अँझायटी डिसॉर्डर


हा लेख इंग्रजीतून वाचण्यासाठी इथे क्लिक करा: Anxiety Disorder

चिंता करणे (अँझायटी) हा माणसाचा स्वाभाविक धर्म आहे. तणावाची परिस्थिती निर्माण झाली की त्याची काळजी वाटते. योग्य प्रमाणात काळजी किंवा चिंता असणे हे फायद्याचे असते. तुमच्या मेंदूचा तणावावर प्रतिक्रिया देण्याचा आणि पुढे संभाव्य धोक्याबद्दल तुम्हाला सतर्क करण्याचा हा मार्ग आहे. चांगल्या-वाईट अनुभवांमुळेच प्रत्येकाच्या आयुष्यात चिंता येऊ लागते. पण ज्यावेळी ही चिंता तुम्हाला अधिक त्रास देऊ लागते त्यावेळी मात्र तुमच्या आरोग्यावर परिणाम करते. म्हणूनच त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. मानसिक आजाराची लक्षणे वेळीच लक्षात घ्यायला हवेत.

अँझायटी डिसॉर्डर ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये व्यक्ती अत्यंत चिंताग्रस्त बनते आणि चिंतेचे विकारांमध्ये परिवर्तन होते. त्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. झोपेच्या समस्या निर्माण होतात. कधीकधी एखाद्या घटनेमुळे हा विकार होतो तर काही वेळेस विनाकारण होऊ शकतो. जर त्याला वेळीच उपचार नाही केल्यास ती क्रोनिक कंडिशन बनू शकते.

लक्षात घ्या कि अँझायटी ही एक नॉर्मल भावना आहे आणि अँझायटी डिसॉर्डर हा एक मानसिक विकार आहे.

CDC नुसार अमेरिकेत 13 ते 18 वर्षे वयोगटातील 25% मुले आणि वय वर्ष अठरा आणि त्याहून अधिक वयोगटात 18% लोकांना अँझायटी डिसॉर्डर आहे.

अँझायटी डिसॉर्डरची कारणे:

 • अनुवंशिकता: एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबात जर कोणाला हा विकार असेल तर त्या व्यक्तीला हा विकार होण्याचा धोका जास्त असतो. ज्या पालकांना विकार आहे त्यांच्या मुलांना हा विकार होण्याची संभावना जास्त असते.
 • मेंदूतील रसायने म्हणजेच ब्रेन केमिकल्स ज्याला न्यूरोट्रान्समीटर म्हणतात. काही रसायनांची पातळी कमी झाल्यामुळे हा विकार  होतो.
 • जीवनातल्या घडामोडी: एखाद्या व्यक्तीच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी तणावपूर्ण आणि सामना करायला कठीण असू शकतात. गंभीर आजार, प्रिय व्यक्तीचा मृत्यु, हिंसा किंवा आर्थिक नुकसान अशा घटनांमुळे हा विकार उद्भवू शकतो.
 • घरातील वातावरण: ज्या कुटुंबात मोठी माणसे सतत चिंताग्रस्त आणि लहानसहान गोष्टीने भयभीत होणारे असतात, त्यांच्या घरात वाढणारी मुले अशीच भित्री बनतात.

रिस्क फॅक्टर्स:

 • चिंतेचा विकार असलेले पालक
 • घरी, शाळेत, नोकरीत किंवा नातेसंबंधात तणाव
 • कॅफीन किंवा निकोटीनचा वापर
 • काही औषधे आणि हेल्थ कंडिशन्स
 • प्यूबर्टी (पौगंडावस्था) मुळे मुलांमध्ये शारीरिक आणि भावनिक बदल होणे
 • न्यूनगंड असणे

अँझायटी डिसॉर्डरची लक्षणे:

 • भावनिक लक्षणे: आलेल्या परिस्थितीची आवश्यकतेपेक्षा जास्त भीती किंवा चिंता वाटणे
 • शारीरिक लक्षणे: छातीत धडधड होणे, वेगाने श्वास घेणे, घाम येणे, गळून गेल्यासारखे वाटणे, शरीर थरथरणे, पोटात दुखणे, डोके दुखणे आणि झोपेच्या समस्या निर्माण होणे
 • वर्तणुकीत बदल: आलेला प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करणे, कॉन्फिडन्स कमी होणे, असुरक्षिततेची भावना निर्माण होणे आणि सुरक्षितता वाटण्यासाठी काही गोष्टी सतत करत राहणे

जाणून घेऊया अँझायटी डिसॉर्डरचे प्रकार:

1. सेपरेशन अँझायटी: पालकांपासून दूर असताना खूप भीती वाटते

 • पालकांच्या सुरक्षिततेबद्दल तीव्र भीती वाटणे
 • शाळेत जाण्यास नकार देणे
 • वारंवार पोटदुखीच्या किंवा इतर शारीरिक तक्रारी
 • पालकांना अति चिटकून राहणे
 • पालकांपासून विभक्त होतेवेळी रडून गोंधळ घालणे
 • झोपेच्या समस्या आणि वाईट स्वप्ने पडणे

2. भयगंड/ फोबिया: अनेकदा एका विशिष्ट गोष्टीची, कृतीची, वस्तूची, प्रसंगाची, प्राण्याची अकारण भीती वाटत असते. या प्रकारच्या भीती वाटण्याला भयगंड किंवा फोबिया असे म्हणतात. ज्याबद्दल भीती वाटते त्यापासून पळ काढण्याची अतिरेकी आणि अवाजवी धडपड संबंधित व्यक्ती करीत असते.

 • अगोराफोबिया: उंच ठिकाणांची, बंद खोली, लिफ्ट, वाहन अशा बंद जागांची अवास्तव भीती. इमर्जन्सी आल्यास अशा ठिकाणाहून बाहेर पडणे अशक्य होईल अशी निरर्थक भीती वाटणे.

3. सोशल अँझायटी डिसॉर्डर: शाळा किंवा इतर ठिकाणी जिथे लोक असतात त्याची भीती वाटणे.

 • लोकांना भेटण्या-बोलण्याची भीती वाटणे
 • चार लोकांमध्ये जाण्याचे टाळणे
 • मोजकेच मित्र असणे
 • सिलेक्टिव्ह म्यूटीजम हा एक सोशल अँझायटी डिसॉर्डरचा प्रकार आहे ज्यामध्ये लहान मुले कुटुंबातील सदस्यांशी नॉर्मल बोलतात आणि घराबाहेर गेल्यानंतर पब्लीक प्लेसमध्ये अजिबात बोलत नाहीत.

4. जनरलाईज्ड अँझायटी डिसॉर्डर (GAD): भविष्याबद्दल अतिशय चिंता करणे आणि सतत काहीतरी वाईट घडेल अशी भीती वाटणे.

 • कुटुंब, शाळा, मित्र किंवा उपक्रमांबद्दल सतत चिंता
 • मनात सारखे नको असलेले विचार येणे
 • चुका होण्याची अवास्तव भीती वाटणे
 • आत्मविश्वास कमी होणे

5. पॅनीक डिसऑर्डर: पॅनीक अटॅक म्हणजे अचानक, तीव्र भीतीचा झटका ज्यात श्वासोच्छवास घ्यायला त्रास होतो, चक्कर येते, हृदय धडधडते, नियंत्रणाबाहेर वाटू शकते. काही वेळेस हृदयविकाराचा झटका आला आहे किंवा मी मरणार आहे अशी भीती तयार होते. सहसा पॅनीक अटॅक हे 5 ते 20 मिनिटांपर्यंत राहतात. परंतु हे काही तासांपर्यंत सुद्धा असू शकतात. जर हे अटॅक वारंवार होत असतील तर त्यांना पॅनीक डिसऑर्डर आहे असे म्हणतात. त्यामध्ये खालील लक्षणे दिसून येतात

 • खूप भीती वाटणे
 • अंग थरथरणे
 • घाम येणे
 • छातीत दुखणे
 • श्वास घेण्यास त्रास होणे
 • हृदयाची धडधड वाढणे
 • डोके दुखणे
 • पोटात दुखणे
 • चक्कर येणे

ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर (OCD) आणि पोस्टट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) हे 2013 पर्यंत अँझायटी डिसॉर्डरचे प्रकार मानायचे. आता ते नवीन श्रेणींमध्ये वर्गीकृत केले गेले आहेत.

अँझायटीकडे दुर्लक्ष करू नका. संकोच न बाळगता डॉक्टरकडे जाऊन वेळीच उपचार घ्या.

उपचारांसोबतच निरोगी जीवनशैली (हेल्दी लाइफस्टाइल) असणे खूप महत्त्वाचे असते.

 • समतोल आहार घेणे. आहारात सगळ्या प्रकारची फळे, भाज्या, कडधान्य, डाळी, नट्स इत्यादीचा समावेश करा. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा: समतोल आहार
 • वयानुसार नियमितपणे शारीरिक व्यायाम करा. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा: व्यायामाचे तंत्र
 • वयोमानानुसार आवश्यक तेवढी झोप घ्या.अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा: आरोग्यदायी झोप
 • जर तुम्ही जास्त कॉफी पिण्याचे शौकीन असाल तर प्रमाण कमी करा. तसेच सोडा आणि एनर्जी ड्रिंकचे सेवन कमी करा
 • काही रिसर्च मधून असे दिसून आले की ओमेगा थ्री फिश ओईल घेतल्यामुळे अँझायटीची रिस्क कमी होते. अधिक माहिती साठी इथे क्लिक करा: ओमेगा थ्री फिश ओईल
 • मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. नियमित योगा केल्यास त्याचा खूप फायदा होतो. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा: ब्रेन पॉवर (मानसिक आरोग्य)

पालकांसाठी टिप्स:

 1. मुलाचे म्हणणे ऐका. त्याला नेमकी कशाची चिंता वाटते हे जाणून घ्या. त्याला समजावून सांगा की एखाद्या गोष्टीची चिंता वाटणे ही एक सामान्य भावना आहे.
 2. त्याला वाटणाऱ्या चिंतेबद्दल बोलण्यास प्रोत्साहित करा.
 3. मुलाला जर एखाद्या गोष्टीची चिंता वाटत असेल तर त्याला बळजबरीने ती गोष्ट करण्यास भाग पाडू नका
 4. परिस्थितीशी सामना करण्यासाठी त्याला मदत करा. तसे केल्याने त्याच्या लक्षात येईल की परिस्थिती इतकी पण वाईट नाही आणि तो ती हाताळू शकतो.
 5. लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करत असतात. तुम्ही शांत राहून मुलाला धीर द्या. त्याला सांगा की, मला माहित आहे की हे कठीण आहे पण तू करू शकतोस.
 6. पॉझिटिव्ह सेल्फ टॉक: स्वतःशी सकारात्मकतेने बोलायला शिकवा. जसे की “मी यातून बाहेर पडू शकतो,” “मी यापूर्वी असे काहीतरी केले आहे”
 7. रिलॅक्सेशन टेक्निक शिकवा: व्यायाम, योगा, ध्यान, प्राणायाम किंवा संगीत ऐकणे ज्यामुळे मन हलके होते आणि चिंता कमी होते.
 8. नियमित झोपायची सवय लावा. झोपण्याआधी टीव्ही, मोबाईल किंवा कम्प्युटर वापरू देऊ नका. त्याची खोली आरामदायक आणि शांत असावी. नियमित झोपेमुळे मुलाला दिवसा शांत वाटू शकते.
 9. मुलाचे छोटे-छोटे यश साजरे करा. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि भीती कमी होईल.उदाहरणार्थ, तुम्ही त्याला/तिला बाहेर एका आवडत्या रेस्टॉरंटमध्ये नेऊ शकता.

मोठ्यांसाठी टिप्स:

 • तुमच्या समोर कोणतीही मोठी समस्या आली तरी देखील शांत राहायला शिका.
 • तुम्ही जितके शांत राहाल तितके त्या समस्येतून बाहेर पडायचे मार्ग सापडतील.
 • नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. एकदा नकारात्मक विचार डोक्यात आले की मन थाऱ्यावर राहत नाही. म्हणून शुल्लक गोष्टीवरून नकारात्मक विचार करणे सोडून द्या.
 • मेडिटेशन करा. तुमच्या मनातील अतिरिक्त चिंता दूर करण्यासाठी मेडिटेशनचा खूप फायदा होतो.
 • नियमित योगा केल्याने मन प्रसन्न राहील आणि चांगल्या गोष्टी सुचतील.
 • नियमित व्यायामामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते.
 • स्वतःचे मन गुंतवून ठेवा. आवडीचे छंद जोपासा. सकारात्मक पुस्तके वाचा.
 • उद्याची काळजी करण्यापेक्षा आजचा दिवस जगा.

उपचार पद्धती:  सामान्यपणे अँझायटी डिसॉर्डरला जेवढ्या गंभीरतेने घेतले गेले पाहिजे तेवढे घेतले जात नाही. लहान मुलांच्या अँझायटी कडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे तरुणांबरोबरच लहान मुलांमध्येही अँझायटीचे प्रमाण खूप वाढत आहे. वेळीच उपचार केल्यामुळे संभाव्य धोके टाळता येतात जसे की  फ्रेंडशिपमध्ये आणि नात्यांमध्ये अडचणी, आर्थिक अडचणी, न्यूनगंड तयार होणे  आणि शिक्षणामध्ये अपयश येणे. उपचारांमध्ये खालील गोष्टींचा समावेश असू शकतो: वैयक्तिक मानसोपचार, कौटुंबिक चिकित्सा (फॅमिली थेरपी), औषधे, वर्तणूक उपचार/ बिहेविअरल थेरपी आणि कौन्सिलिंग.

मानसोपचार/ सायकोथेरपी:  हेल्थ कौन्सेलरची भेट घेऊन आपल्या भावना, चिंता व्यक्त करणे. थेरपी तुम्हाला तुमच्या परिस्थितीबद्दल विचार करण्याचे नवीन मार्ग शोधण्यात मदत करू शकते जेणे करून तुम्हाला कमी चिंता वाटेल. थेरपीमध्ये आपण चिंता कमी करण्यासाठी नवीन स्किल्स देखील शिकू शकता.

 • कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (सीबीटी) : व्यक्तीला त्याचे नकारात्मक विचारचक्र, विचार पद्धती बदलायला शिकवते. तुम्हाला नकारात्मक, किंवा घाबरवणारे, विचार आणि वर्तन सकारात्मक मध्ये कसे बदलावे हे शिकवते.

मेडिसिन्स/ औषधी: नैराश्य म्हणजे डिप्रेशनवरची औषधे अँझायटीमध्ये फायदेशीर ठरू शकतात.

काही लोकांना मानसोपचार आणि औषधी अशी दुहेरी ट्रीटमेंटची गरज लागते. व्यक्तीनुसार उपचार पद्धती वेगवेगळ्या असू शकतात.


2 Replies to “अँझायटी डिसॉर्डर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *