असा वाचवला तिचा संसार!👪


हा लेख इंग्रजीत वाचण्यासाठी इथे क्लिक कराThis Is How I Saved Her Marriage!

परवा कुठलातरी चित्रपट पाहत होते. त्यात एका जोडप्याला मूल होत नसल्याने त्यांना कोण कोणत्या दिव्यातून जावे लागले ते दाखवले होते. त्यावरून मला माझ्या पेशंट्सच्या कहाण्या आठवल्या. त्या तुमच्यासोबत शेअर करत आहे.

मी एका तालुक्याच्या गावी, देगलूरला भूलतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करायची आणि उर्वरित वेळेत एक छोटेसे क्लिनिक चालवायचे. प्रत्येक जोडप्याला वाटते, की आपले स्वतःचे एकतरी मूल असावे. पण प्रत्येक जोडप्यास निसर्गतः स्वतःचे मूल होईलच असे नाही. जोडप्याला लग्नानंतर एक वर्षानंतर कोणतेही गर्भनिरोधक साधन न वापरता गर्भधारणा होत नसेल, तर त्या जोडप्यास वंध्यत्व आहे असे म्हणू शकतो.

एके दिवशी एक महिला एक भली मोठी फाईल घेऊन माझ्या क्लिनिक मध्ये आली. तिचे लग्न होऊन ४ वर्षे झाली होती आणि त्यांना मूल होत नव्हते. तिने बऱ्याच वंध्यत्व(इनफेर्टीलिटी) निवारण केंद्रात जाऊन सगळ्या चाचण्या आणि उपचार करून घेतले होते, पण यश आले नाही. ती त्या सगळ्या रिपोर्ट्सची फाईल घेऊन खूप आशेने माझ्याकडे आली. मी जेव्हा तिची कहाणी ऐकली, मी मनातल्या मनात म्हंटले, बाई ग, मी काही स्त्रीरोगतज्ञ् नाही आणि वंध्यत्व स्पेशालिस्ट तर नाहीच नाही. माझे त्याबद्दलचे ज्ञान मर्यादित आहे. मी तुला काय मदत करणार!

लहान गावात आणि त्या काळात(म्हणजे २५ वर्षांपूर्वी हो) लोकांना असे वाटायचे कि, डॉक्टर म्हणजे तिला/त्याला सगळे आजार कमी करता येतात. त्यातल्या त्यात डॉक्टर जर महिला असेलतर तिला स्त्रियांचे आजार आणि उपचार माहित असायलाच पाहिजे. त्यामुळेच कदाचित ती माझ्याकडे आली असावी. तश्या परिस्तिथीत मी तिला असे उघडपणे सांगू पण शकत नव्हते कि मला त्यातले जास्त काही कळत नाही. त्यामुळेमी तुझ्यावर उपचार करू शकत नाही. “पण तुम्ही तर डॉक्टर आहात ना” अशी विचारणा झाली असती. असो. माझ्याकडे जमेल तसा उपचार करण्या पलीकडे दुसरा पर्याय नव्हता. माझ्या भावाचे औषधी दुकान होते आणि त्याला आयुर्वेदिक औषधांची माहिती होती, जी त्याने मला शिकवली होती. मी तिला मासिकपाळी नियमित येण्यासाठी गोळ्या दिल्या. मग त्या महिलेला आणि तिच्या नवऱ्याला ऍलोपॅथी आणि आयुर्वेदिक औषधी सुरु केली. मला माझ्या उपचारांबद्दल काडी इतकीही खात्री नव्हती.  मी तिला समुपदेशन (कौन्सेलिंग) करून तिच्या मनातून नकारात्मकता कमी केली. अश्याप्रकारे मी ती वेळ मारून नेली होती.

ती गेली आणि मी ती घटना विसरून गेले. तीन महिन्यांनी ती महिला परत आली. तिने आनंदाने जवळजवळ मला मिठीच मारली. ती चक्क प्रेग्नन्ट होती. विश्वासच बसेना. तिची सकारात्मकता, ऍलोपॅथी उपचार, आयुर्वेदिक उपचार किंवा सगळ्याच गोष्टी एकत्रित कामी आल्या असाव्यात. ती बातमी ऐकून मला खूप आनंद झाला. वाटले, बरे झाले. माझ्याकडून तिची निराशा झाली नाही.

काही दिवसांनी दुसरी महिला त्याच उपचारासाठी माझ्याकडे आली. तीला पूर्वीच्या महिलेकडून कळले होते. आता आली का पंचाईत! 🤦‍♀️पण काय करणार. मग तिला पण जवळपास तशीच ट्रीटमेंट सुरुकेली. आणि काय आश्चर्य! ते ही फळाला आले. मी ज्या गोष्टीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होते, तेवढी त्यात गुरफटून चालले होते. हळू हळू बातमी लोकांमध्ये पसरत गेली कि माझा हातगुण चांगला आहे. त्या थोड्याश्या काळात मी २२ जोडप्यावर उपचार केले आणि त्यापैकी १८ केसेस यशस्वी झाल्या. त्या १८ मध्ये माझ्या २ शालेय मैत्रिणीपण आहेत. कदाचित माझे ग्रह खूप चांगले होते. नकळत माझे नाव होत गेले आणि मला श्रेय मिळत गेले. स्त्रीरोगतज्ञ् आणि वंधत्व स्पेशालिस्टच्या उपचारासमोर माझी ट्रीटमेंट काहीच नव्हती. आता जर माझ्या डॉक्टर सहकार्यांनी विचारले कि तू नेमके काय उपचार केलेस, तर मला आता पूर्ण आठवत सुद्धा नाही. पण आनंद ह्या गोष्टीचा आहे कि त्या जोडप्यांना त्यावेळी उपचार करून त्यांच्या जीवनात आनंद मिळवून देण्याचे सत्कार्य माझ्या हातून घडत गेले होते. बस्स! माझ्यासाठी तीच शिदोरी आहे.

त्या १८ यशस्वी केसेस पैकी एका विशेष जोडप्याची कथा तुम्हाला सांगणार आहे. तो प्रसंग अजूनही मला जसाच्या तसा आठवतो. ते जोडपे जवळच्या एका खेड्यातले होते. लग्नाला ५ वर्ष झाली होती पण मूल होत नव्हते. त्यांना कोणीतरी माझे नाव सुचवले आणि ते माझ्या क्लिनिकला आले. त्यापूर्वी बरेच केसेस यशस्वी झालेले असल्यामुळे माझा थोडा आत्मविश्वास वाढला होता. त्यांची सगळी वैद्यकीय माहिती विचारून, त्या दोघांना तपासून मी ट्रीटमेंट लिहून दिली. तिला माझ्या क्लिनिकमध्ये बसवून तो मी लिहून दिलेली औषधे आणायला निघून गेला. तो येईपर्यंत त्या महिलेने साश्रू नयनांनी तिची कहाणी सांगितली आणि विनंती केली कि, कृपया मला वाचवा. तिने सांगितले कि, तिला मूल होत नाही म्हणून तिचा नवरा दुसरे लग्न करायच्या विचारातआहे. ती ढसा ढसा रडायला लागली. म्हणाली, त्याने दुसरे लग्न केले तर माझे काय होईल? मी तिला समजावून शांत केले आणि तिला आश्वासन दिले कि मला जमेल तेवढे मी प्रयत्न करेन तिच्या नवऱ्याला समजावण्याचा. थोड्या वेळाने तिचा नवरा सगळी औषधे घेऊन आला. मी त्याच्याशी बोलताना हळूच त्यांच्या दुसऱ्या लग्नाचा विषय काढला. त्याच्या बोलण्यावरून वाटले कि, तो लवकरात लवकर दुसरे लग्न करणार आहे. केवळ तिच्या आग्रहाखातर तो ट्रीटमेंट साठी आला होता. मग मी त्याला सौम्य भाषेत समजावून सांगितले कि, आता उपचार सुरु केलेत तर अजून ४-५ महिने वाट पाहावी आणि मग दुसऱ्या लग्नाचा विचार करावा. त्याला ते पटले बहुतेक. त्याने सगळी ट्रीटमेंट मी सांगितल्या प्रमाणे घ्यायचे कबूल केले आणि ते जोडपे त्यांच्या गावी निघून गेले. त्या गोष्टीला ४ महिने उलटून गेले असतील. एके दिवशी पुन्हा ते जोडपे माझ्या क्लिनिकमध्ये दाखल झाले. तिने धावत येऊन अक्षरशः माझे पाय धरले आणि माझ्या पायावर तिच्या अश्रुनी सिंचन केले. ती प्रेग्नन्ट होती आणि तिच्या मते मी तिचा संसार उध्वस्त होण्यापासून वाचवला. तो सुद्धा खुश होता. म्हणाला, तुमचे ऐकले ते चांगले केले. मी जर अविचाराने दुसरे लग्न केले असते तर हिचे काय झाले असते! डॉक्टर ताई, तुमचे मनापासून धन्यवाद!🙇

दुसरे एक जोडपे आंध्र प्रदेशातल्या काकीनाडा कडचे होते. नवरा इंजिनिअर होता आणि त्याची बदली आमच्या गावाला झाली होती. त्यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि मूल होत नव्हते. आमच्या घरी सगळ्यांना तेलुगू यायचे, त्यामुळे ते नेहमी आमच्याकडे येत जात असत. सुरुवातीला त्यांना संकोच वाटला. पण एके दिवशी हिम्मत करून ती मला हळू आवाजात म्हणाली कि मला पण ट्रीटमेंट दे ना. ती केस पण यशस्वी झाली आणि त्यांना एक गोड मुलगी झाली. त्यानंतर त्यांची बदली दुसरीकडे झाली. जाताना आठवण म्हणून त्यांनी मला एक चांदीचा डबा दिला होता जो अजूनही माझ्याकडे (इथे,अमेरिकेत) आहे.

यशस्वी झालेल्या पैकी काही जण मी इंडियाला गेले कि मला आवर्जून भेटायला येतात. मला वाटते हीच माझी कमाई!!


4 Replies to “असा वाचवला तिचा संसार!👪”

  1. हिच आहे ग खरी कमाई खूप छान काम झाले तुझ्याकडून पेशंट साठी dr हा देवच असतो

  2. खूप सुंदर लेख सावित्रा. एखाद्याच्या हाताला यश असतेच, त्यातली तू एक. Gynaecologist नसतानाही १८ जोडप्यांना अपत्यसुखाची प्राप्ती करून दिलीस….ती जोडपी तुला कधीच विसरणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *