माँ ची करंजी


आम्ही सगळे आईला माँ म्हणायचो. तिच्या हातच्या खव्याच्या करंज्या म्हणजेअहाहाअमृततुल्य ! त्याला कशाचीच तोड नसायची. सणावाराला आणि समारंभाला आमच्या घरी हमखास खव्याच्या करंज्या बनायच्या. आम्ही लहान असताना खवा विकत मिळत नसायचा. त्यामुळे ती दूध आटवून घरीच खवा बनवायची.आदल्या दिवशी खवा तयार व्हायचा आणि दुसऱ्या दिवशी खव्याच्या करंज्यांचा घाट असायचा. करंज्या दोन प्रकारच्या बनवायची. इतरांना द्यायचे असतील तर मैद्याच्या आणि जर आमच्यासाठी बनवायचे असतील तर कणकेच्या. मैद्याच्या करंज्या दिसायला छान असायच्या आणि कणकेच्या करंज्या चवीला छान असायच्या. आमचा सगळ्यांचा कणकेच्या करंज्यांसाठी हट्ट असायचा.

नंतर नंतर खवा विकत मिळू लागला. लाल साडी नेसलेली आणि कपाळावर चमकणारी मोठी टिकली लावलेली बाई डोक्यावर खव्याची टोपली घेऊन आमच्या गल्लीत “खवा घ्या sss खवा” अशी आरोळी ठोकत यायची. तिचा आवाज ऐकला कि आमच्या डोळ्यासमोर खव्याच्या करंज्या नाचायच्या. आम्हाला माहित असायचे की उद्या परवा खव्याच्या करंज्या आणि गुलाबजामुन नक्की बनणार. ती खवेवाली बाई अधून मधून उगवायची. ती कधी येईल हे कोणालाही सांगता यायचे नाही. माँ तिच्याकडून खवा विकत घेऊन भाजून ठेवायची. मग दुसऱ्या दिवशी स्वयंपाक जेवणे झाल्यानंतर करंज्यांचा कार्यक्रम सुरू व्हायचा. कणीक घेऊन त्यात थोडा रवा टाकून, गरम तुपाचे मोहन घालून दुधामध्ये मळून घ्यायची. मग सारण बनवायची. सुक्या खोबर्‍याचा किस आणि खसखस भाजून घ्यायची. ड्रायफ्रूट्सचे तुकडे आणि पिठीसाखर तयार ठेवायची. भाजलेल्या खव्यात वरील सगळे साहित्य आणि वेलची पावडर टाकून मिक्स करून घ्यायची. आम्ही तिला पीठाचे छोटे-छोटे गोळे करून द्यायचो. आमची मदत कमी आणि लुडबूड जास्त असायची. तिचा जितक्या करंज्यांचा बेत असायचा त्यापेक्षा कमीच व्हायच्या. कारण आम्ही बरेचसे सारण फस्त केलेले असायचे. पुऱ्या लाटून त्यात सारण भरून करंज्या बनवायची आणि मग तळायला घ्यायची. खुसखुशीत, तोंडातच विरघळणाऱ्या गरमागरम करंज्या खाऊन तृप्त व्हायचो. तिच्या हातच्या करंज्यांची गल्लीत आणि नातेवाईकात चर्चा असायची. माझ्या दोन्ही बहिणींच्या सासरी तिच्या करंज्यांना भरपूर मागणी असायची. तिच्या करंज्यांचा वारसा आम्हा तिघां बहिणींना मिळाला. अर्थात तिची सर आम्हाला कशी येणार म्हणा. पण आमच्या करंज्या सुद्धा छान होतात.😄

मी वर्षभरात जमेल तसे, पण दिवाळीला मात्र नेमाने खव्याच्या करंज्या करते. माझ्या मुलांना खूप आवडतात. मुले सारखी माँ च्या करंज्या कर म्हणून मागे लागतात. केल्यानंतर आवडीने खातात. करत असताना मदत सुद्धा करतात. एके वर्षी मुलांनी चकली-करंज्यांचे सूर्यफूल बनवले आणि त्याला ‘फराळाचे सूर्यफूल’ असे नाव दिले. त्या सूर्यफूलाचा हा फोटो:

प्रत्येक वेळेस करंज्या करताना माझे मन पूर्णपणे भूतकाळात रमते.आईच्या आठवणींना उजाळा देत करंज्या बनवताना वेळेचे भान राहत नाही. तिच्या आठवणीने उर दाटून येतो. ती देवाघरी निघून गेली. त्या गोष्टीला बरीच वर्षे झालीत. पण तिच्या हातच्या खव्याच्या करंज्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे. माझी मुले माँ च्या करंज्या फस्त करताना पाहून एकीकडे माझ्या चेहर्‍यावर समाधान असते तर दुसरीकडे आईच्या आठवणीने डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या असतात.  


8 Replies to “माँ ची करंजी”

  1. खुसखुशीत करंजी आईच्या आठवणीने झाली लुसलुशीत जणू आईच्या कुशीत.

    1. छान यमक जुळलं! मस्त कॉमेन्ट. धन्यवाद!

  2. मां च्या करंज्या – wow.!! आठवणीनेच तोंडाला पाणी 😋सुटते. आणी लगेच आमची demand 🤩आई कडे phone ने पोहोंचते …आई करंज्या बनवत असताना मां ची आठवण हमखास येते ; आर्धे सारण करंज्यात आणी आर्धे आमच्या पोटात.!! 😄 मग उरलेल्या कणकेचे आई सप्पक शेव बनवते, लोणच्यासोबत खुपच tasty लागतात. याला म्हणतात double मजा.😂

    खरच माँ चा वारसा तुम्हा तीन्ही बहिणींना भेटला आहे.

  3. Wow very beautifully narrated the story of Karanji and mom😍 And this karanji only started the communication between us😬😍My Karanji friend 🤩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *