डोहाळे जेवण किंवा डोहाळ जेवण हा स्त्रीच्या आयुष्यातला एक सुखद क्षण! सीमंतोन्नयन ह्या नावाने ज्ञात असलेला हा सोळा संस्कारापैकी एक संस्कार आता डोहाळे जेवण नावाने साजरा करतात. हा सोहळा साधारणपणे गरोदरपणाच्या पाचव्या किंवा सातव्या महिन्यात साजरा करतात. आणि मग बाळाच्या आगमनाची तयारी सुरु होते. इंग्रजीत याला बेबी शॉवर तर तेलगू मध्ये श्रीमन्तम आणि हिंदी मध्ये गोद भराई असे संबोधले जाते.
मातेच्या उदरात वाढणाऱ्या अर्भकाच्या हृदयाचे स्पंदन सुरु होते आणि गर्भस्थ बाळ आपल्या इच्छा आपल्या आईद्वारे पूर्ण करून घेत असतो अशी समज आहे. ह्या इच्छांनाच डोहाळे असे म्हणतात आणि गर्भवती स्त्रीचे डोहाळे पूर्ण केले जातात. ह्याच संदर्भातला डोहाळे जेवण हा एक सोहळा. त्यात गर्भवती स्त्रीची ओटी भरली जाते. यानंतर डोहाळे जेवणामध्ये गर्भवती महिलेच्या आवडीचे अनेक पदार्थ, पंचपक्वान्न करण्यात येतात. गोड, आंबट, तिखट पदार्थांची यावेळी रेलचेल असते. पूर्वीच्या काळी डोहाळे जेवण हे घरच्या घरी केले जायचे. पण सध्या त्याला इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
त्याकाळी फोन नव्हते. माझ्या मैत्रिणीच्या डोहाळे जेवणासाठी तिच्या नवऱ्याने आम्हा मैत्रिणीना टेलिग्राम केला होता. आमच्यासारखे त्यालाही डोहाळे जेवणाचा इंग्रजी प्रतिशब्द माहिती नव्हता. त्याने चक्क त्याचे नवीन नामकरण केले आणि आम्हाला “डोहाल मिल” (जेवण = मिल/meal) साठी आमंत्रण दिले होते. आम्ही तेव्हा खूप हसलो होतो. पण खरं सांगायचं म्हणजे आम्हांलाही बेबी शॉवर हा शब्द तेंव्हा माहित नव्हता. 🤣😂असो.
हे सगळं सांगायचा माझा एक वेगळाच मुद्दा आहे. त्यासाठी एक पार्श्वभूमी म्हणून वरील माहिती लिहिली आहे. आमच्याकडे असे ओटी भरणे किंवा डोहाळे जेवण फक्त पहिल्यांदा आई होतानाच करतात. त्याप्रमाणे माझाही असा एक छोटासा घरगुती कार्यक्रम पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये झाला होता. मग मला पुत्ररत्न झाले. सगळ्यांना आनंदीआनंद झाला. काही वर्षांनी मी दुसऱ्यांदा प्रेग्नन्ट राहिले. प्रथेप्रमाणे ओटी भरणे किंवा डोहाळे जेवण असे काही झाले नाही. कन्या रत्न झाले. दुग्धशर्करा योगच होता. अश्याप्रकारे माझ्या मनात असलेल्या आदर्श चौकोनी कुटुंबाचे स्वप्न पूर्ण झाले.
अमेरिकेत आल्यानंतर डोहाळजेवणासंबंधी बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. माझ्या एका तेलुगू मैत्रिणीमुळे कळले कि त्यांच्याकडे प्रत्येक प्रेग्नन्सीला डोहाळे जेवण करतात.
अमेरिकेतल्या लोकांचा बेबी शॉवरचा उद्देश काहीसा वेगळा असतो. जेव्हा स्त्री पहिल्यांदा प्रेग्नन्ट असते तेव्हा तिची फॅमिली आणि फ्रेंड्स मिळून पार्टी करतात आणि बाळाला आवश्यक असलेल्या वस्तू गिफ्ट म्हणून देतात. थोडक्यात बेबीसाठी गिफ्ट्सचा वर्षाव (=शॉवर) करतात. जसे कि क्रिब/पाळणा, कपडे, खेळणी, बॉटल, डायपर, ब्लॅंकेट इ. जर ती स्त्री दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा प्रेग्नन्ट असते तेव्हा बेबी शॉवर ऐवजी बेबी स्प्रिंकल करतात. हे थोड्या लहान प्रमाण करतात आणि गिफ्ट्स सुद्धा डायपर, कपडे असे साधे असतात. त्यामागे असा विचार असतो कि बाकीच्या वस्तू पहिल्या बाळाचे असतातच. गिफ्ट्सच्या प्रमाणामुळे शॉवर म्हणजे वर्षाव आणि स्प्रिंकल म्हणजे शिडकावा. म्हणून बेबी शॉवर आणि बेबी स्प्रिंकल. थोडक्यात, आपल्याकडचे डोहाळ जेवण म्हणजे आई होणाऱ्या स्त्रीच्या कौतुकाचा सोहळा तर पाश्चात्यांचा बेबी शॉवर म्हणजे होणाऱ्या बाळाचे कौतुक ! आहे ना गम्मत?
माझी मुलगी, चिक्की, सात-आठ वर्षाची असेल. एके दिवशी आम्ही दोघी जुने फोटो अल्बम पाहत होतो. जेव्हा तिने माझा डोहाळजेवणाचा फोटो पहिला. जेव्हा तिला कळले कि तो फोटो माझ्या पहिल्या प्रेग्नन्सीचा आहे, तेव्हा ती काहीतरी शोधू लागली. विचारल्यावर म्हणाली, मी तुझ्या पोटात असतानाचा डोहाळजेवणाचा फोटो शोधत आहे. तसा फोटो नव्हताच माझ्याकडे. काय सांगणार तिला? मी कबूल केले कि दुसऱ्यांदा माझे डोहाळे जेवण झाले नव्हते. ती मला म्हणाली कि, म्हणजे मी तुझ्या पोटात असताना तुला आनंद झाला नव्हता का? मग तो आनंद असा साजरा का नाही केला? तिने २-३ दिवस माझ्याशी अबोला धरला. तिच्या मते मला पहिली प्रेग्नन्सीच जास्त प्रिय होती. मी एकदम निरुत्तर झाले. एका स्त्रीसाठी प्रत्येक पेग्नंन्सी तेवढीच आनंददायी असते. मग त्याचा सोहळा का नाही करायचा? तिचे म्हणणे शम्भर टक्के खरे होते. मी याआधी ह्यावर असा विचार केला नव्हता. एक प्रथा किंवा पद्धत समजून पुढे जात राहिले होते.
मला आपल्या पुढच्या पिढीचे कौतुक वाटते कि ही मुले किती प्रॅक्टिकल विचार करतात आणि त्यांच्या प्रश्नांनी आपल्याला बऱ्याचदा विचार करायला लावतात. जसे कि माझ्या मुलीने मला केले होते. लव्ह यू, चिक्की.💖
फारच छान
Dhanyawad!
फारच छान
Thank you!
Sundar same as Chikki…
🙂 Thank you!
2nd time baby shower kru shakto ka.
Mazya mate, karavi.