एक छानशी आठवण!


आज १५ फेब्रुवारी, २०२० म्हणजे शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन! व्हाट्सऍप मुळे कळाले. परवा पासून पिठलं करायचं ठरवत होते पण काही कारणास्तव राहून गेले होते. त्यात माझा मुलगा म्हणाला कि मम्मी, शनिवारीच निवांतपणे कर पिठलं. त्यालाही कल्पना नव्हती. अश्याप्रकारे छान योग जुळून आला आणि मग पिठलं आणि ज्वारीच्या भाकरी ऐवजी कीनवा रोटी (Quinoa, ज्वारी सारखे एक धान्य) असा बेत केला. अमेरिकेला येताना संगीता वहिनीने गजानन महाराजांची पोथी दिली होती. मग काय. मनोभावे पोथी वाचन, पूजा आणि पिठलं- रोटी- कांद्याचा नैवेद्य केला. ह्या निमित्ताने बावीस वर्षांपूर्वीच्या एका प्रसंगाची आठवण झाली आणि ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली.

मी आणि माझा चिंटू

माझा मुलगा, चिंटू तेव्हा दीड वर्षाचा असेल. आम्ही ठाण्याला राहायचो. मी मुलुंड हॉस्पिटलमधे भूलतज्ञ् म्हणून काम करायची आणि मला रोज सकाळी सकाळी जॉब साठी जावे लागायचे. चिंटूला मी एका पाळणा घरात ठेवायची. पाळणाघराच्या उषा ताई खूप छान होत्या. चिंटू त्यांचा खूप लाडका होता. त्या म्हणायच्या कि तुमचा चिंटू अतिशय शहाणं बाळ आहे. कधी रडत नाही, कशाचा हट्ट नाही आणि एकदम गुणी आहे. एके दिवशी मी चिंटूला संध्याकाळी घ्यायला गेले तेव्हा त्या माझी आतुरतेने वाट पाहत होत्या. त्यांना त्या दिवशी घडलेली एक घटना मला सांगायची होती.

तो दिवस आजच्यासारखा श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन होता. उषाताईंची गजानन महारांजावर खूप भक्ती होती.  त्यांनी पिठलं-भाकरीचा भरपूर प्रसाद बनवला होता आणि जवळच्या गजानन महाराज मंदिरात जाऊन नैवेद्य दाखवणार होत्या. त्या म्हणे, कधीही हट्ट न करणारा चिंटू त्यादिवशी ते पिठलं-भाकरी खाण्यासाठी हट्ट धरून बसला. काही केल्या ऐकेचना. नैवेद्य देवाला दाखवण्या आधीच उष्टे कसे करणार ? चिंटू रडायला लागला आणि रडतच राहिला. त्यांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. त्याच्या आवडीची खेळणी आणि खाऊचे अमिष दाखवले पण काही उपयोग झाला नाही. रडून रडून तो घामाघूम झाला. म्हणून त्यांनी त्याचा शर्ट काढून टाकला. जवळपास एक तास तो रडत होता. त्यांना काय करावे सुचत नव्हते. त्यांना कळेचना कि कधी न रडणाऱ्या , न हट्ट करणाऱ्या चिंटूला त्या दिवशी काय झाले होते. त्यांना अंगात सदरा नसलेल्या आणि पिठलं-भाकरी साठी रडणाऱ्या त्या दिड वर्षाच्या मुलात गजानन महाराजांचा भास झाला. त्यांना वाटले बहुतेक गजानन महाराजच चिंटूच्या रूपात त्यांची परीक्षा पाहत होते. लहान मुले म्हणजे देवाघरची फुलेच ना. असा विचार करून ‘गण गण गणात बोते’ असे म्हणत त्यांनी चिंटूला नमस्कार करून त्याला पिठलं-भाकरी खायला दिले. एकच घास खाल्ला आणि तो शांत झाला. त्यांच्या लक्षात आले कि त्याला काही पिठलं-भाकरी खायची नव्हती. तो फक्त परीक्षा पाहत असावा कदाचित. त्यानंतर उरलेले पिठलं-भाकरी घेऊन त्या मंदिरात गेल्या, देवाची माफी मागितली आणि उष्टावलेले नैवेद्य गोड मानून घेण्याची देवाला विनंती केली.

खरंच! लहान मुले म्हणजे देवाघरची फुलेच असतात!


21 Replies to “एक छानशी आठवण!”

  1. खूप छान, जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते

  2. श्रुद्धा,विश्वास, व प्रामाणिक कार्य,यामधून जे साध्य होत,त्यासारखा आनंद कश्यातच नाही.
    Everything that we do ,with faith, solemnly presents,in our subconscious mind , exhibits our work before GOD,in present life only

  3. अतिशय छान सावी तुझे लिखाण वाचुन खुप छान वाटत .

  4. Very nice , ushatai did the right thing, In bible also Jesus says’ the kingdom of God belongs to children’ .

  5. Khup chan ..Gan Gan Ganat both.
    आपले संस्कारच खूप छान आहेत. आणि तू त्यांचावर विश्वास ठेवतेस .खूप मोठी गोष्ट आहे.
    लिखाण सुंदर..

  6. जगाने कीतीही प्रगती केली तरी पण भारतीय संस्कृती मध्ये श्रध्दा/भक्ती/ ईश्वरीय शक्तीवर अटळ विश्वास हे प्रत्येक भारतीयाच्या मनावर लहान पणा पासुन कोरलेले असते तुम्ही साता समुद्रापलीकडे गेल्या तरी आपली ईश्वरावरील श्रध्दा थोडी सुध्दा कमी होऊ दीली नाही हेच भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे

  7. Gan gan ganat bote ..
    Kup chan anubav mam, Maharaj achi कृपा…..
    माझा ही छोटासा प्रयत्न महाराजांच्या चरणी..”Rudramarathi”चॅनल🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *