आज मी तुम्हाला माझ्या लहानपणी दादा सोबत घडलेली एक गंमत सांगणार आहे.
एका छोट्याशा गावात माझे बालपण गेले. तो 1970 चा काळ होता. तेव्हा आम्ही जुन्या घरी राहायचो. ताई माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी आणि दादा तिच्याहून दोन वर्षांनी मोठा. बाकीची भावंडे आमच्यापेक्षा वयाने खूप मोठी किंवा खूप लहान असल्यामुळे जास्त करून आम्ही तिघे एकत्र खेळायचो. गल्लीतल्या मित्र-मैत्रिणींनी त्रास दिला किंवा शाळेत कोणी काही आम्हाला बोलले की दादा आमची ढाल बनून पुढे यायचा आणि आमचे रक्षण करायचा. पण घरी मात्र खूप दादागिरी करायचा. आम्ही दोघी त्याच्यापेक्षा लहान असल्यामुळे सहज रित्या त्याच्या दादागिरीला बळी पडायचो.
सिताफळाच्या बिया जमा करून त्याच्याशी खेळणे हा आमचा सीताफळाच्या सीझनमधला आवडता खेळ असायचा. कदाचित हे वाचुन आजच्या पिढीतली मुले म्हणतील, “शी ss सीताफळाच्या बिया फेकून द्यायचे असतात…खेळायच्या नसतात”. पण आम्ही मात्र लहानपणी सीताफळाच्या बिया, चिंचोके, काचेच्या बांगड्याचे तुकडे, गारगोट्या अशा आजूबाजूला उपलब्ध असलेल्या वस्तू खेळण्यासाठी वापरायचो. त्याकाळी आम्हाला स्मार्टफोन्स, व्हिडिओ गेम्स किंवा टी. व्ही. नव्हते.
बाबांनी घरी सीताफळं आणली की आम्ही तिघे घरातल्या इतरांचे कोण कुणाच्या बिया घेणार ते ठरवायचो. मग आपापल्या वाटणीच्या बिया एका भांड्यात जमा करून स्वच्छ धुऊन घ्यायचे आणि गच्चीवर वाळत घालायचे. वाळलेल्या बिया एका डब्यात जपून ठेवून खेळण्यासाठी वापरायचे. आमच्या घराच्या बाजूला अजून एक जुना वाडा होता. त्या वाड्याच्या मागच्या भागात एक उंबराचे झाड आणि भले मोठे मैदान होते. उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या कि गल्लीतली सगळी मुले तिथे खेळायची. सिताफळाच्या बियांचा एक मजेशीर खेळ खेळायचो. मातीचे तीन छोटे खोपे बनवायचे. दुसऱ्याला पाठ करून उभे राहायला सांगायचे आणि तीन पैकी एका खोप्यात काही बिया लपवायचे. मग दुसऱ्याने येऊन बिया कोणत्या खोप्यात आहे ते ओळखायचे. त्याने ओळखले तर बिया त्याच्या मालकीच्या. जर तो हरला तर त्याने दुप्पट बिया भरपाई म्हणून द्यायच्या. बिया कोणत्या खोप्यात आहेत हे ओळखण्यासाठी एक पद्धत खूप प्रचलित होती. प्रत्येक खोप्या समोर एक बोट घासायचे आणि पाहायचे. ज्या खोप्यासमोरचे बोट जास्त लाल व्हायचे त्या खोप्यात बिया हमखास मिळणार अशी आमची खात्री असायची. आम्ही जेव्हा हा खेळ दादासोबत खेळायचो, तेव्हा कोणास ठाऊक पण चुकून सुद्धा आम्ही जिंकत नसू. हरल्यामुळे आम्हाला नेहमी दुप्पट बिया भरपाई म्हणून द्याव्या लागायच्या. हळूहळू आमच्याकडचे बिया संपून जायचे. खूप वाईट वाटायचं. कालांतराने आमच्या हरण्याचे रहस्य आम्हाला कळले. दादाच्या तीनही खोप्यात बिया नसायच्या. त्यामुळे साहजिकच आम्ही नेहमी हरायचो. हातात मूठभर बिया ठेवायचा आणि एका खोप्यातून शिताफीने काढल्यासारखे करून आमच्याकडून दुप्पट बिया वसूल करायचा. त्यानंतर आम्ही त्याच्यासोबत हा खेळ खेळायचं बंद केलं.
आमच्याकडे एक लाकडी आराम खुर्ची होती. त्याला फोल्ड करता येत असे. लाकडी फ्रेम आणि त्याला जाड कपडा अशी रचना असायची. खुर्चीच्या वरच्या आणि खालच्या भागाला फटी बनवल्या होत्या. कपड्याच्या दोन्ही टोकाला रूळ (रॉड) घालण्याची व्यवस्था असायची. खालच्या आणि वरच्या फटीतून कपडा सरकवायचा आणि मग त्यात लाकडी रूळ सरकवायचे. झाली खुर्ची तयार. हवे तेव्हा रूळ काढून तो कपडा धुऊन घ्यायचा. आमच्याकडे तशी एकच खुर्ची होती. घराच्या दुसऱ्या मजल्यावर मोठा हॉल होता. त्याच्या बाजूला छोटी गच्ची होती. हॉल आणि गच्चीच्यामध्ये लोखंडी जाळी होती. गच्चीवर आई चिमण्यांसाठी तांदूळ आणि दाणे टाकायची. आम्ही आराम खुर्चीवर बसून चिमण्या पाहायचो. एखादा बोका किंवा मांजर चिमण्या खाण्यासाठी आल्यास त्यांना हाकलून लावायचो. त्या खुर्चीवर कोण केव्हा आणि किती वेळ बसायचं ह्याबद्दल आमच्यात भांडणे व्हायची. माझ्यात आणि ताईत समझोता असायचा. पण दादा मात्र आमच्या आधी धावत जाऊन खुर्ची बळकवायचा. विजयी मुद्रेने त्या खुर्चीवर बसून आम्हाला चिडवायचा. आम्हाला खूप राग यायचा. आई-बाबांकडे तक्रार करूनही फारसा फरक पडत नसायचा.
दादाची कशी जिरवायची ह्याबद्दल आमच्या दोघींच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना यायच्या. काही कल्पना प्रत्यक्षात उतरत नव्हत्या तर काहींचा उपयोग होत नव्हता. मग तो सुवर्ण दिवस आला. आम्ही दोघींनी मिळून दादाविरुद्ध एक कट रचला आणि तो यशस्वी झाला. दुपारची वेळ होती. दादा बाहेरून आला. त्याचं चहापाणी सुरू होतं. मी आणि ताई हळूच सटकलो आणि दुसऱ्या मजल्यावर गेलो. आराम खुर्चीचे दोन्ही रूळ अलगदपणे काढून घेतले आणि कपडा तसाच ठेवला. दुरून पाहणाऱ्यांच्या लक्षात येऊ नये याची दक्षता घेतली. मग साळसूदपणे आम्ही दोघी खाली दादाजवळ गेलो. त्याचे खाणे-पिणे झाल्यानंतर आम्ही असेच गप्पा मारत बसलो. आमच्या प्लान प्रमाणे मी उठले आणि म्हणाले की, मी वर जाऊन आराम खुर्चीवर बसणार. ताईने माझा हात ओढल्यासारखा केला आणि म्हणाली की, नाही, खुर्चीवर मी बसणार. “तू मारल्यासारखे कर आणि मी रडल्यासारखे करतो” असेच काहीसे माझे आणि ताईचे सुरू होते. मग काय! दादा अशी संधी कशी सोडेल? नेहमीप्रमाणे आम्हां दोघींना मागे टाकून तो धावत वरती गेला. आम्हाला आधीच कल्पना होती की काय घडणार आहे. म्हणून आम्ही धावत धावत त्याच्या मागे गेलो. तो रूळ नसलेल्या खुर्चीवर बसला आणि खुर्चीवरून धपकन पडला. आम्ही दोघी आनंदाने नाचत सुटलो. आमचा प्लान यशस्वी झाला होता आणि दादाची फजिती झाली होती. त्याचा चेहरा पाहण्यासारखा होता. त्याला कल्पनाच नव्हती की आम्ही असं काहीतरी करू. आम्ही किती तरी वेळ हसत होतो. अचानक पणे आमच्या दोघींच्या पाठीत रपाटा बसला. दादाने जाऊन आईकडे तक्रार केली होती आणि कधीही न मारणाऱ्या आमच्या मातोश्रींनी आमची पाठ गरम केली होती. तिच्या मारण्याने आमच्या आनंदात तसूभरही फरक पडला नव्हता. त्या रात्री आम्हा दोघींना शांत झोप लागली होती.
प्रिय दादा, आमचं बालपण स्मरणीय केल्याबद्दल थँक यू. लव्ह यू!❤
प्रूफरीडर: माझी प्रिय मैत्रीण सौ. ऋता देशमुख
🤣😅🤣… khup chan! Balpanicha kal sukhacha!!
Savitra thodya welesathi lahanach zale g khupach sunder aathvani bhandan chi
Achcha…thank you.
🤩🤩
खरंच खूपच मज्जा.आपल्या लहानपणीॅच्या अश्याच
छोट्या छोट्या आठवणी..किती आनंद होता..
Ho na g!
Savi, परत लहान होऊन गेले g तुझ्या मुळे.
Ho ka…mast 😅
ताई, खूप मज्जा आली हा लेख वाचताना.
पूर्ण डोळ्यासमोर चित्रच उभे झाले.
छान वाक्य रचना आहे .
अभिनंदन..👌🙏👍🙂
Ho na…😍
Khup must
Thank you.