भावनिक बुद्धिमत्ता


हा लेख इंग्लिशमध्ये वाचण्यासाठी इथे क्लिक करा: Emotional Intelligence

आपल्या सर्वांना बौद्धिक पातळी (IQ) किंवा बुद्ध्यांक हा शब्द माहित आहे, जे तुमच्या बुद्धिमत्तेचे मोजमाप आहे. ते एका संख्येने व्यक्त केले जाते. तुम्ही इमोशनल इंटेलिजन्स (EI) किंवा इमोशनल कोशंट (EQ) ज्याला मराठीत भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात हा शब्द ऐकला आहे का? स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवता येणे, इतरांशी सुसंवाद साधता येणे, वागण्यात व स्वभावात लवचिकपणा असणे ह्याला भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात.

आयुष्यातील एकूणच यशासाठी IQ पेक्षा EQ महत्वाचा मानला जातो! उदाहरणार्थ, तुमचा IQ तुम्हाला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देऊ शकतो, परंतु तुमचा EQ तुम्हाला परीक्षेला सामोरे जाताना तणाव आणि भावनांचे व्यवस्थापन करून यशस्वी होण्यास मदत करतो. तुम्ही पाहिले असेल कि काही शैक्षणिकदृष्ट्या हुशार लोक त्यांच्या वैयक्तिक संबंधांमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी अयशस्वी झालेले दिसतात. त्यामुळेच, आजकाल अनेक कंपन्या कामावर नेमण्याआधी EQ चेक करवूनच जॉब देत असताना दिसत आहेत. भावनिक बुद्धिमत्तेची पातळी मोजण्यासाठी विविध मूल्यांकन चाचण्या उपलब्ध आहेत. मानसिक आरोग्य व्यावसायिकाद्वारे चाचणी केली जाते. तुमचा IQ तसेच EQ चांगला असल्यास तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप यशस्वी होऊ शकता!

भावनिक बुद्धिमत्तेचे घटक: भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख पाच घटक आहेत.

  1. स्व-जाणीव/आत्मप्रचिती (सेल्फ अवेरनेस): स्वतःच्या भावना जाणणे तसेच सामर्थ्य आणि कमकुवतपणा ओळखूण घेण्याची क्षमता असणे. तुमच्या भावना आणि कृतींचा इतरांवर कसा परिणाम (चांगला किंवा वाईट) होतो ह्याची जाणीव असणे. ज्याला अशी आत्मप्रचिती किंवा आत्म-जागरूकता असते ती व्यक्ती नम्र म्हणवली जाते.
  2. स्वनियमन/आत्मनियमन (सेल्फ रेग्युलेशन): म्हणजे तुमच्या भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे हे जाणून घेणे, सुयोग्य पद्धतीने भावनांची हाताळणी करणे, नैराश्यातून व्यवस्थितपणे बाहेर पडणे, कोणताही निर्णय सद्सद्विवेकबुद्धिने घेणे, प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेणे, कृती करण्यापूर्वी विचार करणे आणि त्याचे परिणाम जाणून घेणे.
  3. सामाजिक कौशल्ये (सोशल स्किल): समाजातील विविध प्रसंग, घटना यांची अचूकपणे जाणीव, नातेवाईक व समाजातील अन्य व्यक्तींबरोबर सुरळीत संबंध, मन वळविण्याची तंत्रे, श्रवणकौशल्य, नेतृत्त्व, वादविवाद, सहकार्य इत्यादींचा समावेष होतो.
  4. समानानुभूती (इम्पॅथी): यामध्ये इतरांच्या भावना, संवेदना समजून घेणे, त्याबद्दल जाणीव असणे, एखाद्या प्रसंगाकडे इतरांच्या दृष्टीने पाहता येणे किंवा त्या दृष्टीने विचार करता येणे, समाजातील विविध प्रकारच्या भिन्नतेची जाणीव होणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.
  5. प्रेरणा (मोटिव्हेशन): यामध्ये आपल्या जीवनाची ध्येये ठरविणे, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, निराशेवर मात करून आशावादी राहण्याचा प्रयत्न करणे इत्यादी बाबींचा समावेश आहे.

जर भावनिक बुद्धिमत्ता खूप चांगली असल्यास:

  1. शाळेत किंवा कामाचा परफॉर्मन्स खूप चांगला होतो. उच्च भावनिक बुद्धिमत्ते मूळे गुंतागुंत सोडवणे, नेतृत्व करता येणे आणि भरपूर प्रगती करून यशस्वी होणे सोपे जाते.
  2. शारीरिक आरोग्य चांगले राहते: अनियंत्रित तणाव/स्ट्रेस मूळे रक्तदाब वाढतो, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो, वंध्यत्वास कारणीभूत होतो तसेच व्यक्ती लवकर वृद्धत्वाकडे झुकते. ज्या व्यक्तीमध्ये भावनिक बुद्धिमत्ता सुदृढ असते, त्यांना स्ट्रेस चांगले म्यानेज करता येतो आणि शारीरिक आरोग्य चांगले राहते.
  3. मानसिक आरोग्य चांगले राहते- अनियंत्रित भावना आणि तणाव तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतात, ज्यामुळे तुम्ही नैराश्याला बळी पडू शकता. भावनिक बुद्धिमत्ता उत्तम असणारे जीवनात यशस्वी व समाधानी असतात. त्यांच्यात आनंद, परिपूर्णता, स्वनियंत्रण, मैत्री, जागरुकता, प्रशंसा, मानसिक शांतता, समाधान अशा अनेक भावनांचा निरोगी समतोल दिसून येतो. याउलट, ज्या व्यक्तिची भावनिक बुद्धिमत्ता कमी असते असे लोक एकटेपणा, भिती, दडपण, निराशा, राग, चिडचिड, आळस, रिकामेपणा इत्यादी भावनांना बळी पडतात. लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा: ब्रेन पॉवर (मानसिक आरोग्य)
  4. नातेसंबंध– भावना समजून घेण्याची, नियंत्रित करण्याची आणि त्या व्यक्त करण्याची तसेच इतरांना समजून घेण्याची क्षमता दृढ नातेसंबंध निर्माण करण्यास मदत करते.
  5. सामाजिक बुद्धिमत्ता– चांगला EQ तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या इतर लोकांना जोडण्यात मदत करतो. अश्या सोशल कनेक्शन मूळे तुम्हाला प्रेम मिळते आणि आनंदी वाटते.

कमी EQ असल्याची लक्षणे:

  • इतर लोक मला समजून घेत नाहीत असे वाटणे
  • लगेच नाराज होतात
  • भावनांनी भारावून जातात
  • ठाम राहता येत नाही
  • त्यांच्या समस्यांसाठी इतरांना दोष देतात
  • एखाद्या समस्येला व्यवस्थित तोंड देता येत नाही
  • नातेसंबंध टिकवता येत नाहीत
  • असंवेदनशीलपणे वागतात
  • नेहमी स्वतःचेच बरोबर असले पाहिजे असा अट्टाहास करतात

उच्च EQ असल्याची लक्षणे:

  • त्यांच्या भावना आणि त्यानुसार वागण्याची क्षमता असते
  • तणावपूर्ण परिस्थितीत शांत आणि संयमित राहतात
  • इतरांवर प्रभाव टाकण्यास सक्षम असतात
  • कठीण लोकांना कुशलतेने आणि मुत्सद्देगिरीने हाताळू शकतात
  • स्वतःमधल्या गुण आणि दोषांची जाणीव असते 
  • लोकांच्या भावना ओळखण्याची क्षमता असते
  • आत्मविश्वासू आणि खुल्या मनाचे असतात
  • मनात अढी (grudges) ठेवत नाहीत 

आनंदी जीवन जगण्याकरिता उच्च भावनिक बुद्धिमत्तेची गरज असते. काही लोकांना उपजतच चांगला EQ असतो. आपल्याला आपला IQ बदलता येत नाही पण प्रयत्नाने EQ थोड्या फार प्रमाणात सुधारू शकतो.

EQ कसा सुधारायचा हे जाणून घेण्यात तुम्हाला स्वारस्य असेल, होय ना ?

  • तुमच्या भावना कधीच चुकीच्या नसतात. ते तुम्हाला मदतच करतात. म्हणून तुमच्या भावनांबद्दल प्रामाणिक रहा. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या भावना प्रमाणित करायला शिकता तेव्हा तुम्हाला इतरांच्या भावनांचे आकलन होणे सोपे जाते.
  • ऐकण्याची कला – लोक तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत याकडे लक्ष देणे ही पहिली पायरी आहे. त्यांचे शब्द तसेच देहबोली तुम्हाला इतर लोकांच्या भावना समजून घेण्यास मदत करतील.
  • तुम्ही लोकांवर कशी प्रतिक्रिया देता ते पहा. स्वतःला पडताळून पाहण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे डायरी ठेवणे. प्रत्येक दिवसाच्या शेवटी तुमच्यासोबत काय घडले, ते तुम्हाला कसे वाटले आणि तुम्ही ते कसे हाताळले ते लिहून काढा आणि त्याचा अभ्यास करा.
  • तणावपूर्ण परिस्थितीत तुम्ही कशी प्रतिक्रिया देता ते तपासा. जेव्हा काही चुकते तेव्हा आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत रहा.
  • सर्व तथ्य जाणून घेण्याआधी निर्णयाला येण्याची घाई करू नका.
  • तुम्हाला कोणत्या गोष्टी मोटिवेट करतात/ प्रेरित करतात हे समजून घ्या आणि त्याचा योग्य वापर करा.
  • सहानुभूती दाखवा- इतरांचे प्रॉब्लेम ऐकताना त्या परिस्थितीत स्वतःला उभे करा आणि तुम्हाला कसे वाटेल याची कल्पना करा. सहानुभूतीचा सराव केल्याने तुम्हाला भावनिक समज निर्माण होण्यास मदत होऊ शकते.
  • चिंतन करा– समोरच्या व्यक्तीला असे का वाटत आहे, त्यांच्या भावना तुमच्या भावनांपेक्षा वेगळ्या कशा आहेत याचा तुम्ही विचार केल्यास लोकांना समजणे सोपे होईल.
  • तणाव कमी करण्यासाठी विनोद आणि खेळाचा वापर करा. लौफ्टर म्हणजे हास्य-विनोद हे सर्वोत्तम औषध आहे! विनोदामुळे आणि हास्यामुळे मेंदू सक्रिय होतो, तणाव कमी होतो, मन शांत होते आणि क्रिएटिव्हिटी वाढते. हशा लोकांना अधिक व्यापकपणे विचार करण्यास मदत करते. जोक्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा: हास्य विनोद..कोरोना सोबत! आणि हसताय ना ?
  • आपल्या कृतींची जबाबदारी घ्या. जर तुम्ही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर थेट माफी मागा. तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केल्यास लोक सहसा क्षमा करण्यास आणि विसरण्यास तयार असतात.
  • सकारात्मक दृष्टीकोन राखण्याचा सतत प्रयत्न करा. सकारात्मक वृत्तीच्या सामर्थ्याला कमी लेखू नका. प्रेरित राहण्यासाठी सकारात्मक आणि आशावादी मानसिकता राखणे महत्त्वाचे आहे.
  • टीकेचा नीट वापर करा. टीका दोन प्रकारची असते. रचनात्मक टीकेमध्ये सुधारणा कशी करता येईल यावरील सूचनांचा समावेश असतो. विध्वंसक टीका हे बहुतेक वैयक्तिक हल्ले असतात. नाराज होण्याऐवजी टीका कोठून येत आहे, कोण आणि का करत आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्या टीकेचा योग्य वापर करायचा कि त्याकडे दुर्लक्ष करायचे हे ठरवा.
  • गरज असेल तिथे उपलब्ध व्हा आणि तुमच्या उपस्थितीने सकारात्मकता वाढवा.
  • नकारात्मकता कमी करा. त्यामुळे भावनांचे ओझे वाहावे लागणार नाही.
  • शब्द हे शस्त्र असतात. त्यांचा योग्य वापर करा. शब्दाने जखमेवर फुंकर ही घालता येते तसेच घायाळ ही करता येते.
  • क्षमाशील व्हा. क्षमा करा, विसरा आणि तर्कशुद्धपणे पुढे जा. तुमच्या मनःशांतीसाठी जास्त फायद्याचे आहे.
  • आयुष्यातील सकारात्मक क्षण साजरे करण्यासाठी वेळ काढा.
  • आयुष्यभर विद्यार्थी रहा. ज्ञान आणि माहिती या दोन्ही गोष्टी तुमच्या मनासाठी पोषक असतात आणि तुम्हाला प्रेरित ठेवतात.
  • तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्याची तयारी ठेवा. नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. तुमच्‍यासोबत छान गोष्टी घडू शकतात. म्‍हणून तुम्‍ही जमेल तितक्या वेळा तसे करत रहा.
  • अति टीका करणे टाळा. लक्षात ठेवा कि आपण सगळे मानव आहोत आणि प्रत्येकाला तुमच्यासारख्याच मर्यादा आहेत. कोणीही पर्फेक्ट नाही.
  • कृतज्ञतेने जगायला शिका: आपण ज्या गोष्टींसाठी कृतज्ञ आहात त्या गोष्टी ओळखून कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जीवनातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आठवत राहा. त्यामुळे नकारात्मकता दूर होऊन आनंद मिळेल. पूर्ण कुटुंब रात्रीच्या जेवणाआधी एकत्र येऊन प्रत्येकाने त्या दिवशी घडलेली एखादी चांगली गोष्ट एकमेकांना सांगायची पद्धत सुरु करावी.
  • स्वीकृती: लोकांना ते जसे आहेत तसे स्वीकारा. मला सांगा, तुम्ही अगदी तुमच्यासारख्या स्वभावाची व्यक्ती कधी पाहिली आहे का? थोडी फार समानता असू शकते. म्हणतात ना, व्यक्ती तितक्या प्रकृती. आपण लोकांना बदलू शकत नाही. हे एकदा कळले कि त्यांना आहेत तसे स्वीकारायला सोपे जाते. स्वतःलाही स्वीकारा. कोणाशीही तुमची तुलना करू नका. आपण जर तुलना करत बसलो तर नेहमी दुःखी होऊ. कारण नेहमी कोणीतरी आपल्यापेक्षा सुंदर, गुणवान, शिक्षित किंवा पैश्याने श्रीमंत असणार आणि तुलना करत आपण नेहमीच दुःखी राहू. त्यामुळे आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानून पुढे जात राहायचे. 
  • नकारात्मक आत्म-चर्चा थांबवा. स्वतःला दोष देणे टाळा. आपले बहुतेक नकारात्मक विचार हे फक्त विचार असतात, त्यात तथ्य नसते.

 


14 Replies to “भावनिक बुद्धिमत्ता”

  1. महोदया,
    अतिशय सुंदर विश्लेषण करुन आम्हाला IQ व EQ बद्दल माहिती देऊन आमच्या ज्ञानात भर घातलीत. याबद्दल मी आपला शतःश आभारी आहे.
    गंगाधर गायकवाड,
    ए-५०२, सावटळे हाऊस, भवानी शंकर मार्ग, क्राँस लेन,
    दादर पश्चिम, मुंबई – ४०० ०२८

    1. ऐकून छान वाटले कि आपल्याला लेख आवडला. खूप धन्यवाद !

  2. छान लेख आहे madam, मला संशोधनात खूप मदत मिळाली, धन्यवाद

      1. नमस्कार मॅडम
        आपण भावनिक बुद्धिमत्तेवर खूपच छान ब्लॉग लिहिला आहे. मी मानसशास्त्राचा प्राध्यापक असून माझ्या लेक्चर मध्ये तुमच्या लेखाचा खूप उपयोग झाला याबद्दल धन्यवाद!
        आपल्याकडून असेच सुंदर ब्लॉग भविष्यात नेले जावे ही शुभेच्छा!

        1. तुम्हाला माझ्या लेखाचा उपयोग झाला आणि तुम्ही तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचवल्या. खूप आनंद झाला. तुमचे खूप आभार.

  3. इतरांच्या भावनांची देखरेख करणे, भावनाचे नियंत्रण व संतुलन करणे, विचार आणि कृतीसाठी भावनाचायोग्य उपयोग करणे,असा उपयोग करण्यास शिकवणे म्हणजे भावनिक बुध्दीमत्ता होय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *