माझी अमेरिकेतील वैद्यकीय कारकिर्दीची कथा


हा लेख इंग्रजीत वाचण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा: My Story of Becoming A Licensed Physician in USA!

आज मी माझे मनोगत सांगणार आहे. माझ्या अमेरिकेत आल्यानंतरच्या करिअर संबंधीच्या प्रवासाची गाथा सांगणार आहे. सुदैवाने मी लहानपणापासून अभ्यासात चांगली होते. दहावीला गोल्ड मेडल मिळाले होते आणि दहावी-बारावीला मेरिट मध्ये आले होते. त्यामुळे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये सहज रित्या प्रवेश मिळाला. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, औरंगाबाद मधून MBBS झाले. त्यानंतर बधिरीकरण शास्त्रात (ऍनेस्थेशिया) पदव्युत्तर झाले आणि विद्यापीठात प्रथम येऊन शैक्षणिक कारकिर्दीची सांगता केली. असे वाटले कि त्यानंतर जीवनात पुन्हा अभ्यास आणि परीक्षा देण्याची गरज पडणार नाही. आता लग्न करायचे आणि दोन मुले होऊ द्यायची आणि मग फॅमिली लाईफ आणि करिअर लाईफ व्यवस्तिथपणे सांभाळत पुढे जायचे. बरीच अमेरिकेची स्थळे ह्या कारणासाठी नाकारली कि अमेरिकेला जाऊन USMLE (युनाइटेड स्टेट्स मेडिकल लायसेन्सिंग एक्सामिनॅशन्स) द्यायला नको. पण म्हणतात ना, नशिबात असते ते चुकत नाही. नवरा सॉफ्टवेअर इंजिनीअर असल्यामुळे लग्नानंतर काही वर्षांनी आम्ही अमेरिकेला आलो. तोपर्यंत आमची फॅमिली चौकोनी झाली होती. आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी झाली होती. इथे आल्यानंतर मोठा प्रश्न होता कि आता माझ्या करिअरचं पुढे काय होणार!

अमेरिकेत जगभरातले डॉक्टर्स येतात, पण त्यांना USMLE सारख्या किचकट आणि कठीण प्रक्रिये मधून जावे लागते आणि रेसिडेन्सी करावी लागते. त्याशिवाय लायसेन्स मिळत नाही म्हणजेच प्रॅक्टिस किंवा नोकरी करता येत नाही. स्पर्धा पण खूप असते. USMLE च्या तीन स्टेप्स असतात आणि एकूण ४ परीक्षा असतात (step १, step २ CK, step २ CS आणि step ३). त्यापैकी तीन स्टेप्स ८ ते ९ तासांची कॉम्पुटरवर थेरी परीक्षा असतात आणि एक प्रॅक्टिकल परीक्षा असते ज्यात तुम्ही पेशंट कडून आजाराची लक्षणे इ. बद्दलची माहिती कशी मिळवता, त्याला कसे तपासता, त्याच्याशी कसे वागता आणि त्याचे निदान करून नोट्स कसे लिहिता ह्याचे प्रात्यक्षिक असतात. पेशंटच्या रूममध्ये विडिओ रेकॉर्डिंग सुरु असते. दिवसभरात असे १० पेशंट्स पाहायचे असतात. विडिओ रेकॉर्डिंग आणि नोट्स वरून पास/फेल ठरवतात. बरेच जण ह्या प्रॅक्टिकल टेस्ट मध्ये फेल होतात. जेवढे तुम्ही ओल्ड ग्रॅजुएट, (म्हणजे MBBS झाल्यापासूनचा काळ), तेवढी रेसिडेन्सी मिळणे कठीण! आणि मला तर चक्क १५ + वर्षे झाली होती MBBS होऊन. त्यात अमेरिकन जीवनशैली आणि दोन मुलांची जिम्मेदारी. नवरा नॉन-मेडिको असल्यामुळे माझ्या करीअर बद्दल काही मदत पण नव्हती. माझ्या मित्र मंडळींपैकीही कोणी इथे असलेले माहिती नव्हते. एकंदरीत एकटीचा असा माझा संघर्षाचा प्रवास सुरु झाला. सुरुवातीला नवऱ्याचा थोडा विरोध होता. त्याचे म्हणणे असे होते हि, इतक्या वर्षांनी, दोन्ही मुलांचे करत, घर सांभाळत त्या कठीण परीक्षा देणे आणि पास होणे अश्यक्य आहे. त्याला वाटायचे कि ही आता कमीत कमी ५-६ वर्षे ह्यात घालवणार आणि शेवटी रेसिडेन्सी काही मिळणार नाही. असे असताना त्याचा विचार तरी कशाला करावा. ज्या कोणाशी मी USMLE चा विचार बोलून दाखवला, त्या प्रत्येकानी माझा विचार मोडून काढला आणि त्यांना माहित असलेली अयशस्वी उदाहरणे सांगून मला पटवून देण्याचा प्रयत्न केला. मला कळून चुकले कि कोणाची मदत मिळणे तर दूर, साधा मानसिक आधार सुद्धा मिळणार नाही. पण मी मात्र मनाशी निर्धार केला कि एकदा USMLE च्या आखाड्यात उतरायचे आणि स्वतःला सिद्ध करून दाखवायचे. मी माझ्या नवऱ्याला सांगितले कि, जर तुमच्याकडून कोणतीही मदत मिळणार नसेल तरीही चालेल पण मला नाउमेद करू नका. माझ्या अभ्यासामुळे तुमच्या आणि मुलांच्या दैनंदिनामध्ये काहीही बदल होणार नाही. रोजचा स्वयंपाक, स्वच्छता, मुलांचा अभ्यास, त्यांचा नित्यक्रम हे सगळे नेहमीप्रमाणे सुरळीत राहील.

मग हळू हळू सगळी माहिती जमवली, स्टडी मटेरियल घेतले आणि थोडा थोडा अभ्यास सुरु केला. सुरुवातीला खूप कठीण जायचे. सकाळचा चहा-नाश्ता करून, मुलांना स्कूल बसमध्ये बसवून येऊन घरात आवराआवर करणे, लाँड्री करणे, व्हॅक्यूम करणे, लंच बनवणे आणि लंच बनवताना कानाला फोन लावून इंडियाला फोन कॉल करणे अशी सगळी कामे आटोपून मुले शाळेतून परत येईपर्यंत जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळात अभ्यास करणे असे सुरु झाले. एकदा मुले घरी आली कि मग त्यांना स्नॅक्स करून देणे, त्यांचा होमवर्क करून घेणे आणि मग त्यांना स्विमिन्ग, स्केटिंग क्लासेस साठी घेऊन जाणे. मग संध्याकाळचा चहा, त्यानंतर डिनर आणि मग बेड टाईम स्टोरीने मुलांना झोपवणे व्हायचे. वीकएंडला मी अभ्यास बाजूला ठेवून कुटुंबा सोबत वेळ घालवायचे. नेट वर एक USMLE शी निगडित साईट सापडली आणि त्यातून मी हळू हळू नवीन फ्रेंड्स बनवले. काही मैत्रिणीसोबत फोनवरून अभ्यास केला. मग तो क्षण आला. माझ्या USMLE च्या पहिल्या परीक्षेचा दिवस. सगळा अनुभव नवीन होता. याआधी मी काम्पुटर वर ८ तासांची परीक्षा दिली नव्हती. परीक्षा देऊन तर आले. आता जे होईल ते पाहू म्हणत निकालाची वाट पाहात राहिले. माझ्या नवऱ्याला खात्री होती कि मी काही पास होणार नाही. त्याने पाहिले होते कि मी कोचिंग क्लासेस किंवा रिव्ह्यू कोर्सेस न करता, घरी बसून मिळालेल्या थोडया वेळात व थोड्या काळात अभ्यास केला होता जो त्याच्या मते अपुरा होता. आणि ते खरेही होते. पण मी शाळेत असताना एकपाठी होते, कदाचित त्याचा उपयोग झाला असावा. मी चक्क चांगल्या मार्कांनी पास झाले. मग काय, पुन्हा मागे वळून पहिले नाही. एक एक परीक्षा देत राहिले, खूप चांगले मार्क्स (अगदी ९२% सुद्धा मिळाले एका स्टेप मध्ये) मिळत राहिले. अश्याप्रकारे एका वर्षात आवश्यक असलेल्या परीक्षा पास झाले. अपेक्षेपेक्षा खूप लवकर झाले होते सगळे.

माझ्याकडे इथले एकही लेटर ऑफ रेकंमेंडेशन नव्हते. मी बऱ्याच ठिकाणी इमेल्स पाठवले. सुदैवाने युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा मधल्या एका कार्डिओलॉजिस्टने मला तीन महिन्यांची ऑबसेर्व्हरशीप करायला परवानगी दिली. त्या एकुलत्या एका लेटर ऑफ रिकामेंडेशनच्या भरवशावर पुढचे पाऊल उचलले. मग रेसिडेन्सी साठी अर्ज भरणे, त्यासाठी पर्सनल स्टेटमेंट लिहिणे, इत्यादी सुरु झाले. १ सप्टेंबरला रेसिडेन्सीचा फॉर्म भरला आणि वाटले कि आता यापुढे माझ्या हातात काही नाही. सगळे नशिबावर सोडले. मी आधीच ठरवले होते कि, ह्या सगळ्या प्रक्रियेत मी तन-मन-धन ओतले होते, त्यामुळे मी दोन वेळेस रेसिडेन्सी  मॅच (MATCH) (ह्या पूर्ण प्रक्रियेला रेसिडेन्सी मॅच (MATCH) असे म्हणतात) प्रयत्न करेन आणि जर मी यशस्वी नाही झाले तर माझ्या डॉक्टर करिअरला राम राम ठोकायचे आणि मग दुसऱ्या क्षेत्राचा विचार करायचा.

मला तर वाटत होते कि पहिल्या रेसिडेन्सी मॅच (MATCH) मध्ये मला इंटरव्ह्यू येणे जवळ जवळ अशक्यच. पण मला प्रक्रिया तरी कळेल. आणि मला सुखद धक्का मिळाला. चक्क ११ व्या दिवशी मला पहिला  इंटरव्ह्यू कॉल आला. विश्वासच बसेना. तिथून सुखद धक्क्यांची जणू मालिकाच बनत गेली. एकाही  इंटरव्ह्यूची अपेक्षा नसताना पाठोपाठ मला १३  इंटरव्ह्यू आले. मग इंटरव्ह्यूची तयारी सुरु झाली. १३ पैकी २ इंटरव्ह्यू टेक्सास स्टेट मधल्या २ छोट्या युनिव्हर्सिटीतले होते, जिथे आम्हाला जायचे नव्हते, कारण तिथे माझ्या नवऱ्याला नोकरी मिळायला कठीण गेले असते. ते इंटरव्हू स्पॉट्स दुसऱ्या कोणाच्या उपयोगी पडतील असा विचार करून मीच फोन करून रद्द केले. बाकीचे ११  इंटरव्ह्यू ४ टप्प्यात यशस्वीरित्या पार पाडले. हे सगळं सप्टेंबर पासून सुरु होऊन फेब्रुवारीत संपले. आणि मार्च मधला मॅच (MATCH) चा दिवस उजाडला. मनात धाकधूक होती. सकाळच्या ११ च्या ठोक्याला मॅच (MATCH) चा निकाल आला. मी माझ्या टॉप चॉईसला मॅच झाल्याचा इमेल माझ्या इनबॉक्स मध्ये झळकला. विश्वासच बसत नव्हता. कळतच नव्हते की काय घडतेय. नवऱ्याकडून खात्री करवून घेतली कि मला खरंच हा इमेल आलेला आहे आणि मी यशस्वीरीत्या मॅच झाले आहे. मी आधी नमूद केल्याप्रमाणे सुरुवातीला नवऱ्याचा विरोध होता. जसजशी मी एक एक स्टेप यशस्वीरीत्या क्लियर करत राहिले, तसतसा त्याचा माझ्याबद्दलचा विश्वास वाढत गेला. मॅच झाल्यानंतर मात्र त्याने लगेच मला “बॉण्ड ००७” ची पदवी  बहाल केली. त्याचे म्हणणे कि मी जेम्सबॉण्ड सारखी अशक्य गोष्टीही शक्य करू शकते ! मला ती पदवी रेसिडेन्सीच्या यशाएवढीच भारी वाटली आणि अगदी मनापासून आवडली.

देवाचे खूप खूप आभार मानले आणि पुढच्या तयारीला लागले. हे सगळं इतक्या लवकर घडले होते आणि त्यासाठी आमची तयारी नव्हती. नवऱ्याला न्यूयॉर्क मध्ये नवीन जॉब शोधावा लागणार होता. त्यासाठी त्याच्या मनाची तयारी नव्हती. मुलांच्या स्कुल ऍडमिशनचे पाहायचे होते. पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडून आल्या आणि आम्ही मिनेसोटा स्टेट मधून न्यूयॉर्कला शिफ्ट झालो. जुलै पासून बालरोग शास्त्रात रेसिडेन्सीचा तप सुरु होणार होता. हो, तपच ते. ३०-३० तासांचे शिफ्ट्स, खूप अभ्यास, प्रेसेंटेशन्स, संशोधन, झोपेचे खोबरे ई. माझ्यासाठी न्यूयॉर्कची जीवनपद्धती नवीनच होती. एक एक गोष्टी अवगत करत रेसिडेन्सीचा प्रवास सुरु होता आणि मग एक नवा टप्पा आला. माझ्या सोबतचे सगळे रेसिडेंट्स फेलोशिपसाठी अर्ज करत होते. फेलोशिप म्हणजे सुपर स्पेशलायझेशन. मला वाटायचे कि ईश्वर कृपेने एवढ्या वर्षानंतरच्या अंतराने एवढी चांगली रेसिडेन्सी मिळाली, जी जवळ जवळ अशक्यच होती. आता पुन्हा आणखी तीन वर्षांची फेलोशिप करायची मनाची तयारी तर नव्हती पण मन काही स्वस्थ बसेना. वाटत होते कि फेलोशिप बद्दल थोडी माहिती काढायला काय हरकत आहे. म्हणून मी ३-४ ठिकाणी इमेल्स पाठवले. चक्क न्यू जर्सीच्या युनिव्हर्सिटीतून इंटरव्ह्यूची ऑफर आली. पूर्ण न्यू जर्सी स्टेट मध्ये असलेली एकुलती एक सीट मला मिळण्याची शक्यता होती. एकीकडे फेलोशिप करावी का नाही यावर मनात द्वंद्व सुरु होते आणि त्यात ही ऑफर आली. मग विचार केला कि अशी सुवर्णसंधी गमावणे म्हणजे मूर्खपणा ठरेल. कमीतकमी जाऊन इंटरव्ह्यू देऊन येऊ या आणि एक नवीन अनुभव घेऊ या. ऑफर स्वीकारायची किंवा नाही ते नंतर बघू. मग मी न्यू जर्सीच्या युनिव्हर्सिटीत इंटरव्ह्यूसाठी गेले आणि त्या लोकांनी लगेच सांगून टाकले कि तू आम्हाला आवडलीस आणि आम्ही तुला चाईल्ड न्यूरोलॉजी मध्ये ३ वर्षांची फेलोशिप देऊ इच्छितो. अमेरिकेला यायचे नव्हते पण यावे लागले, रेसिडेन्सी मिळणे अश्यक्य होते पण मिळाली. त्याचप्रमाणे फेलोशिप करणे हे हि विधिलिखित असावे कदाचित म्हणून हे सगळं घडून येत होते.

विचार विनिमय करून फेलोशिपची ऑफर स्वीकारली. न्यू जर्सीला येऊन ३ वर्षांची फेलोशिप यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यानंतर इथेच एका न्यूरोसायन्स इन्स्टिटयूट मध्ये प्रोफेसर म्हणून मागच्या ८ वर्षांपासून कार्यरत आहे. जेव्हा त्यांच्या मुला/मुलीला मेंदूचा आजार आहे असे कळल्यावर पालक हतबल होतात. तश्या पालकांना व्यवस्थित मार्गदर्शन करून त्यांच्या मुलांच्या मेंदूच्या रोगांचे निदान करून उपचार करून बरे करण्यात किती समाधान असते ते केल्यानंतरच अनुभवता येते. मला ही संधी मिळाली ह्याबद्दल खूप धन्यता वाटते.

जीवनाच्या ह्या टप्प्यावर मी जेव्हा मागे वळून पाहते, तेव्हा वाटते कि बरे झाले मी इतरांचे न ऐकता स्वतःवर विश्वास ठेवला आणि धडपड करत राहिले. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो ह्याची खात्री पटते. यश मिळणे हे आपल्या हातात नसते पण प्रयत्न तर करू शकतो ना. नवीन काहीतरी करायला वयाचे बंधन नसते.

मला सुरुवातीला संकोच वाटला कि मीच माझ्याबद्दल काय लिहायचे. प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष असतोच आणि त्याशिवाय यश मिळत नाही. मग माझ्या संघर्षाचे कसले कौतुक? पण माझ्या विशीतल्या मुलाने मला माझी स्टोरी लिहायला भाग पाडले असे म्हणायला हरकत नाही. त्याचे असे म्हणणे कि बरेच लोक लग्न झाले, एक-दोन मुले झालीत म्हणजे आता काय करियर होणार/करणार असा विचार करतात. त्या लोकांना दोन मुलांना सांभाळत चाळीसाव्या वर्षी अमेरिकेत रेसिडेन्सी/फेलोशिपची ही स्टोरी वाचून कदाचित प्रेरणा मिळेल. तसे झाले तर मला आनंदच आहे.

माझी गाथा तुमच्याशी शेयर करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न! 😊


35 Replies to “माझी अमेरिकेतील वैद्यकीय कारकिर्दीची कथा”

  1. Very nicely written article. Really inspiring.
    Hats off to your hard work, determination and intellectual capacity to clear all exams and getting jobs in physically and emotionally adverse situation. 👌👏👏👏👏

  2. Nice that you have written down your journey. This will definitely inspire to each and everyone who are trying to succeed in life not only in medical field but in all walks of life. Hats off to you and your family too

  3. काय कठीण, संघर्ष पूर्ण प्रवास आहे सावि. तुला वाकून नमस्कार करते..तूझ्या जीवनात सर्व काही भरभरून मिळो ..😘

  4. डिअर सावीत्रा,तुझ्या अंगच्या हुशारीने,अथक प्रयत्नाने तू असाध्य ते साध्य करवलस..निश्चितपणेgreat achievement…तुझा अभिमान वाटतो.
    संगिता U..

  5. Very good savi u were hard working ,most helpful still I remember if I have emergency ,I ca share room with savi … and I can get notes from u only as I have seen u very closely….u must be remembering my home terrace…..most enthusiastic , humble , intelligent a.svholar.saxi ..so many titles u deserve but still doing this after marriage with so many responsibilities that to in America with no maid help it's a great …. only a mother can do this …as she has strength to fight the world … great hirkani .

  6. डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट झेलणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी जोशी वर लिहिलेल्या"आनंदी गोपाळ" कादंबरीची आठवण झाली, चिकाटी, प्रतिभा आणि इच्छाशक्तीच्या जोरावर मिळविलेले यश केवळ अपूर्व असते, आपल्या कर्तृत्वास प्रणाम व खूप कौतुक !!

  7. Truly inspiring story of yours!
    Your determination, hardwork and focus made it to this level.
    Morever you achieved this in a foreign country while taking care of your family.
    It is really commendable!
    I wish you great success with happiness. We're proud of you.
    Ramesh Agrawal.

  8. Hello Savitra ! Hats off to ur determination hard work & achievement ! That too after 15 yrs gap ! A very much inspiring real story ! Feel proud of u ! Keep it up !

  9. देगलूरकर म्हणून ही तुमची झेप अभिमानाने सांगू शकतो आता कोणालाही !

  10. Story vachun far Anand zala. Mulatach tu lahanpanapasunch hushar ahes. Tujhi budhi mhanaje ajachya yugache computarach ahe. Tujya budhimulech krashna bhauji yani pudhil shikshanachi himat dakhawali hoti jo ki tu purn karun dakhwalis. Tyapramanech ata pan zidine mehant karun mothe yash sampadan kales. Dhanyawad.

  11. Gr8….अकल्पनीय वाटते…ईतक struggle कराव लागल…
    आम्हाला यातल कांही कल्पनाही नाही ताई..
    प्रचंड आत्मविश्वास, जिद्द ,इच्छाशक्ती व चिकाटी असल्याशीवाय कसे शक्य आहे…खरच gr8 👏🙏😊

    1. थँक यु, रमेश. मला स्वतःलाच माहित नव्हते कि किती किती आणि काय काय करावे लागणार होते. इथले प्रॉब्लेम्स इतके वेगळे कि तुम्हाला सांगता पण यायचे नाही. त्यात आईच्या अचानकपणे आपल्या आयुष्यातून निघून जाण्याने तर माझी पूर्ण हवाच निघून गेली होती. एवढ्या कष्टाने डॉ. होऊन भारतातून आले होते. मग स्ट्रगल करत राहिले आणि देवाच्या कृपेने यश मिळत गेले.

  12. लहरोसे डरकर नैया पार नही होती और कोशीस करणे वालो की कभी हार नही होती
    एकाग्रता/जीद्द/लक्षाचा वेध/चीकाटी /मेहणत करायची तयारी आणी हुशारी या सर्व गोष्टी तुमच्यात होत्या त्यामुळे एवढा खडतर संघर्ष करुण तुम्ही यश संपादन केल खरच तुम्ही ग्रेट आहात

  13. Congratulations for your great achievement. Nothing is possible without hard work, and you proved that. Beside that you are a very good cook and writer . All my best wishes you and your family. I am enjoying reading your articles. It’s very informative and simple. It would be my pleasure to meet you one day.

    1. That is very sweet of you, Sonali. Thank you very much and yes, I will be happy if we cross our paths one day 🙂

  14. Me father of yashodhara deepak vanpal.
    They both had come to consult for my grand
    Daughter nihera.thanks for the accurate guidance.besides I opened the link and kept
    Reading and request you to note my m.n.
    961.971.9862.and add me in your what’s up.
    Please send me as much reading material
    You can as I write under नागपूर च्या आठवणी.
    On face book as it is my hobby to write about
    Towering personalities so many readers are
    Benefitted after reading about them.
    I was impressed by your determination and
    Hard work which very few can match.
    I feel many more should read and take .aspiration from your outstanding career.
    .I wish you all the best and good luck.

    1. Thank you so much for taking the time to reach out. I added you to WhatsApp. Feel free to share any of my articles on your Facebook as all my articles are accessible to the public. Again, thank you.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *