देवभाषेचे पाठ


ह्या लेखात माझ्या शालेय जीवनात देवभाषा म्हणजे संस्कृत भाषा शिकून परीक्षा दिल्या होत्या त्या बद्दलच्या आठवणी शेयर करत आहे. 

माझे शालेय शिक्षण एका तालुक्याच्या गावी जि.प.कन्या शाळेत झाले. त्याकाळी आम्हाला शाळेत मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेव्यतिरिक्त इतर भाषा शिकण्याची सुविधा नव्हती. पण आमच्या सुदैवाने आम्हाला संस्कृत शिकण्याची संधी मिळाली ती केवळ एका व्यक्तीमुळे ज्यांचे नाव होते “तारेतले दादा”. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल कि “तारेतले” म्हणजे काय बरे?

आमच्या गावात एक सद्गृहस्थ राहत होते. त्यांचे नाव श्री. गोपाळराव देशपांडे मुजळगेकर. त्यांना सगळे दादा या नावाने ओळखायचे. ते एक प्रतिष्ठित वकील होते. तसेच स्वातंत्र्य सैनिकही होते. त्यांनी पू.विनोबाजी भावेंसोबत कार्य केले होते. सेवानिवृत्ती (रिटायर्मेंट) नंतर त्यांनी विद्यादानाचे व्रत घेतले. एका मोठ्या मोकळ्या जागेवर त्यांची एक खोली होती. थोडक्यात आश्रमच होता. त्या मोकळ्या जागेभोवती तारेचे कुंपण होते. त्यामुळे त्यांना तारेतले दादा असे नाव पडले होते. त्यांनी वेद आणि भगवद्‌गीतेचा सखोल अभ्यास केला होता आणि त्या तारेतल्या आश्रमात राहून सगळ्या वयोगटातल्या लोकांना निःशुल्क शिकवत असत. सकाळी सात वाजल्यापासून एकानंतर एक क्लासेस सुरु असायचे. आमच्यासारखी शालेय मुले-मुली संस्कृत आणि भगवद्‌गीता शिकायचे तर माझ्या आईच्या वयाची मंडळी वेद विचार शिकायला जायची. माझी आई शिकलेली नव्हती पण तिची स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती दांडगी असल्यामुळे तिने वेदातले तत्वज्ञान खूप लवकर आत्मसात केले होते. तसेच दादांना आयुर्वेदिक औषधांची माहिती होती. लोक त्यांच्याकडे पांढऱ्या व्हॅसलिनच्या बाटल्या घेऊन यायचे आणि दुसऱ्या दिवशी दादांकडून ती बाटली न्यायला यायचे. त्यावेळेस त्यातले पांढरे व्हॅसलिन हिरवे झालेले असायचे कारण दादांनी त्यात औषधी वनस्पतीचा अर्क मिसळलेले असायचे. ते बऱ्याच त्वचारोगासाठी गुणकारी असायचे. इतर बरीच आयुर्वेदिक औषधी बनवायचे आणि लोक दुरून दुरून त्यांच्या औषधांचा लाभ घेण्यासाठी यायचे.

आमचा क्लास सकाळी सात वाजता असायचा. त्यामुळे मी सहाला उठून तयारी करून पावणे सातला घरून निघायची. एक दोन मैत्रिणी माझ्याकडे यायच्या आणि मग आम्ही रमत गमत निघायचो. सकाळचे प्रसन्न वातावरण असायचे. जाण्याच्या वाटेवर बरीच फुलझाडे लागायची. मग त्याचा आनंद घेत, गप्पा मारत आम्ही तारेत जायचो. तिथे आम्ही सगळ्या जणी जमल्यानंतर सर्वप्रथम ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः असे करत करत बारा सूर्यनमस्कार घालायचो. त्याशिवाय क्लास सुरु होत नसे. थोडक्यात गुरुकुल सारखे वातावरण असायचे.

सूर्यनमस्कारातील सूर्याच्या बारा नावांचा अर्थ

  1. ”ओम मित्राय नमः” – सगळ्यांचा मित्र
  2. “ओम रवये नमः” – अत्यंत तेजस्वी
  3. “ओम सूर्याय नमः” – अंधार दूर करणारा
  4. “ओम भानवे नमः” – स्वतः प्रकाशित
  5. “ओम खगया नमः” –मुक्तपणे आकाशात विचरण करणारा
  6. “ओम पुष्ने नमः” – सगळ्यांचे भरण पोषण करणारा
  7. “ओम हिरण्यगर्भाय नमः”– विश्व निर्मितिचा स्वर्णिम स्त्रोत
  8. “ओम मारिचये नमः”– प्रातः कालचा राजा
  9. “ओम आदित्याय नमः”– (देवी)अदितिचा पुत्र
  10. “ओम सवित्रे नमः” – पुनर्जीवन देणारा
  11. “ओम अर्काय नमः” – प्रशंसा योग्य
  12. “ओम भास्कराय नमः”– प्रखरपणे प्रकाशणारा

सकाळी घरून पायी निघाल्यामुळे व्यायाम व्हायचा आणि त्यानंतर बारा सूर्यनमस्कार! त्यामुळे उर्वरित दिवस एकदम छान जायचा. 

हळू हळू भगवद्‌गीतेचे श्लोक उच्चारण शिकून एक तास गीतेचा अभ्यास व्हायचा. सगळ्याजणी एका सुरात गीतेचे श्लोक म्हणायचो आणि त्यामुळे चुटकीसरशी पाठांतर व्हायचे. ज्या दिवशी गीतेचा पूर्ण अध्याय म्हणून व्हायचा, तेव्हा दादा आम्हाला त्याच्या पुढच्या अध्यायाचा एक श्लोक म्हणवून घ्यायचे. त्यांच्या मते गीतेचे पठण अखंड राहायला पाहिजे. पुढच्या अध्यायाचा एक श्लोक आज म्हणून थांबले म्हणजे तो अध्याय सुरु होतो आणि मग तो पुढे पूर्ण करायचा असतो. क्लास संपल्यानंतर तारेतल्या मोकळ्या जागी खेळत असू. तिथल्या झाडांवरची बोरं-चिंचा तोडायला आणि पारिजातकाची फुले वेचायला खूप आवडायचे.

एके दिवशी आमचे गीता पठण सुरु असताना श्री. पांडुरंग महाराज नावाचे एक शिक्षक आले. त्यांनी दादांना संस्कृतच्या परीक्षांबद्दल सांगितले. मुंबईच्या भारतीय विद्याभवन सरल संस्कृत परीक्षा नावाच्या संस्थेचे पाच परीक्षा होत्या:

  • बालबोध
  • प्रारंभ
  • प्रवेश
  • परिचय 
  • कोविद

त्यांनी आम्हाला सांगितले होते कि प्रत्येक परीक्षेच्या तयारीसाठी सहा-सहा महिने लागतील. त्यांनी परीक्षेसंबंधीची माहिती आणि पत्रकं दादाकडे ठेवून निघून गेले. दादांनी आम्हाला ती माहिती दिली आणि आपापल्या पालकांना विचारून सांगायला सांगितले. माझ्यासोबतच्या माझ्या सगळ्या मैत्रिणी हुशार आणि उत्साही होत्या. आम्ही कोणतीही स्पर्धा किंवा परीक्षेला सहसा नाही म्हणत नसू. दुसऱ्या दिवशी आपापल्या पालकांची संमती आणि परीक्षेची फीस घेऊन दादांकडे गेलो. दादांनी पांडुरंग गुरुजींना बोलावून आमचे परीक्षा फॉर्म आणि फीस दिली आणि त्यांच्याकडून संस्कृतच्या पहिल्या परीक्षेची पुस्तके घेतली. तिथून आमचा संस्कृत परीक्षेचा अभ्यास सुरु झाला. त्यात संस्कृत व्याकरण, श्लोक आणि सुभाषिते होती. दादांचे शिकवणे आणि आमचे शिकणे दोन्हीही खूप जलद गतीने सुरु होते. सुरुवातीला आमचा संस्कृत भाषेचा शब्दसंग्रह सीमित होता. एके दिवशी दादांनी आमची प्रगती बघण्यासाठी एक टेस्ट घेतली. ते एक मराठी शब्द सांगणार आणि आमच्यापैकी एक एक करत त्याचा संस्कृत प्रतिशब्द सांगायचा. सगळेजण अचूक उत्तरे देत होतो आणि खेळ रंगात आला होता. मग एक गम्मत झाली. त्यांनी आम्हाला “गोड” हा शब्द सांगितला आणि त्याचा “मधुरम” असा प्रतिशब्द अपेक्षित होता. आमच्या क्लासमधल्या एका लहान मुलाचा टर्न होता. त्याला पटकन “मधुरम” शब्द आठवेना. त्याने चक्क गोड ह्या शब्दाला “म्” लावून “गोडम्” असे उत्तर सांगून टाकले आणि हशा पिकला. 🤣

अश्या तऱ्हेने अपेक्षेपेक्षा खूप लवकर आमचा पहिल्या परीक्षेचा अभ्यास झाला होता. परीक्षेला बराच अवकाश होता. आता काय करावे? दादांच्या डोक्यात एक कल्पना आली. ते म्हणाले कि, तुमचा पहिल्या परीक्षेचा अभ्यास एकदम व्यवस्थित झालेला आहे. परीक्षेला अजून अवकाश आहे. तोपर्यंत आपण दुसऱ्या परीक्षेची तयारी सुरु करू या. मग आमच्या अति उत्साही मुलींचा दुसऱ्या परीक्षेचा अभ्यास सुरु झाला. आणि हे काय? पहिल्या परीक्षेच्या तारखेच्या आधी आमचा दुसऱ्या परीक्षेचा अभ्यास पण झाला होता. दादांनी पांडुरंग गुरुजींना ही गोष्ट सांगितली. तेव्हा ते म्हणाले कि, मग आपण डायरेक्ट दुसऱ्या परीक्षेचा फॉर्म भरू. दुसरी परीक्षा पास झाल्यास त्यांना दोन्ही परीक्षेचे श्रेय मिळते. तशी तरतूद आहे. आम्हाला ते ऐकून अतिशय आनंद झाला आणि आम्ही सगळ्यांनी दुसरी परीक्षा दिली. सगळ्याजणी पास झालो. मी फर्स्ट क्लास आले. मग तिसऱ्या परीक्षेची तयारी सुरु झाली.

आता आम्हाला संस्कृत मध्ये छोटी छोटी वाक्ये वापरून एकमेकींशी थोडे थोडे बोलता येऊ लागले होते. जसे “त्वम कुत्र गच्छसी?” म्हणजे “तू कुठे जात आहेस?” आणि “अहं गृहम गच्छामि” म्हणजे “मी घरी जात आहे.” त्यावरून आम्ही मजेशीर वाक्य आणि वाक्प्रचार करायचो. जसे कि, रस्त्यावरून चालताना कुत्रा दिसला कि मुद्दाम म्हणायचो, “हे कुत्रा, त्वम कुत्र गच्छसी?” अश्याप्रकारे आमचे देव भाषेचे पाठ उत्तम रीतीने सुरु होते. तेव्हा म्हणजे १९७८-१९७९ च्या काळात मुखोद्गत केलेली काही सुभाषिते अजूनही मला पाठ आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या परीक्षेच्या बाबतीत जसे घडले होते तसेच तिसऱ्या आणि चवथ्या परीक्षेचे झाले. तिसऱ्या परीक्षेआधी आमचा तिसऱ्या आणि चवथ्या परीक्षेचा पूर्ण अभ्यास झाला होता आणि डायरेक्ट चौथी परीक्षा दिली. तीही यशस्वीरीत्या पास झाले. अश्याप्रकारे आमचे देवभाषेचे पाठ आणि परीक्षा संपल्या.

त्यानंतर आमचा गीता पठणाचा अभ्यास सुरु राहिला. आम्हाला सगळे अठरा अध्याय आणि सातशे श्लोक व्यवस्थित म्हणता येऊ लागले होते आणि सुरुवातीचे बरेच अध्याय मुखोद्गत झालेले होते. त्यानंतर माझे दादांकडे जाणे बंद झाले. त्याचे कारण म्हणजे शाळेतल्या इतर ऍक्टिव्हिटीज. शाळेच्या बँडमध्ये हार्मोनिअमवर राष्ट्रगीत वाजवणे, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पार्श्वगायन करणे, बम्बई हिंदी विद्यापीठाची परीक्षा, ड्राइंगच्या परीक्षा, हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा शिवाय शाळेतला अभयास. त्यामुळे अठरा अध्याय मुखोद्गत करण्याचे राहून गेले.

पू. दादांनी मला भगवद्‌गीता आणि संस्कृत शिकवून माझे बालपण समृद्ध केले. ते आज आपल्यात नसले तरीही माझ्या आठवणीत नेहमी असणार आहेत. अश्या ऋषितुल्य दादांबद्दची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा लेख प्रपंच! 🙏


31 Replies to “देवभाषेचे पाठ”

  1. अप्रतिम लेख. माझे आजोबा असल्याने हे सारे वाचताना परत एकदा जगत गेलो. ही अनुभुती दिल्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार. 🙏

  2. खूपच सुंदर, दादा म्हणजे आमच्या आत्याचे यजमान, आम्हीही हा अनुभव लहानपणी घेतला, अनेक अध्याय मुखोद्गत केले होते, नंतर कौटुंबिक कारणाने त्यांना परभणीस जावे लागले, तेथेही त्यांनी त्यांचा क्लास चालू केला होता असे ऐकले, नंतर ते तिथेच गेले, भूतकाळात घेऊन गेल्याबद्धल धन्यवाद, आदरणीय दादांना भावपूर्ण अदारांजली

  3. अप्रतिम…. हीच बुद्धीमत्ता आ. काका मध्ये ही होतीच… संस्कृत आणि इंग्रजी, तसेच नव्या गोष्टी जाणून घेण्याची जिज्ञासा मोठी… तिला कायम नमस्कार… 🙏🏻

  4. शालेय जीवनात , कै. गोपाळराव दादांच्या संस्कारांच्या परिस स्पर्शाच्याआठवलेल्या आठवणी शब्दरूपाने आपण व्यक्त केलात .खूप छान. सुमारे 40 ते 50 वर्षांपूर्वीचा काळ , नीती मूल्यांना जपणारी ती संस्कृती, ,कै. दादांचे ऋषी तुल्य व्यक्तिमत्व या सर्वांची आनंददायी उजळणी केलीत. आपण वर्णन केलेल्या वैभवाचा एक साक्षीदार मी आहे. दादांच्या कुटीच्या (आश्रमाच्या) शेजारीच आम्हा हसनाळकर कुटुंबाचा रहिवास असल्यामुळे कै. दादांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण ना क्षण आम्ही अनुभवला आहे.

    1. हो, तुम्ही आणि लताताई दादांच्या शेजारीच राहायचा. धन्यवाद!

  5. जुन्या पिढीतल्या संस्करावराच आपली पिढी नवीन जगातले बदल सहज पचवू शकली. स्वातंत्र्यानंतरच्या तीस चाळीस वर्षात हा माझा हा तुझा असे स्वार्थी विचार नसायचे. लहान मुले आपली सगळ्यांचीच असे मोठी माणसे समजावत. कोणी मुल वागायला चुकले की कोणताही मोठा माणूस लगेच समजावून सांगत असे. वेळ पडल्यास एक लगावून देत असे. त्यामुळे आपल्या पिढीला एक वेगळे शिक्षण मिळाले.
    त्या पिढीतील धुरिणांनी आपल्याला दिलेले संस्कार आपल्या कायम स्मरणात आहेत. पण दुर्दैवाने ते कोणी शब्दबद्ध करत नाही. आपल्या सर्वांचे एक कर्तव्य म्हणून आपल्या जुन्या पिढीतील आपल्यावर उत्तम संस्कार करणाऱ्या वक्तींची आशि शब्द चित्रे ,आसे सुंदर लेख आपण आश्या कुटुंबीय ग्रुप वर लिहून तो ठेवा जातं केला पाहिजे. दुर्दैवाने आपल्या पिढीने तो वारसा जपला नाही , पण आता निवृत्ती नंतर दादा सारखे शक्य तेवढे आपण समाजासाठी काही तरी केले पाहिजे ही प्रेरणा पण आश्य लेखातून मिळेल.

    1. सावित्रा दादांविषयावर लेख वाचून ४८ वर्षांपूर्वीच्या सर्व आठवणी डोळ्यासमोर येत आहेत…. आपल्याला भगवद्गीता शिकवताना दादांनी खूप मेहनत घेतली व त्यांच्या मुळेच आपण गीता छान पाठांतर करू शकलो..व मुखोद्गत करून परिक्षेत उत्तीर्ण झालो…. दादांना शतशः नमन…..व भावपूर्ण आदरांजली…. त्यांच्या आठवणी तुझ्या लेखातुन परत जागृत झाल्या….तुझे पण आभार….

    2. धन्यवाद! तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी गतकाळातल्या आठवणीवर खूप लेख लिहिले आहेत. तुम्ही वाचू शकता.

  6. खुप छान लिहिलात डाँ.सावि भंडारी ,
    आम्ही तुमच्याकडे आपण व मधुजी यांच्या आदरातिथ्य अनुभव घेतलेला आहे.
    आपली प्रतीभा व लेखनशैली लाजवाब , त्यात संस्क्र‍ीत भाषेविषयी असलेले प्रेम पाहुन खुप आनंद होतो. .हे आंग्ल भाषेच्या नावाने डंका करणारी मंडळी साठी अंजन आहे.
    आदरणीय पुज्य दादा यांच्याविषयी काय बोलावे.
    त्यांच्या सहवासाचा आम्हाला जो काही लाभ मिळाला ते आमचे परम भाग्य !
    डाँ. संतोष देशपांडे हसनाळकर !

    1. धन्यवाद! तुमच्या भेटीचे फोटो आहेत माझ्या संग्रही. वेळ काढून प्रतिक्रिया दिल्याबद्दल थँक यु.

  7. खुप छान
    मी मागे आदरणीय गोपाळराव देशपांडे यांच्या वर व्यक्तीविशेष लेख लिहीला आहे तो आगामी लेखसंग्रहात येईलच देगलूर च्या इतिहासातील समृध्द व्यक्ती पैकी ते एक होते.
    धन्यवाद
    आपली आठवण आणि लेखन छान आहे

  8. खुप छान
    मी मागे आदरणीय गोपाळराव देशपांडे यांच्या वर व्यक्तीविशेष लेख लिहीला आहे तो आगामी लेखसंग्रहात येईलच देगलूर च्या इतिहासातील समृध्द व्यक्ती पैकी ते एक होते.
    धन्यवाद
    आपली आठवण आणि लेखन छान आहे

    1. अरे व्वा! प्लिज, तो लेख माझ्याशी शेयर कर. धन्यवाद!

  9. खुपच छान लिहलस ग सावित्रा ते गोड
    रम्य दिवस सर्व काही आठवल डोळ्या समोरुन त्या आठवणी अलगद गेल्या
    आणि मन एकदम भरुन आले
    खरच आहे लहानपण दे गा देवा
    म्हणतात ना

  10. खूप छान लेख. मला वाटते आपण सोबतच तारेत गीता शिकायला जात होतो. आजूनही सर्व काही तोंडपाठ आहे. खूप छान आनुभव होता तो.

  11. खूप छान लिहिलंस ताई . आदरणीय दादांची नात पल्लवीताई . ती विष्णूसहत्रनाम आणि भगवतगीतेचे अध्याय डिजिटल स्वरूपात online घेते .

  12. खुप छान लेख लिहिलाय वाचून खूप आनंद झालाय जुन्या आठवणीत पून्हा एकदा रममाण झालोय मी पण तो आनंद अनुभवलाय तारेतले दादा म्हटलेय की सर्व काही डोळ्यासमोर येत होते पुन्हा एकदा भूतकाळातील आठवणीत तुझ्या लेखणीतून उजाळा मिळालाय
    परम पुज्य दादासाहेबांना शतशः प्रणाम

    1. धन्यवाद आशा. त्या आपल्या सगळ्यांच्याच आठवणी आहेत. खूप छान दिवस होते ते.

  13. खुप छान लेख लिहिला दादांवर.तारेतले गीता शिकवणारे दादा म्हणूनच देगलूर मध्ये नावाजलेले. माझी आई आम्हाला घरीच गीता पाठांतर करून घ्यायची म्हणून कधी दादांकडे गीता शिकायला जायचा योग नाही आला, पण तुझ्या लेखातून व देगलूर ला असताना नेहमीच तारेतले दादा व गीता , हे कायम स्मरणात असतात. पांडुरंग महाराज आमच्या घराजवळच रहायचे त्यामुळे संस्कृत च्या परिक्षा आम्ही त्यांच्याकडेच दिल्या. तुझ्या लेखामुळे त्याही आठवल्या. तुला खुप खुप शुभेच्छा असेच लिहित रहा.

    1. धन्यवाद, जयू ! देगलूरला आपण सगळ्यांनी सोनेरी क्षण अनुभवलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *