मायग्रेन/अर्धशिशी


हा लेख इंग्रजीतून वाचण्यासाठी इथे क्लिक करा: Migraine

डोकेदुखी ही  एक  सामान्य समस्या आहे. मायग्रेन ही फक्त एक डोकेदुखी नसून ही एक न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे ज्यामध्ये तीव्र प्रकारच्या डोकेदुखी सोबत इतरही लक्षणे आढळतात. साधारणतः ही डोकेदुखी डोक्याच्या अर्ध्या भागात असल्यामुळे त्याला अर्धशिशी किंवा अर्धी डोकेदुखी पण म्हणतात. डोकेदुखीचा प्रादुर्भाव बारा वर्षाखालील मुला-मुलीमध्ये समान असतो. बारा वर्षानंतर मुलींमध्ये हे प्रमाण जास्त असते. प्रौढांमध्ये मायग्रेन पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये तीन पट जास्त असते. मायग्रेनचा त्रास 50% लोकांमध्ये वयाच्या वीस वर्षांपूर्वी सुरू होतो. स्त्रियांमध्ये मायग्रेनचे प्रमाण जास्त असण्याचे कारण म्हणजे हार्मोनल बदल. मासिक पाळी, प्रेग्नेंसी, गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर, पोस्ट-पार्टम (डिलिव्हरीनंतर) आणि रजोनिवृत्तीच्या काळात मायग्रेनचा त्रास होतो. जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के रुग्णांमध्ये मायग्रेनची फॅमिली हिस्ट्री असते. जर तुमच्या जवळच्या नातेवाईकास मायग्रेन असेल तर तुम्हालाही मायग्रेन होण्याची शक्यता अधिक असते.

आता पाहूया मायग्रेनची वैशिष्ट्ये:

  • सामान्यतः डोक्याची उजवी किंवा डावी अर्धी बाजू दुखणे (लहान मुलामध्ये डोक्याच्या दोन्ही बाजूला दुखू शकते)
  • ही डोकेदुखी मध्यम ते तीव्र स्वरूपाची असून थ्रोबिंग किंवा ठणठणणारी असते.
  • मळमळ किंवा उलट्या होतात
  • फोटोसेन्सिटिव्हिटी आणि फोनोसेन्सिटिव्हिटी म्हणजे आवाज सहन न होणे, प्रकाश सहन न होणे
  • दैनंदिन कार्यात अडथळा येतो
  • मायग्रेनचा अटॅक प्रौढांमध्ये 4-72 तास आणि मुलांमध्ये 2-72 तास असतो
  • थोड्याशा श्रमाने (उदा.पायर्‍या चढणे किंवा धावणे) डोकेदुखी तीव्र होते

मायग्रेनचे तीन प्रकार आहेत:

1. मायग्रेन विदाऊट ऑरा: त्याला पूर्वी सामान्य मायग्रेन किंवा कॉमन मायग्रेन असे म्हणायचे. मायग्रेनच्या 80% लोकांना अचानक डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. डोकेदुखी सुरू होण्याआधी ऑरा म्हणजे चेतावनीची लक्षणे नसतात.

2. मायग्रेन विथ ऑरा: ह्याला पूर्वी क्लासिकल मायग्रेन असे म्हणायचे.ऑरा म्हणजे डोकेदुखी सुरू होण्याआधी काही लक्षणे जाणवतात. त्यामध्ये व्हिज्युअल ऑरा ( उदा.ठिपके दिसणे, झिग झ्याग लाईन/ नागमोडी रेषा दिसणे, दृष्टी अंधुक होणे किंवा टनेल व्हिजन होणे), चव किंवा वासाची संवेदना थोड्या वेळासाठी बदलणे यासारखी विविध लक्षणे असू शकतात. मायग्रेन विथ ऑरा हे 20% लोकांमध्ये दिसून येते. खालील चित्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिज्युअल ऑरा दाखवलेले आहेत. बॅझिलर माइग्रेन (ज्याला आता मायग्रेन विथ ब्रेनस्टेम ऑरा म्हणतात), ज्यात व्यक्तीला ऑरा दरम्यान बोलता न येणे, चक्कर येणे, कान वाजणे (टीनिटस) किंवा बॅलेन्सिंगचा प्रॉब्लेम होणे अश्या लक्षणांचा समावेश असतो.

3. एटिपिकल मायग्रेन/ मायग्रेन व्हेरिएन्ट: हा प्रकार दुर्मिळ आणि केवळ लहान मुलांमध्ये दिसून येतो. एका वर्षाखालील मुलाला सुद्धा होऊ शकतो. यामध्ये सहसा डोकेदुखी नसते, पण उलट्या होणे, पोट दुखणे, मान वाकडी होणे, कन्फ्युजन होणे अशी लक्षणे दिसून येतात. काही उदाहरणे म्हणजे: सायकलिक वोमीटिंग सिंड्रोम, ऍबडॉमिनल मायग्रेन, कन्फ्युजनल मायग्रेन, अ‍ॅलिस इन वंडरलँड सिंड्रोम. 

माइग्रेन कशामुळे होतो? मायग्रेनचे नेमके कारण माहित नाही, परंतु जेनेटिक्स/अनुवंशिकताआणि एन्व्हायरमेंटल गोष्टींचा रोल असतो. संशोधकांचे असे मत आहे की, मायग्रेन ग्रस्त व्यक्तीला अनुवंशिकतेमुळे संवेदनशील मेंदूचा वारसा मिळतो. मायग्रेन नसलेल्या व्यक्तीचा मेंदू तीव्र प्रकाश, उग्र वास किंवा कर्णकर्कश्य आवाजाशी काही मिनिटातच ऍडजेस्ट होतो. याउलट मायग्रेन ग्रस्त व्यक्तीला तीव्र प्रकाश, उग्र वास किंवा कर्णकर्कश आवाजामुळे मायग्रेनचा अटॅक/झटका येऊ शकतो. मायग्रेन अटॅकच्या दरम्यान मेंदूमध्ये बरेच रासायनिक बदल होतात आणि मेंदूतील रक्तवाहिन्या आणि पेशींना सूज येते.

ज्या ज्या बाह्य गोष्टीमुळे मायग्रेनचा झटका येऊ शकतो त्याला मायग्रेन ट्रिगर असे म्हणतात. ह्यामध्ये हार्मोनल बदल, काही अन्नघटक आणि इतर गोष्टींचा समावेश असतो.

मायग्रेनचे निदान कसे होते?  हे क्लीनिकल डायग्नोसिस असते. म्हणजे तुमच्या लक्षणांवरून, न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशनवरून तसेच फॅमिली हिस्ट्री वरून निदान करतात. त्यासाठी ब्लड टेस्ट, सिटीस्कॅन, एमआरआय (MRI) किंवा इइजी (EEG) सारख्या टेस्टची गरज नसते. काही विशिष्ट केसेसमध्ये शंका समाधानासाठी इतर टेस्ट करून मायग्रेन व्यतिरिक्त अजून काही आहे का हे पाहतात.

मायग्रेन अटॅकमध्ये तीन ते चार स्टेजेस असतात. मायग्रेन विदाऊट ऑरा मध्ये तीन आणि मायग्रेन विथ ऑरामध्ये चार स्टेजेस असतात. प्रत्येक स्टेजमध्ये वेगवेगळी लक्षणे असतात.

मायग्रेनची गुंतागुंत (कॉम्प्लिकेशन्स):

1. दीर्घकालीन/क्रॉनिक मायग्रेन: व्यक्तीस महिन्यात 15 किंवा अधिक दिवस मायग्रेनचा त्रास होतो.
2. स्टेट्स मायग्रेनोसस: सहसा मायग्रेनचा झटका जास्तीत जास्त 72 तासांपर्यंत असतो. जर ते 72 तासांनंतर सुरु राहिल्यास त्याला स्टेटस मायग्रेनोसस म्हणतात.
3. पर्सिस्टन्ट ऑरा विदाऊट इन्फारक्शन: सामान्यतः ऑरा 20-60 मिनिटे टिकते. जर हे 60 मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकत असेल परंतु स्ट्रोकला कारणीभूत नसेल तर त्याला पर्सिस्टन्ट ऑरा विदाऊट इन्फारक्शन असे म्हणतात.
4. मायग्रेनस इन्फारक्शन / स्ट्रोक: ह्यामध्ये ऑराच्या काळात म्हणजे त्या २०-६० मिनिटात स्ट्रोक म्हणजे पॅरालीसीस चा अटॅक येतो. ही एक दुर्मिळ कॉम्प्लिकेशन आहे जी बहुदा तरुण स्त्रियांमध्ये होते. 45 वर्षाखालील स्त्रिया ज्या धूम्रपान करतात आणि गर्भनिरोधक गोळ्या घेतात, त्यांना जास्त रिस्क असते.
5. मायग्रेन ट्रिगर्ड एपिलेप्सी (मायग्रेलेप्सी): मायग्रेन ऑराच्या दरम्यान त्या व्यक्तीला फिट/सीझर येते.

मायग्रेनचा उपचार: ह्यामध्ये घरगुती उपाय, जीवनशैली मधील बदल, वेगवेगळी औषधे, थेरपी आणि काही उपकरणे यांचा समावेश आहे.

बरं झालं आपण अठराव्या शतकात नसून एकविसाव्या शतकात आहोत.😃😃😃😃😃

घरगुती उपाय:

  • शांत आणि अंधाऱ्या खोलीत आराम करा
  • आईस पॅक: एका स्वच्छ टॉवेलवर बर्फाचे काही तुकडे ठेवा आणि त्याने तुमचे डोकं आणि मान शेका.
  • डोक्याला मसाज करा
  • योगा करू शकता
  • मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. स्ट्रेसमुळे जास्त त्रास होऊ शकतो.
  • छोटीशी झोप घेतल्यामुळे फायदा होतो.

जीवनशैलीतील बदल/लाईफस्टाईल मोडिफिकेशन्स: मायग्रेनसाठी औषधोपचार घेण्यापूर्वी लाईफस्टाईल मोडिफिकेशन्स म्हणजेच जीवनशैलीतील बदल खूप महत्त्वाचे असतात.

  • झोप: अति कमी किंवा अति जास्त झोपेमुळे मायग्रेनचे झटके येण्याची शक्यता वाढते. त्यासाठी दररोज सात ते आठ तासांची आरोग्यदायी झोप महत्वाची असते. विकेंड किंवा सुट्टीच्या दिवशी सुद्धा झोपेचे वेळापत्रक सांभाळणे आवश्यक असते. झोप मोड होणार नाही याची दक्षता घ्या. पूर्ण लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा: आरोग्यदायी झोप
  • शारीरिक व्यायाम: आठवड्यातून 150 मिनिटे किंवा आठवड्यातून पाच वेळा वेळेस अर्धा तासाचा व्यायाम करावा. त्यामुळे शरीर आणि मन सुदृढ राहते. पूर्ण लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा: व्यायामाचे तंत्र
  • पुरेसे पाणी प्या: डिहायड्रेशनमुळे मायग्रेनचे झटके येण्याची शक्यता वाढते. साधे पाणी पिणे हा सर्वोत्तम पर्याय आहे  (साधारणतः २.५ ते ३.५ लिटर) कारण त्यात साखर, स्वीटनर नसते आणि कॅलरी कंट्रोल होते. पूर्ण लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा: पाणी म्हणजे जीवन
  • आहार: आहारामध्ये नियमितता असावी. जेवणाच्या वेळा चुकवणे, अवेळी जेवणे, भूक नसताना जेवणे आणि अति उपवास करणे या कारणामुळे मायग्रेनचा झटका येण्याची शक्यता असते. पूर्ण लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा: समतोल आहार
  • ताणतणाव: तणावामुळे मायग्रेन वाढण्याची शक्यता असते. दैनंदिन जीवनात प्रत्येकाला समस्या असतात आणि त्यामुळे स्ट्रेस असतो. म्हणून नियमित मेडिटेशन आणि योगा करा. त्यामुळे मन शांत राहण्यास मदत होईल. पूर्ण लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा: ब्रेन पॉवर (मानसिक आरोग्य)
  • वेदनाशामक औषधे/ पेन-किलर्सचा अती वापर करू नका. अति वापरामुळे मायग्रेन कमी होण्याऐवजी वाढू शकतो हे लक्षात ठेवा.

मायग्रेन जर्नल किंवा डायरी: यासाठी तुम्ही पेपर-पेन वापरू शकता किंवा स्मार्टफोन वरती ॲप्स उपलब्ध आहेत. कोणत्या तारखेला आणि कोणत्या वेळी मायग्रेन अटॅक आला, काय काय लक्षणे होती, आदल्या रात्री तुमची झोप व्यवस्थित झालेली होती का, तुम्ही कुठल्या तणावाखाली आहात का, वातावरणात काही बदल झालेला आहे का, तुमच्या खाण्यापिण्यात काही फरक झाला आहे का, डोकेदुखी कोणत्या प्रकारची आहे, 1 ते 10 स्केलवर किती तीव्र आहे, पेन किलर घेतले आहे का, अटॅक किती काळ टिकला अशा सर्व बाबींची नोंद करा. स्त्रियांमध्ये जर मासिक पाळी सुरू असेल तर त्याची पण नोंद ठेवा. ह्या डायरीमुळे तुमचे मायग्रेन ट्रिगर ओळखण्यास मदत होईल आणि त्यापासून दूर होता येईल.

मायग्रेन मेडिकेशन्स/औषधोपचार: ह्यामध्ये मुख्यतः दोन प्रकारची औषधे असतात. 

अबोर्टिव्ह थेरपी: ही औषधे मायग्रेन अटॅक आल्यानंतर घ्यायची असतात. त्याला रेस्क्यू मेडिसिन पण म्हणतात. ते फक्त एका अटॅक पुरतं काम करते. यामध्ये ओव्हर-द-काउंटर पेन-किलर्स/औषधे उदा.असिटॅमिनोफेन (पॅरासिटॅमॉल, टायलेनॉल), इबुप्रोफेन, ऍस्पिरिन किंवा नेप्रोक्सेन येतात. पेन किलरचा वापर आठवड्यातून दोन ते तीन पेक्षा जास्त वेळेस करू नये. नाहीतर रीबाउंड हेडेक होतो. औषधाचा डोस योग्य असला पाहिजे. खूप कमी किंवा खूप जास्त डोस घेऊ नये. तसेच ते घेण्याची वेळही तेवढीच महत्वाची असते. मायग्रेन सुरु झाल्यानंतर २० ते ३० मिनिटाच्या आत घेतल्यास जास्त फायदा होतो. जर पेन-किलर्स प्रभावी नसतील तर ट्रिपटान्सचे (Triptans) प्रेस्क्रीप्शन देतात. ट्रिपटान्स हे टॅबलेट, नेझल स्प्रे, इंजेक्शन किंवा स्कीन पॅचच्या स्वरूपात असतात.

प्रिव्हेंटिव्ह थेरपी: ज्या लोकांना महिन्यातून चार किंवा जास्त मायग्रेनचे अटॅक येत असतील तर त्यांच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह थेरपी किंवा प्रोफीलॅक्सिस मेडिसिन्सची गरज असते. जरी तुम्हाला रोज मायग्रेन होत नसेल तरीही ही औषधे रोज घ्यावी लागतात. ह्यासाठी खूप वेगवेगळी औषधे वापरतात.

  • बीटा ब्लॉकर्स (प्रोप्रेनॉलॉल, अटेनोलॉल, नाडोलॉल)
  • कॅल्शियम चॅनेल ब्लॉकर्स (वेरापॅमिल)
  • एंटीसीझर औषधे (टोपीरामेट, वॅलप्रोइकऍसिड)
  • एंटीडप्रेसन्ट्स (अमिट्रिप्टिलिन, नॉर्ट्रीप्टलिन)
  • कधीकधी, स्टिरॉइड वापरतात.
  • कॅल्सीटोनिन जनुक-संबंधी (सीजीआरपी) मोनोक्लोनल अँटीबॉडीज (एरेनुमॅब, फ्रीमेनेझुमॅब, गॅल्केनेझुमॅब)

व्हिटॅमिन, खनिज, हर्बल/औषधी वनस्पती (रिबॉफ्लेविन/ व्हिटॅमिन बी 2, मॅग्नेशियम, फीव्हरफ्यू, को-एंजाइम क्यू10) हे मायग्रेन प्रोफिलेक्सिस (प्रतिबंध) साठी उपयोगी आहेत असे दिसून आले आहे.

इतर: बायोफिडबॅक थेरपी (एक अशी पद्धत ज्यात शरीराच्या प्रतिक्रिया नियंत्रित करण्यास शिकवतात), अ‍ॅक्यूपंक्चर/अ‍ॅक्यूप्रेशर, मालिश/मसाज थेरपी आणि बोटॉक्स इंजेक्शन अशा पद्धतींचा अवलंब करतात.

मायग्रेन उपकरणे/डिवाइसेस: मायग्रेनच्या उपचारासाठी काही डिवाइसेस उपलब्ध आहेत. अमेरिकेत एफडीए (FDA) ने मंजूर केलेली तीन उपकरणे आहेत. मायग्रेनच्या उपचारांसाठी डिव्हाइसद्वारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक करंट वापरून न्यूरल सर्किट्समध्ये कार्यात्मक फेरबदल घडवून आणतात आणि त्यामुळे मायग्रेन बरा होतो.

ही उपकरणे वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. त्यांची नावे: ट्रायजेमिनल नर्व्ह स्टिमुलेशन (ई-टीएनएस), सिंगल पल्स ट्रान्सक्रॅ निअल मॅग्नेटिक स्टिम्युलेटर (एसटीएमएस) आणि नॉन-इंव्हेजिव्ह वेगस नर्व्ह स्टिम्युलेशन  (गॅमाकोर नॉन-इंव्हेजिव्ह वेगस नर्व्ह स्टिम्युलेटर).


16 Replies to “मायग्रेन/अर्धशिशी”

    1. लेखात दिल्याप्रमाणे मायग्रेन डायरी, लाईफ स्टाईल चेंजेस आणि अयिबुप्रोफेनच्या गोळ्या घेऊन पहा. त्यानंतर जर महिन्यातून किमान ४ वेळेस मायग्रेन होत असल्यास डॉक्टरांकडे जाऊन मेडिसिन घ्या.

        1. माझे क्लिनिक अमेरिकेत आहे. तुम्हाला अमेरिकेला यावे लागेल😀

          1. ह्या वेबसाईट वर वैद्यकीय सल्ले दिले जात नाहीत. कृपया, तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारा.🙏

  1. हा आजार खूप जणांना आहे खूप छान माहिती सगळ्यांना उपयोगी पडेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *