भेटी लागी जीवा


सहसा लोक दरवर्षी किंवा एक वर्षाआड इंडियाला ये-जा करत असतात. पण आम्हाला मात्र या वेळेस खूप गॅप आला. डिसेंबर 2018 मध्ये इंडियाला जाऊन आल्यानंतर दीड वर्षांनी कोविड पँडेमिक सुरु झाला. त्यात जवळपास चार-पाच वर्षे गेली. त्यानंतर जायचं म्हणेपर्यंत 2025 उजाडले. यावर्षी मात्र ठरवलं होतं की काहीही झालं तरी इंडियाला जायचं. माझे मन सारखे म्हणत होते “भेटी लागी जीवा…लागलीसे आस” मुलांना काही येणं जमणार नव्हतं. नवरोबा आधी नाही म्हणत होते पण पुन्हा माझ्यासोबत येण्यास तयार झाले. आमच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना सलग २ आठवड्याची सुट्टी मिळू शकते. त्यापेक्षा जास्त हवी असेल तर आमच्या चेयरमनची परमिशन घ्यावी लागते (जास्तीत जास्त ३ आठवड्याची परवानगी देतात). मला परवानगी मिळाली आणि आम्ही लगेच विमानाची तिकिटे बुक केली. तीन आठवड्यात खूप लोकांना भेटायचे होते आणि खूप ठिकाणी फिरायचे होते. त्यासाठी वेळ कमीच पडणार होता. मी पितृपक्षातला पहिला आठवडा आणि मग नवरात्र असा तीन आठवड्यांचा प्लान फिक्स केला. पितृपक्षांमध्ये कोणतेही शुभ कार्य नसतात. त्यामुळे सगळे कमी बिझी असतील  आणि सगळ्यांना भेटता येईल. तसेच माझ्या प्रिय सिताफळांचाही आस्वाद घेता येईल असाही थोडा विचार होता.

मला शालेय मैत्रिणींचा म्हणजे बालसखींचा तसेच MBBS फ्रेंड्स म्हणजे मैत्र जीवाचे असे दोन गेट-टुगेदर सुद्धा अटेंड करायचे होते. मग एकदा प्लॅन फिक्स झाला आणि मग ग्रुप व्हिडिओ कॉल करून सगळ्या नातेवाईकांना, शाळा-कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींना कळवून टाकलं. उत्साहात सगळी तयारी सुरू झाली. मी ह्या वेळेस ठरवले होते की जास्तीत जास्त लोकांना भेटायचं. नाही म्हटलं तरी पावणेसात वर्षांचा काळ लोटला होता. सगळ्यांची खूप आठवण येत होती. 12 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर असा आमचा तीन आठवड्यांचा भारत दौरा ठरला होता. मग काय सकाळ संध्याकाळ इंडियाहून फोन्स सुरू झाले. सगळ्यांचे आपापल्या परीने प्लान सुरू झाले होते. सगळ्या ग्रुप्समध्ये चर्चा सुरु झाली. इकडे माझा पण कोणत्या दिवशी कोणाकडे जायचे ह्याचा प्लॅन सुरु झाला. जसे नरेंद्र मोदींनी म्हंटले होते कि “घर में घुसके मारेंगे”, तसे ” घर में घूस के मिलूंगी” असे माझे जणू ब्रिदवाक्य बनले. 😂 जोक्स अपार्ट, पण भाऊ-वहिनी, बहिणी-भाऊजी, भाचे -भाची, मामा-मामी, मामे भावंडे, मावशी-काका, मावस भावंडे, चुलत भावंडे, सासरकडची सगळी मंडळी, सगळी मित्र मंडळी आणि आप्तेष्ट असे सगळ्या सगळ्यांकडे जाऊन भेटायचे ठरवले.

मला पाच भाऊ आहेत त्यामुळे माहेर म्हणजे पाच घरे. त्यापैकी एक वहिनी (संगीता वहिनी) गुजरातला असते आणि गुजरातला जाण्यासाठी माझ्याकडे वेळ नसल्यामुळे बाकीच्या चार जणांकडे जायचं होतं. चार पैकी एक भाऊ हैदराबादला आणि बाकीचे तीन घरं देगलूरला. तिकडे सगळ्यांची तयारी सुरू होती आणि इकडे माझी तयारी. सगळ्यांसाठी गिफ्ट घ्यायचे होते. काय घ्यावं असा विचार सुरू होता. सासरी आणि माहेरी खूप मोठा गोतावळा असल्यामुळे सगळ्यांसाठी इथून गिफ्ट नेणे शक्य नव्हते. त्यामुळे मी असं ठरवलं की इंडिया मध्येच काहीतरी घेऊन सगळ्यांना द्यायचं. कर्नाटकातल्या बिदर गावी काही लोकल कलाकार असतात. ते दोन मेटल एकत्र करून त्यापासून खूप सुंदर मुर्त्या आणि वॉल हँगिंग तयार करतात. मला वाटलं की त्या छोट्या कलाकाराला मोठी ऑर्डर देऊन मदत करता येईल आणि नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे गिफ्ट्स दिले जातील. त्यासाठी माझी भाची आरती हिची खूप मदत झाली. तिने सगळे संपल्स मला व्हाट्सअप द्वारे पाठवले. मग सुंदर राधाकृष्ण आणि तिरुपती बालाजी असे ३५ गिफ्ट ऑर्डर केले. मी जाईपर्यंत सगळे गिफ्ट्स तयार झाले होते.

आम्ही ठरवलं की हैदराबादला भावाकडे जायचं. त्यांना भेटून, तिथे थोडीशी शॉपिंग करून मग देगलूर ला जायचं. आम्हाला न्यूयॉर्कच्या एअरपोर्टला जायचे होते. योगायोगाने माझा मुलगा १२ सप्टेंबरला फ्री असल्यामुळे त्याने आम्हाला एअरपोर्टला सोडले. तिथून आबूधाबीला जायचे होते आणि मग तिथून हैद्राबादला. पूर्ण प्रवासात झोप आली नाही. १७-१८ तासांचा प्रवास करून आम्ही १३ सप्टेंबरला इंडियात पोहोचलो. हैदराबादला एअरपोर्टवर माझा भाऊ कृष्णा, भाचा पियुष, पियुषची बायको सौजन्या आणि त्यांचा मुलगा अद्वैत असे सगळे बुके घेऊन आमचे स्वागत करायला आले. खूप वर्षांनी गेल्यानंतर भरपूर गप्पा झाल्या. मग दोन अडीच दिवस भरपूर शॉपिंग केली. माझी भाची ऋता पण आली होती. तिची शॉपिंगसाठी खूप मदत झाली. हैदराबादच्या फेमस शरत सिटी मॉलमध्ये आम्ही सगळ्यांनी खूप मजेत दिवस घालवला.

हैद्राबादला माझे दोन मामा तसेच काही मामेभावंडं आणि मावसबहीण असते. सूर्यकांतमामाच्या घरी आम्ही एक गेट-टुगेदर केलं. खूप वर्षांनी सगळ्यांना भेटून अतिशय आनंद झाला.

देगलूरला प्रथम सगळ्यात लहान भाऊ लक्ष्मण, त्याची बायको संध्या आणि सोनल-तेजस (भाची-भाचा) त्यांच्याकडे जायचं ठरलं कारण त्यांचा खूप आग्रह होता. तेजस मला हैदराबादला घ्यायला आला आणि 16 तारखेला मी देगलूरला गेले. वाटेत मिर्झापूरच्या हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. देगलूरला फुलांच्या रांगोळीने स्वागत झाले. त्या दिवशी संध्याकाळी संध्याचा वाढदिवस होता. छान योग जुळून आला होता. आम्ही सगळ्या फॅमिली मेंबर्सनी तिचा बर्थडे साजरा केला. खूप वर्षांनी मनसोक्त सीताफळे खाल्ली.

 17 तारखेला जुक्कलला माझ्या मावशीकडे जायचं ठरलं. त्यासाठी माझी मोठी बहीण उदगीरहून आली. आम्ही माझ्या मावस बहिणीला (विजयाला) घेऊन मावशीकडे गेलो. मावशीकडे भरपूर तयारी सुरू होती. त्यांचं नवीन घर पाहण्यात आलं. सगळ्यांची भेट झाली. चांदीच्या ताटात बासुंदी-पुरी-बिर्याणी आणि बऱ्याच काही पदार्थांनी आमचा पाहुणचार झाला. मग आहेर वगैरेचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही देगलूरला परतलो. मला देगलूरच्या गजानन महाराज मंदिरात जाऊन दर्शन घ्यायची खूप इच्छा होती आणि ती तेजसने पूर्ण केली.

अठरा तारखेला मी देगलूरच्या डॉक्टर गायकवाड आणि डॉक्टर एकलारेना भेटून आले. लग्नाआधी देगलूरला मी ज्या डॉक्टरांसोबत काम करत होते त्यांना सगळ्यांना भेटायची खूप इच्छा होती. पण वेळेअभावी राहून गेले. माझा चौथा नंबरचा भाऊ डॉक्टर रमेश आणि त्याची बायको डॉक्टर गीता आणि मुलगी गार्गी. मी गीता सोबत 18 तारखेला नांदेडला गेले. सर्वात प्रथम संध्याची आई म्हणजे व्यवहारे मामी आणि साईनाथला भेटले. त्यानंतर बंडेवारकडे गेले जिथे संगीता वहिनी गुजरातहून आल्या होत्या. बंडेवार त्यांचे माहेर. तिथे पण आमचं छान स्वागत झालं. कितीतरी वर्षांनी मी ह्या सगळ्यांना भेटत होते. गीताने नांदेडच्या सराफाकडे नेऊन मला एक नेकपीस घेऊन दिले. तिथून नीताताई आणि अनिल भाऊजी यांच्या घरी आले. तिथे पण माझे जोरदार स्वागत झाले. माझ्यावर पुष्पवृष्टी करत औक्षण करून स्वागत केले. नीता ताईच्या घरी मी नऊ वर्षांनी गेले होते. 19 तारीख उजाडला. मोठ्या भावाचा मुलगा योगेश मुंबईहून नांदेडला आला. त्याची पण खूप वर्षांनी भेट झाली होती. त्यानंतर संगीता वहिनीपण नीताताई कडे आल्या. मग आम्हा सगळ्यांचे जेवण, गप्पा-टप्पा झाल्या. तसेच तुप्तेवारकडे (माझा भाचा अभिजीतची सासुरवाडी) धावती भेट देऊन आले.

ह्या ट्रिप मध्ये माझ्या चारही भावजयीच्या मातोश्रींना भेटण्याचा योग जुळून आला.

त्यानंतर नीताताई आणि अनिल भाऊजी सोबत नांदेडच्या गुरुद्वाराला भेट दिली. तिथून बालाजी मंदिरात दर्शन घेऊन मग आम्ही शॉपिंग करायला निघालो. सोन चाफ्यामध्ये जाऊन माझ्या मैत्रिणींसाठी आणि माझ्या मुलीसाठी काही खरेदी केली. 20 तारखेला नीताताई भाऊजींचा निरोप घेऊन मी बालसखीच्या गेट-टुगेदर ला गेले.

नांदेडच्या गेट-टुगेदर वरचा लेख:

इथे क्लिक करा: आमची यारी जगात भारी!

 

२० सप्टेंबरला संध्याकाळी लातूरला जाऊन MBBS फ्रेंड्सचे गेट-टुगेदर जॉईन केले.

MBBS फ्रेंड्सचे गेट-टुगेदर वरचा लेख:

इथे क्लिक करा: दोस्ती नाय तर मस्ती नाय!

 

२१ सप्टेंबरला लातूरचे गेट-टुगेदर झाल्यानंतर मी आणि माझी मैत्रीण सुनंदा मिळून संगीताच्या घरी गेलो. तिथे गप्पा-कॉफी वगैरे झाल्यानंतर मी सुनंदाच्या घरी गेले. मग सुनंदाने मला ऋताच्या घरी सोडले. ऋता सोबत जयू कडे गेले. तिथून आम्ही तिघी मीरा आणि कीर्तीकडे जाऊन आलो. ऋता, जयू आणि कीर्तीने मला छान छान साड्या दिल्या. मीरने मोत्याची रांगोळी दिली. ऋताच्या कारने मी, ऋता आणि जयू उदगीरला निघालो. लातूर सोडण्याआधी माझ्या भावाच्या सासुरवाडी म्हणजे गंजेवारकडे धावती भेट घेतली आणि आमची स्वारी उदगीर कडे निघाली. उदगीरच्या आमच्या मैत्रिणीचे म्हणजे सुशीलाचे आग्रहाचे निमंत्रण होते. म्हणून आधी तिच्याकडे गेलो.

माझ्यासोबत ऋता आणि जयू अशा तीन मैत्रिणी तिच्या घरी आलेल्या पाहून सुशीलाला आभाळ ठेंगणे झाले होते. काय करू अन काय नको अशी तशी तिची अवस्था झाली होती. तिने आम्हा सगळ्यांचे औक्षण केले. आम्ही पण तिचे औक्षण केले. तिने अक्षरशः शाल पांघरून, पुष्पगुच्छ देऊन, आहेर करून माझा सत्कार केला. तिच्या भावी सुनेला पण बोलावून घेतले. त्या सगळ्यांची भेट घेऊन आम्ही माझ्या मोठ्या बहिणीकडे आलो. बहिणीने पण औक्षण करून माझे स्वागत केले. ऋता आणि जयू त्या रात्री परत लातूरला निघून गेल्या. मी भयंकर थकून गेले होते. मग मी ठरवलं दुसऱ्या दिवशी कुठे जायचं नाही. फक्त विश्रांती घ्यायची. माझे हैदराबादहून देगलूर-जुक्कल-नांदेड-लातूर-उदगीर फिरून होईपर्यंत माझा नवरा हैदराबादला होता. मग 23 तारखेला तो उदगीरला आला. आम्ही सगळे मिळून माझ्या मामे बहिणीकडे (कोटलवार) तसेच माझ्या शालेय मैत्रिणीकडे (सुवर्णमालाकडे) जाऊन भेटून आलो.

24 तारखेला देगलूरला जायचे होते. देगलूरला जाण्याआधी माझ्या मैत्रिणीची (सुषमाची) बहीण, संध्याताई, कडे भेट दिली. आम्ही देगलूरला सत्यवती वहिनी, ज्या माझ्या मोठ्या वहिनी आहेत, त्यांच्याकडे गेलो. भाचा राकेश, त्याची बायको स्वपना आणि मुली आराध्या-आरोही असे सगळ्यांनी आमचे स्वागत केले. वहिनींनी भाकर तुकडा ओवाळून टाकले. चांदीच्या ताट-वाटीत माझ्या आवडीचे पदार्थ करून वाढले. राकेशने माझ्या फॅमिलीसाठी प्रत्येकाचे नाव लिहिलेली/कोरलेली किचेन्स दिली. त्याचदिवशी म्हणजे २४ सप्टेंबरला चार वाजता देगलूरच्या नगरेश्वर मंदिरामध्ये आर्य वैश्य महिला मंडळातर्फे माझा सत्कार आणि भाषण ठेवण्यात आले होते. 

मी पैठणी नेसून नगरेश्वर मंदिरला गेले. तिथे खूप जणांची भेट झाली. खूप छान वाटलं. 

माझ्या तीन गोड मैत्रिणी, सुषमा-मधुमती-संध्या तिथे आल्या. त्या तिघींनी पण माझा सत्कार केला. गिफ्ट दिले.

मग तिथे माझे अर्धा तास भाषण झाले. त्या भाषणामध्ये मी माझे थोडेसे बॅकग्राऊंड सांगितले. त्यानंतर लहान मुलांच्या ब्रेनची वाढ आणि मेंदूचे विकार याबद्दल सोप्या भाषेमध्ये सगळ्यांना समजेल असे सांगितले.

त्यानंतर शाल-बांगड्या-श्रीफळ आणि ओटी भरून देवीच्या सानिध्यात माझा सत्कार करण्यात आला. बऱ्याच जणांनी येऊन मेडिकल प्रश्न विचारले. वेळेअभावी इच्छा असूनही सगळ्यांना मदत करता आली नाही.

त्यानंतर इंदू मावशी वट्टमवारकडे गेले. त्यांना भेटून मग चुलत बहिणीकडे म्हणजे सिंधुताई कडे गेले. तिच्या फॅमिलीला भेटून छान वाटले. तिथून माझे दोन्ही लहान भाऊ आणि भावजया सगळे मिळून आम्ही मोठ्या वहिनींकडे गेलो. सीताफळे खात, गप्पा-जोक्स मधे वेळ कसा गेला कळलेच नाही. दिनेश भाऊंनी अतिशय सुंदर अशी कृष्णाची मूर्ती माझ्यासाठी पाठवली. 25 तारखेला मोठ्या वहिनी, राकेश, स्वपना, आराध्या आरोही असा सगळ्यांचा निरोप घेऊन अशोकदादा-आशावहिनी नारलावारकडे गेलो. त्यांनी आमचे जोरदार स्वागत केले. शाल पांघरून, हार घालून, आहेर करून माझा सत्कार केला. तिथून डॉक्टर भावाच्या घरी आले. मुक्ताकडून कच्च दूध आलेलं होतं. मग खरवस एन्जॉय केला. 27 तारखेला सकाळी लहान भावाकडे (लक्ष्मण कडे) गेले. तिथे संध्याने जेवणाची उत्तम तयारी करून ठेवलेली होती. आमची सगळ्यांची जेवणे झाली. पाऊस पडत होता आणि तिथून आम्हाला निजामाबादला जायचे होते. सगळ्यांचा निरोप घेऊन निघेनिघेपर्यंत संध्याकाळचे सात वाजले. पावसामुळे सगळ्यांचा आग्रह होता की आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी जावे. रात्रीचा प्रवास टाळावा. पण आम्ही सगळ्यांना हमी दिली की रस्त्यात जर काही वाटले तर आम्ही परत येऊ. आम्ही निघालो आणि सुखरूप पणे निजामबादला साडेनऊला पोहोचलो. आम्ही तिकडे पोहोचलो आणि इकडे देगलूरला ढगफुटी झाली आणि तीन दिवसासाठी रेड अलर्ट जाहीर झाला. आम्हाला दैवाची साथ होती. आम्हाला कुठेही अडचण आली नाही. मी जिथे जाईन तिथे सगळ्यांनी माझ्या आवडी-निवडी लक्षात ठेवून मला भरपूर खाऊ-पिऊ घातले. कोणी काय खाऊ घातले ह्याबद्दल इथे सांगणे शक्य नाही.

निजामाबादला लहान नणंद, ललिता असते. तिने वेलकम रांगोळी काढली आणि फुलांचा वर्षाव करून औक्षण करून आमचे स्वागत केले. 28 तारखेला आम्ही निजामबादला थोडी शॉपिंग केली. इथे माझ्या हॉस्पिटलमध्ये स्टाफला देण्यासाठी म्हणून मी तिथून तीन डझन डफल बॅग्स घेतले. आणखी काही वस्तूंची शॉपिंग झाली. मग आम्ही सगळ्यां सासरच्या लोकांना फोन करून दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 29 तारखेला गेट-टुगेदरला येण्याचे सांगितले. जेवणाचा मेन्यू ठरवला आणि केटरिंग साठी ऑर्डर दिली. रविवार उजाडला. नऊ-दहा पासून एकेक करत सासरची सगळी मंडळी एकत्र जमा झाली. माझ्या नवऱ्याला तीन भाऊ आणि चार बहिणी, दोन पुतण्या आणि सात-आठ भाच्या असा मोठा गोतावळा आहे. सगळ्यांची भेट झाली. सगळ्यांची जेवणे झाली. मी राधाकृष्णाचे गिफ्ट आणि अमेरिकेहून नेलेले चॉकलेट सगळ्यांना दिले. मोठ्या जाऊबाईने आमच्यासाठी आहेर आणि फुलांच्या मोठ्या माळा आणल्या होत्या, आमची मॅरेज ॲनिवरसरी ॲडव्हान्स मध्ये साजरा करण्यासाठी कारण डिसेंबर पर्यंत आम्ही तिथे राहणार नव्हतो. त्यामुळे पण अजून मजा आली. आम्ही एकमेकांना प्रपोज करून काही रिल्स करून गंमत केली. नवऱ्याच्या बहिणीने त्यांना राख्या आणि मला फ्रेंडशिप बॅण्ड बांधला. अशा प्रकारे तो दिवस अतिशय आनंदात गेला.

सोमवारी राहिलेली कामे करून घेतली आणि मग मंगळवारी मी छोट्या नणंदेला सोबत घेऊन माझ्या सासरी म्हणजे आरमुरला गेले. आरमूरला पाय ठेवताच सासूबाईंची तीव्रतेने आठवण आली. मागच्या इंडिया ट्रिपमध्ये त्या होत्या आणि आता त्या दिसणार नव्हत्या. तीन जावांकडे, नणंदेकडे आणि पुतण्याकडे घरी जाऊन सगळ्यांना भेटले. लहान जावेने पुष्पगुच्छ देऊन, पुष्पवृष्टी करून छान स्वागत केले. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. आम्ही दोघे मुपकाल गावी गेलो. तिथे अजून एक नणंद असते. तिने पण औक्षण करून आमचे स्वागत केले. जेवणे वगैरे झाली. मी वेळात वेळ काढून धनपाल काकाकडे जाऊन भेटून आले. मग आम्ही निजामाबादला परतलो. जवळपास सगळ्यांना भेटून झालेले होते.

बुधवारी (१ ऑक्टोबर) तेलंगणाचा मोठा सण बतूकम्मा होता. दुसऱ्या दिवशी दसरा होता. कितीतरी वर्षांनी इंडियामध्ये दसरा साजरा केला. जेवणे वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही काही ठिकाणी देवी चे देखावे पाहायला गेलो. एके ठिकाणी 50 मुखांची देवी होती आणि दुसरीकडे कालिका देवीचे डेकोरेशन होते. त्यानंतर विठ्ठल-रुक्माई मंदिरात जाऊन आलो. तसेच एका तेलगू प्रोडूसर, दिल राजू यांनी बांधलेले तिरुपतीचे मंदिर पाहून आलो. त्या रात्री नणंदेच्या जावेची फॅमिली आम्हाला भेटायला आली. त्यानंतर आमची पॅकिंग सुरू होती. बघता बघता परत येण्याचा दिवस उजाडला. 3 ऑक्टोबरला संध्याकाळी आमची फ्लाईट होती. सकाळी नाश्ता करून सगळ्या ब्यागा घेऊन निझामाबादहून थेट हैद्राबादच्या एरपोर्टला निघालो. एअरपोर्टला गेल्यानंतर नवऱ्याचे दोन भाचे, शेखर आणि श्रवण म्हणजे त्यांच्या दोन बहिणींची मुले त्यांच्या बायका मुलांसहित एअरपोर्टला येऊन भेटणार होते. शेखरने कदंबाच्या लाकडातून कोरलेली बाप्पांची मूर्ती माझ्यासाठी एअरपोर्टला घेऊन आला. एका भाच्याने माझ्यासाठी सीताफळं, जेवण आणलं होतं. फ्लाईटमध्ये बसेपर्यंत सीताफळाचा आस्वाद घेता आला.

तिथे गप्पा, कॉफी वगैरे करून, सगळ्यांना बाय बाय करून, इंडियाला बाय बाय करून आम्ही आबूधाबीला निघालो. आबूधाबीहुन चार तारखेला न्यूयॉर्कला JFK एअरपोर्टला पोहोचलो. असा आमचा तीन आठवड्यांचा भरगच्च कार्यक्रमांनी सजलेला, नेहमीसाठी आठवणीत राहणारा, आपुलकी आणि प्रेमाने चिंब भिजलेला दौरा होता. सगळ्यांचे भरभरून प्रेम मिळाले आणि माझे मन प्रफुल्लित झाले. खूप वर्षांनी मायदेशी जाऊन येण्याचा अनुभव वेगळाच असतो. पूर्ण ट्रिप अतिशय समाधानकारक झाली. तरीही मनाच्या एका कोपऱ्यात माझे आई-बाबा, सासूबाई आणि दोन स्वर्गवासी तसेच दोन भावांची, दोन स्वर्गवासी नणंदाची खूप उणीव भासली.😒


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *