हा लेख इंग्रजीतून वाचण्यासाठी इथे क्लिक करा: Concussion

डोक्याच्या कवटीत मेंदू असतो. मेंदू हा मऊ पेशींनी बनलेला असतो. कवटी आणि मेंदूच्या मध्ये कुशनिंगसाठी पाण्याचे आवरण असते. त्या पाण्याला सेरेब्रो स्पायनल फ्लुईड म्हणतात. त्यामुळे कवटीच्या आत मेंदू हलू शकतो आणि कधीकधी कवटीवर आदळु शकतो.

कंकशन म्हणजे काय? कंकशन म्हणजे मेंदूला झालेली सौम्य इजा किंवा मुका मार. डोक्यावर दणका बसल्यामुळे किंवा डोके आपटल्यामुळे मेंदू वेगाने मागेपुढे हलतो आणि मेंदूला मुका मार लागतो. डोके गदागदा हलवल्यामुळे सुद्धा इजा होऊ शकते. याचा परिणाम म्हणजे मेंदूमध्ये काही रासायनिक बदल होतात आणि कधी कधी मेंदूच्या पेशी खराब होतात. ह्या बदलामुळे मेंदू मधल्या सिग्नल मध्ये व्यत्यय येतो आणि ते लक्षणांच्या रूपात आपल्याला आढळून येतात. जरी ही इजा सौम्य स्वरूपाची वाटत असली तरीही त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

कंकशनची कारणे कोणती?

  • पडणे
  • स्पोर्ट्स इन्जुरी/खेळताना जखमी होणे
  • मोटर वाहनाचा अपघात
  • बहुतांश वेळी मुलांमध्ये खेळाच्या मैदानावर, दुचाकी चालविताना किंवा फुटबॉल, बास्केटबॉल,आइस हॉकी, कुस्ती किंवा सॉकर यासारख्या खेळांमध्ये इंजुरी होते.
  • स्पोर्ट्समध्ये मुलांपेक्षा मुलींमध्ये 1.5 पट जास्त कंकशन होतात.
  • एखाद्याला एक कंकशन झाले असेल तर दुसरे होण्याची शक्यता तीन ते पाच पटीने वाढते.

कंकशनची लक्षणे कोणती? बऱ्याच वेळेस लक्षणे इंजुरी झाल्याबरोबर दिसून येतात पण काही वेळेस काही दिवस किंवा आठवड्यानंतर दिसू लागतात. त्यामुळे इंजुरी झालेल्या मुलावर काही दिवसापर्यंत व्यवस्थित लक्ष ठेवावे लागते. मुलाच्या वयानुसार लक्षणे वेगवेगळी असू शकतात.

  • बरें न वाटणे, कसेतरीच वाटणे
  • डोके दुखणे
  • डोक्याला मार लागण्या आधीच्या आणि नंतरच्या गोष्टींचा विसर पडणे
  • चकित किंवा स्तब्ध झाल्यासारखे दिसणे
  • चक्कर येणे, गुंगी येणे किंवा संतुलन गमावणे
  • शुद्ध हरपणे (अगदी काही क्षणांसाठी हरवली असेल तरीही)
  • मळमळ किंवा उलटी होणे
  • प्रकाश आणि आवाज सहन न होणे
  • चिडचिडेपणा, अस्वस्थ वाटणे, डिप्रेस्ड वाटणे
  • लक्ष केंद्रित करण्यास कठीण जाणे
  • मेमरी प्रॉब्लेम्स (विसरभोळेपणा वाढणे)
  • कान वाजणे
  • झोपेच्या समस्या उद्भवणे
  • लहान मुलांच्या बाबतीत किरकिर करणे आणि खायला नकार देणे

कंकशनचे निदान कसे केले जाते?

डॉक्टर तुम्हाला तुमच्या मुलाच्या इंजुरी बद्दल सविस्तर माहिती आणि लक्षणे विचारतील. न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन करून मुलाच्या मेंदूचे कार्य कितपत व्यवस्थित सुरू आहे ते बघतील. डोळ्यांच्या बाहुल्या (प्यूपिल), मेमरी, बॅलेन्स तपासून पाहतील. कंकशन हा मुका मार आहे. सिटीस्कॅन किंवा एमआरआय स्कॅन मध्ये सूक्ष्म बदल दिसत नाहीत. त्यामुळे जनरली स्कॅन नॉर्मल असतात. जर फ्रॅक्चर किंवा मेंदूत रक्तस्त्राव ह्याबद्दल शंका असेल तर ब्रेनस्कॅन करतात.

कंकशनचे डायग्नोसिस झाल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यायची? बहुतांश केसेस मध्ये कंकशनची लक्षणे दोन आठवड्याच्या आत काही उपचार न करता कमी होऊन जातात. इजा झाल्यानंतर पहिल्या 48 तासात मुलावर बारीक लक्ष ठेवा.

  • शारीरिक विश्रांती/ फिजिकल रेस्ट: शारीरिक विश्रांतीमुळे मुका मार भरून येण्यास मदत होते. मुलाला शाळेत किंवा डे-केअर मध्ये पाठवू नका. त्याला बाईक चालवणे, धावणे, पोहणे, चढणे आणि स्पोर्ट्स खेळू देऊ नका.
  • मानसिक विश्रांती/ ब्रेन रेस्ट/ कॉग्निटिव्ह रेस्ट: पहिल्या 48 तासात मेंदूला संपूर्णपणे विश्रांती द्यायची शिफारस केलेली आहे. मुलांना व्हिडिओ गेम खेळू देऊ नका, टीव्ही पाहू देऊ नका आणि कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स वापरू देऊ नका.
  • शारीरिक आणि मानसिक विश्रांती झाल्यानंतर हळूहळू मूल शाळेत जाऊ शकते आणि दैनंदिन क्रिया स्लोली सुरू करू शकते. कोणत्याही ऍक्टिव्हिटीने लक्षणे वाढत असतील तर ती ऍक्टिव्हिटी ताबडतोब थांबवायला पाहिजे.
  • डॉक्टरांनी तपासून स्पोर्टसाठी परमिशन दिल्याशिवाय मुलाला स्पोर्ट्स मध्ये खेळू देऊ नये. तसे नाही केल्यास त्याची लक्षणे वाढू शकतात आणि दुसरे कंकशन होण्याची रिस्क वाढू शकते.
  • लक्षणे असताना ड्रायव्हिंग करू देऊ नका.
  • त्याच्या झोपेचे वेळापत्रक तयार करा. त्यामुळे त्याला खूप कमी किंवा खूप जास्त झोप टाळता येईल. झोपण्याची आणि उठण्याची एक ठराविक वेळ असली पाहिजे. मुलांची खोली शांत आणि अंधारी असली पाहिजे.
  • डोके दुखत असेल तर पेन-किलर्स वापरता येतील. पेन-किलर्सचा योग्य वापर केला पाहिजे.अतिवापरामुळे रीबाउंड हेडेक होऊ शकतो.
  • असेटमैनोफेन (टायलेनॉल किंवा पॅरासिटॅमॉल) वेदना आणि ताप कमी करते.
  • आयबुप्रोफेन (मोट्रिन) सारख्या एनएसएआयडीमुळे सूज, वेदना आणि ताप कमी होण्यास मदत होते.
  • गरज असेल तेव्हा डोकेदुखी, मळमळ, उलट्या, झोपेची समस्या, चक्कर येणे, औदासिन्य आणि कॉन्सन्ट्रेशन साठी प्रिस्क्रिप्शन औषधे दिली जातात.
  • काहीजणांना स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, वेस्टिब्युलर थेरपी, व्हिजन थेरपी किंवा कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी (सीबीटी) सारख्या उपचारांची आवश्यकता असते.

सेकंड इम्पॅक्ट सिंड्रोम (SIS): पहिल्या कंकशनमधून मेंदू पूर्णपणे बरा होण्याआधी जर दुसरे कंकशन झाले तर त्याचे अतिशय वाईट परिणाम होतात. त्याला सेकंड इम्पॅक्ट सिंड्रोम असे म्हणतात. त्यामध्ये मेंदूला सूज येते आणि 50% केसेसमध्ये मृत्यू सुद्धा होतो. त्यामुळे कंकशनबद्दलचे ज्ञान प्रत्येक पालकाला असणे खूप महत्त्वाचे असते.

दुसरे कंकशन होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी:

  • मुलांसाठी घर सुरक्षित असले पाहिजे. पडून मार लागण्यासारख्या गोष्टींचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे.
  • पायर्‍यांना गेट बसवा. तसेच हॅन्ड रेल बसवा.
  • फर्निचरच्या कोपऱ्यांना मऊ बंपर घाला.
  • ड्रेसर किंवा बुककेस यासारख्या अवजड फर्निचरला सुरक्षित करा, जेणेकरून आपले मुल त्यास ओढू शकणार नाही. 
  • कार मध्ये प्रवास करताना वयानुसार कार-सीट, बूस्टर सीट किंवा सीट बेल्टचा वापर करा. त्यामुळे जर अपघात झाल्यास डोक्याला दुखापत होण्याची शक्यता कमी असते.
  • स्पोर्ट्स मध्ये असतील तर आवश्यक असलेली प्रोटेक्टीव स्पोर्ट्स इक्विपमेंटचा वापर करावा. 
  • हेल्मेट घातल्याने कंकशन न होण्याची हमी मिळत नाही पण धोका कमी होतो आणि तीव्रताही कमी असते. त्यांना दुचाकी चालवणे, स्केटबोर्डिंग, फुटबॉल खेळताना हेल्मेट घालण्याची सक्ती करावी. तशी सवय लावावी.

कंकशनची धोकादायक लक्षणे: 

  • एका डोळ्याची बाहुली दुसऱ्या डोळ्यापेक्षा मोठी होणे
  • गुंगी येणे
  • सतत डोके दुखणे आणि ते वाढतच जाणे
  • बोलताना अडखळणे
  • वारंवार उलट्या किंवा मळमळ होणे, आकडी येणे/ सिजर येणे
  • अस्वस्थता वाढणे, गोंधळल्यासारखे होणे, वर्तणुकीत बदल होणे
  • शुद्ध हरपणे
  • हातापायात विकनेस येणे, संवेदना कमी होणे किंवा बॅलेन्सचा प्रॉब्लेम होणे
  • कानातून किंवा नाकातून रक्त किंवा पाण्यासारखा द्रव बाहेर येणे
  • लहान मुल रडण्याचे थांबत नसेल किंवा जेवत नसेल
  • बाळाच्या टाळूवर सूज येणे

कंकशन ही एक गंभीर समस्या आहे. जर त्याचे निदान आणि उपचार झाले नसतील तर पुढे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. पुढे जाऊन त्यांना डोकेदुखी, मेमोरी प्रॉब्लेम्स, चक्कर येणे, मेंदूचे कार्य संथ होणे या सारख्या समस्या उद्भवू शकतात आणि ते काही महिने आणि वर्षापर्यंत राहू शकतात. त्याला पोस्ट-कंकशन सिंड्रोम म्हणतात.

क्रॉनिक ट्रॉमॅटिक एन्सेफॅलोपॅथी (सीटीई) ही संज्ञा वारंवार डोक्याच्या दुखापतीमुळे होणाऱ्या मेंदूच्या ऱ्हासाचे वर्णन करण्यासाठी वापरली जाते. याचे निदान केवळ शवविच्छेदनात केले जाते. ह्याची रिस्क फुटबॉल खेडाळु आणि बॉक्सिंग खेळणाऱ्यांना असते. तसेच लष्करी जवानांमध्ये देखील होऊ शकते ज्यांना स्फोटांचा सामना करावा लागतो. ह्याची लक्षणे म्हणजे विचार (आकलन) करण्याची क्षमता कमी होणे, भावनिक आणि शारीरिक समस्या आणि बिहेवियरल प्रॉब्लेम्स असणे. हि लक्षणे डोक्याला वारंवार आघात झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी दिसून येतात आणि त्याला काहीही ट्रीटमेंट नाही.

“कंकशन” नावाचा 2015 चा इंग्रजी चित्रपट आहे जो पॅथॉलॉजिस्ट डॉ. बेनेट ओमालूच्या जीवनावर आधारित आहे. फुटबॉल मध्ये मरण पावलेल्या खेळाडूंच्या मेंदूवर वारंवार झालेल्या इंजुरीचा परिणाम ह्यावर त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्यांनी अमेरिकन फुटबॉल खेळाडूंमध्ये क्रॉनिक ट्रॉमॅटिक एन्सेफॅलोपॅथीचा शोध लावला.


6 Replies to “कंकशन”

  1. खूप छान लेख वाचून आनंद झाला माहित खूप छान आहे

  2. खूपच छान मुलांसाठी उपयुक्त माहिती धन्यवाद savitra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *