पाणी म्हणजे जीवन!


हा लेख इंग्रजीमध्ये वाचण्यासाठी इथे क्लिक करा: Are You Drinking Enough Water?

पाण्याशिवाय कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनाची कल्पना करु शकत नाही. कारण मानवाचे जीवन हे पाण्यावरच अवलंबून आहे. पाणी हे जीवनातील सर्वात महत्वाचे अनमोल रत्न आहे. मानव काही दिवस अन्ना शिवाय राहू शकतो. परंतु पाण्याशिवाय जगू शकत नाही. पाण्याचा एक-एक थेंब महत्वाचा आहे. म्हणून म्हटले गेले आहे कि, पाणी हेच जीवन आहे. पाणी हे आपल्या शरीराचा हा एक मुख्य घटक आहे. आपले ६०% शरीर पाण्याने बनलेले आहे. आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीला योग्यरित्या कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. आपल्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकून आपले शरीर स्वच्छ करते. श्वास घेणे, लघवी, घाम येणे, मल-मूत्र विसर्जन अश्या क्रियांद्वारे आपले शरीर पाणी गमावते. शरीराचे तापमान राखण्यासाठी सुद्धा त्याची आवश्यकता आहे.

प्रत्येकाची पाण्याची गरज वेगळी असल्याने त्यानुसार तहान लागते. आपण योग्य प्रमाणात पाणी किंवा पेय पदार्थांचे सेवन केले पाहिजे. बऱ्याचदा, विशेषतः मुले तहान आणि भूक यामध्ये कन्फयुज होतात आणि पाणी पिण्याऐवजी खात राहतात. व्यायामानंतर आणि आधी पाणी पिले पाहिजे.

तुमचे वजन, वय आणि स्त्री/पुरुष यावर किती पाणी प्यावे हे ठरलेले असते. खालील दिलेल्या तक्त्यात वयानुसार किती पाणी प्यावे हे दिलेले आहे. एक कप म्हणजे जवळपास पाव लिटर पाणी (1 cup=250 ml).

पुरेसे पाणी न पिल्याने निर्जलीकरण/डिहायड्रेशन होते. त्यामुळे डोकेदुखी, थकवा, स्नायू पेटके/मसल क्रॅम्प, कमी रक्तदाब होऊ शकतो. बरीच फळे, भाज्या आणि पेये आहेत ज्यात पाणी आहे. उदाहरणार्थ: टरबूज, स्ट्रॉबेरी, खरबूज/कॅन्टलूप, पीच, संत्री, अननस, काकडी, दूध, सूप, झुकिनी, दही, टोमॅटो, सिमला मिरची, फुलकोबी, पत्ताकोबी, द्राक्षे, नारळ पाणी, पालक, सफरचंद, मशरूम, ब्रोकोली, लिंबू, ब्लूबेरी, चहा, कॉफी आणि बरेच काही.

साधे पाणी हा सर्वोत्तम पर्याय आहे कारण त्यात साखर, स्वीटनर किंवा इतर पदार्थ नसतात. स्पोर्ट्स ड्रिंकमध्ये सोडियम आणि पोटॅशियम सारखे इलेक्ट्रोलाइट्स असतात.अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (AAP) मुलांच्या स्पोर्ट्स ड्रिंकचा वापर मर्यादित ठेवण्याची शिफारस करते कारण स्पोर्ट्स ड्रिंकमुळे जास्त कॅलरी घेतल्या जातात आणि वजन वाढू शकते. तसेच दात किडण्याची रिस्क वाढते. सॉफ्ट ड्रिंक्सच्या ऐवजी साधे पाणी पिणे उत्तम. सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये भरपूर साखर असते.

हायड्रेटेड राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे पाणी पिणे आणि त्याव्यतिरिक्त हायड्रेटिंगयुक्त पदार्थ खाणे ज्यामुळे अतिरिक्त प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर मिळतील. काही मुलांना साध्या पाण्याची चव आवडत नाही आणि ते पिण्यास नकार देतात. पाणी चवदार बनवण्यासाठी पाण्याला फ्लेवर द्या. स्टोअरमध्ये महागडे फ्लेव्हर्ड वॉटर विकत घेण्याऐवजी घरच्या घरी तुम्ही ते बनवू शकता. त्यासाठी पाण्यात लिंबू, रासबेरी, आंबा, किवी, काकडी, संत्री, पुदीना वापरू शकता.

नियमितपणे पाणी पिल्याने शारीरिक वजन नियंत्रणात ठेवू शकतो. सकाळी उठल्यानंतर भरपूर पाणी प्यावे.  जेवणाआधी आणि जेवताना पाणी प्यावे. पाणी खूप थंड किंवा खूप गरम नसावे. नेहमी घोट घोट पाणी प्यावे. तसे केल्याने लाळ मिश्रित पाणी पोटात जाते आणि ऍसिडिटी होत नाही.

म्हणूनच पाणी हे जीवनाचे स्रोत नव्हे तर ते जीवन आहे!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *