एडीएचडी (अतिचंचलता)


हा लेख इंग्रजीतून वाचण्यासाठी इथे क्लिक करा: ADHD

अतिचंचलता म्हणजेच अटेंशन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर ही एक कॉमन न्यूरोडेव्हलपमेंटल डिसॉर्डर आहे ज्यामध्ये खाली दिलेली लक्षणे आढळून येतात:

 • लक्ष केंद्रित करायला कठीण जाणे (इनअटेंशन)
 • अतिचंचलता (हायपर ऍक्टिव्हिटी)
 • आवेग (इम्पल्सिविटी)

 • मुलांमध्ये ही लक्षणे बारा वर्षाच्या आधी दिसून येतात त्यामुळे डायग्नोसिस साधारणतः बालपणात होते.
 • एडीएचडी पूर्णपणे बरा होऊ शकत नाही पण वेळीच डायग्नोसिस करून ट्रीटमेंट आणि थेरपी दिल्यास बरीच लक्षणे नाहीशी होऊन मोठेपणी त्यांना जास्त स्ट्रगल करावे लागत नाही.
 • मुलींपेक्षा मुलांमध्ये एडीएचडीचे प्रमाण जास्त असते (4:1)
 • मुलीमध्ये सहसा कॉन्सन्ट्रेशन प्रॉब्लेम्स जास्त दिसून येतात आणि मुलांमध्ये हायपर ऍक्टिव्हिटी जास्त दिसून येते.
 • बऱ्याच वेळेस एडीएचडी सोबत इतर काही कंडिशन्स असू शकतात ज्यांना कोमॊर्बीड कंडिशन म्हणतात. उदाहरणार्थ:  डिस्लेक्सिया, इतर लर्निंग डिसॉर्डरस, अंक्साइटी, डिप्रेशन, टिक्स, झोपेच्या समस्या, ड्रग्जच्या आहारी जाणे.

एडीएचडीची लक्षणे: 

इनअटेंशनची लक्षणे:

 • बारीक सारीक तपशीलांकडे दुर्लक्ष होणे
 • कोणत्याही गोष्टीवर जास्त वेळ लक्ष केंद्रित करू शकत नाही
 • एक काम पूर्ण होण्याआधीच दुसरे काम सुरू करणे
 • बोललेले ऐकून न ऐकल्यासारखे करणे
 • दैनंदिन व्यवहारात खूप विसरभोळेपणा
 • सारख्या वस्तू हरवणे
 • ज्या कामात खूप मेहनत आणि एकाग्रता लागते ते काम टाळणे
 • लहान सहान गोष्टीनी सहजरित्या विचलित होणे
 • कुठलीही गोष्ट व्यवस्थित न ठेवता अतिशय पसारा करणे

हायपर ऍक्टिव्हिटीची लक्षणे:

 • एके ठिकाणी जास्त वेळ बसू शकत नाहीत
 • सारखी चुळबुळ सुरूअसते
 • रांगेत उभे राहिल्यावर नंबर येईपर्यंत थांबत नाही
 • क्लासरूममध्ये सतत जागेवरून उठून जाणे
 • सतत बडबड करून क्लासमध्ये डिस्टर्ब करणे
 • इतरांना त्रास देणे, मारामारी करणे 
 • खेळताना खूप आवाज करणे

इम्पल्सिविटीची लक्षणे:

 • परिणामांचा विचार न करता कृती करणे
 • प्रश्न पूर्ण होण्याआधी घाईगडबडीने उत्तर देणे
 • बोलण्यापूर्वी इतरांचे न ऐकणे
 • इतरांच्या बोलण्यात व्यत्यय आणणे
 • पेशन्स नसणे, लवकर बोअर होणे/ कंटाळा येणे
 • अतिशय शीघ्रकोपी असणे

लक्षणांच्या आधारे एडीएचडीचे 3 प्रकार आहेत:

 1. कंबाइनड टाईप

हायपरएक्टिव्हिटी, आवेग आणि लक्ष नसण्याची लक्षणे

 1. हायपरॅक्टिव/इम्पल्सिव (अतिचंचलता/आवेगपूर्ण) टाईप

हायपर ऍक्टिव्हिटी आणि इम्पल्सिविटीची लक्षणे

 1. इनअटेंशन टाईप

लक्ष केंद्रित न करता येण्याची लक्षणे

ही सगळी लक्षणे पाहून तुमच्या लक्षात येईल की लहानांपासून मोठ्यापर्यंत ही लक्षणे कधी ना कधी आढळून येतात. मग त्याला एडीएचडी म्हणायचे का? नाही. कारण एडीएचडी असणाऱ्या लोकांमध्ये ह्या लक्षणांचे प्रमाण खूप जास्त असते, वारंवार असते आणि त्यामुळे शिक्षण किंवा जॉबवर त्याचा विपरीत परिणाम होतो.

आता पाहूया एडीएचडी कशामुळे होतो.

एडीएचडी जास्त साखर खाण्यामुळे, इलेक्ट्रॉनिक्सच्या अतिवापरामुळे, चुकीच्या पॅरेंटिंगमुळे किंवा आर्थिक परिस्थितीमुळे होत नाही. पण ह्या सगळ्या घटकांमुळे लक्षणे जास्तच बिघडू शकतात.

एडीएचडी हा जेनेटिक्स (अनुवंशिकता) आणि एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेमच्या कॉम्बिनेशन मुळे होतो.

डोपामिन हे मेंदूचे एक रसायन आहे (ज्याला न्यूरोट्रांसमीटर देखील म्हटले जाते) जे मेंदूच्या बर्‍याच महत्त्वाच्या कामांमध्ये सक्रिय असते. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की एडीएचडी असणाऱ्या मुलांमध्ये डोपामीनची पातळी इतर मुलांपेक्षा वेगळी असते आणि त्यामुळे एडीएचडीची लक्षणे दिसून येतात.

अनुवांशिकते व्यतिरिक्त इतर संभाव्य कारणे:

 • ब्रेन इंजुरी/ मेंदूला इजा झाल्यामुळे
 • गरोदरपणात मद्यपान, धूम्रपान, कोकेन किंवा तत्सम ड्रग्सचा वापर
 • प्रीमॅच्युअर बर्थ
 • जन्माच्या वेळी बाळाचे वजन खूप कमी असणे
 • लेड पॉयझनिंग (शीशेमुळे विषबाधा)

एडीएचडीचे निदानः एडीएचडीचे निदान करण्यासाठी कोणतीही टेस्ट/चाचणी (जसे की रक्त चाचणी, सिटी स्कॅन, एम आर आय स्कॅन किंवा ब्रेन वेव्ह टेस्ट) उपलब्ध नाही. निदान करण्यासाठी स्पेशालिस्ट मुलाची पूर्ण हिस्ट्री, लक्षणे लक्षात घेतात, पालक आणि शिक्षकांकडून लक्षणे आणि तीव्रता जाणून घेण्यासाठी रेटिंग-स्केल वापरतात आणि त्यावरून डायग्नोसिस करतात.

कोशंट नावाची कंप्यूटर टेस्ट आणि एका विशिष्ट प्रकारची ब्रेन वेव्ह टेस्टचा वापर केल्यानंतर असे आढळून आले की त्यामध्ये बऱ्याच त्रुटी आहेत आणि निदान बरोबर होत नाही. त्यामुळे वर नमूद केल्याप्रमाणे रेटिंग-स्केलचा उपयोग करून डायग्नोसिस करतात.

झाले एकदाचे एडीएचडीचे डायग्नोसिस. आता पुढे काय?

जर मुलाला एडीएचडी असेल पण त्याचे डायग्नोसिस झालेले नसेल तर तो ऐकत नाही, वर्गात लक्ष नाही, व्यवस्थित अभ्यास करत नाही अशा कारणांसाठी सतत रागावल्यामुळे मुलांमध्ये चिडखोरपणा आणि आक्रमकता वाढू शकते. त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डायग्नोसिस वेळेवर होणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे मुलाच्या वागण्याला कश्या पद्धतीने हाताळायचे हे पालकांना तसेच टिचरना कळेल. अशा मुलांना प्रेमाने समजून सांगणे खूप गरजेचे असते. योग्य वेळी योग्य उपचार केल्यामुळे एडीएचडीची लक्षणे बर्‍यापैकी कंट्रोल करता येतात. सहा वर्षाखालील मुलांना मेडिसिन्स ट्राय करण्याआधी कौन्सिलिंग करण्याची शिफारस केलेली आहे. प्रत्येक मुलाला सारखीच ट्रीटमेंट काम करत नाही. काही मुलांना फक्त काऊन्सिलिंग, काही मुलांना फक्त मेडिसिन्स, काही मुलांना काहीच ट्रीटमेंट नाही तर काही मुलांना दोन्ही ट्रीटमेंटची आवश्यकता असते. अमेरिकेत एडीएचडी असणाऱ्या मुलांना 504 प्लान मॉडीफिकेशन्स ज्यामध्ये त्यांना स्कूलमध्ये कौन्सिलिंग मिळणे, होमवर्क पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ देणे, थोडा थोडा होमवर्क देणे अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. जर मुलाला लर्निंग डिसॉर्डर असेल तर त्याला स्पेशल एज्युकेशन क्लासमध्ये बसवतात.

मेडिसिन आणि काऊन्सेलिंग सोबत निरोगी जीवनशैली अतिशय महत्त्वाची असते.

 1. खाण्या-पिण्याच्या योग्य सवयी विकसित करणे: भरपूर फळे, भाज्या आणि कडधान्य खाण्याची सवय लावावी. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा: समतोल आहार
 2. नियमितपणे शारीरिक व्यायाम करणे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा: व्यायामाचे तंत्र
 3. इलेक्ट्रॉनिक्सचा वापर मर्यादित करा. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा: स्क्रीन टाइम: शाप की वरदान?
 4. वयानुसार आवश्यक असलेली झोप घेणे. अधिक माहिती साठी इथे क्लिक करा: आरोग्यदायी झोप
 5. काही रिसर्च मधून असे दिसून आले की ओमेगा थ्री फिश ओईल घेतल्यामुळे एडीएचडीच्या लक्षणांची तीव्रता कमी होते. अधिक माहिती साठी इथे क्लिक करा: ओमेगा थ्री फिश ओईल
 6. काही लोकांच्या मते एडीएचडीच्या मुलांमध्ये सुपर ब्रेन योगा फायदेशीर असतो. अधीक माहितीसाठी इथे क्लिक करा: सुपर ब्रेन योगा!

एडीएचडीच्या लक्षणावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही औषधे उपलब्ध आहेत. त्यात दोन प्रकारची औषधे आहेत: स्टीमुलंट्स (उत्तेजक) आणि नॉनस्टीमुलंट्स.

स्टीमुलंट्सचा वापर सर्वाधिक केला जातो. अँफेटामिन आणि मिथाईल फेनीडेट हे ह्या प्रकारात मोडतात. ते गोळ्या, कॅप्सूल, लिक्विड आणि स्किनपॅच अशा विविध रूपात उपलब्ध आहेत. ते डोपामीनची कार्यक्षमता वाढवतात. त्यांचा परिणाम ताबडतोब दिसून येतो. जवळपास सहा ते आठ तासानंतर शरीरातून क्लियर होऊन जातात. मुलांना ही औषधे फक्त स्कुल-डेज ला देऊन सुट्टीच्या दिवशी ‘ड्रग हॉलिडे’ देता येते.

नॉनस्टीमुलंट्स: अटोमोझेटीन (स्ट्रॅटेरा), इंटुनिव्ह (ग्वानफेसिन) आणि क्लोनिडीन हे ह्या प्रकारात मोडतात. स्टीमुलंट्स सारखे ते ताबडतोब काम करत नाहीत पण त्याचा प्रभाव 24 तासापर्यंत टिकून राहतो. ही औषधे दररोज घ्यावी लागतात आणि घ्यायला सुरुवात केल्यानंतर त्याचा योग्य परिणाम दिसायला ४ ते ६ आठवडे लागतात.

एप्रिल 2021 मध्ये, FDA ने क्वेलब्री (Qelbree/viloxazine) ह्या नवीन नॉनस्टीमुलंट्ला मंजुरी दिली आहे. ते 6 ते 17 वर्षे वयाच्या मुलांसाठी वापरता येते.

प्रत्येक मुलाचा औषधाला रिस्पॉन्स वेगवेगळा असू शकतो. भूक मंदावणे, डोके दुखणे, छातीत दुखणे, झोप न येणे अशा प्रकारचे साइड इफेक्ट असू शकतात. स्पेशालिस्टच्या मदतीने तुमच्या मुलाला कोणती थेरपी आणि कोणते मेडिसिन्स आवश्यक आहेत ते मिळवू शकता.

एडीएचडी साठी व्हिडिओ गेम: एन्डेवर (EndeavorRx) हा एडीएचडी असलेल्या मुलांसाठी एफडीएने 15 जून 2020 रोजी मंजूर केलेला पहिला व्हिडिओ गेम आहे. ज्यांना मुख्यतः इनअटेंशनची लक्षणे आहेत अश्या 8 आणि 12 वयोगटातील मुलांसाठी डॉक्टर ह्या गेमचे प्रिस्क्रिप्शन लिहून देऊ शकतात. एडीएचडीच्या इतर उपचारासोबत हि ट्रीटमेंट वापरतात. हा एडीएचडी औषधांचा पर्याय नाही.अशी शिफारस केली जाते की हा गेम दररोज सुमारे 25 मिनिटे, आठवड्यातून 5 दिवस, 4 आठवड्यांसाठी वापरावे. त्यानंतर एक महिना ट्रीटमेंट पॉज घेऊन ट्रीटमेंटचा दुसरा महिना सुरु करावा. असा हा 3 महिन्यांचा उपचार आहे.
जस जसे मुले हा गेम खेळात जातात तस तसे आव्हाने वाढत जातात आणि मल्टीटास्किंगचे नियम क्लिष्ट होत जातात. सातत्याने खेळल्यामुळे त्याचा फायदा होतो.
ह्या गेमचे काही साईड इफेक्ट्स पण आढळून आले आहेत: डोकेदुखी, मळमळ, फ्रस्टेशन, अग्रेशन इ. काही विशिष्ट प्रकारचे फिट्स ज्याला फोटो सेन्सिटिव्ह एपिलेप्सी म्हणतात किंवा कलर ब्लाइंड असणाऱ्या मुलांनी हा गेम वापरू नये.

वेळेवर निदान आणि उपचार न केल्यास होणारे दुष्परिणाम:

 • शिक्षणात मागे राहणे
 • मैत्री टिकवता न येणे
 • ड्रायव्हिंग करताना एक्सीडेंट होणे
 • ड्रग्जच्या आहारी जाण्याचा धोका वाढणे
 • मल्टिटास्किंग (एकाच वेळेस दोन तीन कामे करणे) करता न येणे, कामाचे प्लॅनिंग व्यवस्थित न जमणे, धरसोड वृत्ती असणे आणि किचकट कामांपासून दूर पळणे अशा लक्षणांमुळे नोकरी टिकून ठेवणे किंवा कुठलेही काम वेळेवर आणि योग्य प्रकारे  करणे त्यांना जमत नाही.
 • एडीएचडी असलेल्या लोकांमध्ये ब्रेकप आणि घटस्फोटाचे प्रमाण जास्त आढळून आलेले आहे.
 • त्यांच्यामध्ये न्यूनगंड तयार होऊ शकतो.

पालकांसाठी टिप्स:

 1. तुमच्या मुलासाठी नित्यक्रम तयार करा. उठण्यापासून ते झोपायच्या वेळेचे वेळापत्रक करा आणि त्याचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करा.
 2. स्कूल बॅग, कपडे आणि खेळणी ह्यासाठी जागा निश्चित करा आणि मुलाला त्याची सवय लावा.
 3. होमवर्क करते वेळेस आजूबाजूला शांतता राखण्याचा प्रयत्न करा. टीव्ही बंद करा, मोठ्याने बोलू नका. काही मुलांना बॅकग्राऊंड मध्ये हळुवार म्युझिक असेल तर त्याचा फायदा होतो. फायदा होणार असेल तर वापरू शकता.
 4. एडीएचडी असणारी मुले लगेचच अतिउत्साही होतात. त्यामुळे त्यांना कमीत कमी चॉईसेस द्या जेणेकरून निवडायला सोपे जाईल. उदाहरणार्थ: काय खाणार, काय घालणार किंवा कोणती खेळणी पाहिजे असे विचारण्या ऐवजी हा शर्ट की तो शर्ट, हा पदार्थ की तो पदार्थ, ही खेळणी कि ती खेळणी.
 5. अशा मुलांशी बोलताना स्पष्टता राखणे महत्त्वाचे असते.
 6. त्याचे बोलणे लक्ष देऊन ऐका.
 7. खूप सूचना एकत्रित न देता एका वेळेस एकच सूचना द्या. ती पण स्पष्ट शब्दात द्या.
 8. काम जर किचकट असेल तर थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घेऊ द्या.
 9. चांगल्या कामाची स्तुती करा आणि योग्य असेल तर बक्षीस द्या. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
 10. अयोग्य वर्तनासाठी ओरडणे आणि मारण्यापेक्षा त्यांना समजावून सांगा, टाईम आउट करा किंवा पनिशमेंट म्हणून इलेक्ट्रॉनिक्स काढून घ्या.
 11. मुलांच्या आवडीनिवडी टिपून त्याप्रमाणे त्यांना प्रोत्साहन द्या. कला, संगीत, खेळ इत्यादींचा वापर सकारात्मक रीतीने करता येतो.
 12. पौष्टिक आहार, शारीरिक व्यायाम आणि पुरेशी झोप याकडे लक्ष देऊन त्यांची जीवनशैली निरोगी करा.2 Replies to “एडीएचडी (अतिचंचलता)”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *