मातृ देवोभव-पितृ देवोभव!


आई वडिलांचे आपल्या जीवनातले स्थान अढळ असते. त्यांच्याशिवाय आपल्या जीवनाला अर्थच नसतो. ह्या गोष्टीची जाणीव ते आपल्या आयुष्यातून गेल्यानंतरच जास्त कळते का? असेल कदाचित. आई नावाची व्यक्ती बाळाला जन्मण्याआधी पासून प्रेम करते आणि बाबा आपल्या मुलांवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतात ही वस्तुस्थिती आहे.

माझे बाबा, श्री गोविंद नारायण रेखावार. त्यांचे मूळचे गाव खानापूर, जे देगलूर जवळचे एक छोटेसे खेडे आहे. माझे बाबा जन्मल्यानंतर सहा महिन्यातच त्यांची आई देवाघरी गेली. त्यांच्या काकूंनी त्यांना वाढवले. बाबा एकुलते एक. त्यांना ना बहीण, ना भाऊ. खानापूरच्या घरावर तुळशीपत्र ठेवून, असलेले शेत ब्राह्मणाला दान देऊन त्यांचे वडील, श्री.नारायण रेखावार, त्यांना घेऊन देगलूरला आले. अजूनही त्या शेताला “रेखावारचे शेत’ असे म्हणतात म्हणे. असे ऐकण्यात आहे कि जवळपास २० किलो सोने विकून देगलूरला “नारायण गोविंद रेखावार” नावाने कापड दुकान सुरु केले. त्या दुकानात एका विश्वासू व्यक्तीला पार्टनरशिप दिली पण विश्वासघात झाला. खूप नुकसान झाले. बाबा दहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे देहावसान झाले. दहा वर्षाचा मुलगा, आई गेली, बाबा गेले, कोणी भावंडे नाहीत. काय आणि कसे वाटले असेल त्या कोवळ्या मनाला. लहान वयात खूप मोठी जिम्मेदारी अंगावर पडली. त्यांचे शिक्षण मोडी भाषेत ४ थ्या इय्यते पर्यंत झाले होते. अतिशय बुद्धिमान पण रागीट स्वभाव! कदाचित परिस्थितीने त्यांना तसे बनवले असेल. जमेची बाजू म्हणजे त्यांना असलेली मिडास राजासारखी दैवी देणगी! कोणताही व्यापार किंवा कोणतेही काम हाती घेतले कि त्याचे सोने व्हायचे. त्यांच्या हाताला भरपूर यश होते. त्यांनी स्वतःच्या हिमतीने व्यापार सुरु केला. आधी ‘रेखावार किराणा दुकान’ आणि नंतर ‘गोविंद नारायण रेखावार सराफा दुकान’. त्यानंतर ‘रेखावार जनरल स्टोअर्स’. तीनही दुकाने त्याकाळी गावात अतिशय प्रसिद्ध होती. व्यापार फळफळत गेला. भरपूर सुबत्ता होती. त्यांचे लग्न बेट मोगऱ्याच्या गंगाबाईशी झाले. त्यांना दोन मुले आणि दोन मुली झाल्या. त्यांची नावे अनुक्रमे: सुभद्रा, सुशीला, नारायण (आजोबांचे नाव दिले) आणि नरसिंग. सुभद्रेचे लग्न वयाच्या १२ व्या वर्षी झाले. त्यानंतर काही दिवसातच गंगाबाईना क्षयरोग झाला आणि त्यातच त्यांचा अंत झाला. बाबांवर अर्धांगिनी गेल्याचे दुःख आणि त्यात चार मुलांची जिम्मेदारी आली. त्यांना हे सगळं खूप कठीण जात होते. त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला आणि माझी आई त्यांच्या आयुष्यात आली.

कंगटी हे आंध्रप्रदेश (आत्ताचे तेलंगाणा) मधल्या मेदक जिल्ह्यातले एक खेडे गाव. तिथे सर्वसाधारण कुटुंबात माझ्या आईचा जन्म झाला. तिचे वडील, श्री दत्तय्या दारमवार, अतिशय देखणे होते आणि तिची आई, सौ. लक्ष्मीबाई दारमवार, दिसायला साधारण होती.  

त्यांचे एक कापड दुकान, एक किराणा दुकान होते आणि शेती पण होती. त्यांना चार मुले आणि तीन मुली. त्यापैकी एक मुलगी (पार्वती) तरुण वयातच वारली. 

सगळ्या भावंडात माझी आई थोरली. अगदी तिच्या वडिलांसारखी देखणी आणि सोज्वळ चेहरा घेऊन जन्माला आली होती. तिचे नाव सुलोचना असे ठेवण्यात आले होते जे खूप सार्थक होते. ती तिच्या आईला घरकामात मदत करायची आणि लहान भावंडाना सांभाळायची. हे सगळं करण्यात तिचे शाळेत जाऊन शिकायचे राहून गेले. अतिशय बुद्धिमान. शिकली असती तर नक्की काहीतरी भव्य करून दाखवले असते तिने. ती १३-१४ वर्षांची झाली आणि तिच्यासाठी स्थळे पाहणे सुरु झाले. तिच्या वडिलांना माहिती मिळाली कि, देगलूरला एका बिजवराचे स्थळ आहे, खूप श्रीमंत आणि चार मुलांचा बाप आहे. इतर नातेवाईकांनी माझ्या आजोबांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला कि तुमची मुलगी एवढी सुंदर आहे. तिला चांगले स्थळ मिळेल. कशाला बिजवराला तुमची मुलगी देता. पण आजोबांनी कोणाचेही ऐकले नाही. त्यांना वाटले कि मुलगी श्रीमंत घरी पडेल आणि सुखी होईल. असे म्हणतात ना लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. माझ्या आई-बाबांचे तसेच असावे आणि म्हणून त्यांचे एकमेकांशी लग्न झाले. तेलगू भाषा बोलणारी, न शिकलेली, एका खेड्यातली जेमतेम १३-१४ वर्षांची मुलगी तिच्या वयाच्या दुपटीपेक्षा मोठा असलेल्या, मराठी भाषिक (थोडेफार तेलुगू यायचे) व्यक्तीची पत्नी झाली. 

डोक्यावर अक्षता पडताच ती चार सावत्र मुलांची आई झाली! एक मोठा संसार आणि हजारो जीम्मेदाऱ्या अंगावर पडल्या. भाषा, पद्धती, राहणीमान शिकताना तिला अतिशय त्रास झाला. लहान लेकीला क्षयरोग झालेला होता. तिची भरपूर सेवा करायला लागायची. रोज सकाळी बदामाचा शिरा करून द्यावा लागायचा. दोन सावत्र मुले चार व सहा वर्षाची असल्यामुळे त्यांचे किती किती आणि काय काय करावे लागत असे हे वेगळे सांगायला नको. घरात नेहमी पाहुण्यांची वर्दळ. सुरुवातीला काही दिवस स्वयंपाकाला जानकीबाई नावाच्या बाई होत्या. आई तेलंगणाची असल्यामुळे भाकरी-पोळ्यांची जास्त सवय नव्हती आणि इथे तर रोजचे १०-१५ माणसे जेवायला असायची. दिवसभर नुसते रांधा वाढा उष्टी काढा! असेच दिवसामागून दिवस जात होते. मोठ्या लेकीची (सौ. सुभद्रा गंगाधरराव कोंतमवार, मदनूर) बाळंतपणे (तिला तीन मुले आणि चार मुली झाल्या), दुसऱ्या लेकीचे लग्न (सौ.सुशीला जगन्नाथराव राजकोंडवार, मुक्रमाबाद)आणि तिची बाळंतपणे (तिला पाच मुले आणि एक मुलगी) आणि मग एका एका मुलाचे लग्न करून दोन सावत्र सुना(लक्ष्मीबाई आणि शांताबाई) घरी आणल्या आणि त्यांचंही सगळं केलं. मोठ्या मुलगा-सुनेला (नारायण आणि लक्ष्मीबाई) दोन मुली आणि दोन मुले तर लहान मुलगा-सुनेला (नरसिंग आणि शांताबाई) तीन मुले झाली. अश्या प्रकारे आदर्श सावत्रआई आणि आदर्श सावत्रसासू अश्या दोन्ही भूमिका उत्तम रीतीने पार पाडल्या.


हे सगळं होत असताना तिला स्वतःची दोन मुले- मुलगा गंगाधर आणि मुलगी पुष्पा झालीत. पण नियतीला तिचे आई होण्याचे सुख पाहवले नाही. एका पाठोपाठ दोन्ही मुले दगावली. तिच्यावर दुःखाचे पहाड कोसळले. स्वतःला सावरत संसार सुरु ठेवला. त्यानंतर लवकर मूल झाले नाही. मग उपास तपास, गंडे-दोरे सुरु झाले. कुणीतरी सुचवले कि तिला सवतीने पछाडले म्हणून मूल होत नाहीये, तिला सवतीचे नाव द्या. मग तिचे नाव सुलोचना बदलून गंगाबाई असे ठेवण्यात आले. त्यानंतर मुलगा झाला. त्याचे नाव हणमानलू असे ठेवण्यात आले. नवसा सायासाने झालेला म्हणून त्याचे अतिशय लाड झाले. तो खूप खोडकर होता. आम्ही बाबांना ‘आय्या’ आणि आईला ‘माँ’ म्हणायचो. तसेच हणमानलू आण्णाला ‘पेद्दाणा’ म्हणायचो. मोठे मामा, श्री. संगमेश्वर, देगलूरला एक का दोन वर्षे शिकायला होते. त्यांची आईला खूप मदत व्हायची, विशेषतः खोडकर पेद्दाणाला सांभाळण्यासाठी. एक एक करत कृष्णा, अनुसूया, बळीराम, नर्मदा झाले. एकीकडे कुटुंब वाढत होते तर दुसरीकडे आईला वेगवेगळ्या प्रकारचे त्रास सुरु होते. जुन्या वाड्यात अर्ध्या भागात आई-बाबा आणि कुटुंब राहायचे आणि दुसऱ्या अर्ध्या भागात चुलत काका-काकू आणि त्यांचे कुटुंब राहायचे. घरोघरी मातीच्या चुली ह्या उक्ती प्रमाणे घडायचे आणि आईला मानसिक त्रास व्हायचा. ती त्या त्रासाला कंटाळली होती. तिने बाबांच्या मागे तगादा लावला कि आपण ह्या वाड्यातून दूर कुठेतरी जाऊ या. आपल्या मुलांना इथे सुख मिळणार नाही. पूर्ण आयुष्य अश्या त्रासात नको. पण बाबा ऐकत नव्हते. 
 
आईच्या पोटात मी होते आणि आठव्या महिन्यात आईने हिम्मत करून मुनगीलवारच्या घरात भाड्याने राहायला गेली. मग बाबांनी विरोध केला नाही आणि चुपचाप तेही तिच्याबरोबर निघाले. त्यानंतर माझा जन्म झाला. आई सांगायची कि त्या क्षणापासून ते बाबा जिवंत असेपर्यंतचा काळ खूप छान गेला. जीवनात समाधान आले आणि रोजच्या कटकटी पासून सुटका झाली. मग रमेश आणि लक्ष्मण जन्मले. त्या घरात त्यांना खूप मनःशांती लाभल्यामुळे पुढे ते घर त्यांनी विकत घेतले. त्या घरातल्या माझ्या अनंत आठवणी आहेत. त्या सगळ्या आठवणी लिहिणे अशक्य आहे. बाबा आम्हा तिघी बहिणींना (अनुसूया, नर्मदा, सावित्रा) अनुक्रमे अनश्या, नम्म्या आणि सत्या म्हणायचे. पेद्दाणाचे मॅट्रिक नंतर पियुसी पर्यंत शिक्षण झाले आणि तो बाबांसोबत सराफा दुकानात बसू लागला. कृष्णा आण्णा खूप शांत आणि समजूतदार होता. त्याचे बी. कॉम. झाले. त्याला बँकेच्या परीक्षा देऊन जॉब करायचा होता. पण बाबांनी त्याला किराणा दुकानात बसायला सांगितले. दोघेही अभ्यासात खूप हुशार होते. आमची आक्का, म्हणजे अनुसूया, पहिली मुलगी असल्यामुळे आई-बाबांची विशेष लाडकी होती. ती पण अभ्यासात खूप हुशार होती. पण तिला ७ वी नंतर घरी बसावे लागले कारण त्या काळात वयात आलेल्या मुलींना शाळेत पाठवत नसत. बळीदादाला अभ्यास आणि शाळा आवडायची नाही. त्याला शाळेत नेण्यासाठी बाबांनी दोन माणसेच ठेवली होती. नर्मदाताई शांत आणि कमी बोलणारी होती. पण मी मात्र अतिशय बडबडी होते. रमेश आणि लक्ष्मणला आई ‘राम-लक्ष्मण’ म्हणायची आणि सगळ्यांना ते जुळे वाटायचे.  
 
माझ्या नंतर तब्बल पाच वर्षांनी रमेश जन्मला. त्यामुळे मी ती पाच वर्षे सगळ्यांचे आकर्षण केंद्र होते. त्या घरात दुसऱ्या मजल्यावर आजूबाजूच्या खेड्यातली मुले जी शिक्षणासाठी देगलूरला यायची ते भाड्याने राहायचे. मी त्या सगळ्यांकडे जाऊन नुसती बडबड करायची. त्यांना स्वयंपाक करून देऊ का असे विचारायची. त्यांना खूप गम्मत वाटायची. आईला आक्काचा खूप आधार असायचा. ती घर आणि रमेश लक्ष्मणला सांभाळायची. आई सुगरण होती आणि तिला कामाचा खूप उरक होता. मातीच्या चुलीवरच्या आईच्या हातच्या रुचकर स्वयंपाकाला कशाचीच तोड नव्हती. शेगडीवर दूध तापवल्यावर त्यावर भाकरीसारखी जाड साय यायची. रोज एकाला ती साय मिळायची. आई, बाबा आणि आम्ही आठ भावंडे, असा दहा जणांचा साग्र-संगीत जेवण बनवून, सगळे आवरून ती मंदिरात कीर्तन भजनाला नियमितपणे जायची. ती येईपर्यंत आक्का घर सांभाळून, दुपारचा चहा, चिवडा करायची. मला आणि नर्मदा ताईला कामे वाटून दिलेली होती. मातीची चूल सारवणे, भांडी विसळून ठेवणे, घरे झाडणे इ. पण मी घरापेक्षा बाहेर गल्लीतल्या मैत्रिणीसोबत खेळण्यात अतिशय व्यस्त असायची. मग खूप ओरडा मिळायचा. आमचे सगळे नातेवाईक आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या खेड्यातलेच. त्यातल्या त्यात आम्ही देगलूरला म्हणजे मोठ्या शहरात! मी आवर्जून आई सोबत प्रत्येक नातेवाईकाच्या लग्नाला जायची. रमेश लक्ष्मण माझ्यापेक्षा लहान असून सुद्धा ते आक्काजवळ घरी राहायचे. ह्यावरून मला कंगटीची आज्जी रागवायची. म्हणायची, आलं का कुक्कुलं बाळ आईचा पदर धरून!
 
पेद्दाणाने मुंबईहुन टेप रेकॉर्डर आणले होते. त्या आधी कुणीही ते पाहिले नव्हते. सगळ्यांना खूप कुतूहल असायचे. संगमेश्वर मामा सकाळी सकाळी ‘जय जय रघुवीर समर्थ’ म्हणून संत रामदासांचे श्लोक म्हणायला सुरुवात केली कि आम्ही ते रेकॉर्ड करायचो. खूप मज्जा यायची. त्याच दरम्यान देगलूरच्या दिनशा टॉकीज मध्ये श्रीयुत सुधीर फडके आले होते. आम्ही त्यांचे संपूर्ण गीत रामायण रेकॉर्ड केले होते. मग टेप फॉरवर्ड-रिवर्स करून सगळी गीते लिहून काढली होती. तसे करताना ती पूर्ण तोंडपाठ झाली होती.

आईचा आवाज अतिशय मधुर होता. ती शिकलेली नव्हती पण एकपाठी होती. तिला वेद, पुराण, भगवदगीता आणि अध्यात्माचे भरपूर ज्ञान होते. एखादे गाणे असो कि कीर्तन असो कि प्रवचन असो, तिच्या छान लक्षात राहायचे. तिला मराठी, तेलुगू आणि हिंदी भाषेतली देवांची गाणी, देशभक्तीची गाणी, ओव्या यायच्या. एक गाणे तर असे होते कि प्रत्येक कडवे वेगवेगळ्या म्हणजे कन्नड, मराठी, तेलगू आणि हिंदी भाषेत होते. लिहिता वाचता येत नसूनही आईने बरीच गीते रचली होती. त्यामुळे तिला “बहिणाबाई” म्हणायचे. देगलूर जवळच्या शेळगाव इथल्या नरसिंह स्वामींवर तिने रचलेली आरती ह्या फोटोत पहा.

ती देवळातून येण्याची आम्ही खूप वाट पाहायचो कारण ती घरी आल्यानंतर आम्हाला त्या आख्यायिका आणि मजेशीर गोष्टी सांगायची. बाबांना पण ते ऐकायला खूप आवडायचे आणि त्यासाठी ते तीच वेळ साधून चहाला घरी यायचे. मी आधी नमूद केल्याप्रमाणे बाबा सुरुवातीला खूप रागीट होते. आई त्यांच्या आयुष्यात आल्यानंतर कालांतराने त्यांचा राग कमी कमी होत गेला. दररोज स्वयंपाक करताना पहिली छोटी भाकरी (मराठवाड्यात त्याला चिपटे असे म्हणतात) गायींसाठी, दुसरे दारासमोर येणाय्रा कुत्र्यांसाठी आणि मग तिसरी भाकरी घरातल्यांसाठी. गायीची भाकरी, म्हणजे ‘गो-ग्रास’ तिला दिल्याशिवाय बाबा अन्न ग्रहण करत नसत. कधी कधी गायीला शोधत खूप दूर जावे लागायचे आणि जेवायला उशीर व्हायचा. पण नियम म्हणजे नियम! बाबांचे जेवण पद्धतशीर असायचे. मोजकेच खायचे पण एका विशिष्ट पद्धतीत खायचे. सुरुवातीला गरमागरम तूप-भात भाजी सोबत खायचे. मग भाकरी/पोळी/पुरण पोळी/पुरी (म्हणजे त्यादिवशी मेनूत जे असेल ते) खायचे. शेवटी दूध भात/दही भात/ताक भात/कढी भात असे जे असेल ते. ते म्हणायचे कि आधी गरम भात आणि तूप खाल्यामुळे पोटात जठराग्नी तयार होतो आणि पचनास मदत होते. शेवटी दही-दूध भात खाल्ल्याने पित्ताचा त्रास होत नाही. आणि दोन भाताच्या मध्ये पिठाचे पदार्थ खावेत. 


बाबांना गुलाब-जामून आणि इतर गोड पदार्थ खूप आवडायचे. ‘कैलास भुवन/मिठाईघर’ मधून गरमागरम कलाकंद सगळ्यांसाठी घेऊन यायचे. फळे आणण्याचा खूप शौक होता. चांगली फळे दिसली कि आणायचे. मग त्याला काही मोजमाप नसायचे. कधीं कधीं तर दिवसातून ४-५ वेळेस वेगवेगळी फळे आणायचे. आई मग वाटण्या करून प्रत्येकाला फळे मिळतील ह्याची खात्री करायची. ह्या सगळ्यात आमची खूप चंगळ व्हायची. बाबांजवळ पिशवी नसेल तर चक्क धोतराच्या सोग्यात फळे आणायचे. माझ्या भावांना ते आवडायचे नाही. त्यांना वाटायचे कि आपले बाबा एवढे प्रतिष्ठित व्यक्ती असून असे धोतराच्या सोग्यात आणणे बरोबर दिसत नाही. पण आमच्या भोळ्या बाबांना त्याचे काही वाटायचे नाही. आंब्याच्या सिझन मध्ये आम्ही टेस्टर असायचो. बाबा एक आंबा आणायचे, आमच्यापैकी कोणाला तरी खायला द्यायचे. ते खाऊन मग त्यांना सांगायचो कि रस घट्ट कि पातळ, कोय खूप मोठी तर नाही ना, साल खूप जाड आहे का, कोय जास्त केसाळ आहे का इ. त्यावरून ते ठरवायचे कि ते आंबे घ्यायचे कि नाही. जर आंबा त्यांच्या पसंतीस आला आणि त्यांनी विकत घेतले कि बाकीचे लोक डोळे मिटून ते आंबे विकत घ्यायचे आणि त्या बाईची टोपली बघता बघता रिकामी व्हायची. सगळे आंबेवाले मनातून प्रार्थना करायचे कि गोविंद सावकारने आपले आंबे घ्यावेत. मग त्यांना जास्त वेळ बाजारात बसावे लागणार नाही. गावातल्या सगळ्या नातेवाईकांना, सगळ्या डॉक्टर्सना आणि इतर लोकांना आंबे पाठवायचे. आमच्या गावात सीडलेस द्राक्षे मिळत नसायचे. बाबा हैद्राबादहुन एक मोठी द्राक्षांची पेटीच मागवायचे आणि गावात सगळ्या नातेवाईकांकडे पाठवायचे. जेव्हा ते सगळ्यांसाठी पपई आणायचे आणि जर सुनबाई प्रेग्नन्ट असेल तर तिच्यासाठी पपई ऐवजी दुसरे फळ न विसरता आणायचे. मला सीताफळ खूप खूप आवडायचे आणि मी लक्ष्मण कडून केळीच्या बदल्यात सीताफळ घ्यायची. देगलूरला शनिवारचा बाजार असतो. शनिवार उजाडला कि आम्हा आठही भावंडाना करकरीत नोटांच्या गड्डीतून एक-एक कोरा रुपया मिळायचा. आमचे ते पॉकेटमनी असायचे. त्या काळातही आमचे पालक किती पुढारलेल्या विचाराचे होते, नाही का? आम्हाला वाटेल तसे खर्च करायची मुभा होती. जास्त करून आम्ही आठाण्याचा पेढा आणि आठाण्याचे काजू आणायचो. तेव्हा आठ आण्याला एक छटाक, म्हणजेच ५० ग्राम काजू यायचे.

मी सहा महिन्यांची असताना आई बाबा आणि आम्ही सगळे तिरुपती ला गेलो होतो. त्यावेळेस हैद्राबादला रिगल फोटो स्टुडिओत जाऊन काढलेला माझा फोटो अजूनही माझ्या संग्रहात आहे.

‘पाकीजा’ नावाचा हिंदी सिनेमा खूप गाजला होता आणि त्यानंतर मार्केट मध्ये पाकीजा ड्रेस आला. मी बाबांच्या खूप मागे लागून आकाशी निळ्या रंगाचा पाकीजा ड्रेस विकत घेतला. त्याची आठवण फोटो रुपी जपली आहे.

आईने सांगितलेला एक किस्सा आठवला. तेव्हा आक्का लहान होती आणि आई बाबा तिला घेऊन तिरुपतीला जात होते. आक्का आजारी पडली आणि तिचा आजार वाढत जाऊन तिने डोळे पांढरे केले. आई बाबांना वाटले कि सगळं संपलं. तिला जमिनीवर ठेवून दोघेही रडू लागले. चमत्कार झाला आणि आक्का हालचाल करू लागली. तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला.

पेद्दाणा सोने खरेदी साठी मुंबईला जायचा. एकदा तो मुंबईला गेला, सोने खरेदी केली आणि ट्रेनने नांदेडला यायला निघाला. काय झाले कोणास ठाऊक, तो ठरलेल्या वेळी पोहोचला नाही. बाबानी नांदेडला माणूस पाठवून दिला. काही थांग पत्ता लागत नव्हता. इकडे आईचे डोळे रडून रडून सुजले होते. सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. आण्णा जवळ सोने असल्यामुळे काही दगा फटका तर झाला नसेल ना अशी शंका येत होती. काही तासांनी तो पोहोचला. त्याने जे कारण सांगितले ते ऐकून सगळ्यांना हसावे कि रडावे कळत नव्हते. त्याला ट्रेनमध्ये झोप लागली आणि तो नांदेडच्या पुढे निघून गेला होता. सगळ्यांना खूप हायसे वाटले कि तो सुखरूप परत आला होता.

आमचे घर शंभर वर्षापूर्वीचे जुने मातीचे होते. तेव्हा हळू हळू आरसीसीची घरे बांधण्यात येऊ लागली होती. माझ्या भावांनी पण तसे नवीन घर बांधूया म्हणून बाबांकडे मागणी केली. बाबांचा नकार होता. आईने त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण यश मिळाले नाही. मग तिने अन्न वर्ज्य केले. तेव्हा कुठे चार दिवसांनी त्यांनी नवीन घर बांधायची परवानगी दिली पण एका अटीवर. ते म्हणाले कि घर असे बांधा कि त्यात पाच कुटुंबांना राहता येईल. पुढे मागे तुम्ही पाच भाऊ वेगळे होणार तेव्हा दुसऱ्यांकडे भाड्याने राहायची वेळ तुमच्यावर येऊ नये. तुम्हाला स्वतःचे हक्काचे घर हवे. मग सगळ्यांना उत्साह आला. निझामाबादच्या अभियंत्याकडे जाऊन घराचा नक्षा बनवून आणला. सगळें मिस्त्री पण तिथलेच. त्यांना देगलूरला एक खोली करून दिली. त्यांना सगळा किराणा द्यावा लागायचा आणि ते स्वयंपाक करून खायचे. घराच्या बांधकामाचे साहित्य मुंबईहुन यायचे. आम्ही लहान होतो आणि त्या सगळ्या गोष्टींचे खूप अप्रूप वाटायचे. घराची पायाभरणी बाबांच्या हस्ते झाली. घराचे बांधकाम दीड-एक वर्षे चालले (१९७५ ते १९७६).

तेव्हा मोठ्या शहरातल्या फ्लॅट पद्धतीबद्दल लोकांना माहित नव्हते. आणि देगलूर सारख्या छोट्या गावात शांतिकुंज नावाचे शहरी पद्धतीचे पाच फ्लॅट असलेली अतिशय दिमाखदार वास्तू तयार झाली. मोठ्या धुमधडाक्यात वास्तुशांती झाली. त्यासाठी जुक्कलचे प. पूज्य गोविंद महाराज आले होते. त्यांनी होम हवन करून खूप चांगल्या पद्धतीने सर्व विधी केले.
दसरा आला कि सगळ्या मुलांना एकाच ताग्यातले शर्ट शिवायचे. श्री. विठ्ठल काका मोतेवार यांचे ड्रेसेस चे दुकान होते. नागपंचमी जवळ यायची तेव्हा बाबा त्यांना सांगायचे कि, अरे विठू, मुंबईहून माझ्या लेकींसाठी नायलॉनचे फ्रॉक घेऊन ये. मग आम्ही विठूकाकांच्या निरोपाची चातकासारखी वाट पाहायचो. त्यांचा निरोप आला रे आला कि पळत जाऊन नवीन फ्रॉक्स घेऊन यायचो. दरवर्षी न चुकता बाबा दोन कुष्ठरोग्यांना नवीन कपडे शिवायचे आणि मगच स्वतःला नवीन कपडे घ्यायचे. बाबांसाठी दर दसऱ्याला दोन जोडी स्पेशल बूट करवून आणायचे आणि ते वर्षभर पुरायचे.
आम्हाला बाबा एका राजासारखे वाटायचे. डोक्यावर गडद गुलाबी रंगाचा रेशमी फेटा, कानात भिकबाळी, पांढरा सदरा, सदऱ्याला चांदीची बटणे, धोतर, हातात पंच धातूची अंगठी, गळ्यात सोन्यात मढवलेली रुद्राक्षाची माळ, कपाळावर अष्टगंधाचा टिळा, पायात राजेशाही बूट आणि तेजस्वी चेहरा! त्यांची अंगकाठी कृश होती आणि चालण्यात तरुणाईला मागे टाकायचे. दसऱ्याला त्यांना सोने देऊन आशीर्वाद घेण्यासाठी जवळपास पूर्ण गाव यायचे. प्रत्येक मोठ्या सणाला तिन्ही दुकानातले मुनीम आणि नोकर चाकर आमच्या घरी जेवायचे. त्यामुळे सणा वाराला आईला भरपूर काम असायचे. तिचे काम खूप नीटनेटके असायचे.
 
आंबाडा पिन

आई सोनेरी काठा पदराची नऊवारी साडी नेसून कानात बुगड्या, मोत्याच्या वेली, आंबाड्यावर सोन्याचे फुल, सोन्याचा अर्धचंद्राकृती गजरा (आंबाडा पिन), नाकात मोत्याची नथ, गळ्यात मोहनमाळ, एकदाणी, चंद्रहार, हातात पाटल्या-बांगड्या-तोडे, अंगठ्या, मीनाकारी चे बाजूबंद, पायात मोठे पैंजण आणि जोडवे असे घालायची. देवळात सगळ्या बायका एकमेकींना कुंकू लावायचे. त्यामुळे देवीच्या मळवटा सारखे दिसायचे. देवळातून घरी येताना तिचे रूप लक्ष्मी सारखे दिसायचे. काही जणांनी मला सांगितले कि आईचे ते तेजस्वी रूप पाहण्यासाठी ते आवर्जून घरासमोर थांबायचे म्हणे. आई बाबा दोघेही अतिशय दानशूर, धार्मिक आणि त्यांना कशाचाही गर्व नव्हता. ती दोघेही आपापल्या परीने सगळ्यांना मदत करायचे. बाबा सगळ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करायचे. त्यामुळे हळू हळू आमच्या दुकानातली नोकर मंडळी स्वतःचे दुकान सुरु करू शकले.

बाबांना सख्खे भाऊ बहीण नव्हते पण मानलेल्या बहिणी, नरसूबाई काशटवार आणि गंगुबाई दारमवार आणि बऱ्याच भाच्या होत्या. आई मग सगळ्यांना संक्रांत आणि पंचमीला खण-वाण पाठवायची. उन्हाळा आला कि भरपूर लोणचे बनवायची. उभ्या मोठ्या बरण्या होत्या. ठरल्याप्रमाणे दरवर्षी कित्येक लोकांना लोणचे पोहोचायचे. बरेच लोक येऊन लोणचे मागून न्यायचे. आई त्यांना लोणचे द्रोणात द्यायची. 

श्रावण महिना तर अतिशय व्यस्त असायचा. रविवारी भरपूर बेल आणि फुले आमच्या घरी यायचे आणि मग ते सगळ्यांना वाटण्यात पूर्ण दिवस जायचा. लोक अगदी हक्काने यायचे. आई बाबा म्हणजे कल्पवृक्षासारखे होते. हवे ते लोकांना मिळायचे. गणेश चतुर्थीला बाबा एक लाकडी पाट घेऊन कुंभाराकडे जायचे. कुंभार चांगल्या मातीची बाप्पाची मूर्ती, छोटा उंदीर बनवून पाटावर ठेवून द्यायचा. घरी आणल्यानंतर आम्ही चुना, गेरू आणि सोनेरी बेगड पेपर ने सजवायचे. मी त्यात पुढाकार घ्यायची. बाप्पाच्या बेंबीत एक बंदा रुपया ठेवायचे. आई पहाटे उठून ओल्या शेवयाची गुळातली खीर आणि उंडरालू (ज्वारीच्या पिठाचे उकडलेले गोळे) बनवायची आणि गणपती बसवून झाले कि सगळ्यांना ते द्यायची. त्यासाठी घरासमोर रांग लागायची. आमच्याकडे दीड दिवसाचा गणपती असायचा. विसर्जनापूर्वी बेंबीला लावलेला एक रुपयाचा बंदा लेकीला मिळायचा. दोन्ही बहिणींची लग्न झाल्यानंतर ते मला मिळत गेलं. बैल पोळ्याला पण तसेच करायचे. पाटावर कुंभार पाच बैल, त्यांना पाणी पिण्यासाठी छोटे पात्र आणि एक गुराखी बनवून द्यायचा. मग मी त्यांना रंगवायची आणि सजवायची. आई पिठाचे छोटे छोटे रिंग बनवून तळायची आणि ते बैलांच्या शिंगाना अडकवायची. 

दिवाळीची मज्जा तर सांगायलाच नको. त्याचा थाट तर लग्नासारखा असायचा. (“दिवाळीचा वसा:भारतातून अमेरिकेपर्यंत!” हा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.)

देगलूरला शिवाजी पार्कला मेहेन्दीच्या झाडाचे कुंपण असायचे. नागपंचमी जवळ आली कि आम्ही मेहेंदीची पाने खुडून आणायचो. मग आई ती पाने उखळात कुटून तो लगदा आमच्या तळहातावर ठेवून आमची मूठ कपड्याने बांधायची. रात्रभर आम्ही तसेच झोपायचो. सकाळी उठून कपडा सोडला कि मेहेंदीने रंगलेले तळहात दिसायचे. नंतर नंतर मेहेंदीची पावडर मिळायला लागली. प्रत्येक सणांचा भरपूर आनंद लुटला आहे.

 
आई बाबांनी आम्हा सगळ्या भावंडांना देवादिकांची नावे ठेवली होती जेणेकरून सतत त्यांच्या तोंडी देवाचे नाव असेल. आई म्हणायची कि आमच्या घरी पाच पांडवच आहेत. तिला आपली मुले गुणी असल्याचा अभिमान होता. देवळात वट पौर्णिमेचा पाच दिवसांचा कार्यक्रम असायचा आणि आई नियमितपणे जायची. माझा जन्म त्या पाच दिवसात (वट पौर्णिमेच्या दोन दिवस आधी) झाल्यामुळे माझे नाव सावित्रा ठेवण्यात आले. एक मात्र खरे कि बाबा तरी थोडेफार आमच्यावर रागवायचे, पण आईने कधी एक चापट सुद्धा न मारता आणि न रागावता आठ मुलांना वाढवले. किती ती सहनशीलता!
 
आईला सारखे वाटायचे कि थोडे थोडे सोने आणि दागिने जमा करायला हवेत कारण एक एक करत पाच सुना येतील. तेव्हा त्यांच्या अंगावर घालण्यासाठी घराण्याला साजेसे दागिने असावेत. पण बाबा म्हणायचे कि सगळं आपलंच आहे. काय घाई आहे दागिने जमा करायची. पण आई हळू हळू पैसे बाजूला काढून सोने जमा करत राहिली. हौसेने तिने सगळ्या सुनांना भरपूर दागिने दिले. तिच्या दूरदृष्टीला सलाम!

त्या काळात हुंडा घेणे प्रतिष्ठेचे लक्षण समजायचे. सगळे म्हणायचे कि तुम्ही श्रीमंत आहात आणि तुम्हाला भरपूर हुंडा मिळेल. पण माझ्या बाबांचे विचार खूप वेगळे होते. ते म्हणायचे कि आम्हाला हुंडा वगैरे काही नको. माझ्या मुलांना मुलगी आवडली कि झालं. सर्वसाधारण घरातल्या मुली सुना होऊन आमच्या घरी आल्या तर सुखी होतील. चार दागिने घालतील. त्या उपर काहीही नको. देवाच्या कृपेने आम्हाला पैशांची कमी नाही. त्यांनी चांगला संसार करून सुखी झाले म्हणजे मिळालं. 
आम्ही आठ भावंडे असल्यामुळे आई बाबांना वाटायचे कि दोन दोन लग्न एका मांडवात धुमधडाक्यात करू. त्याप्रमाणे तीन वेळेस तसे झालेही. मोठा भाऊ आणि आक्काचे लग्न १९७८ ला एका मांडवात होऊन अनुसूया सौ.अनुपमा अनिल पत्तेवार बनून उदगीरला गेली आणि सौ. सत्यवती पहिली सून बनून रेखावार परिवाराची सदस्य झाली. त्यानंतर १९८२ ला नर्मदा ताईचे लग्न होऊन ती सौ. निता अनिल मुखेडकर बनून नांदेडला गेली. त्यानंतर दोन वर्षांनी, म्हणजे १९८४ मध्ये कृष्णा आण्णा आणि बळीदादाचे एका मांडवात लग्न झाले आणि भैसाहून सौ.उषा(कृष्णा रेखावार)आणि नांदेडहुन सौ. संगीता (बळीराम रेखावार)आमच्या परिवारात सामील झाल्या. उदगीरच्या आक्काची मुलगी, आरती हि पहिली नातवंड. तिच्या जन्मानंतर काढलेला हा पाच पिढ्यांचा फोटो. त्यानंतर आजी आणि पणजी गेल्या.
माझी मावशी जूक्कलची. जूक्कल हे तेलंगाणा मधले देगलूर जवळचे एक छोटे गाव. हि घटना १९८४ ची. तिच्या सासू-सासऱ्यानी त्यांच्या परिवारासोबत काशी यात्रा करायची ठरवले. मावशीने देगलूरला येऊन बाबांना खूप आग्रह करून त्या यात्रेला यायचे कबूल करवून घेतले. मग आई, बाबा, मी, बळीदादा, रमेश आणि लक्ष्मण असे सहा मेम्बर काशी यात्रेला जायचे ठरले. तब्बल २५ दिवसांची यात्रा, त्यात ४ ज्योतिर्लिंग, एक धाम, ५-६ स्टेट्स, ताजमहाल आणि बरीच प्रेक्षणीय स्थळे होती. बळीदादा मेडिकल शॉप मध्ये बसायचा. त्यामुळे त्याला औषधांबद्दल माहिती होती. त्याने औषध-गोळ्यांचा एक बॉक्सच सोबत घेतला होता. कोणाला काही झाले कि त्याच्याकडे धाव घ्यायचे. तो त्या यात्रेत आमच्या सगळ्यांचा डॉक्टर होता आणि त्याने ती जिम्मेदारी खूप छान रीतीने पार पाडली. आमचा पूर्ण ताफा दिल्लीला जाऊन भारताच्या भूतपूर्व प्रधानमंत्री, श्रीमती इंदिरा गांधीना भेटला.

एक ना अनेक असे किस्से आहेत. बेट मोगरा हे देगलूर जवळ असलेले एक छोटेसे गाव. तिथल्या एका गृहस्थांनी बाबांकडे येऊन एक विनंती केली. ते म्हणाले कि त्यांचा मुलगा खूप लहान आहे आणि त्यांच्या पत्नीला कसलातरी आजार आहे. त्यांची इच्छा होती कि त्यांचा ऐवज त्यांचा मुलगा हाताशी येईपर्यंत बाबांजवळ ठेवायचे. त्यांनी तिजोरीत त्यांचे सोने-नाणे एका छोट्या पेटीत कुलूप लावून ठेवले आणि त्यानंतर ते जोडपे यात्रेला निघाले. काही वर्षांनी एका नंतर एक ते देवाघरी निघून गेले. मुलगा मोठा झाला. बाबांना त्या घडामोडीची काही कल्पना नव्हती. बऱ्याच वर्षांनी जेव्हा त्यांच्या लक्षात आले, त्यांनी एक माणूस पाठवून चौकशी करवली आणि त्यांच्या मुलाशी संपर्क साधला. त्या मुलाला त्या पेटी बद्दल काहीही माहित नव्हते. त्याला बोलावून घेऊन बाबांनी त्याला त्याची ठेव परत दिली. किती प्रामाणिकपणा! तो मुलगा पुढे खूप यशस्वी व्यापारी झाला आणि तो त्याचे सगळे श्रेय माझ्या बाबांना देतो. असे एकाच नव्हे अनेकांच्या बाबतीत घडले.


एक ओळखीच्या स्वयंपाकीण मावशी होत्या. एकदा बोलता बोलता त्या सहज आईला म्हणाल्या कि तुमच्या अंगावरची साडी किती छान आहे. झालं. आईने त्यांना दुसऱ्या दिवशी येऊन भेटायला सांगितलं. त्यांना वाटले कि काहीतरी काम असेल. दुसऱ्या दिवशी त्या आल्या. आईने ती साडी धुवून, घडी करून त्यांच्या हातावर ठेवली होती. त्या अतिशय भारावून गेल्या कि काही निमित्त नसताना फक्त साडी छान आहे म्हंटल्यावर चक्क तिने ती साडी त्यांना देऊन टाकली होती.

आई बाबा खूप धार्मिक असल्यामुळे गावात कोणतेही महाराज, गुरु आले कि लोक त्यांना सरळ आमच्या घरी घेऊन यायचे. अनेक संतांचे पाय आमच्या घराला लागले आहेत. देगलूरचे वारकरी सांप्रदायाचे गुंडा महाराज मठ हे एक खूप प्रतिष्ठेचे अध्यात्मिक शक्तीपीठ. तिथल्या सगळ्यांशी बाबांचे खूप जवळचे संबंध होते. प. पु. धुंडा महाराजांशी त्यांच्या खूप गप्पा रंगायच्या. आमच्या शेतात हुरडा तयार झाला कि सगळ्यात आधी मठातल्या मंडळींना शेतात घेऊन जायचे आणि मग बाकीच्या लोकांना हुरडा खायला मिळायचा. माझे बाबा लहान असताना त्यांच्या काकांसोबत मठात जायचे. तेव्हा प. पु.महिपती महाराज, जे धुंडा महाराजांचे काका होते, बाबांचे खूप लाड करत असत. बाबांना महिपती महाराजांविषयी अतिशय आदर होता आणि जीवनातल्या प्रत्येक चांगल्या-वाईट घटनेनंतर नदीकाठी असलेल्या महिपती महाराजांच्या समाधीला भेट द्यायचे. आत्ताही रेखावार परिवार न चुकता त्या समाधीला भेट देत असतो. ब्रह्माकुमारी संतोष बहन जेव्हा पहिल्यांदा बिदरहुन देगलूरला त्यांचे केंद्र सुरु करायला आल्या तेव्हा प्रथम आमच्याचकडे आल्या होत्या. त्या आमच्या घराला ‘माहेर’ म्हणायच्या. आमच्यापैकी आई, बाबा, मी आणि बळीदादा त्यांच्याकडे नियमित जायचो. मी आणि आई माऊंट अबूला त्यांच्या मुख्य केंद्राला भेट देऊन आलो होतो. गोरठ्याचे परम पूज्य अनंतमहाराज आठवले सुद्धा आमच्याकडे आले होते. कालांतराने देगलूरला परम पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याय सुरु झाले. त्याचा पाया सुद्धा आमच्याकडेच रोवला गेला होता. आई बाबांच्या पुण्याई मुळे प. पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांनी आपल्या दोन्ही भेटीत आमच्याकडेच वास्तव्य केले होते. त्यामुळे सगळा स्वाध्याय परिवार आमच्या घराला एका मंदिरासारखे मानायचे. ते घरी आल्यानंतर आईने चक्क त्यांची दृष्ट काढली. तेव्हा ते म्हणाले कि त्यांना त्यांच्या आईची आठवण झाली. 

मी दहावीला बोर्डात चौथी आणि जिल्ह्यात पहिली येऊन सुवर्णपदक मिळवले होते. त्यामुळे सगळ्यांचे म्हणणे होते कि मी औरंगाबादला जाऊन ११ वी-१२ वी करावी. बाबा आधी नाही म्हणत होते पण पुन्हा त्यांनी परवानगी दिली. पण देगलूर कॉलेजच्या प्राध्यापकांनी घरी येऊन विनंती केली कि तिला आमच्या कॉलेजला शिकू द्या म्हणजे आमचे नाव होईल. आम्ही हवी ती मदत करू तिला. मग देगलूर कॉलेजलाच प्रवेश घेऊन १२ वी पूर्ण केली आणि मेरिटने पास झाले. मला बायोलॉजी तर आवडायचेच पण गणिताकडे जास्त ओढ होती. मेडिकल साठी ९६% आणि अभियांत्रिकीसाठी ९७% मार्क होते. माझी इच्छा इंजिनिअर व्हायची होती. त्याकाळात इंजिनीरिंग क्षेत्रात सिव्हिल इंजिनीरिंगला महत्व होते. पण बाबांनी मला स्पष्ट सांगितले कि करायचे असेल तर मेडिकल कर. तू मुलगी आहेस. इंजिनिअर होऊन डोक्यावर हॅट घालून साईटला जाणे बरे दिसणार नाही. मग डॉक्टर व्हायचे ठरले. देगलूरहुन मुंबई खूप दूर. त्यापेक्षा औरंगाबाद थोडे जवळ, म्हणून तिथे ऍडमिशन घ्यायचे ठरले आणि घेतले पण.

एम.बी.बी.एस.च्या पहिल्या वर्षीची परीक्षा देऊन सुट्ट्यात देगलूरला आले. काही आठवड्यानी परीक्षेचा निकाल लागला (डिसेम्बर १९८५) आणि मी चांगल्या मार्कानी पास झाले. बाबानी पेढे वाटले. मी म्हणाले कि पहिल्या वर्षी पास होण्यात कसले कौतुक. पण बाबा म्हणाले कि तेवढ्या दूर जाऊन नवीन क्षेत्रात सुद्धा छान मार्क मिळवलेस म्हणून पेढे आणले. त्यानंतर काही दिवसांनी माझी औरंगाबादला परत जायची वेळ आली.

माझी बॅग भरून झाली आणि दुसऱ्या दिवशी निघणार कि आदल्या दिवशी बाबांची तब्येत खराब झाली. थंड घाम फुटून उलट्या सुरु झाल्या. तेव्हा देगलूरला फक्त एकच एम.बी.बी.एस. डॉक्टर होते. त्यांनी बाबाना तपासले आणि सांगितले कि तो हार्ट अटॅक होता पण आता धोका टळला आहे. बातमी कळताच पूर्ण गाव त्यांना भेटायला आले होते. पलंगावर बसून हसत सगळ्यांशी बोलले. दुसऱ्या दिवशी मला म्हणाले कि, बेटा, आता माझी तब्येत ठीक आहे आणि तू औरंगाबादला जा. नाहीतर तुझे क्लासेस बुडतील. त्यानंतर थोड्याच वेळात पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्यावर उपचार सुरु झाले. त्यांचे ब्लड प्रेशर कमी झाले होते आणि ते वर येतच नव्हते. त्यासाठी ‘डोपामिन’ नावाचे इंजेक्शन हवे होते. पण ते देगलूरला उपलब्ध नव्हते. नर्मदाताई नांदेडला होती. तिला निरोप गेल्यावर ती आणि भाऊजी नांदेड हुन डोपामिन इंजेक्शन घेऊन बाबांना भेटायला देगलूरला आले. बाबांच्या तब्येतीत सुधार होत नव्हता आणि त्यांना हैद्राबादला घेऊन जायचे ठरले. ऍम्ब्युलन्स दारासमोर तयार होती पण बाबांचे ब्लड प्रेशर काही केल्या वर येत नव्हते आणि एका नंतर एक असे दोन अटॅक आले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. आक्का तिच्या सासरी होती. बाबा जाण्याच्या चार दिवस आधी तिला एक स्वप्न पडले. स्वप्नात बाबा योगेश्वर भगवानच्या खांद्यावर बसून दही खात होते. दूरच्या प्रवासाला जाताना हातावर दही देतात ना. तिच्या मनाला रुख रुख लागली. आणि तिला चार दिवसात बाबा गेल्याची बातमी आली. आमच्या कुटुंबावर भले मोठे संकट कोसळले. आईच्या खांद्यावर संसाराची जिम्मेदारी टाकून बाबा देवाघरी निघून गेले. सगळ्या वर्तमान पत्रात बातमी आली. त्यांच्या अंत्यविधीला मोठा जनसागर लोटला होता. बाबांनी त्यांच्या आयुष्यात हजारो लोकांना मदत आणि मार्गदर्शन केले होते, सढळ हाताने दान धर्म केला होता. ती सगळी मंडळी धाय मोकलून रडत होती. त्यांचा राजा त्यांना सोडून गेला होता. आमच्या परिवारासाठी चक्क श्री.प पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांनी सांत्वनपत्र पाठवले होते. ब्रह्माकुमारींनी योग केला होता.

बाबांच्या माघारी आईवर मी आणि माझ्या दोन लहान भावांच्या शिक्षणाची आणि लग्नाची जबाबदारी होती. कृष्णा आण्णाने वडिलांची जागा घेतली आणि आमचे शिक्षण आणि इतर गोष्टीची काळजी घेतली. त्या काळात देगलूरला जास्त सोयी नव्हत्या. मग आण्णा माझ्यासाठी नांदेड आणि पुण्याहून आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य आणून द्यायचा आणि माझ्या अभ्यासाकडे जातीने लक्ष द्यायचा. माझ्या डॉक्टर होण्यात त्याचा खूप मोठा वाटा आहे. 


आईची नातवंडे: रूपा, योगेश, राकेश (हणमानलू-सत्यवतीची मुलें), पियुष,ऋता (कृष्णा-उषाची मुलें), आरती, अभिजीत (अनुपमा-अनिलची मुलें), संकेत (बळीराम-संगीताचा मुलगा), अंकुश, अनुप (निता-अनिलची मुलें). १९९४ ला माझे आणि लक्ष्मणचे एकाच मांडवात लग्न झाले. मी सौ.सावित्रा मधुसूदन बंडारी झाले आणि नांदेडची संध्या सौ. संध्या लक्ष्मण रेखावार झाली. मला महिंद्रा (चिंटू) आणि मनीषा (चिक्की)  झालीत आणि लक्ष्मण-संध्याला सोनल आणि तेजस. त्यानंतर रमेश एम.बी.बी.एस. पूर्ण करून १९९८ मधे बोहल्यावर चढला आणि पानगावची संगीता हि सौ.गीता रमेश रेखावार होऊन देगलूरला आली. पुढे त्यांना गार्गी झाली.

आई सुनांना लेकीसारखेच वागवायची. कधी सुनांना धाक नाही कि कशाचे बंधन नाही. वरून भरपूर कोड कौतुक. ती खूप हौशी होती. तिला सुनांचे सगळे सण साजरे करणे, दाग-दागिन्यांनी मढवने, त्यांचे डोहाळजेवण करणे, बाळंतपणं करणे, नातवंडांचे बारसे आणि कौतुक करणे इ. खूप आवडायचे. सुनांच्या चांगल्या कामाला ती प्रोत्साहन द्यायची. जेव्हा सून स्वाध्यायच्या परीक्षेसाठी मैत्रिणी सोबत अभ्यास करत असेल तर ती त्यांना दूध आणि केळी नेऊन द्यायची. म्हणायची कि तू व्यवस्तिथ अभ्यास कर. कामाची काळजी करू नकोस. त्यांच्या मैत्रिणीला खूप कौतुक वाटायचे कारण असे दृश्य दुर्मिळ असायचे. माझ्या स्वतःच्या, माझ्या बहिणी, नातेवाईक, मैत्रिणी आणि इतर लोकांच्या अनुभवावरून पाहता वाटायचे कि खरंच, माझ्या आईच्या सुना खूप भाग्यवान. आई सगळ्यांची दृष्ट काढायची. मुली, सुना, मुले, नातवंडे असे सगळ्यांची. कधी भाकरीने, कधी मिठाने तर कधी तिच्या पदराने. त्यात काय जादू असायची कोणास ठाऊक पण लगेच छान वाटायचे. 

मी औरंगाबादला शिकायला असताना जेव्हा सुट्ट्यात घरी यायची तेव्हा खूप धमाल यायची. बऱ्याचदा दोघी बहिणी मला भेटायला यायच्या. लहान दोन भावांचे लग्न झालेले नव्हते. तीन वहिनी, आम्ही तिघी बहिणी आणि बाकीचे मिळून खूप एन्जॉय करायचो. वेगवेगळ्या डिशेश बनवून खाणे, सिनेमे पाहणे, गच्चीवर अंताक्षरी खेळणे, अंगत-पंगत करणे, गप्पा टप्पा, कुठेतरी पिकनिकला जाणे, कधी शेतात जाऊन डब्बा पार्टी करणे, पत्ते खेळणे, नऊवारी नेसून फोटोशूट करणे, मिर्झापूरला जाऊन येणे असे एक ना अनेक गोष्टी करायचो. आमचेच कुटुंब एवढे मोठे होते कि आम्हाला दुसऱ्यांची कंपनी लागायचीच नाही. मी औरंगाबादला केक, आईसक्रीम, बांधणी प्रिंट आणि ब्यूटिशिअन चे क्लासेस केले होते. मग देगलूरला येऊन त्याचे प्रयोग करणे आणि शिकवणे सुरु असायचे. ते सोनेरी दिवस कधीच विसरू शकत नाही. 

आमच्या घरी कोणताही कार्यक्रम असो, अंधशाळा आणि अपंगशाळेतल्या विद्यार्थ्यांना घरी जेवायला निमंत्रण असायचे किंवा फळे-मिठाई चे बॉक्सेस त्यांच्याकडे पाठवायचे. त्या संस्थांना भरपूर डोनेशन पण द्यायचे. एक दोन वेळेस त्या सगळ्यांना नवीन कपडे शिवून दिले. ते हि आईला त्यांच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणी म्हणून बोलवायचे आणि तिच्या हस्ते बक्षीस वाटप करायचे.

आईला तिचे सुना-नातवंडांनी भरलेले गोकुळ खूप आवडायचे. पण ते सुख जास्त दिवस टिकले नाही. कधी न कधी ते होणारच होते. सगळे भाऊ वाटणी करून वेगळे झाले होते. वेगळे होण्यात भावांचा काही दोष नव्हता. त्यांचा परिवार वाढत चालला होता आणि प्रत्येकाला आपापल्या कुटुंबाची जिम्मेदारी आणि काळजी होती. माझे लग्न होऊन मी मुंबईला गेले आणि पहिल्यांदा माहेरवाशीण म्हणून देगलूरला आले तर आमच्या गोकूळाचे पाच तुकडे झाले होते. मी ते पाच तुकडे जोडण्याचा आणि माझे माहेर त्यात शोधण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर आई खचत गेली. तिला वाटायचे कि आता माझे काही राहिले नाही. माझी कोणाच्या संसारात लुडबुड नको. एवढा संघर्षमय प्रवास झाल्यामुळे असेल कदाचित पण ती वरचेवर जास्तच हळवी होत गेली. छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घ्यायची आणि खूप चिंता करायची. 

तिची सगळी नातवंडं तिच्या सुरस गोष्टींत रमून जायचे आणि त्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगायचा आग्रह करायचे. मी अमेरिकेला येण्याआधी काही वर्षे मुलांसोबत तिच्याकडे राहिले होते. तिने माझ्या मुलांना देवाची गाणी आणि श्लोक शिकवले आणि खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या. तेवढाच काय तो मला आणि माझ्या मुलांना तिचा शेवटचा सहवास. नियतीनेच तशी व्यवस्था केली असावी. मी अमेरिकेला आल्यानंतर जेव्हा माझी ३ वर्षांची मुलगी फोन वर बोबड्या बोलात तिला ‘दुर्गे दुर्गट भारी’ म्हणून दाखवायची, तिला अतिशय आनंद व्हायचा. म्हणायची बेटा, असेच लक्षात ठेव. विसरू नकोस. 

इंडियात असताना आईची सगळी गाणी रेकॉर्ड करून आणली होती. अमेरिकेहून त्या गाण्यांचे कॅसेटस (‘स्वरगंगा’ असे नाव दिले होते) बनवून सगळ्या भावंडाना दिले होते.

भावा-बहिणींच्या निःस्वार्थ प्रेमाचे उदाहरण म्हणजे माझी आई आणि तिची भावंडे. तिला तिच्या माहेरी खूप आदर आणि प्रेम मिळायचे. म्हणूनच त्या वयातही तिला माहेरची ओढ असायची. तिने प्राण सुध्दा तिच्या लाडक्या लहान भावाच्या घरी सोडला. असे म्हणतात कि माहेरी किंवा काशीत प्राण गेला तर त्यांना स्वर्ग मिळतो. अधिक मास सुरु होता, सिंहस्थ होते आणि लीप वर्षाचा २९ फेब्रुवारीचा दिवस होता तो. पहाटे पाचला तिच्या हृदयाची धडधड वाढली आणि छातीत थोडी वेदना सुरु झाली. मामा डॉक्टरला घेऊन येण्यासाठी निघाले. त्यांचा एक पाय दाराच्या आत आणि दुसरे बाहेर आणि इकडे देवाचे नामःस्मरण करत आईने प्राण सोडला. तिने पाच मिनिटे सुध्दा वेळ दिला नाही. सगळा खेळ खलास झाला. ती आम्हाला पोरके करून निघून गेली. आमचे माहेर हरवले. सगळे भाऊ आणि वहिनी खूप प्रेम करतात पण आई शिवाय माहेर अपूर्ण असते ना. 

माझी आई गेल्यानंतर नर्मदाताई (लग्नानंतरची सौ.नीता मुखेडकर)ने आईवर सुंदर लेख लिहिला होता. तो लेख सकाळ वर्तमानपत्रात प्रकाशित झाला होता.

प्रिय आई-बाबा, तुम्ही मला जन्म दिलात, खूप चांगले संस्कार केलेत आणि माझे जीवन घडवलात. तुम्ही आम्हाला शिकवलात कि कशाचा हि गर्व करू नये, सगळ्यांना मदत करावी, उजव्या हाताने केलेले दान डाव्या हाताला सुद्धा कळू नये, अन्न वाया घालू नये, सगळ्यांशी प्रेमाने वागावे, नेहमी सत्य बोलावे, चांगल्या मार्गावर चालावे, नेहमी जमिनीवर पाय असावेत, नाती सांभाळावी आणि गरीब-श्रीमंत असा भेदभाव करू नये. मी तुमच्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न करत राहीन. एकही दिवस असा जात नाही कि तुमची आठवण झाली नाही. ज्यांचे आई-वडील हयात आहेत अश्या भाग्यवान लोकांचा खूप हेवा वाटतो आणि स्वतःबद्दल खंत वाटते. मी देवाजवळ एवढीच प्रार्थना करते कि पुढच्या जन्मी सुध्दा तुम्हीच माझे जन्मदाते व्हा! 🙏

 


3 Replies to “मातृ देवोभव-पितृ देवोभव!”

  1. Poem by unknown:

    खूपदा वाटतं
    फोटोत जाऊन बसलेल्या
    आईशी निदान फोनवर बोलावं
    जमलं तर इंद्राशी गोड बोलून
    तिने परतूनच यावं
    सकाळी झोपेतून तिनं
    हळूच उठवावं
    तरी तिच्या मांडीवर
    लोळत पडावं
    तिच्या हातच काहीही
    मनसोक्त खावं
    तिने पाण्याला सुद्धा
    दिलेल्या फोडणीने
    घर दरवळून जावं
    वय किती ही वाढलं असो
    तोंड तिच्या पदराला पुसावं
    स्वयंपाक शिकून घे
    तिने सतत ओरडावं
    आणि आपण मात्र
    ओट्यावर बसून
    आयतंच खावं
    आई कुठल्या रंगाचा
    घालू ग ड्रेस
    म्हणून सतवावं
    तिच्या साडीच्या मऊ स्पर्शाची
    पैठणी ला नाही सर , तिला सांगावं
    बाहेरून आल्यावर
    तिनेच समोर दिसावं
    थकली असशील ना म्हणून
    लगबगीने पाणी द्यावं
    आपण ही आल्या आल्या
    आज दिवसभरात घडलेलं
    अधाशासारखं सांगून टाकावं
    आपल्याशी वाईट वागणाऱ्या वर
    तिने खूप रागवावं
    आपली चूक असली तरी
    आपलीच बाजू घेऊन भांडावं
    आई तू गेल्यापासून
    खाण्या पिण्याची
    सणा वाराची मजाच गेली
    दारापुढची रांगोळी
    तुळशीची रयाच गेली
    आता नेहमीसारखी देवाची
    पूजा नाही करत
    कुणी उपास नाही धरत !
    किती बोलायचो आपण
    पण नन्तर कामात गेले बुडून
    पाच मिनिटं बोलतेस का बेटा
    विचारयचीस घाबरून
    तुला दिसतंय ना कामात
    आहे ग मी ..जा ना
    असंच म्हटलं मी
    आणि खरंच निघून गेलीस तू परत
    ना येण्यासाठी
    असं कुठलं काम असतं
    आईशी बोलायला ही
    नसतो वेळ
    माहीतच नसतं आपल्याला
    नियती मांडून बसली आहे
    वेगळाच खेळ
    मला देवाशी भांडायचंय
    सगळीकडे म्हणे देव नाही
    जाऊ शकत
    म्हणून बनवली आई
    देवा तूच तिला नेण्याची
    का केलीस घाई
    आता हे घर निशब्द आहे
    यात नाही तुझ्या मायेची ओल
    आज ही तुझा फोटो
    पाहिला की
    काळजात उठते कळ खोल
    आज ही आनंद झाला की
    तुझ्यापुढे येऊन नाचते
    आज ही कुणी दुखावलं
    तर तुझ्या समोर रडते
    चूक झाली तर तुझ्यापुढे
    येऊन कान धरते
    नवीन काही सुरु करताना
    नमस्कार करते
    पण फोटोत तुझे शब्द नाहीत
    तुझा स्पर्श नाही
    आई तुझ्याशिवाय कशालाच अर्थ नाही
    बघ ना जमेल तर
    बोलता येईल का प्रत्यक्ष भरभरून
    खरंच का ग एकदा
    गेलेली माणसं येत नाहीत परतून ?

  2. Sensitive article,Soulful expression.Parents really proud of you Savi.All ur golden moments l too experienced while reading.Many thanks for sharing it with me.God bless.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *