गोष्ट मिसाक पेनाची


आज मी तुम्हाला माझ्या लहानपणीच्या एका विशेष पेनाची गोष्ट सांगणार आहे.

एका तालुक्याच्या गावी माझे लहानपण गेले. त्याकाळी गावात सुविधा नव्हत्या. प्रत्येक लहानसहान गोष्टीसाठी शहर गाठावे लागायचे. आमचे घर म्हणजे आई-वडील आणि आठ भावंडांनी भरलेले गोकुळच. मराठी मध्ये वडीलभाऊ असा एक अर्थपूर्ण शब्द आहे. वडिलांचे कर्तव्य करणारा वडिलांसारखा भाऊ म्हणजे वडील भाऊ. माझा भाऊ कृष्णा. त्याला आम्ही कृष्णाण्णा म्हणतो. तो जन्माने नसला तरीही कर्तव्याने वडील भाऊच. आम्हा लहान भावंडांच्या सगळ्या गरजा पुरवायचा. त्याचे लहानपणीचे नाव कृष्णमूर्ती. बाबांनी त्याचे शाळेत कृष्णमूर्ती म्हणूनच नाव घातले होते. आई सांगायची की कृष्णमूर्ती नावामुळे त्याने घरी रडून गोंधळ घातला होता आणि मग बाबांना त्याचे नाव कृष्णा असे करावे लागले होते.

मी आणि ताई फ्रीलचा परकर-शर्ट किंवा मॅक्सी-ब्लाऊज घालायचो. आमच्यासाठी आण्णा नांदेडहुन बिन्नी मिलचा कापड आणून टेलर कडून आमच्यासाठी कपडे शिवून घ्यायचा. त्यामुळे त्याच्या आवडीचे कपडे घालुन आम्ही मोठे झालो. मी ज्या दिवशी त्याला सांगितलं कि मला शाळेत फळ्यावरचं स्पष्ट दिसत नाही, लागलीच दुसऱ्या दिवशी मला नांदेडला नेऊन डोळ्यांचा डॉक्टरांकडून तपासून घेतलं. एकदा भौतिकशास्त्राच्या (फिजिक्स) परीक्षेच्या आदल्या दिवशी मला ताप आला होता. डॉक्टरांनी येऊन इंजेक्शन दिले आणि आराम करायला सांगितलं. त्याला माहीत होतं की मी नक्की पुस्तक उघडून बसणार. मी तसे करू नये म्हणून तो माझ्यावर पहारा देत बसला. मला त्याने शेवटपर्यंत पुस्तक उघडू दिले नाही. मी तशीच परीक्षा द्यायला गेले. भौतिकशास्त्राचा एक महत्त्वाचा प्रश्न परीक्षेला जाण्याआधी वाचायचे म्हणून ठेवले होते. नेमका तोच प्रश्न परीक्षेत आला आणि मला दोन मार्क कमी मिळाले. मी दोन दिवस त्याच्याशी अबोला धरला होता. नांदेड, औरंगाबाद, पुणे, मुंबई अशा कुठल्याही मोठ्या शहरातुन माझ्यासाठी शैक्षणिक साहित्य आणि पुस्तके आणायचा. त्यामुळे तो गावाहून परत आला की मी त्याची बॅग तपासायची; खाऊ किंवा कपड्यासाठी नव्हे तर पुस्तकांसाठी. दिवाळीला नवीन खाते-वह्या आणल्यानंतर आदल्या वर्षीचे एक मोठे रजिस्टर जे जवळपास चारशे पानी होते ते त्याने मला दिले आणि गमतीने म्हणाला, बघू किती दिवसात तू हे पूर्ण भरून काढशील. मला गणित खूप खूप आवडायचे. होमवर्कच्या व्यतिरिक्त गणिते करून थोड्याच महिन्यात मी ते मोठे रजिस्टर भरून काढले होते. जेव्हा भरलेले रजिस्टर त्याच्या हाती दिले तेव्हा त्याला खूप खूप आश्चर्य तसेच कौतुकपण वाटले. त्याकाळी पार्टी वगैरे असा प्रकार नसायचा. मी बारावीला मेरीटमध्ये येऊन औरंगाबादच्या मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळाल्यानंतर त्याने सगळ्या प्राध्यापकांना आणि माझ्या मैत्रिणींना बोलावून पार्टी दिली होती. मला पहिल्यांदा औरंगाबादच्या मेडिकल कॉलेजच्या होस्टेलवर सोडून परत जाताना त्याचे डोळे भरून आले होते. त्याच्या भक्कम पाठिंब्यामुळे मी सावित्राची डॉ. सावित्रा झाले. मी अमेरिकेला येताना स्वाध्याय ह्या आध्यात्मिक परिवाराचे जनक प. पू. पांडुरंग शास्त्री आठवले लिखित पुस्तके माझ्या बॅगेत ठेवायला विसरला नाही. ह्या सगळ्या आठवणींपैकी एक विशेष आठवण आहे, ती म्हणजे माझे मिसाक पेन.

भारतातल्या मोजक्या सरस्वती देवीच्या मंदिरांपैकी एक म्हणजे बासरचे ज्ञान-सरस्वती मन्दिर. बासर हे तेलंगणाच्या निर्मल जिल्ह्यातले गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले गाव. लहान मुलांना शाळेत पाठवण्याआधी ह्या मंदिरात पाटीपूजा म्हणजेच अक्षरारंभ (तेलुगूमध्ये श्रीकारं म्हणतात) करवतात. नवीन पाटी घेऊन त्यावर कुंकवाचा थर टाकतात. देवीच्या साक्षीने मंत्रोच्चारात लहान मुलाकडून चांदीच्या पेनने श्री असे लिहून घेतात. अशी ही सरस्वती विद्येची देवता असल्यामुळे माझी तिच्यावर नितांत श्रद्धा होती.

शाळेत असताना आम्ही फाउंटेन पेन वापरायचो. बॉल पेनमुळे अक्षर खराब होते असा समज असल्यामुळे पालक आणि शिक्षक आम्हाला फाउंटेन पेनच वापरायला सांगायचे. आम्हा सगळ्यांकडे एक लाल शाईची आणि एक निळ्या शाईची असे दोन पेन असायचे. त्याकाळी  मिसाक पेन प्रसिद्ध होते. इतर पेनांपेक्षा थोडे महाग असायचे, पण लिहायला छान आणि अक्षरही सुंदर यायचे. (माझ्या पेनचा फोटो नसल्यामुळे मी नेटवरचा फोटो घेतला आहे). नेटवर पेनचा फोटो शोधत असता मला त्याबद्दलची नवीन माहिती कळली. ह्या पेनचे जनक म्हणजे हैदराबादचे कासीम. त्यांच्या नावाची अक्षरे उलट क्रमात म्हणजे KASIM चे MISAK असे नाव दिले म्हणे. 

एकदा आण्णा त्या भागात लग्नाला गेला होता. तो घरी आल्यानंतर नेहमीप्रमाणे मी उत्सुकतेपोटी त्याची बॅग तपासली. त्यात मला एक नवीन मिसाक पेन सापडला. त्याला हळद-कुंकू-अक्षता लागलेले होते. माझ्यासाठी वाट चुकवून बासरला जाऊन त्या नवीन मिसाक पेनची पूजा करवून आणली होती. तो आशीर्वादरुपी पेन पाहून मला खूप आनंद झाला होता. तो पेन मी कितीतरी वर्षे जपून वापरला. निबंध स्पर्धा, शुद्धलेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेचे भाषण लिहिणे आणि परीक्षा अशा मोजक्या कामांसाठी वापरायची. तो पेन हातात घेऊन लिहायला बसले कि असे वाटायचे की सरस्वती देवी मला तिच्या मांडीवर बसवून माझा हात धरून माझ्याकडून लिहून घेत आहे. त्यामुळे सहाजिकच आत्मविश्वास वाढायचा आणि यश मिळायचे.

प्रिय आण्णा, 13 डिसेंबर म्हणजे तुझा वाढदिवस. त्यानिमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख लिहिला आहे. अशीच वडिलांसारखी माया करत रहा.

जीवेत शरदः शतम् ! 🙏❤


14 Replies to “गोष्ट मिसाक पेनाची”

  1. वाचून खूप छान वाटत आहे. यातल्या बर्‍याच गोष्टींची माहिती नव्हती ती समजली.
    (डॅडी स ) वाढदिवसानिमित्त अनमोल भेट ….

  2. खुप छान.. बहिन-भावाचे नाते आणि तुझा लेख दोन्हीही.!!

  3. Nice Birthday Gift (to my Dad). खुप सुंदर लिखाण. जुन्या आठवणींना उजाळा देणारा लेख.

  4. खूप छान लेख👍🏻👍🏻
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कृष्णाण्णा💐💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *