माझे सण….अमेरीकेत पण!


ह्या लेखाचे युट्यूब विडिओ आणि ऑडिओ क्लिप खाली दिलेले आहे.

‘आपली संस्कृती’ हा शब्द आपण नेहमी ऐकतो आणि वापरतो. पाहू या संस्कृती म्हणजे नेमके काय? संस्कृती म्हणजे भाषा,आचार-विचार, सण-वार, पोशाख-पेहराव, खाद्य पदार्थ, चालीरिती, रूढी-परंपरा, रितीरिवाज असे विविध पैलू असलेली आपली जीवन पद्धती. ती प्रांतवार आणि काळानुसार बदलत असते. मुख्यतः पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृती असे ढोबळ प्रकार असले तरीही भारतीय संस्कृती मध्ये सुद्धा प्रांतवार बरेच भेद आहेत. महाराष्ट्रातली संस्कृती आणि तेलंगणा किंवा आसाम-बंगालमधली संस्कृती यामध्ये बरेच फरक दिसून येतात. इतकंच कशाला? अगदी गावांचीही संस्कृती वेगवेगळी असते. जसे पुण्याची संस्कृती, मुंबईची संस्कृती अशी स्वतंत्र ओळख असू शकते. तर सांगायचे तात्पर्य हेच कि मी भारतीय संस्कृतीत वाढले आणि सध्या अमेरिकेत म्हणजे पाश्च्यात्य संस्कृतीत वावरत आहे. असे करताना मन क्षणोक्षणी दोन्ही संस्कृतींची तुलना करत राहते. मनाला एक कायमचा प्रश्न पडलेला असायचा कि हे सण-वार आणि पद्धती कितपत पाळायच्या? त्याला कोणती लिमिट आहे का आणि ते कोण ठरवत असते? मग मीच माझ्या मनाला सांगते कि, बाई ग, तुला जे आवडेल ते कर. शेवटी, कुठल्या गोष्टीला किती महत्वं द्यायचं, हे ज्याने त्याने ठरवायचं!

स्वाध्याय चळवळीचे प. पु. पांडुरंगशास्त्री आठवले लिखित पुस्तके, ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाची शिकवण, श्रीमद्भगवद गीता पाठांतर आणि धार्मिक वातावरणात आई-बाबांनी केलेले संस्कार ह्यामुळे आपल्या संस्कृतीची मनावर घट्ट पकड आहे जी पाश्चिमात्य संस्कृतीकडे वाहवत जाऊ देत नाही. त्यामुळे अमेरिकेत मी आपले सण साजरे करते आणि काही पद्धती पाळते. ह्यासाठी जास्त करून पाठीवर शाबासकीची थाप पडते आणि तोंडभरून कौतुक होते. पण कधी कधी मायदेशातल्या आपल्या लोकांकडून ऐकायला मिळते कि, काय ग, तू एवढी शिकलेली असून आणि अमेरिकेत राहूनही हे सगळं काय करत बसतेस? आम्ही इथे इंडियातच करणे बंद केले आहे. माझा ह्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोण वेगळा आहे. मी जेव्हा दिवाळी, ख्रिसमस, हनुक्का किंवा ईद सारखे वेगवेगळ्या धर्मातले सण पाहते, त्यात खूप साम्य आढळून येते. दैनंदिन आयुष्य जगताना आपण कंटाळून जात असतो. काहीतरी नवीन घडण्याची वाट पहात असतो. माणसाच्या या सतत नाविन्याच्या आणि बदलाच्या ओढीने सणांचा जन्म झाला. जर सण-उत्सवामागची पारंपारिकता आणि कथा बाजूला सारून सगळ्या धर्मातल्या सणांची तुलना केली तर खूप साम्य दिसून येते. कोणताही सण आला कि आपण घर स्वच्छ करतो, घराला सजवतो, नवीन कपडे खरेदी करतो, गोड-धोड बनवतो, आपल्या आराध्य देवतेला आपापल्या पद्धतीने प्रार्थना करतो, एकमेकांना गिफ्ट देतो आणि अश्या प्रकारे तो दिवस वेगळ्या पद्धतीने घालवतो. त्यामुळे मन ताजे तवाने होते आणि परत आपले दैनंदिन सुरु राहते. तर मग आपापल्या मनाला भावेल ते सण आणि पद्धती का करू नयेत? आपली संस्कृती आपणच जपायला हवी, ती पुढल्या पिढीपर्यंत पोचवायला हवी असाही थोडा उद्देश आहे.

आज तुम्हाला मी अमेरिकेत काय काय भारतीय सणवार आणि पद्धती जपते त्याबद्दल सांगणार आहे. सर्वप्रथम शाळेतल्या माझ्या मराठी शिक्षिकेला धन्यवाद देते कारण त्यांच्यामुळे अजूनही मराठी महिने तोंडपाठ आहेत आणि क्रम पण विसरले नाही. 😀 कोणत्या महिन्यात कोणते सण असतात ह्याची नामावली नेट वर सापडली. ती इथे कॉपी/पेस्ट करत आहे. त्यातले मी अगदी मोजकेच साजरे करते.

 • चैत्र– गुढीपाडवा (हिंदू नववर्षारंभ), रामनवमी ,हनुमान जयंती
 • वैशाख -अक्षय तृतीया (परशुराम जयंती, श्री नृसिंह जयंती, शनैश्चर जयंती )
 • ज्येष्ठ -वटपौर्णिमा
 • आषाढ -पंढरपूर यात्रा,गुरुपौर्णिमा, व्यासपूजा
 • श्रावण -नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी
 • भाद्रपद -हरितालिका, ऋषी पंचमी ,गौरीगणपती
 • आश्विन -नवरात्र,दसरा ,कोजागिरी ,वासू बारस,धनत्रयोदशी नरकचतुर्दशी,लक्ष्मीपूजन
 • कार्तिक -बलिप्रतिपदा (पाडवा ),भाऊबीज ,तुलसी विवाह,त्रिपुरी पौर्णिमा
 • मार्गशीर्ष -खंडोबा नवरात्र,दत्तजयंती, गीता जयंती
 • पौष -मकर संक्रांत
 • माघ -श्री गणेश जयंती, रथसप्तमी, रामदास नवमी, महाशिवरात्री
 • फाल्गुन -होळी

माझे इष्ट दैवत बाप्पा आणि आमचे कुलदैवत लक्ष्मी-नृसिंह. इथे स्वामीनारायण मंदिरात आपल्या हिंदू धर्माचा प्रसार व्हावा म्हणून मेटलचे वेगवेगळ्या प्रकारचे पूजेचे मंदिर आणि इतर पुजेचे साहित्य विकतात. मी तिथूनच मध्यम आकाराचे पूजा मंदिर आणले. त्याचा कळस त्या लोकांनी सेपरेट बनवला. इच्छा असेल तर वापरा आणि नको असल्यास बाजूला काढून ठेवा. घरातल्या पूजा मंदिराला कळस असू नये असे मला सांगण्यात आल्यामुळे मी ते सुरुवातीलाच बाजूला काढून ठेवले. त्या मंदिरात गणेश मूर्ती, लक्ष्मी-नृसिंह मूर्ती, गौर, महादेवाची पिंड, माझ्या नवऱ्याने प्रथेनुसार लग्नात चोरलेला बाळकृष्ण असे पाच चांदीचे देव आणि जोडीला भरला गडू/कलश, छोटा नारळ असे आहे. रांगोळी पण काढलेली असते. रोज सकाळी देवासमोर अगरबत्ती लावून ३-४ श्लोक म्हणते आणि मगच घराबाहेर पडते. संध्याकाळी मी, माझा नवरा आणि दोन्ही मुले देवासमोर दिवा लावून शुभंकरोती म्हणतो. दिवा म्हणजे इथे वापरतात ते टी-कॅण्डल. जवळपास मध्यरात्री पर्यंत ते तेवत असते. तसेच दर शनिवारी आमच्या कुलदेवतेच्या नावाने एक डॉलर बाजूला काढते आणि जमेल तसे धर्मपुरी (तेलंगणाच्या जगित्याल जिल्ह्यात आहे) च्या नृसिंह मंदिराला अन्नदानासाठी पाठवते. माझ्या घरी आलेल्या सुवासिनीची ब्लाउज-पीस घालून ओटी भरल्याशिवाय पाठवत नाही. फायबरचे एक छोटेसे तुळशी वृंदावन पण आहे. वाढदिवसाला आधी औक्षण करते आणि मगच केक कापणे होते.

आम्ही न्यूजर्सीला राहतो. इथे भरपूर भारतीय लोक आहेत. तसेच खूप सारे हिंदू टेम्पल्स आहेत. बालाजी टेम्पल, रंगनाथा टेम्पल, साईबाबा टेम्पल, गणेश टेम्पल, सत्यनारायण टेम्पल, शिवा टेम्पल, अंबिका टेम्पल, स्वामी नारायण टेम्पल तसेच हरे रामा हरे कृष्णा टेम्पल असे बरेच आहेत. एक मोठे मुख्य मंदिर आणि त्याभोवती इतर देवतांचे छोटे छोटे मंदिर अशी रचना असते. मुख्य मंदिरात जो देव असतो त्यावरून त्या मंदिराला गणेश टेम्पल, कृष्णा टेम्पल असे नाव देतात. काही वेळेस नुसते हिंदू टेम्पल किंवा हिंदू समाज मंदिर असे नाव देतात. हिंदू टेम्पल्स मध्ये संस्कृत सहित अनेक भारतीय भाषा, भरतनाट्यम/कथ्थक, योगा, गायन, वादन, भगवद गीता, मुलांसाठी शाडूचा गणपती बनवणे, पूजा करण्याची पद्धत असे क्लासेस घेतात. भजनी मंडळ असतात. तसेच अमेरीकेत धार्मिक-अध्यात्मिक संस्था आहेत. तसे बरेच आहेत पण मला माहित असलेले म्हणजे स्वाध्याय केंद्र, ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय, चिन्मय मिशन, आर्ट ऑफ लिविंग, ईशा फाउंडेशन, स्वामीनारायण आणि इस्कॉन. तिरुपतीहून एकूण एक साहित्य आणून इथे श्रीनिवासा कल्याणम म्हणजे देवाच्या लग्नाचा भव्य कार्यक्रम पण करतात.

इथल्या साऊथ इंडियन रंगनाथा टेम्पल मध्ये आमचे कुलदैवत असलेले लक्ष्मी-नृसिंह मंदिर असल्यामुळे आम्ही जास्त करून त्या मंदिरात जात असतो. एक दोन वेळेस तिथे सत्यनारायण पूजा पण घातली होती. जवळपास सगळ्या मंदिरात सगळे सण साजरे होतात. जर आपल्याला घरी काही करायचे नसेल तर मंदिरात जाऊन सणांचा आनंद लुटता येतो. होळी, नवरात्र खूप धूम धडाक्यात साजरा करतात. भारतात होणारे सगळे धार्मिक विधी आणि सण इथे तितक्याच उत्साहाने साजरे होतात.

गुढीपाडवा: चैत्र शुध्द प्रतिपदा हा मराठी नवीन वर्षाचा प्रथम दिवस. यामागील कथा अशी की प्रभू श्री रामचंद्र चौदा वर्षे वनवास संपवून लंकेच्या रावणाचा वध करुन, विजयी होऊन ज्या दिवशी आपल्या अयोध्येला परत आले तो दिवस. गुढी उभारतात. पण गुढी उभारण्याची पद्धत सासरी किंवा माहेरी नसल्यामुळे मी कधी गुढी उभारली नाही. गुढीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. माझे सासर तेलंगणातले आहे आणि तिथे उगादी साजरा करतात. कैरीच्या पन्ह्याला ते उगादी पचडी असे म्हणतात. चिंच गुळाचे मिश्रण, त्यात मीठ, कडू निंबाची फुले, हिरवी मिरची किंवा लाल तिखट आणि कैरीच्या बारीक फोडी टाकतात. मला जर सुट्टी असेल तर पुरण पोळी बनवते. नाहीतर मग खीर, किंवा श्रीखंड/आम्रखंड असा बेत असतो. माझ्या मुलांना उगादी पचडी खूप आवडते म्हणून जरा जास्तच करते. अश्या प्रकारे आमचा गुढीपाडवा/उगादी साजरा होतो!

इथे आल्यानंतर काही वर्षे अक्षय-त्रितिया, नागपंचमी वगैरे केली होती. आता श्रावणात फक्त राखीपौर्णिमा साजरी करतो. काहीतरी गोड धोड करायचे आणि रक्षा बंधन करायचे बस्स!

हरितालिकेचा कडक उपवास करते आणि सुट्टी घेऊन गणेश चतुर्थी साजरी करते. खव्याचे एकवीस मोदक, रांगोळी, आरास आणि बाप्पाची यथासांग पूजा करतो. माझ्याकडे मोठी पितळेची मूर्ती आहे. ह्या मूर्तीची एक खास आठवण आहे. मी इथे नवीन आले तेव्हा एका अमेरिकन दुकानात शॉपिंगला गेले होते. ध्यानी मनी नसताना मला तिथे बाप्पाची हि मोठी आणि सुबक पितळी मूर्ती दिसली. अमेरिकन दुकानात बाप्पाची मूर्ती ह्याचे मला भारी अप्रूप वाटले आणि लगेच ती मूर्ती विकत घेतली. त्याचीच दरवर्षी पूजा करते. आईच्या शिकवणी प्रमाणे आमच्या चौघांचे शैक्षणिक साहित्य म्हणजे वह्या, पुस्तकं, पेन, लॅपटॉप इ पूजेत ठेवते. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून सांगता करते. गणपती बसवणे आणि विसर्जन करणे वगैरे करत नाही. “घरचा गणेश” ह्या लोकसत्ताच्या सदरात आमच्या घरच्या बाप्पाचा फोटो छापून आला होता.

इथे बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक गणपती बसवतात. सकाळ संध्याकाळ पूजा-आरती करतात. अनंत चतुर्दशीला ढोल ताशे वाजवत मोठी मिरवणूक काढतात. इंडियाहुन बॉलीवूडच्या कलाकारांना तसेच टी व्ही च्या कलाकारांना बोलावतात. एक हजार पौंड्स ते १५५१ पौंड्सचा मोठा मोदक बनवतात आणि विसर्जनाच्या दिवशी प्रसाद म्हणून वाटतात. भयंकर गर्दी असते. आपण भारतातच असल्याचा भास होतो.

दसरा: दसऱ्याला मी घरी काही विशेष करत नाही. आम्ही मंदिरात दर्शनाला जातो. देवी देवतांना फुलांनी सजवलेले असते. तिथे तोबा गर्दी असते. संध्याकाळच्या वेळी एका मोठ्या मैदानात दसरा फेस्टिवल साजरा करतात. हजारो लोक जमतात. स्टेजवर रामलीला सुरु असते. सगळीकडे वेगवेगळे स्टॉल असतात. स्टॉल वर शॉपिंग, खाणे पिणे सुरु असते. रात्री नऊच्या सुमारास रावण दहन करतात. आतिषबाजी करतात. एका मंदिरात तिरुपती सारखे ब्रह्मोत्सव सुद्धा करतात आणि रथ यात्रा काढतात.

कोजागिरी पौर्णिमा: कोजागिरी पौर्णिमेला सरस्वती देवीची पूजा करून मसाला दूध बनवते.

दिवाळी: दिवाळी वर मी आधीच एक पूर्ण लेख लिहिला आहे. वाचण्यासाठी इथे क्लिक करा. दिवाळी तर आम्ही घरी छान पैकी साजरा करतोच. त्याचबरोबर ‘दिवाली-मेला’ पण अटेंड करतो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वीकएन्डला असे दिवाली मेला भरवतात. काही ठिकाणी तिकीट असते तर काही फ्री ठेवतात. ऑर्केस्ट्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, बॉलीवूड सेलेब्रिटी, फूड आणि सगळ्या प्रकारचे स्टॉल (कपडे, दागिने, वस्तू, हॅन्डबॅग, रांगोळ्या, स्नॅक्स) असतात. पूर्ण दिवस नुसती धमाल असते. अमेरिकन पोस्ट खात्याने २०१६ मध्ये दिवाळीचे पोस्टाचे तिकीट जारी केले होते. आम्ही ती तिकिटे विकत आणून जपून ठेवली आहेत. मी दरवर्षी माझ्या हॉस्पिटल मध्ये दिवाळी ग्रीटिंग कार्ड बनवून तिथल्या सगळ्यांसाठी मिठाई घेऊन जाते.

रंगनाथा मंदिरात दिवाळीला सहस्त्र दीपालंकाराचा दोन तीन तासांचा कार्यक्रम असतो. एक हजार चांदीचे दिवे तेल-वाती ने प्रज्वलित करतात आणि त्याची छान मांडणी करतात. सगळे लाईट्स बंद करतात. मग मंत्रोच्चारण सुरु होते. अंधारात त्या चकाकणाऱ्या एक सहस्त्र चांदीच्या दिव्यांच्या प्रकाशाने पूर्ण मंदिर उजळून निघते. मन एकदम प्रसन्न होऊन जाते.

मकर संक्रांत: मकर राशीमध्ये सूर्य जाणे यालाच ‘मकर संक्रमण ‘ असे म्हणतात. संक्रांतीच्या वेळी थंडी असते. त्यामुळे शरीराला जास्त उष्मांक देणारे तीळ व गूळ या पदार्थांना या दिवशी फार महत्त्व असते. शक्यतो तीळ गुळाचे लाडू मी घरीच बनवते. जर वेळे अभावी करणे नाही झाले तर पटेल ग्रोसरीतून विकत आणते. एक दोन वेळेस इंडियाहून पार्सल आले होते. माझ्या माहेरी १४ वस्तूंचे तर सासरी १३ वस्तूंचे वाण करायची पद्धत आहे.

त्यादिवशी हमखास तिळगुळ पोळी बनवते आणि गौरीला वाण देते. मग बाकीचे वाण इथल्या मैत्रिणींना देते. मी हळदी -कुंकवाचा कार्यक्रम करत नाही. माझ्या मैत्रिणीकडे मात्र बोलावणे असते.

अश्याप्रकारे बोटावर मोजण्याइतके आपले सण इथे साजरे करते. बाकीचे सण व्हाट्सअँप वर साजरे होतात 😃 खरे पाहता व्हाट्सअँपचे आभारच मानायला पाहिजे. त्यामुळे सासर-माहेरची मंडळी, इतर नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात राहता येते. प्रत्येक सण-समारंभाचे फोटोज, विडिओ आणि शुभेच्छांची देवाण-घेवाण होते आणि अप्रत्यक्षरीत्या त्या सगळ्यात मनाने सामील झाल्यामुळे मला स्वतः ते सगळं जगल्यासारखे वाटते. आणि सण साजरा केल्याची फिलिंग येते. आधी नेटवर चेक करावे लागायचे कि कुठला सण कधी आहे. इंडिया आणि अमेरिकेत १०-११ तासांचा फरक असल्यामुळे व्हाट्सअँप द्वारे मला आदल्या दिवशीच कळते कि उद्या काय आहे ते.

धार्मिक सणांव्यतिरिक्त राष्ट्रीय सण पण साजरे करतो. ऑगस्ट महिना म्हणजे इथे उन्हाळा असतो. जगातला सगळ्यात मोठा १५ ऑगस्टचा इंडिया-डे परेड न्यूयॉर्कला असतो. त्याचे स्वरूप ही जवळपास दिवाली-मेला सारखेच असते. म्हणजे बॉलीवूड सेलेब्रिटी, राजकीय नेते, विविध स्टॉल्स इ. त्या व्यतिरिक्त दिल्लीला जसे देखावे (फ्लोटस) असतात तसे चाळीस-एक देखावे आणि भव्य परेड असते. पूर्ण दिवस जातो त्यात. आम्ही दरवर्षी नाही जात. बऱ्याच सेलिब्रिटींना जवळून पाहायला मिळाले. तसेच प्रजासत्ताक दिवस पण परेड करून साजरा करतात.

अमेरिकेत आल्यानंतर इथल्या सणांबद्दल शिकले. मुले लहान होती. एखादा सण/उत्सव/जयंती/पुण्यतिथी/स्पेशल डे असले कि मी स्वतः त्याबद्दल जाणून घ्यायची आणि मग त्यावर छोटेसे भाषण बनवून मुलांकडून पाठ करून घ्यायची. बऱ्याचदा मुलांनी वर्गात भाषण केले जे अमेरिकन शाळेत सहसा होत नाही. त्यामुळे त्यांच्या शिक्षकांना भारी कौतुक वाटायचे. पण मला त्यात विशेष काही वाटायचे नाही कारण शाळेत असताना हेच तर केलं होतं. ह्यामुळे मार्टिन ल्युथर किंग जयंती, लिंकन जयंती, रोजा पार्क डे, व्हॅलेंटाईन डे, सेंट पॅट्रिक डे, मदर्स डे, फादर्स डे, पास ओव्हर, इस्टर संडे, थँक्स गिविंग डे, गुड फ्रायडे, मेमोरियल डे, कोलंबस डे, हॉलोवीन, वेटेरन्स डे आणि बरेच ज्युविश हॉलिडेजची ओळख झाली. मुले लहान असताना ख्रिसमस अगदी जोरात साजरा करायचो. ख्रिसमस ट्री, घराला लाइटिंग, सांता क्लॉज, गिफ्ट्स असे सगळं सगळं करायचो. मला इथला ख्रिसमस खूप आवडतो. सगळीकडे सुंदर सुंदर डेकोरेशन, हवेत सुगंधी कॅण्डल्सचा सुवास, केक आणि कुकींची लयलूट, सगळीकडे लागलेले भव्य सेल्स, शॉपिंग, ख्रिसमस ट्री असे खूप काही असते. सगळं वातावरणच बदलून जाते. प्रत्येक जण हॉलिडे मूड मध्ये असतो. आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणचे डेकोरेशन पाहायला जाऊन त्याचा आनंद लुटत असतो. मी आमच्या हॉस्पिटल मध्ये खूप साऱ्यांना गिफ्ट्स देते आणि ग्रीटिंग सोबत चॉकलेट-कुकीचे मोठे बॉक्सेस घेऊन जाते. माझे लग्न योगायोगाने ख्रिसमसच्या दिवशी झालेले असल्यामुळे माझ्यासाठी ख्रिसमस जरा जास्तच स्पेशल आहे.

अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस म्हणजे फोर्थ ऑफ जुलै (चार जुलै) ला खूप सुंदर फायर वर्क्स शो म्हणजे आतिषबाजी करतात. ते पाहायला आम्ही जात असतो. तेवढेच नेत्रसुख.

इथे अमेरिकेत सगळ्या देशाचे, सगळ्या धर्माचे लोक आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या संस्कृती, त्यांचे सण, खाण्या पिण्याचे पदार्थ असे खूप काही पाहायला आणि शिकायला मिळते. सण आणि उत्सव साजरे करून जर मनाला आनंद मिळत असेल तर नक्की साजरे करावेत. माणूस आवडेल ते घालून, आवडीचे खाऊन, जे मनाला भावेल ते करून आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतो. मग तो जगाच्या पाठीवर कुठल्याही प्रांताचा असो, कोणत्याही धर्माचा असो आणि कोणतीही भाषा बोलणारा असो, शेवटी तो एक तुमच्या आमच्यासारखा माणूसच असतो, होय ना?

 


8 Replies to “माझे सण….अमेरीकेत पण!”

 1. Khup chan. You are celebrating indian festivals in America from your busy sechdule that’s great!

 2. सोडणं आणि तोडणं पेक्षा जतन करून ठेवण हे must आहे आणि ते तुम्हीच करूच शकता …छानच शंका नाही 👌👌👌

 3. अरे व्वा कधी आम्हाला पण बोलवा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *