आरोग्याची गुरुकिल्ली-स्क्रीनिंग टेस्ट्स


हा लेख इंग्लिश मध्ये वाचण्यासाठी इथे क्लिक करा: Know Your Health Screening Checklist

आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपले आरोग्य. आपण सगळे आपापल्या परीने आपले आरोग्य सांभाळण्याचा नियमित प्रयत्न करत असतो. आपण पौष्टिक अन्न खातो, नियमित व्यायाम करतो आणि आजारी पडलो कि वैद्यकीय मदत घेतो. मला काहीच त्रास नाही. मग मला डॉक्टरकडे जायची आणि तपासण्या करायची गरजच काय? हा नियम आता जुना झाला आहे. आजार झाल्यानंतर मग तपासण्या करणे आणि ट्रीटमेंट घेणे ह्या व्यतिरिक्त एक महत्वाची गोष्ट पण आहे. ती म्हणजे काही आजार होण्या आधीच त्यांचा प्रतिबंध करणे. आपण लसी (व्हॅक्सिन) घेऊन काही रोगापासून बचाव करून घेतो. तसेच काही आजार लक्षणे दिसण्या आधीच टेस्ट करून योग्य काळजी घेतली कि त्याचा जास्त त्रास होत नाही आणि आटोक्यात आणायला सोपे पडते. अश्या टेस्ट्सना स्क्रीनिंग टेस्ट्स असे म्हणतात. 

जर तुमच्या आई-वडील-बहीण-भाऊ किंवा जवळच्या नातेवाईकांना हृदयरोग, स्ट्रोक (पॅरालीसीसचा अटॅक), मधुमेह किंवा कर्करोग यासारखे आजार असतील तर तुम्हाला त्या आजाराचा धोका असण्याची शक्यता असू शकते. तसेच काही रोगांमध्ये, रोग गंभीर टप्प्यात जाईपर्यंत रोगाची लक्षणे दिसत नाहीत. अश्या परिस्थितीत नियमित पणे स्क्रीनिंग टेस्ट्स करत राहिल्यास बरेच रोग होण्याआधीच निदान करून ट्रीटमेंट करता येते. ह्याबद्दल तुम्हाला माहिती मिळावी ह्या उद्देश्याने हा लेख लिहिला आहे.

अमेरिकेतली आणि भारतातली किंवा इतर देशातली अश्या स्क्रीनिंग टेस्ट्सची पद्धत वेगवेगळी असू शकते. इथे अमेरिकेत ज्या काही स्क्रीनिंग टेस्ट्स करतात त्याबद्दल लिहीत आहे. हा वैद्यकीय सल्ला नाही. तुम्ही तुमच्या डॉक्टरना विचारून असे टेस्ट्स करून घेऊ शकता.

सर्व वयोगटातील लोकांसाठी अश्या टेस्ट्स असतात. काही टेस्ट्स वरचेवर करावे लागतात तर काही अधून मधून करायच्या असतात.

पुढील शिफारसी यू.एस. प्रीवेन्टिव्ह सर्व्हिसेस टास्क फोर्स (USPSTF) आणि सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन (CDC) च्या एकत्रित मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित आहेत.

1. फिजिकल एक्साम म्हणजे पूर्ण चेकअप: १९ -४९ वयोगटातील लोकांनी दर १-२ वर्षांनी पूर्ण चेकअप करून घ्यावे. पन्नाशी नंतर दरवर्षी करून घ्यावे.

2. नियमित वजन, उंची आणि बीएमआयः बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) हे वजन आणि उंचीच्या प्रमाणातून काढले जाते. यामधून उंचीच्या तुलनेत शरीराचे अपेक्षित वजन कमी किंवा जास्त आहे का हे ओळखता येऊ शकते.

शरीराचे बीएमआय ठाऊक असणे फार आवश्यक आहे. हाय बीएमआय म्हणजे शरीरात बॉडी फॅटचे प्रमाण अधिक असल्याचे व त्यानुसार वजनही अधिक असल्याचा संकेत मिळतो. अपेक्षित बीएमआय नसणे म्हणजे मधूमेह, स्ट्रोक, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रेरॉलचे वाढलेले प्रमाण, ह्रदयविकाराचा धोका तसेच संधीवाताचे दुखणे ओढावू शकते.

तुमचा बीएमआय (BMI) इथे कॅलक्युलेट करू शकता: Adult BMI Calculator

 • 18.5 पेक्षा कमी बीएमआय : अंडरवेट ( अपेक्षेपेक्षा कमी वजन)
 • 18.5 – 25 च्या दरम्यानचा बीएमआय : योग्य वजन
 •  25 – 30 च्या दरम्यानचा बीएमआय : अतिवजन
 • 30 – 40 च्या दरम्यानचा बीएमआय  : लठ्ठ
 • 40 पेक्षा जास्त बीएमआय : अतिलठ्ठ

जर बीएमआय 25-30 (जास्त वजन) आणि 30 पेक्षा जास्त (लठ्ठपणा) दरम्यान असेल तर खालील रक्त चाचण्या घ्याव्यात:

 •  लिपिड प्रोफाइल
 •  एचबीए 1 सी (HbA1C)
 •  फास्टिंग ब्लड शुगर
 •  लिव्हर फंक्शन टेस्ट्स

3. ब्लड प्रेशर स्क्रीनिंगः वयाच्या १८ वर्षांपासून प्रत्येक चेकअप च्या वेळी रक्त दाब  (ब्लड प्रेशर) तपासायला हवे. नॉर्मल ब्लड प्रेशर १२०/८० असते. जर १८-३९ वयोगटात ब्लड प्रेशर १२०/८० पेक्षा कमी असेल तर त्यांनी दर २ वर्षांनी ब्लड प्रेशर तपासून घ्यावे. चाळिशीपासून तसेच ज्यांना उच्च रक्तदाबाची रिस्क आहे त्यांनी दरवर्षी ब्लड प्रेशर तपासून घेणे आवश्यक आहे.

उच्च रक्तदाबाची रिस्क कोणाला असू शकते? ज्यांचे ब्लड प्रेशर १२०/८०-१२९/८४ किंवा लठ्ठ व्यक्ती (बीएमआय 30 पेक्षा जास्त) .

4. लिपिड प्रोफाइलः म्हणजे कोलेस्टेरॉल टेस्ट. हि एक ब्लड टेस्ट आहे आणि त्यासाठी टेस्टच्या आधी ८ ते १२ तास काहीही खाऊ पिऊ नये. त्यात खालील घटक तपासतात:

 • कमी-घनतेचे लिपोप्रोटीन (एलडीएल) किंवा “खराब” कोलेस्ट्रॉल. एलडीएल कोलेस्ट्रॉलचे उच्च प्रमाण असल्यास आपल्या रक्तवाहिन्यां ब्लॉक होऊ शकतात आणि परिणामी हृदयरोग किंवा स्ट्रोक होऊ शकतो.
 • उच्च-घनतेचे लिपोप्रोटीन (एचडीएल) किंवा “चांगले” कोलेस्ट्रॉल. एचडीएलला “चांगले”कोलेस्ट्रॉल म्हणून म्हंटले जाते कारण त्यामुळे हृदय रोग आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
 • ट्रायग्लिसेराइड्स, आपल्या रक्तातील चरबीचा एक प्रकार. जर हाय ट्रायग्लिसरायड्स आणि कमी एचडीएल कोलेस्ट्रॉल किंवा हाय एलडीएल कोलेस्ट्रॉल मुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
 • टोटल कोलेस्ट्रॉल: म्हणजे एचडीएल, एलडीएल आणि ट्रायग्लिसरायड्स असे आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉलची एकूण मात्रा.

9 ते 11 वयोगटातील मुलांचे कोलेस्ट्रॉल तपासून घ्यावे आणि त्यानंतर 17 ते 21 दरम्यान पुन्हा एकदा कोलेस्ट्रॉलची तपासणी केली पाहिजे. निरोगी प्रौढांनी दर 4 ते 6 वर्षांनी त्यांच्या कोलेस्ट्रॉलची तपासणी केली पाहिजे.

ज्या लोकांना हृदयरोग किंवा मधुमेह आहे किंवा हाय कोलेस्ट्रॉलची फॅमिली हिस्टरी आहे, त्यांनी कोलेस्ट्रॉल किमान दरवर्षी तपासून घ्यावे.

5. फोलिक ऍसिड: हे एक प्रकारचे बी व्हिटॅमिन आहे. जर गर्भवतीच्या शरीरात ह्याची कमतरता असेल तर जन्मणाऱ्या बाळाच्या मेंदूत किंवा मेरुदंडातील दोष उद्भवतात. खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे भयानक दोष उद्भवू शकतात. म्हणून सकस आहारासोबत सगळ्या स्त्रियांनी प्रेग्नंसीच्या आधीपासून ४०० mcg च्या फोलिक ऍसिडच्या गोळ्या घ्यायला सुरु करावे. प्रेग्नंसी टेस्ट पॉझिटिव्ह येऊन कळेपर्यंत गर्भाच्या मेंदूची डेव्हलपमेंट झालेली असते आणि नंतर फोलिक ऍसिड घेऊन ते दोष सुधारता येत नाहीत. म्हणून आधीपासूनच गोळ्या घ्यायला सुरुवात करावी.

6. मधुमेह:  मधुमेहाचे दोन प्रकार असतात. टाईप 1 आणि टाईप २. टाईप १ मधुमेहच्या तपासणीची गरज नाही. ज्यांचे वय 45 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त असेल त्यांनी दर तीन वर्षांनी टाईप २ मधुमेहाची टेस्ट केली पाहिजे असे USPSTF ने सांगितले आहे . परंतु, अमेरिकन डायबिटीज असोसिएशनने 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दरवर्षी टाइप 2 मधुमेहासाठी स्क्रीनिंग करण्याची शिफारस केली आहे.

त्याचे निदान कसे करतात ?

 • फास्टिंग ब्लड शुगर १२६ किंवा त्यापेक्षा जास्त
 • HbA1C ६.५ पेक्षा जास्त
 • बिना फास्टिंग (रँडम) ब्लड शुगर २०० पेक्षा जास्त असल्यास

खालील व्यक्तींना रिस्क असते म्हणून त्यांनी मधुमेहाची टेस्ट करून घ्यावी:

 • अति वजन असणारे (बीएमआय २५ पेक्षा जास्त)
 • आई-वडील-भावंडांना मधुमेह असल्यास
 • शारीरिकरित्या निष्क्रिय किंवा बैठे काम करणारे
 • उच्च रक्तदाब (> 140/90) किंवा उच्च रक्तदाबसाठी औषधे घेत असाल तर
 • पीसीओएस (पॉलीसिस्टिक ओवॅरियन सिंड्रोम)
 • HDL लिपोप्रोटिन कोलेस्ट्रॉल पातळी <35 किंवा ट्रायग्लिसेराइड पातळी> 250 असल्यास
 • हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग असल्यास

7. मॅमोग्राम: स्तनाच्या कर्करोगाच्या सुरुवातीची चिन्हे शोधण्यासाठी मॅमोग्राम करतात ज्यात क्ष-किरणांनी किंवा इन्फ्रारेड किरणांनी तपासणी केली जाते. कर्करोग होण्याच्या तीन वर्ष अगोदरच मॅमोग्राम मध्ये त्याची चिन्हे दिसू शकतात आणि वेळीच त्यावर बाकीचे टेस्ट्स करून ट्रीटमेंट करता येते. मॅमोग्राम साठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शिफारसी आहेत. परंतु वयाच्या 40 व्या वर्षांपासून दर वर्षी मॅमोग्राम करणे उत्तम.

8. गर्भाशयाच्या कर्करोगचे स्क्रीनिंग / पॅप स्मिअरः पॅप टेस्ट किंवा पॅप स्मीयर ही गर्भाशयाच्या तोंडाच्या कर्करोगाच्या तपासणीची एक प्रोसिजर आहे. गर्भाशयाच्या तोंडाच्या पेशींचे नमुने लहान ब्रश वापरुन गोळा केले जातात. पॅप टेस्टने कर्करोगाचे निदान खूप आधी करता येतो आणि त्यामुळे ट्रीटमेंट करून बरे होण्याचे चान्सेस जास्त असतात.  २१ व्या वर्षापूर्वी स्क्रीनिंग करण्याची गरज नसते कारण २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांना कर्करोगाचा धोका कमी असतो. २१ ते ६५ वयोगटातील महिलांनी पॅप स्मिअर करून घ्यावी आणि जर नॉर्मल असेल तर पुन्हा तीन वर्षांनी रिपीट करावी. ६५ वयानंतर ह्या टेस्टची गरज नसते.

9. कोलो-रेक्टल कॅन्सर तपासणी: मोठ्या आतड्याचे कर्करोग म्हणजे कोलोरेक्टल कॅन्सर, पुरुष आणि स्त्रियांना होऊ शकतो. अमेरिकेत ह्याचे प्रमाण खूप आहे. स्क्रिनिंग मूळे पॉलीप्स (आतड्यातल्या गाठी) शोधण्यात मदत होते आणि ते कॅन्सर मध्ये रूपांतरित होण्या आधीच त्यांना काढून टाकता येते. स्क्रीनिंग वयाच्या 50 व्या वर्षी सुरूवात करावी.

खाली दिलेल्या तीन पैकी एका पद्धतीने स्क्रिनींग करतात:

 • कोलोनोस्कोपी -दर १० वर्षांनी
 • फ्लेक्सिबल सिग्मोईडोस्कोपी – दर ५ वर्षांनी
 • स्टूल ब्लड टेस्ट – दरवर्षी

10. हाडांचे घनता स्क्रीनिंग (डीएक्सए) / ऑस्टिओपोरोसिस स्क्रिनिंगः मेनोपॉज (म्हणजे मासिक पाळी बंद होणे) झाल्यावर हाडे ठिसूळ व्हायला सुरुवात होते. त्याला ऑस्टिओपोरोसिस (कमकुवत आणि ठिसूळ हाडे) असे म्हणतात. त्याचे निदान करण्यासाठी डेक्सा स्कॅन करतात. हा एक एक्सरेचाच प्रकार असतो. 65 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या स्त्रियांसाठी दर दोन वर्षांनी डेक्सा स्कॅन करणे आवश्यक असते.

11. अबडॉमिनल एओर्टिक एन्यूरिझम: एओर्टा ही हृदयातून रक्त वाहून नेणारी एक मोठी रक्त वाहिनी आहे. एन्यूरिझम म्हणजे एओर्टा मध्ये एक बलून सारखा फुगवटा तयार होतो. तो फुटून शरीरात रक्तस्त्राव होऊन मृत्यू होण्याचा धोका असतो. धूम्रपान केलेल्या किंवा करणाऱ्या 65 ते 75 वर्षे वयोगटातील पुरुषांचे पोटाचे अल्ट्रासोनोग्राफी एकदा करून घ्यावी.

रोग झाल्यानंतर त्यावर उपाय करण्यापेक्षा ज्या ज्या रोगांचे स्क्रीनिंग टेस्ट उपलब्ध आहेत त्याचा योग्य वापर करून वेळीच त्यावर प्रतिबंध घालता येतो. आपल्या वाढदिवसाच्या आठवड्यात किंवा महिन्यात स्क्रीनिंग टेस्ट करून घ्यायची पद्धत सुरु करावी म्हणजे लक्षात ठेवायला सोपे जाईल. ती स्वतःला एक वाढदिवसाची गिफ्ट समजावी. शेवटी जान है तो जहान है, होय ना?

तर वाचक हो, निरोगी राहा..आनंदी राहा!


6 Replies to “आरोग्याची गुरुकिल्ली-स्क्रीनिंग टेस्ट्स”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *