चिमुकल्यांचे फोटोशूट…होय, माझ्या चिंटू आणि चिक्कीचे लहानपणी म्हणजेच सतरा-अठरा वर्षांपूर्वी काढलेल्या फोटोंची छायाचित्रसफर. तेव्हा डिजिटल कॅमेरे अजून वापरात आले नव्हते. स्मार्टफोन आणि वेगवेगळे ऍप्स तर अस्तित्वातच नव्हते. त्यामुळे आत्तासारखे फोटोशॉपिंग, कॅप्शन, विडिओचा वापर करून क्रिएटिव्ह फोटो अल्बम करायची सुविधा नव्हती.
त्यावेळी दोन-एक वर्षे मी आणि मुले अमेरिकेच्या व्हिसाच्या प्रतिक्षेत इंडियात होतो आणि माझा नवरा अमेरिकेला होता. त्याला मुलांची खूप आठवण यायची आणि सारखे त्यांचे फोटो पाठवण्याचा आग्रह असायचा. मग कोडॅक कॅमेऱ्यात रीळ टाकायचे आणि पूर्ण रीळ संपेपर्यंत फोटो काढत राहायचे. एका रीळेमध्ये एकूण छत्तीस फोटो यायचे. पण कधी कधी तीन-चार फोटो जास्तच निघायचे आणि बोनस मिळाल्यासारखा आनंद व्हायचा. ते तालुक्याचे गाव असल्यामुळे तिथे रीळ धुवून फोटो डेव्हलप करायची सोय नव्हती. त्यासाठी जवळच्या मोठ्या शहरात पाठवावे लागायचे. तिथून फोटो यायला जवळपास १-२ आठवडे आणि कधी कधी तर त्याहीपेक्षा जास्त दिवस लागायचे. एकंदरीत एकदा रीळ घालून फोटो काढणे सुरु केल्यापासून ते हातात फोटो येणे ही लांबलचक प्रक्रिया असायची. खूप प्रतीक्षेनंतर फोटो आल्यानंतर मगच कळायचे कि काही फोटो जळून गेले, काही फोटोत डोळे बंद होते तर काही फोटोत दुसरेच काहीतरी. मग पोस्टाने किंवा कुरिअरने ते फोटो अमेरिकेला पाठवायची आणि १-२ आठवड्याने पोहोचायचे. हे सगळं लवकरात लवकर होण्यासाठी कधी कधी तर एकाच दिवसात पूर्ण रीळ संपवायचे, म्हणजे पूर्ण छत्तीस फोटो एकाच दिवसात काढून व्हायचे.
दोन्ही मुले खूप गुणी असल्यामुळे त्यांचा पूर्ण सहकार मिळायचा. चिंटूचा जास्त कल खेळण्याकडे असायचा आणि त्याला फोटो साठी पोज द्यायला फारसे आवडायचे नाही पण चिक्की मात्र कंटाळा न करता दिवसभर फोटोशूट साठी तयार असायची. सारखे सारखे फोटो काढून तोच तोच पणा यायला लागला होता. मग विचार केला कि काहीतरी वेगळे करू या. मग एक एक कल्पना सुचत गेली आणि वेगवेगळे थीम, ड्रेसअप आणि मेकअप करून फोटो काढणे सुरु झाले. ह्यात चिंटू-चिक्कीच्या आज्जी (सगळे तिला माँ म्हणायचे), सगळे मामा-मामी, मामे भावंडे, मावश्या आणि मावस भावंडांचा सहभाग असायचा.
एकदा असेच सगळे फोटो काढून त्याचा अल्बम नांदेडला माझ्या बहिणीकडे पाठवला होता. तिच्या सुपीक डोक्यातून एक छान कल्पना आली आणि तिने सगळ्या फोटोना मथळे म्हणजे कॅप्शन दिले आणि मला पाठवून दिले. त्या आधी मी कॅप्शन साठी स्टिकर वापरायची.
मला तिची आयडिया खूप आवडली आणि मग वेगवेगळे फोटोशूट करून नवनवीन कॅप्शन लिहिणे सुरु झाले. तसे खूप सारे फोटो काढलेले आहेत. त्यातले निवडक फोटो घेऊन त्यांचे कोलाज बनवून तुमच्याशी शेयर करत आहे. चला तर मग आपण ह्या गोड़ चित्रसफरीचा आनंद घेऊ या आणि खूप सारे फोटो आणि त्याला दिलेले कॅप्शन पाहू या.
सुरुवात सकाळी पाणी भरण्यापासून व्हायची. उन्हाळा असल्यामुळे कधी पाणी मिळायचे नाही आणि मग चिकी नाराज व्हायची. तर कधी भरपूर पाणी मिळाल्यामुळे आमची आवडाक्का भलतीच खुश व्हायची. मग मथुरेच्या गवळणी कडून घट्ट मलईदार दही घेणे व्हायचे.
त्यानंतर टेरेस गार्डनला जाऊन ताजी फुले आणली जायची आणि मनोभावे देवाची पूजा व्हायची. शाळेला जायचे वय झाले नव्हते पण खूप हौस असल्यामुळे रंगीबेरंगी छत्री घेऊन शाळेला जाण्याची तयारी व्हायची.
मग चहा पीत पीत सकाळचे वर्तमानपत्र वाचायचे. देश आणि विदेशातल्या बातम्या वाचून मन खिन्न व्हायचे.
‘तांदूळ होते सात.. पण पहा कसा केला पातेलेभर भात’ असे गुणगुणत प्रेस्टिज कुकर वापरून छानसा मऊ मऊ भात तर करून झाला. पण हे काय? गहू दळून आणायचे राहिले ना! आता पोळ्या कश्या करायच्या? नुसतेच हाती पोळपाट आणि लाटणे घेऊन काय फायदा. चला तर मग आज नुसता भातच खाऊ या. लाडूसाठी शेंगदाणे भाजून झालेले आहेतच. त्यातल्याच थोड्या शेंगदाण्याची चटणी करावी आणि संकेत दादा सारखे दूध-भात आणि शेंगदाण्याच्या चटणीवर ताव मारावा.
मग आपल्या मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर सारखी बॅटिंग करायला बाहेर जाऊन बहीण-भावाचे क्रिकेट खेळून झाले.
क्रिकेट खेळून थकल्यानंतर घरीच बैठे खेळ खेळण्याचा प्लॅन झाला. त्यात पच्चिसी, बुद्धिबळ आणि कॅरम खेळणे झाले. काही खेळ आवडले तर काही मध्ये मजा नाही आली. त्या बैठ्या खेळावरून चिंटू आणि चिक्कीचे भांडण झाले. चिक्की रुसून तिच्या तीन चाकी सायकलवर बसून त्या टी व्ही तल्या जाहिरातीप्रमाणे ‘सब मुझे डांटते है, मैं घर छोडके जा रही हूं’ असे म्हणत निघालीच होती, पण नेमके त्यादिवशी घरात गुलाब जामून बनत होते. मग तिने घर सोडण्याचा बेत रद्द केला आणि गुलाब जामूनचा फडशा पाडला. तिचा रुसवा क्षणात पळून गेला.
टी. व्ही. वरच्या जाहिराती तरी कश्या अपवाद राहतील? फोटोशूट मध्ये आणखी काही जाहिरातींचा समावेश झाला.
मग आपल्या लोकप्रिय बॉलिवूडचा टर्न आला. ‘डॉन’ मधला सुपरस्टार अमिताभ, ‘चांदणी’ मधली दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी आणि ‘त्रिदेव’ मधली ‘ओये ओये’ करणारी माधुरी दीक्षित अश्या महत्वाच्या व्यक्तींची हजेरी लागली.
मम्मी डॉक्टर असल्यामुळे चिंटू आणि चिक्कीचे डॉक्टर बनणे हे ओघाने आलेच. आळीपाळीने डॉक्टर आणि रुग्णाच्या भूमिका करून झाल्या, इंजेक्शन देऊन झाले आणि रडणे ही झाले.
लहान मुलांचे फोटोशूट करणे आणि त्यांना बाळकृष्ण न बनवणे हे तर जवळ जवळ अशक्यच. जुन्या राख्या आणि घरीच असलेल्या साहित्यातून सोनेरी मुकुट आणि दागिने तयार झाले. माझ्या ओढण्या, मोरपीस आणि रेशमी सोवळे उपयोगी आले. बासरी साठी बघत होते आणि माझ्या भावाने सांगितले कि त्याच्या सराफा दुकानात त्याच दिवशी एका गिर्हाइकाची चांदीची बासरी बनवून तयार झाली होती. एका कृष्ण भक्ताने नवस केला होता आणि नवस फेडण्यासाठी त्याने चांदीची बासरी बनवण्याची ऑर्डर दिलेली होती. तो ती बासरी तिथल्याच कृष्ण मंदिरात अर्पण करणार होता. ती बासरी श्रीकृष्णाच्या हातात विराजमान होण्याआधी आमच्या बाळकृष्णाकडे आली आणि आता फोटोरुपी आमच्याकडे राहून गेली.
मग कृष्ण झालेल्या चिंटूने राधा बनलेल्या त्याच्या मामेबहीण, ऋतावर पिचकारी घेऊन रंग टाकायला सुरुवात केली.
‘चल ग सखे चल ग सखे’…नव्हे, ‘चल ग चिकू चल ग चिकू पंढरीला’ असे म्हणत, गळ्यात तुळशीची माळ घालून, हातात टाळ घेऊन ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम|पंढरीनाथ महाराज की जय!’ असा जयघोष करत पंढरीची वारी झाली आणि थोडे पुण्य कमावून झाले.
आपल्या पु. ल. देशपांडेंच्या ‘वरात निघाली लंडनला’ च्या धर्तीवर आमची ‘मानसी निघाली लंडनला!’
चिंटूचे शिवरायांचा मावळा बनून, तलवार उपसून “खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या !” असे स्फूर्तिगीत म्हणून झाले.
मग आला चिक्कीचा टर्न. तिनेही शूर वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई बनून “हिम्मत है तो आगे बढ” , ‘मेरी झांशी नही दूंगी’ म्हणत ब्रिटिशांना सामोरी गेली. तसेच महात्मा गांधी बनून अहिंसेचा मार्ग दाखवला आणि ब्रिटिशांना पिटाळून लावले.
जेव्हा स्त्री आई होते, ती परत नव्याने आपले बालपण जगत असते. ती मुलांसोबत मुलांचे खेळ खेळते, बोबडे बोलते, मुलांच्या होमवर्क मुळे ती अप्रत्यक्षरीत्या पुन्हा शालेय जीवन जगते. ‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही’ हे अंगाई गीत हजारो वेळेस गाऊन त्यांना झोपवलेले असते. असाच हळू हळू काळ लोटतो आणि तिच्या नकळत तिची मुले बालपण संपवून मोठी होऊन जातात. माझेही तसेच झाले. आता दोन्ही मुलें विशीतले तरुण झाली आहेत. त्यांच्या बालपणीच्या आठवणींचा अमूल्य ठेवा उराशी जपून ठेवला आहे.
आशा करते की तुम्हाला ही चित्रसफर आवडली असेल. वेळ काढून वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
चित्रसफर छान वाटली,
लेख वाचताना त्या काळात गेल्या सारखंच वाटतं
फार पद्धतशीरपणे व उत्साहाने केलेल्या संग्रहाचे कौतुक वाटते,
त्याचं सादरीकरण पण चांगलंच झालं आहे,
पुढील लेखास अनेक शुभेच्छा😊🙏
Thank you, Shrikant. You always support and encourage me. Thank you so much.
कीती छान केलय संकलन, मस्त ,तुला एव्हढा वेळ मीळतो छान वाटतं
धन्यवाद सुनंदा! हो, वेळ अड्जस्ट करून लिहीत असते.
खूपच छान वाटले
Thank you.
सावि अतिशय छान सफर. मलाही आपलं बालपण आठवलं.
Thank you, dear.
खूप छान फोटो. स्वतः साठी वेळ काढणे खरच गरजेचे आहे.हो ना.
Ho, agdi barobar. Thank you.
Khup sunder ..cute happy innocent faces lovely 😘
Thank you.