चिंटूची ‘दामिनी’


माझ्या मुलाच्या लहानपणी त्याचा दामिनी नावाच्या मराठी मालिकेशी असलेल्या आगळ्या-वेगळ्या नात्याची एक गोड आठवण ह्या लेखात शेयर करत आहे. बघा, तुम्हाला आवडते का.

माझा मुलगा, चिंटू तेव्हा दीड वर्षाचा असेल. आम्ही ठाण्याला राहायचो. मी मुलुंड हॉस्पिटलमधे भूलतज्ञ् म्हणून काम करायची आणि मला रोज सकाळी सकाळी जॉबसाठी जावे लागायचे. चिंटूला मी एका पाळणा घरात ठेवायची. पाळणाघराच्या उषा ताई खूप छान होत्या. चिंटू त्यांचा खूप लाडका होता. त्या म्हणायच्या कि तुमचा चिंटू अतिशय शहाणं बाळ आहे. कधी रडत नाही, कशाचा हट्ट नाही आणि एकदम गुणी आहे. एके दिवशी मी चिंटूला संध्याकाळी घ्यायला गेले तेव्हा त्या माझी आतुरतेने वाट पाहत होत्या. त्यांना त्या दिवशी घडलेली एक घटना मला सांगायची होती.

“दामिनी” ही मराठीतली पहिली दैनंदिन मालिका १९९७-१९९८ च्या दरम्यान दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दररोज संध्याकाळी ४.३० च्या सुमारास  प्रसारित केली जात असे. प्रतीक्षा लोणकर या अभिनेत्रीने साकारलेली ही “दामिनी” प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत

 दामिनी दामिनी ….

सत्यता शोधण्या घेऊनी लेखणी

जाहली दामिनी मूर्त सौदामिनी

दामिनी दामिनी…. 

हे कविता कृष्णमूर्तींच्या आवाजातले टायटल सॉंग महाराष्ट्रातल्या घराघरांतून ऐकू येत असे.

माझी पाळणा घरात जाऊन चिंटूला पिकअप करण्याची वेळ आणि दामिनीच्या टायटल सॉंगची वेळ एकच असायची. माझी वेळ सहसा चुकत नसे. त्यामुळे चिंटूला सवय झाली होती. दामिनी सिरीयल सुरू झाली की त्याला माहीत असायचे की आता मम्मी येईल आणि मला घरी घेऊन जाईल. त्याचा चेहरा आपोआप फुलायचा. पाळणाघर चौथ्या मजल्यावर होते. मग चिंटू दारात उभा राहून पायर्‍यांकडे बघत माझी वाट पाहायचा आणि मी दिसली येऊन मला घट्ट मिठी मारायचा. सगळ्यांना बाय-बाय करायचा आणि मग आम्ही दोघे तिथून निघायचो. असा आमचा दिनक्रम बनला होता.

एके दिवशी गम्मत झाली! एका इमर्जन्सी केसमुळे मला यायला उशीर झाला. इकडे 4:30 वाजले. टीव्हीवर दामिनी सिरीयल सुरू झाली. नेहमीप्रमाणे चिंटू माझ्या येण्याकडे डोळे लावून बसला होता. टायटल सॉंग संपले पण मम्मी आली नाही. तो थोडा हिरमुसला. बोलता येत नसल्यामुळे तो काही सांगूही शकत नव्हता. टायटल सॉंग संपून बराच वेळ झाला होता. मग मात्र तो अस्वस्थ झाला आणि फेऱ्या मारायला लागला. तो दारापर्यंत जाऊन पायऱ्यांकडे बघायचा, मग आत जाऊन भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहायचा आणि मग उषाताईंकडे पाहायचा. जणू काही तो मूकपणे उषाताईंना विचारायचा की, एवढा वेळ झाला पण माझी मम्मी का नाही आली? उषाताईंना ह्या सगळ्या प्रकाराची खूप गम्मत वाटत होती. त्या गालातल्या गालात हसत अस्वस्थपणे फेऱ्या मारणाऱ्या चिंटूला पाहात राहिल्या. त्यांनी मला सांगितलं की त्याच्या जवळपास 20-25 फेऱ्या मारून झाल्या होत्या. मग मात्र तो थकला आणि एका कोपऱ्यात जाऊन बसला. सहसा न रडणाऱ्या चिंटूचे डोळे पाण्याने भरून आले होते आणि चेहऱ्यावरचे हसू मावळले होते. वीसेक मिनिटांनी मी तिथे पोहोचले. माझा आवाज ऐकताच त्याने धावत येऊन मला घट्ट मिठी मारली आणि रडायला लागला. त्यावेळेची मिठी नेहमीपेक्षा घट्ट होती.चिंटूचे दामिनीसोबत बनलेल्या अशा अनोख्या नात्यामुळे ती सिरीयल आमच्यासाठी अविस्मरणीय ठरली !💕


8 Replies to “चिंटूची ‘दामिनी’”

  1. छान लिहिलेस, माझ्या डोळ्यासमोर प्रसंग जश्याचा तसा उभा राहिला. I had similar memory of my son who was just 8 months and I dont know how but he would know the time of me returning home and would wait ag door for me, would become restless if I was late… it is not about song but they hv sixth sense I believe.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *