लकी चार्म


लकी चार्म म्हणजे एखादी वस्तू किंवा व्यक्ती जी आपल्यासाठी  भाग्यदायी असते. मग ती वस्तू एखादा दागिना, नाणे, खेळणी, पेन, रुमाल, ड्रेस यापैकी काहीही असू शकते. वस्तू नेहमीचीच असते पण आपण त्याच्याशी भावनेने जोडल्या गेलेले असल्यामुळे नकळत आपल्याला सकारात्मकता देऊन जाते. खरे पाहता त्या वस्तूत वेगळं असं काहीही नसते. पण ती वस्तू आपल्या जवळ असताना एक-दोन वेळेस जर काही चांगल्या गोष्टी घडल्या की आपला त्या वस्तूशी एक नातं तयार होते. ती वस्तू जवळ असल्यास एक प्रकारचा आत्मविश्वास वाटतो आणि मन:स्थिती आनंदी बनते. त्या वस्तूचे वैयक्तिक महत्त्व वाढून ती नेहमी जवळ ठेवावीशी वाटते.

आज मी तुम्हाला माझ्या एका गोड लकी चार्मची गोष्ट सांगणार आहे. आम्ही वीस वर्षांपूर्वी पहिल्यांदा अमेरिकेला आलो तेव्हा माझी दोन्ही मुले लहान होती. आज उपलब्ध असलेल्या कितीतरी गोष्टी त्याकाळी इंडियामध्ये नव्हत्या. इथे आल्यानंतर दर वीकेंडला बाहेर जाऊन बर्‍याच नवनवीन गोष्टी पाहणे आणि शिकणे सुरू असायचे. त्यापैकी एक म्हणजे पेनी प्रेस मशीन. अमेरिकेतला एक पैसा म्हणजे एक सेंट ज्याला पेनी म्हणतात. तो तांब्याचा बनलेला असतो. अशा पेनी प्रेस मशीन मध्ये एक पेनी ठेवायची. त्या मशीन मध्ये उपलब्ध असलेल्या डिझाईन्स पैकी एक डिझाईन निवडायचे. मशीनला असलेले हँडल गोल फिरवत राहायचे. आपल्या डोळ्यासमोर ते गोल नाणे चपटे आणि अंडाकृती होऊन त्यावर आपण निवडलेले डिझाईन उमटताना दिसायचे. एकदा नाणे तयार होऊन खळकन पडल्याचा आवाज आला कि मग हँडल फिरवणे थांबवून मशीन मध्ये हात घालून ते नाणे बाहेर काढायचे. त्याला प्रेस्ड पेनी असे म्हणतात. माझ्या मुलांना ह्या मशीनचे इतके आकर्षण होते की कुठेही मशीन दिसली की पेनी मागायचे आणि मग प्रेस्ड पेनी बनवायचे. त्यामुळे बाहेर निघताना माझ्या पर्समध्ये पेनी असल्याची खात्री करूनच निघायची.

अमेरिकेत आल्यानंतर डॉक्टरकी करण्यासाठी आवश्यक असलेले लायसन्स मिळवण्याकरता मला बऱ्याच परीक्षा द्यायच्या होत्या. हळूहळू माझी तयारी सुरू झाली. माझ्या पहिल्या परीक्षेचा दिवस उजाडला. मी सगळी तयारी करून निघतच होते, तेवढ्यात माझी मुलगी, चिक्की, तिच्या जवळ असलेल्या प्रेस्ड पेनी पैकी एक पेनी घेऊन माझ्याकडे आली आणि म्हणाली, “मम्मी, हे लकी चार्म आहे. परीक्षा देत असताना तुझ्याजवळ असू दे. तुला खूप छान मार्क मिळतील”. वाटले, हिला मम्मी पेक्षा लकी चार्म वरती जास्त विश्वास आहे. परीक्षेला जाण्याच्या टेन्शनमध्ये सुद्धा माझ्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले आणि परीक्षा देऊन घरी आले. मी चांगल्या मार्काने पास झाले. चिक्कीला वाटले की तिच्या लकी चार्मने त्याचे काम चोख बजावले. त्यामुळेच तिच्या मम्मीला एवढे चांगले मार्क मिळाले. त्यानंतर माझ्या प्रत्येक परीक्षेच्या तसेच इंटरव्हूच्या वेळी ती खात्री करून घ्यायची की माझ्याकडे ते लकी चार्म आहे. तिच्या त्या गोड लकी चार्म मध्ये मी पण नकळत गुंतत गेले आणि मागील वीस वर्षांपासून ते अजूनही माझ्या पर्समध्ये विराजमान आहे. 😍


6 Replies to “लकी चार्म”

  1. खुप छान लिखाण सुंदर आठवण ग
    Savitra माझा विश्वास आहे यावर
    बेस्ट ऑफ लक
    Savitra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *