माझी वॉटरप्रूफ साडी


२१ डिसेंबर म्हणजे जागतिक साडी दिन ! त्याचे औचित्य साधून माझ्या आगळ्या-वेगळ्या वॉटरप्रूफ साडीची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे.

साडी ही एक पारंपारिक वेशभूषा असूनही सदाबहार आहे. ती आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य अंग आहे. माझ्यासाठी साडीची पहिली ओळख म्हणजे आईचा पदर आणि आजी-पणजीच्या मऊसूत साड्यापासून बनवलेली गोधडी. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातल्या रुक्मिणीसाठी कमी उंचीची साडी असायची. तशा छोट्या साड्या “कल्पना साडी” या नावाने बाजारात मिळायच्या. आई-बाबांनी माझ्यासाठी कल्पना साडी घेतल्याचे आठवते. त्यानंतर शाळा-कॉलेजमध्ये फक्त एखाद्या कार्यक्रमाला साडी नेसायची. म्हणजे वर्षातून जास्तीत जास्त एक किंवा दोन वेळेस. मला साडी खूप आवडते. मला साडी नेसायला कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त पाच मिनिटे लागतात. मग ती कुठल्याही प्रकारची असो. आता अमेरिकेत असल्यामुळे साडी नेसण्याचे प्रसंग फार कमी असतात.

माझे लग्न ठरले आणि 25 डिसेंबर 1994 अशी लग्नाची तारीख निघाली. त्यावेळेस लग्नाचा बस्ता बांधायला हैदराबादला जाण्याची फॅशन होती. आम्ही खरेदीसाठी हैदराबादला गेलो. माझ्यासाठी 11 साड्या घेण्याचे ठरले होते. त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या दोन शोरूम पैकी एका शोरूम मध्ये आम्ही साडी खरेदीसाठी गेलो. शोरूम मध्ये गेल्यानंतर एका सेल्समनने वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या दाखवण्यास सुरुवात केली. बनारसी शालू, कांची सिल्क, म्हैसूर सिल्क, कर्नाटक सिल्क, पोचमपल्ली, कांजीवरम अशा अनेक पद्धतीच्या साड्या एकानंतर एक दाखवत होता आणि मी प्रत्येक प्रकारची एकेक साडी निवडत होते. कुठलाही रंग रिपीट होणार नाही याची दक्षता घेत होते. काही फॅन्सी साड्या घेतल्या. एक एक करत 10 साड्या घेऊन झाल्या होत्या. आता फक्त एक साडी घ्यायची राहिली होती. त्या सेल्समनला कळत नव्हते की आता कुठली साडी दाखवावी. तो मालकाकडे जाऊन त्यांना घेऊन आला. आम्ही मालकाला सांगितले की ह्या पेक्षा वेगळ्या प्रकारची साडी दाखवा. मालक विचारात पडले. दोन मिनिटांनी त्यांनी चुटकी वाजवून विचारले, “वॉटरप्रूफ साडी चालेल का”?  ते ऐकताच आम्ही सगळे एका सुरात ओरडलोकायsss? वॉटरप्रूफ साडी??

आम्हाला कल्पनाच नव्हती की वॉटरप्रूफ साडी नावाचा प्रकारही असतो. आमची उत्सुकता शिगेला पोहोचली. त्यांनी आतून साड्यांचे तीन बॉक्सेस आणले. त्यांनी आम्हाला सांगितले की, हा प्रकार नवीन आहे. साडीवर वॉटरप्रूफचे कोटिंग दिलेले असते. साडी जरी दिसायला साधी आहे तरीही वॉटरप्रूफ कोटिंगमुळे त्याची किंमत बनारस-कांची सिल्क एवढी आहे. महाग असल्यामुळे लोक घ्यायला मागेपुढे करतात. म्हणून आम्ही फक्त तीनच साड्या ठेवल्या आहेत. असे म्हणून त्यांनी एक बॉक्स उघडला आणि त्यातली साडी बाहेर काढली. मोतिया कलरची साडी, आकाशी निळ्या रंगाची बारीक जरीची काठ, सुंदर सुंदर गोपिकांची प्रिंट आणि त्याला साजेसा पदर ! त्या कोटिंगमुळे साडीला उठाव आला होता. बघता क्षणी मी त्या साडीच्या प्रेमात पडले.♥ 

त्यांनी पेलाभर पाणी आणण्यास सांगितले. त्यांनी ती साडी पसरवली आणि पूर्ण पेलाभर पाणी साडीवर ओतले. आणि काय आश्चर्य ! 😲 साडी ओली झाली नाही आणि पाणी साडीवर जसेच्या तसे तरळत राहिले. त्यांनी ते पाणी अलगदपणे झटकून टाकले. खात्री करून घेण्यासाठी मी साडीवर हात फिरवला. पेलाभर पाण्याने साडी जरासुद्धा ओली झालेली नव्हती. मला तो वॉटरप्रूफ प्रकार आणि ती साडी इतकी आवडली की त्यांनी दाखवलेली पहिली साडी लगेच घेऊन टाकली.

बाकीची सगळी खरेदी आटोपून आम्ही काही दिवसांनी आमच्या गावी परत आलो. माझ्या वॉटरप्रूफ साडीची बातमी गावात वार्‍यासारखी पसरली आणि गावभर चर्चा सुरू झाली. एक एक करत गावातले नातेवाईक, फ्रेंड्स, शेजारीपाजारी येत राहिले. प्रत्येकीला वॉटरप्रुफ साडी पाहण्याची उत्सुकता होती. नंतर नंतर तर ओळख नसलेली मंडळी येऊन, “आम्हाला तुमची वॉटरप्रूफ साडी दाखवाल का”? अशी विचारणा करू लागले. आलेल्या प्रत्येकीला साडी बद्दल माहिती सांगून, साडीवर पेलाभर पाणी ओतून, वॉटरप्रूफ असल्याचा दाखला देणे सुरू राहिले. वॉटरप्रूफचा प्रूफ पाहून त्यांना अप्रूप वाटायचे. माझ्या लग्नापर्यंत गावातल्या बहुतांश लोकांची साडी पाहून झालेली होती. बाहेरगावाहून आलेल्या नातेवाईकांना लग्नात आणि लग्नानंतर साडी पाहायला मिळाली. एकंदरीत ह्या वॉटरप्रूफ साडीचा एक वेगळाच आनंद मिळाला होता. त्या गोष्टीला तब्बल 27 वर्षे झालीत. ह्या सत्तावीस वर्षात माझ्या माहितीतल्या कोणाकडे वॉटरप्रूफ साडी असल्याचे ऐकिवात नाही.

अमेरिकेला येताना ती साडी इंडियात ठेवली होती. माझ्या लाडक्या डॉक्टर भाचीला ती साडी खूप आवडायची. तिने तशी इच्छा दर्शविल्यामुळे मागच्या इंडिया ट्रिप मध्ये तिला ती साडी द्यायचे ठरले. जसे लाडकी लेक सासरी जाताना तिची आई सासरच्या लोकांना सांगते की, “माझ्या मुलीची काळजी घ्या. तिच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका”. जवळपास तसेच काहीसे माझ्या मनात साडी देताना आले.🤭 मग लक्षात आले, अरेच्या ! ही तर वॉटरप्रूफ साडी आहे. डोळ्यातल्याच काय पण कुठल्याच पाण्याने तिचे काही वाकडे होणार नाही. 🤷‍♀️ मग निर्धास्तपणे भाचीच्या हातावर साडी ठेवली आणि अमेरिकेला परत येण्यासाठी एअरपोर्टला निघाले.  

अशी ही वॉटरप्रूफ साडीची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ! 😂 


6 Replies to “माझी वॉटरप्रूफ साडी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *