपेमध्ये सीझर येतात, त्यांना ह्याची रिस्क जास्त असते. झोपेमध्ये सीझर येऊन श्वास थांबू शकतो.
आपल्या मुलाला सीझर येत असताना काय करावे?
- घाबरून जाऊ नका.
- सीझर केव्हा सुरू झाला आणि किती काळ टिकला याची नोंद करा. शक्य असल्यास व्हिडिओ रेकॉर्डिंग करा ज्यामुळे डॉक्टरांना खूप माहिती मिळू शकते.
- मुलाला हळूवारपणे जमिनीवर किंवा एखाद्या पृष्ठभागावर झोपवा. त्याच्या आसपास असलेल्या तीक्ष्ण वस्तू बाजूला काढा.
- त्याची मान उजवी किंवा डावीकडे वळवा. त्यामुळे लाळ किंवा उलटी लंग्समध्ये (फुफ्फुसात) जाण्यापासून संरक्षण मिळते.
- मुलाच्या मानेभोवतीचे कपडे सैल करा. त्यामुळे त्याला श्वास घेणे सोपे जाते.
- तोंडात पाणी टाकणे, तोंडात चमचा ठेवणे, तोंडावर पाणी शिंपडणे, चप्पल हुंगवणे, तोंडात बोटे घालून दातखिळी उघडण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार करू नयेत. असे करून सीझर थांबवता येत नाही.
- सीझर थांबल्यानंतर थोड्यावेळासाठी तो रिस्पॉन्स देणार नाही, कन्फ्युज्ड असू शकेल, किंवा खूप थकलेला असेल. त्याला झोपू द्या.
- जोपर्यंत तो पूर्णपणे शुद्धीवर येत नाही तोपर्यंत काहीही खायला-प्यायला देऊ नका.
- जर तुमच्या मुलाला एपिलेप्सीचे निदान झालेले असेल आणि त्याच्या डॉक्टरांनी त्याला सीझर थांबवण्यासाठी इमर्जन्सी औषध लिहून दिले असेल तर ते निर्देशानुसार वापरा.
स्थानिक आपत्कालीन क्रमांकावर कॉल करा (यूएसए मध्ये 911; इंडिया मध्ये ११२) जेव्हा:
- मुलाला पहिल्यांदाच सीझर आलेली असल्यास
- सीझर नंतर व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत असल्यास.
- सीझर 5 मिनिटांपेक्षा जास्त काळ सुरू राहिल्यास
- एकापाठोपाठ एकापेक्षा जास्त सीझर आल्यास
- सीझर दरम्यान व्यक्तीला दुखापत झाल्यास.
- पाण्यात असताना सीझर आल्यास
- मधुमेह किंवा हृदयरोग यासारखे आजार असणाऱ्यांना सीझर आल्यास
सीझर प्रिकॉशन्स/ प्रतिबंधात्मक उपाय :
- मुलांना दुचाकी, स्कूटर किंवा स्केटबोर्ड चालवताना हेल्मेट घालण्याची सक्ती करा.
- मुलाला बंक बेडच्या वरच्या बेडवर झोपू देऊ नका.
- मुलाला झाडांवर किंवा खडकांवर चढू देऊ नका.
- मुलाला त्याच्या बेडरूम किंवा बाथरूमच्या दरवाजाला कडी लावू देऊ नका.
- लाईफ गार्ड किंवा ज्या व्यक्तीला सीझरबद्दल माहिती आहे अशा व्यक्तीच्या सुपरव्हिजन शिवाय मुलाला पोहू देऊ नका. तुमच्या मुलाला लाइफ जॅकेटसारखे फ्लोटेशन उपकरण वापरण्यास सांगा.
- मुलाच्या शिक्षकांना कल्पना द्या की त्याला अपस्मार आहे. त्याला जर शाळेत सीझर आल्यास काय करायचे याची लेखी सूचना द्या. न्यूरोलॉजिस्ट कडून सीजर ॲक्शन प्लॅन घ्या.
- आपल्या मुलाने बाथ ऐवजी शॉवर घेणे सेफ आहे. बाथ घेताना सीझर आल्यास नाकातोंडात पाणी जाऊन जीवाला धोका संभवतो.
एपिलेप्सी असणाऱ्या मुलांच्या पालकांसाठी टिप्स:
- आपल्या मुलाला नियमितपणे ठरलेल्या वेळी औषध द्या. दररोज औषध घेण्याची आठवण करून देण्यासाठी अलार्म सेट करा.
- तणाव/स्ट्रेस मुळे मुलाला सीझर येऊ शकते. त्यासाठी हेल्दी लाइफस्टाइलकडे लक्ष द्या. मुलाला व्यायामासाठी प्रोत्साहित करा. व्यायामामुळे ताण कमी होण्यास मदत होते.
- झोपेची कमतरता सीझरला कारणीभूत ठरू शकते. झोपेचे वेळापत्रक तयार करा. झोपायची आणि उठायची वेळ फिक्स करा.
- सीझर डायरी ठेवा. प्रत्येक सिझरची नोंद ठेवल्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलाचे सीझर ट्रिगर शोधण्यात आणि ते टाळण्यास मदत होऊ शकते. संभाव्य ट्रिगरमध्ये आजार, झोपेची कमतरता, हार्मोनल बदल, तणाव यांचा समावेश आहे.
- कुटुंबातल्या सगळ्यांना, मुलाच्या मित्रांना आणि शाळेच्या अधिकाऱ्यांना एपिलेप्सीबद्दल कल्पना द्या. त्यामुळे तुमच्या अनुपस्थितीत सीझर आल्यास तुमच्या सूचनांचे पालन करून मुलाला सुरक्षित ठेवू शकतात.
- किशोरवयीन मुलांना एपिलेप्सीमुळे काही काळ ड्रायव्हिंग करायची परवानगी नसते. डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- एपिलेप्सी असणाऱ्या मुलाने मेडिकल अलर्ट ज्वेलरी किंवा कार्ड नेहमी जवळ ठेवावे
v.nice article
Thank you, Seema.
खूप महत्वपूर्ण माहीती मिळत आहे वेगवेगळ्या आजारावर सावित्रा तुझ्याकडुन. खूप भाग्यवान आहे मी तुझ्यासारखी विद्वान व कधी कूनाला कमी न लेखनारी मैत्रीन मला भेटली Thanks सावित्रा तुझ्या या सत्कार्या बद्दल.
Thank you my sweet friend:)