शाळा सुटली…पाटी फुटली !


ह्या लेखाचे युट्यूब विडिओ आणि ऑडिओ क्लिप खाली दिलेले आहे.

आजकाल सगळीकडे सद्य शिक्षण पद्धतीबद्दल खूप चर्चा असते. सगळे पालक मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप धडपडत असतात. त्यासाठी खूप वेळ आणि पैसा खर्च करतात. हे सगळं ऐकत/पाहत असताना माझं मन नकळत भूतकाळात शिरले आणि माझे  शालेय जीवन हळू हळू माझ्या स्मृती पटलावर उमटू लागले. मी त्या आठवणी तुमच्याशी शेअर करत आहे.

 माझे जन्मगाव देगलूर, जे मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यातले एक तालुक्याचे गाव. ते महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश (आत्ताचे तेलंगणा) च्या त्रिवेणी संगमावर वसलेले आहे. त्यामुळे तिथे तीनही भाषा आणि संस्कृती नांदत असायचे. त्या काळी गावात मोजक्याच शाळा होत्या. माझे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण तिथल्या जिल्हा परिषद कन्या शाळेत झाले.  पहिली ते तिसरीचे वर्ग जुन्या सराफा गल्लीत एका जुन्या इमारतीत भरायचे. पहिलीच्या आधी मुले बालकवाडीत जायचेपण बाबांनी मला थेट पहिलीतच पाठवून दिले होते.

शिकवायला मालतीबाई होत्या. बाई वर्गात आल्याबरोबर आमच्या दणदणीत सामूहिक स्वरात ‘एक साथ नमस्ते’ व्हायचे आणि वर्ग सुरु व्हायचा. सगळ्या मुलींची सतत बडबड सुरु असायची. मग त्या वैतागून म्हणायच्या, तुमची तोंडे जर खापराची असती तर कधीच फुटून गेली असती. मी बहुतेक तिसरीत असेन. माझ्या बहीण-भावासाठी भांगेसर घरी येऊन ट्युशन घ्यायचे. बाबा मला पण त्यांच्यासोबत ट्युशनला बसायला सांगायचे. सर त्या दोघांना शिकवत राहायचे आणि मला त्या वेळात बोरूने शुद्धलेखन म्हणून म्हणी पूर्ण पानभर लिहायला द्यायचे. ते नेहमी मला “दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा”,’देव तारी त्याला कोण मारी’, ‘साखरेचे खाणार त्याला देव देणार’ किंवा ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ सारखी मोठी वाक्ये लिहायला द्यायचे. मला त्यांना विचारावेसे वाटायचे कि सर तुम्हाला “अति तिथे माती’, ‘खाण तशी माती’ किंवा ‘बळी तो कान पिळी’ सारख्या छोट्या म्हणी लक्षात येत नाहीत का हो?! तसे विचारायची सोय नव्हती. पण त्यामुळे माझे अक्षर सुधारले होते.

चौथी पासून मग मोठ्या इमारतीत शाळा भरायची. आमच्या जुन्या घरापासून दूरच पडायचे. मी पाचवीत जाईपर्यंत आमचे नवीन घर बांधून झाले होते आणि आम्ही राहायला गेलो होतो. नवीन घरापासून शाळा मिनिटांच्या अंतरावर होती. शाळेतली घंटा सुद्धा घरी ऐकू यायची. पहिली घंटा झाल्यावर जरी मी घरून निघाले तरी दुसऱ्या घंटेपर्यंत वर्गात पोहोचायची. मोठी पिवळी इमारत होती. शाळेला एक मोठे फाटक आणि त्याला एक छोटेसे दार असायचे. मोठे फाटक फक्त शाळा सुटेल तेव्हाच उघडायचे. छोट्या दारातून वाकून जावे लागायचे. म्हणायचे कि विद्या मंदिरात जाताना विनयाने वाकून प्रवेश करावे म्हणून तशी व्यवस्था केली आहे. आमच्या शाळेत शिस्तीला फार महत्व होते. शाळा भरायची आणि एका विशिष्ट वेळेनंतर छोटे दार ही बंद व्हायचे. उशिरा आलेल्या मुली बाहेरच थांबायच्या आणि मग आमच्या कडक शिस्तीच्या बाई त्या सगळ्यांना शिक्षा करायच्या. सरफराज, इरण्णा आणि बिबनबी असे घंटा वाजवणारे शिपाई/चपराशी होते. प्रार्थना झाल्यावर एक बातमी वाचून दाखवायची आणि एक गाणे म्हणायची पद्धत नंतर सुरु झाली होती. संत तुकडोजी महाराज आणि साने गुरुजींची गीते म्हणायचो.

सुरुवातीला बरीच वर्षे आमच्या मुख्याध्यापिका दुर्गाबाई होत्या. अतिशय हुशार आणि कडक शिस्तीच्या होत्या. आम्हाला त्यांची आदरयुक्त भीती वाटायची. आम्ही कन्या शाळेत, मुख्याध्यापिका एक स्त्री आणि त्यावेळेस भारताच्या पंतप्रधान सुद्धा एक स्त्री होत्या. ह्या योगायोगाबद्दल अभिमान वाटायचा. शाळेला एक मोठा खेळाचा मैदान होता. थोड्या भागात मोठे मोठे खडक होते आणि एक मोठे झाड होते. हिवाळ्यात ऊन्हासाठी एकदोन तास आमचे वर्ग त्या खडकावर भरायचे. आम्हाला ते खूप आवडायचे. शाळेत एक स्टाफ रूम, एक विज्ञान प्रयोगशाळा, लायब्ररी, एक स्टेज होते. आमची शाळा मराठी होती. उर्दू वर्ग हळू हळू सुरु झाले होते. शाळेच्या आवारात भिंतीवर रोज एक नवा सुविचार लिहिला जायचा.

आमच्या शाळेचा बॅण्ड पथक होता. त्यात बाजाची पेटी (हार्मोनियम), ढोल, स्नेयर ड्रम, झांज आणि त्रिकोण वाद्य असायचे.

बोधनकर सर आठवीतल्या एका मुलीला पेटीवर राष्ट्रगीत शिकवायचे आणि इतर मुलींना बाकीची वाद्ये शिकवायचे. मग २६ जानेवारी, मे ( महाराष्ट्र दिन) आणि १५ ऑगस्टला झेंडा वंदन व्हायचे आणि बॅण्डवर राष्ट्रगीत वाजायचे. राष्ट्रगीत तीन ठिकाणी व्हायचे. शाळेत, गांधी चौकात आणि कलेक्टर ऑफिसमध्ये सगळ्या वाद्यात सगळ्यात कठीण हार्मोनियम आणि त्यानंतर स्नेअर ड्रम. जेव्हा ती आठवीतली मुलगी दहावी संपवून शाळेतून जायची, तेव्हा सरांना नवीन मुलीला तयार करावे लागायचे. मी पाचवी होते आणि त्यावर्षी सरांनी ठरवले कि आता आठवी ऐवजी पाचवीतल्या मुलीला तयार करायचे म्हणजे पाच वर्षे काळजी नको. सर वर्गात आले आणि त्यांनी विचारले कि कोणा कोणाला पेटी शिकायची आहे? आम्ही बऱ्याच जणींनी हात वर करून इच्छा व्यक्त केली. मग सरानी सगळ्यांची बोटे पाहिली आणि माझी निवड केली. मग हार्मोनियम शिकण्याचे धडे सुरु झाले. सुरुवातीला खूप तारांबळ उडायची. काळ्या पट्टीसाठी चार बोटे आणि पांढऱ्यासाठी अंगठा वापरायचा असतो. त्याकडे लक्ष दिले कि डाव्या हाताने चालणारा भाता थांबायचा आणि भात्याकडे लक्ष दिले कि बोटे चुकायची. पण तरीही अपेक्षेपेक्षा लवकरच शिकले असे सरांचे म्हणणे होते. गरज नसताना गमतीने मी स्नेअर ड्रम वाजवायला शिकले आणि ते पण उत्तम वाजवता येऊ लागले होते. एकदा राष्ट्रगीत छान वाजवायला आले कि पुढची स्टेप म्हणजे ते ५६ सेकंदात व्हायला पाहिजे आणि बाकीची वाद्ये पण एका सूरात वाजली पाहिजेत. माझा छान जम बसला आणि माझी दहावी संपेपर्यंत सरांची काळजीच मिटली. त्यानंतर ११ वी आणि १२ वी ला सुद्धा मला बोलावून घ्यायचे कारण त्यांना पेटीसाठी दुसरी योग्य मुलगी मिळाली नव्हती. देगलूर सोडून गेल्यापासून ते अमेरिकेला येईपर्यंत पेटी वाजवण्याचा योगच आला नव्हता. अमेरिकेला आल्यानंतर माझ्या मुलांसाठी छोटे म्युझिकल कीबोर्ड आणले होते. मी त्यावर सहज राष्ट्रगीत वाजवून पहिले आणि अतिशय आनंद झाला कि इतक्या वर्षांनंतरही मी ते विसरले नव्हते.

सहावीला एक अतिशय कडक शिस्तीच्या बाई होत्या. त्यांची शिक्षा करण्याची पद्धत जगा वेगळी होती. त्यांच्या प्रश्नाचे उत्तर येणाऱ्या मुलीने उत्तर येणाऱ्या मुलींच्या श्रीमुखात मारायचे. माझा अभ्यास चांगला असल्यामुळे तसे करण्याचा प्रसंग माझ्यावर वारंवार यायचा. मला ते आवडायचे नाही, पण करावे लागायचे.

१९७५ मध्ये ‘जय संतोषी माँ’ नावाचा धार्मिक हिंदी सिनेमा अतिशय गाजला होता. आम्ही गल्लीतल्या मैत्रिणींनी म्हणजे मी, अनिता, वनिता, संगीता, दोन अनुराधा मिळून संतोषी मातेच्या आरतीवर डान्स केला होता.मैत्रिणींच्या शेतात ऊस, हुरडा खायला जायचो आणि संत्री-मोसंबीच्या मळ्याला भेट द्यायचो. आमच्या लहान मोठ्या सहली काढल्या जायच्या. छोट्या सहलीसाठी आम्हाला देगलूरचे पम्प हाऊस, मिर्झापूर, कलंबर साखर कारखाना, कागद बनवण्याचा कारखाना अश्या ठिकाणी घेऊन जायचे. एकदा आम्हालासंत ज्ञानेश्वरनावाचा सिनेमा पाहायला पिरोजदिन टॉकीज मध्ये मॅटीनी शो ला नेले होते. सिनेमा संपेपर्यंत बऱ्याच जणींचे डोळे रडून लाल झाले होते. मोठी सहल मात्र औरंगाबादची होती. आम्ही खूप साऱ्या मुली आणि काही शिक्षक होते. सहल पूर्ण १५ दिवसांची होती. काही मुलींना वेण्या घालता येत नसायचे. मग मी आणि काही मुली ज्यांना स्वतःची आणि दुसऱ्यांची वेणी घालता यायची, त्या मुलींना रोज वेणी घालून द्यायचो. त्या शिबिरात आम्हाला भाज्या चिरणे, भांडी घासणे, स्वयंपाक करणे, स्वतःचे कपडे धुणे अशी कामे शिकायला मिळाली. स्वावलंबनाचे धडेच होते ते. प्रा. वसंत कुंभोजकर व्याख्यानमाला, सगळी प्रेक्षणीय स्थळे, तसेच चिकलठाणा इथले औरंगाबाद विमानतळ पाहणे असा प्रोग्रॅम होता. जेव्हा आम्ही विमानतळाला भेट दिली तेव्हा योगायोगाने हिंदी चित्रपट अभिनेता, ‘बाबू मोशाय’ उर्फ राजेश खन्नाला पाहायला मिळाले.

शाळेचे दप्तर म्हणजे मेटलची पेटी असायची. त्यात पुस्तके, फेयर वह्या, रफ वही, कॅम्लिनचा कंपॉस बॉक्स, शाईची पेन असे असायचे. काही मैत्रिणींच्या पेटीत गोष्टीची पुस्तके पण असायची. एका मैत्रिणीचे वडील ‘ब्रूक बॉण्ड’ चहा कंपनीसाठी काम करायचे. चहापत्तीच्या खोक्यांना जाड ब्राऊन पेपर गुंडाळलेला यायचा जो आम्ही वह्या पुस्तकांना कव्हर लावायला वापरायचो. पेटी उघडताच चहाचा मस्त सुवास यायचा आणि नुसत्या वासाने तरतरी यायची. ऋतुमानानुसार आमच्या सगळ्यांकडे चिंचा, बोरं, कैऱ्या असायचे. मिठाच्या पुड्या नेहमीच राखून ठेवायचो. गमतीने आम्ही कैरी-मिठाला पोळी-भाजी म्हणायचो.

काही वर्षांनी शाळेत गणवेश लागू झाला. गुलाबी ब्लॉउज/शर्ट आणि चॉकलेटी परकर/स्कर्ट. आठवड्यातले दोन दिवस गणवेश घालून जाणे सक्तीचे होते. नियम पाळणाऱ्यांना शिक्षा मिळायची. आमच्या वर्गात एक हुशार पण परिस्थितीने गरीब मुलगी होती. तिच्याकडे गणवेश घेण्यासाठी पैसे नव्हते. मग आम्ही सगळ्या मैत्रिणींनी पैसे जमा करून तिच्यासाठी गणवेश शिवून घेतला. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर उमटला होता.

वर्षातून एकदा वर्ग सजावटीची स्पर्धा व्हायची. आम्ही सगळ्या मुली जीव ओतून आमचा वर्ग सजवायचो. आधी पैसे जमा करणे, त्यातून लागणारे साहित्य आणणे आणि मग एक एक करत चित्र काढणे, म्हणी लिहिणे सुरु व्हायचे. सुर्यकिरणाचे डेकोरेशन खूप प्रचलित होते. छताच्या मध्यातून दोरे एक एक करत भिंतीवर सगळीकडे खिळ्यांना बांधायचे आणि त्यावर क्रेप पेपरची फुले करून चिटकवायचे. खूप सुंदर दिसायचे ते. मग भिंतीवर एका रांगेत मोठाली चित्रे आणि त्याखाली म्हणींच्या रांगा. फळा काळा कुळकुळीत करण्यासाठी सीताफळाची पाने कुटून त्याचा रस लावायचो. लाकडाचा भुसा वेगवेगळ्या रंगात रंगवून त्याचा भारताचा नकाशा बनवायचो आणि प्रत्येक राज्याच्या राजधान्या दर्शवण्यासाठी खडू वापरायचोमला वर्ग मॉनिटर होण्याची संधी बऱ्याचदा मिळालेली होती. आमच्या वर्ग सजावटीला खूपदा बक्षीस मिळाले होते आणि ते स्टेजवर जाऊन घ्यायचा मान वर्गमॉनिटर म्हणून मला मिळायचा.

आमचे सर्व शिक्षक खूप मनमिळाऊ होते आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास ते आम्हाला खूप प्रोत्साहन द्यायचे. वरखिंडे सरांमुळे भारताच्या इतिहासाची ओळख झाली. दोन अंबूबाई, दोन कृष्णाबाई, उत्तरवारबाई, बोधनकरसर, दवणेसर, पोतदारसर, गायकवाडसर, खानापूरकरसर, जाधवसर, आठवलेसर, धर्माधिकारीबाई, धानोरकरबाई, ताराबाई, टोंगेसर, भालेसर, पुठ्ठावारबाई, जनाबाई, खडकतकरबाई, एकाळे सर, दोसलवार सर असे एक ना अनेक शिक्षकांनी आमच्या शिक्षणात योगदान दिले. दोन कृष्णाबाई असल्यामुळे सोयीसाठी आम्ही गोऱ्या कृष्णाबाई आणि काळ्या कृष्णाबाई म्हणायचो. आमच्या निरागस बालमनात वर्णभेदाचा अंशही नसायचा. खडकतकरबाई, आमच्या खेळाच्या बाईंनी आम्हाला विविध खेळ शिकवले होते. खो-खो, कबड्डी, लेझीम, डंबेल्स, गोळा फेक, थाळी फेक, दोरीवरच्या उड्या, वेगवेगळी आसने (भुजंगासन, नौकासन, मयूरासन, त्रिकोणासन, हलासन, धनुरासन, शीर्षासन इ.), सूर्य नमस्कार . बऱ्याच गोष्टींचा त्यात समावेश होता. त्या आणि इतर शिक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाची जिम्मेदारी घेतली होती. एक सर हार्मोनियम वाजवायचे, दुसरे सर हाताला घुंगरू बांधून तबला वाजवायचे आणिआम्ही काही निवडक मुली पार्श्वगायन करायचोबरेच आदिवासी नाच (आई माई को) आणि नाटकं बसवायचे.

त्याच बरोबर हस्ताक्षर स्पर्धा, भाषण/वक्तृत्व स्पर्धा, निबंधस्पर्धा व्हायच्या. मला त्यात भाग घ्यायचा कि नाही असा विचार करायची वेळ माझे शिक्षक येऊच द्यायचे नाहीत. सरळ प्रत्येक स्पर्धेत माझे नाव देऊन मोकळे व्हायचे आणि मला फक्त सांगायचे कि, सावित्रा, फलाण्या दिवशी फलाणी स्पर्धा आहे आणि तूझे त्यात नाव दिले आहे. मग माझ्याकडे फक्तठीक आहे, सर/बाईम्हणण्या पलीकडे पर्याय नसायचा. त्याचा मला इतका फायदा झाला कि कोणतीही स्पर्धा असो, माझा त्यात सहभाग असायचाच. नाही म्हणण्याची सवयच लागली नाही. मला वाचनाची खूप आवड असल्यामुळे आमच्या घराजवळ असलेल्या जयप्रकाश वाचनालयातले माझ्या वाचन्यायोग्य असलेली जवळपास सगळी पुस्तके वाचून झाली होती.

मी नववीत असताना आमच्या शाळेला एका समूह गीताच्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली. त्यासाठी औरंगाबादला ‘आकाशवाणी औरंगाबाद-परभणी’ केंद्रात जाऊन दोन देशभक्तीपर गाणी रेकॉर्ड  करायची  होती. आम्ही निवडक गायिका आणि दोन शिक्षक औरंगाबादला गेलो होतो. आयुष्यात प्रथमच रेडिओ सेंटर पाहायला आणि अनुभवायला मिळाले होते. त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेतला आणि उत्कृष्ट गाणी गायली होती. एक गाणे होते पुढे पुढे आम्ही जाऊया ..क्रांती गीतचि गाऊ याआणि दुसरे होते ‘देश हमारा…देश हमारा’.

आमच्याशाळेचे ‘कलिका’ 🌹नावाचे एक हस्तलिखित मासिक निघायचे. त्यात आम्ही सगळ्या जणी खूप हिरीरीने भाग घ्यायचो. ज्यांचे  हस्ताक्षर चांगले आहे अश्या मुलींची निवड व्हायची आणि त्यात मी पण असायची. लिहिण्याबरोबर मी माझ्या स्वतःच्या गोष्टीं, कविता आणि जोक्स पाठवायची. एके वर्षी त्या मासिकाच्या मुखपृष्ठावर सरस्वती देवीचे चित्र काढण्याचा मान मला मिळाला होता आणि त्यासाठी मी बक्षीस ही मिळवले होते.

चित्रकलेचे पोतदार सर बदली होऊन आमच्या शाळेत आले होते. मग माझ्या मैत्रिणीसोबत मी पण चित्रकलेचे एलिमेंटरी आणि इंटरमेडिएट असे दोनही परीक्षा देऊन चांगल्या ग्रेडने पास झाले. त्याची तयारी म्हणून आम्हाला रोज पाच चित्रं काढावी लागायची. दुर्दैवाने त्याकाळी अश्या प्रत्येक आठवणी कॅमेऱ्याने टिपून घेण्याची सुविधा नव्हती. परीक्षेत बरेच विषय असायचे. स्थिर चित्र/स्टील लाईफ, निसर्ग चित्र/नेचर ड्रॉईंग, स्मरण चित्र/मेमरीड्रॉईंग, फ्री हॅन्ड ड्रॉईंग, लेटर राईटींग आणि जओमेट्री. युनेस्कोने १९७९ हे बालवर्ष म्हणजे चिल्ड्रेन्स इयर असे घोषित केले होते आणि त्यावर्षीमी लेटर राईटींग मध्ये चिल्ड्रेन्स इयरनिवडले होते. ह्या सगळ्या प्रॅक्टिसमुळे आम्ही वर्ग सजावटीसाठी सुंदर सुंदर चित्र काढू शकायचो.

चित्रकलेसोबत हस्तकला पण शिकवायचे. त्यात पेपरचा बंगला करायला शिकवले होते. मी दोन मजली आकाशी रंगाचे घर, त्याला कंपाउंड, मोठे गेट, पायऱ्या, खुर्च्या, टेबल, टूथ पेस्टच्या झाकणापासून कुंड्या बनवून त्यात पेपरची रोपे बनवली होती.

एकदा आंतर शालेय चित्रकला स्पर्धा होती आणि विषय होता “दारूबंदी”.  मी एक मोठ्ठी दारूची बाटली, त्यात बुडालेला दारुडा, घरात रिकामी पातेली, डोक्याला हात लावून बसलेली त्याची बायको आणि उघडी नागडी मुले जे भुकेने रडत आहेत असे चित्र काढले होते. ते चित्र छान जमले होते. माझा दुसरा नंबर आला. पहिला नंबर एका पेंटरला मिळाला. माझी समजूत काढण्यासाठी आमचे सर म्हणाले कि, तो पेंटर आहे म्हणून पहिला नंबर मिळाला. पण तू विद्यार्थिनी आहेस आणि तसे पाहता तुलाच पहिले बक्षीस मिळाले असे समजायला हरकत नाही. 

वर्षातून एकदा विज्ञान प्रदर्शन भरायचे. त्यातही माझा सहभाग असायचा. एके वर्षी मी नारळाच्या करवंटीपासून इग्लू बनवला. अर्धी करवंटी घेऊन त्यावर मेडिकल कॉटनचे तुकडे चिटकवले आणि मध्ये एक अगरबत्तीचा तुकडा पेटत ठेवला. त्यामुळे इग्लू मधून (नारळाच्या डोळ्यातून) धूर यायचा आणि ते खूप जिवंत वाटायचे.

शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे मी आणि माझ्या मैत्रिणींनी टिळक गणित परीक्षा, बम्बई हिंदी परीक्षा, संस्कृत परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा देऊन यश मिळविले होते.

शाळे व्यतिरिक्त पूज्यनीय गोपाळरावदादा मुजळगेकरांकडे जाऊन संपूर्ण भगवद्गीतेचे १८ अध्याय आणि ७०० श्लोक तोंडपाठ केली होती.🙏

आठवीनववीदहावी मध्ये गर्ल गाईड/गर्ल स्काऊटमध्ये भाग घेतला होता. त्यात बऱ्याच गोष्टीं शिकायला मिळाल्या. गुलाबी रंगाचा स्कार्फ आणि त्याला बेडन पॉवेलचे चित्र असलेले निळ्या रंगाचे रिंग असायचे. बेडन पॉवेल हे स्काऊटचे जनक होते. आम्ही एक गाणे म्हणायचो..”बेडन पॉवेल तेरे चेले हम, मानेंगे तेरे दस नियम”.

आम्हाला शाळेने खरी कमाईचे धडे ही दिले. दहा-दहा मुलींचा गट तयार केला. प्रत्येक गटाने थोडे पैसे कसल्यातरी कामात गुंतवून त्यातून कमाई करून दाखवायची आणि ज्या गटाची कमाई जास्त त्याला बक्षीस. माझ्या संघाचे नाव ‘सदाफुली’🌺 आणि ग्रुपचे नाव ‘राणी लक्ष्मीबाई’ असे होते. त्यात आम्ही विविध गोष्टीं करायचो. शाळेच्या मागच्या बाजूला मोकळी जागा होती. छोटे छोटे वाफे करून त्यात मेथी, पालक, कोथिंबीर उगववायचे आणि ते विकून पैसे मिळवायचे.

खरमूरे किंवा मुरमुऱ्याचा चिवडा करायचा आणि तो आमच्या आणि इतर शाळेत जाऊन विकायचा. एका गटाने तर चक्क शाळेतच गरमागरम भजी करून कमाई केली होती. अश्या ऍक्टिव्हिटी मुळे मुद्दल आणि प्रॉफिट बद्दल खरा अनुभव मिळायचा. दुसरा एक प्रकल्प होता. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे टाके, म्हणजे गाठी टाका, गहू टाका, धावता टाका, उलटी टीप, साखळीटाका असे बरेच टाके शिकवायचे. मग आम्हाला सगळ्या टाक्यांचा एक अल्बम करायला सांगितले होते. तळहाता एवढे रुमाल शिवून घ्यायचे आणि प्रत्येक रुमालावर वेगवेगळे टाके वापरून डिजाईन काढायची. आणि ते रुमाल एका जाड पेपर वर चिटकवायचे आणि त्याचा फोटो अल्बम सारखा अल्बम बनवायचा.

तसेच लोकर विणूनत्याचे छोटेसे स्वेटर, मोजे, स्कार्फ आणि छोटी टोपी बनवले होते.

कार्यानुभव नावाचा एक विषय होता. त्यात गायकवाड सरांनी केरोसीनचा स्टोव्ह कसा दुरुस्त करायचा ते शिकवले होते.

शाळेत एक ‘संचयिका’ नावाची बचत बँक सुरु केली होती. विद्यार्थ्यांना बचतीचे महत्व कळावे म्हणून हा प्रकल्प राबवला होता. जिच्या अकाउंट मध्ये जास्त पैसे जमा होतील तिला बक्षीस ही मिळायचे. आम्हाला शाळेतर्फे एक रोजनिशी दिली गेली होती. त्यात रोज घडलेल्या महत्वाच्या घटना लिहावे लागायचे.

आमच्या शाळेतून मी आणि माझ्या दोन मैत्रिणींची विज्ञान मंचासाठी निवड झाली होती. त्यासाठी आम्ही नांदेडच्या यशवंत कॉलेजला एका आठवड्यासाठी गेलो होतो. भरपूर वेगवेगळे विज्ञानाचे प्रयोग आणि माहिती शिकायला मिळाली होती. 

आमच्या शाळेत २५ जानेवारीला स्वयंशासन दिन साजरा व्हायचा. त्यादिवशी सगळी शाळा मुलीच चालवायच्या. अगदी मुख्याध्यापका पासूनते चपराशी पर्यंत. मी एके वर्षी लिपिक झाले आणि बाकीच्या वर्षी वेगवेगळ्या विषयांची शिक्षिका. त्यासाठी पण बक्षीस मिळाले होते. २६ जानेवारीला बक्षीस समारंभ व्हायचा. मला भरपूर बक्षिसे मिळायची. मग आमचे शिक्षक हसून मला म्हणायचे कि, प्रत्येक बक्षिसासाठी खालून स्टेजवर येण्या ऐवजी तू स्टेजवरच थांब.

अमेरिकेच्या नासाने १९७३ मध्ये स्कायलॅब आकाशात पाठवले होते. त्यात बिघाड होऊन ते पृथ्वीवर कुठेही कोसळू शकते अशी भीती १९७९ मध्ये पसरली होती. ज्या दिवशी ते जमिनीवर आदळणार होते, त्यादिवशी मी आणि माझ्या मोजक्या मैत्रिणी शाळेत गेलो होतो. बाकीच्यांनी भीतीने शाळेला दांडी मारली होती.

आमचा वर्ग अतिशय हुशार होता. गाईड वापरणे हे कमीपणाचे मानायचो. त्यामुळे आम्ही गाईड वापरायचो नाही. स्वतः उत्तरे शोधून स्वतःच्या शब्दात लिहिण्याची निकोप स्पर्धाच जणू असायची. आम्ही दीक्षित सरांकडे गणिताच्या ट्युशनला जायचो. आमचा इतका वचक असायचा कि दुसऱ्या शाळेतली मुले आमच्या सोबत ट्युशनला नाही म्हणायचे. सरांना आमचे खूप कौतुक होते. एके दिवशी सरांनी एक गणिताचा प्रश्न देऊन म्हणाले कि, तुम्ही सगळे रथीमहारथी आहात ना. बघूया कोण कोण हे गणित सोडवताय. प्रश्न अतिशय सोपा होता आणि आम्हा सगळ्यांना उत्तर येत होते पण प्रत्येकीला वाटले कि एवढा सोपा प्रश्न चॅलेंज म्हणून का देतील. नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. सर मात्र गालातल्या गालात हसत होते. बराच वेळ शांतता होती. उत्तर सांगायला कोणीही तयार नव्हते. मग मात्र सर खो खो हसत सुटले आणि म्हणाले, “तुम्हाला घागरीने पाणी भरता येते पण तांब्याने नाही“. त्यांनी आमची चांगलीच फिरकी  घेतली होती.

दवणे सरांकडे गांधी चौकात इंग्रजीच्या ट्युशनला जायचो. त्यांच्या मुळे इंग्रजीचा बाऊ वाटला नाही. वर्गात पण  खूप मजा यायची. त्यावेळेसचे मुख्याध्यापक श्री इनामदार सर, श्री जी. एम. पाटील आणि नंतर श्री हणमंतराव पाटील सर होते. त्या वर्षी आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक आणि शिक्षिका अशी बरीच पारितोषिके मिळाली होती. एक एक वर्ष  सरत गेले आणि दहावीचे वर्ष ही संपत आले. दहावीचा सेंड ऑफचा कार्यक्रम सगळ्यांनी रडून पूर्ण केला. सगळ्यांचा ग्रुप फोटो झाला. एकमेकींना ब्लॅक अँड व्हाईट पासपोर्ट फोटोंची देवाण-घेवाण झाली. दहावी बोर्डात आमच्या क्लासने घवघवीत यश मिळवले. मी बोर्डात चौथी, नांदेड जिल्ह्यात पहिली येऊन सुवर्ण पदक मिळवले होते. देगलूर मध्ये मराठीत टॉप आल्यामुळे ‘श्री. गोविंदराव मत्सावार’ पारितोषिक मिळाले. दुसरी मैत्रीण बोर्डात ११ वी आली होती. अश्या प्रकारे दोन मेरिट, चार डिस्टींक्शन, बारा फर्स्ट क्लास असा अभिमानास्पद निकाल लागला होता. मग सगळ्या वर्तमानपत्रात बातम्या, मुलाखती आणि सगळीकडे सत्कार समारंभ सुरु झाले. नांदेडला जाऊन जेसीज क्लब तर्फे सुवर्णपदकाचा कार्यक्रम झाला.

उत्तरवार बाईंनी एक छानशी कविता केली.

अश्या प्रकारे शालेय जीवन हसत खेळत कधी संपले ते कळले नाही.  खरोखरच आपल्या जीवनात शाळा ही खूप मोठी भूमिका बजावते कारण शाळेत जाण्यापूर्वी आपण घरातल्या छोट्याशा जगात असतो. बाहेरील मोठ्या जगाशी परिचय होतो तो शाळे मुळेच. म्हणूनच शाळेचे महत्व जीवनात फार असते. आम्हाला एज्युकेशन आणि लर्निंग दोन्हीही मिळत गेले. पाठ्यपुस्तकांतून मिळते ते एज्युकेशन आणि आयुष्यामध्ये जे कायमचे शिक्षण चालते ते लर्निंगशिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवत नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो. आपल्या व्यक्तीमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती आदर असेपैलू पाडले जातात. ज्यांनी मला घडवले अश्या माझ्या सर्व गुरुजनांना माझे त्रिवार वंदन!🙏

आई वडिलांचे आशीर्वाद आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे सर्वांगीण विकास शक्य झाले. माझ्या शालेय जीवनाच्या सगळ्या आठवणी लिहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली कि, ३५४० वर्षांपूर्वी, देगलूर सारख्या एका छोट्याश्या गावी, मराठी माध्यम शाळेत माझ्यावर एवढे विविध संस्कार घडले आणि तेही हसत खेळत आणि नकळत. आमच्या शाळेने आम्हाला काय नाही शिकवले! पुस्तकी ज्ञान, व्यवहार ज्ञान, बचत, कृषी, घरकाम, प्रवासाचे अनुभव, मनोरंजन, शारीरिक शिक्षण, श्रमाचे महत्व, पैसे कमावणे, गायन, वादन, चित्रकला, हस्तकला, रोजनिशी, बातम्या, सुविचार, स्टेज करेज, डेकोरेशन, मैत्री, आदर, विणकाम, भरतकाम, वेळेचे महत्व आणि बरेच काही. ह्या शाळेमुळे मला जीवाभावाच्या गोड-गोड मैत्रिणी मिळाल्या. आमच्या शाळेने आमच्यावर योग्य संस्कार करून आम्हाला घडवले आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी आपापल्या आयुष्यात सुखी-समाधानी आहोत. एक दोन मैत्रिणींची सातवी-आठवीत लग्न झाले होते आणि आम्ही लग्नाचे लाडू खायला गेलेले आठवते. दहावी नंतर मात्र बऱ्याच जणींची लग्नें झाली होती. नवीन टेक्नॉलॉजि मुळे पुन्हा >३५ वर्षानंतर एकमेकींच्या संपर्कात आलो आणि आमचा ‘बालसखी’ नावाचा व्हाट्स ऍप ग्रुप बनला. 

🌺नमस्कार माझा ह्या ज्ञानमंदिरासत्यम् शिवम् सुंदरा🌺

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *