आम्ही तिघी बहिणी. आक्का, ताई आणि मी. ताईचे लग्नाआधीचे नाव नर्मदा आणि लग्नानंतरचे नीता. तिच्यात आणि माझ्यात दोन वर्षांचे अंतर. आमची शाळा एकच. कन्या शाळा. तिच्या बऱ्याच वर्ग मैत्रिणींच्या दोन वर्षे लहान असलेल्या बहिणी माझ्या वर्ग मैत्रिणी. त्यामुळे सहाजिकच आम्हाला गप्पा मारण्यासाठी भरपूर विषय मिळायचे. आमचे अभ्यासाचे टेबल तसेच बेडरूम एकच असायचे. तिने वापरलेली अभ्यासक्रमाची पुस्तके दोन वर्षांनी मी वापरायची. आम्हा दोघींना नवीन कपडे सुद्धा एकत्रच मिळायचे. ताई मला हळूच सांगायची की, आता आपल्याला नवीन कपडे हवे आहेत. तू बाबांकडे हट्ट कर. मग मी आपली बाबांच्या मागे नवीन कपड्यांसाठी भूनभून लावायची. तीन-चार दिवसांनी बाबा नवीन कपडे घेण्यासाठी तयार व्हायचे. मग म्हणायचे, तुझ्याबरोबर ताईला पण नवीन कपडे घेऊ या. मग आम्हा दोघींना नवीन कपडे मिळायचे.
नववी-दहावीला असणाऱ्या मुलींनी एक वेणी आणि लहान वर्गातल्या मुलींनी दोन वेण्या घालण्याचा प्रघात होता. दोन वेण्या घालण्यासाठी मागचा भांग मला पाडता येत नसे. आईने ती जबाबदारी ताईकडे दिली होती. शाळेत जाण्यापूर्वी मला दोन वेण्या घालून देण्याच्या बदल्यात ताई माझ्याकडून चार कामे करून घ्यायची. तिच्या दीदीगिरीला आळा घालण्यासाठी मी रोज शाळेतून घरी आल्यानंतर मोठ्या आरश्या समोर बसून प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. सुरुवातीला कसातरी वेडा-वाकडा भांग पडायचा. ती मला त्यावरून चिडवायची. पण म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर. माझ्या प्रयत्नांना यश येऊन मला व्यवस्थित भांग पाडून दोन वेण्या घालता येऊ लागल्या. त्यामुळे तिची एक्स्ट्रा कामे करण्याचा प्रश्न मिटला.
वार्षिक परीक्षा झाल्यानंतर प्रगती पुस्तक (रिपोर्ट कार्ड) मिळायचे. त्यावर मुख्याध्यापकाची स्वाक्षरी आणि विद्यार्थिनीची स्वाक्षरी अशा जागा असायच्या. आपण स्वतःची सही करायची आणि मुख्याध्यापकाकडे जाऊन त्यांची सही घ्यायची. एकदा ताईने चुकून मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीच्या ठिकाणी स्वतःची सही केली आणि प्रगती पुस्तक घेऊन त्यांच्या ऑफिसला गेली. मुख्याध्यापक बराच वेळ हसत राहिले आणि म्हणाले की, माझी जागा घ्यायचा विचार आहे का? तेव्हा तिची चुक तिच्या लक्षात आली.
ती दिसायला सुंदर असल्यामुळे “चट मंगनी पट ब्याह” ह्या उक्तीप्रमाणे तिची बारावी संपण्याआधीच लग्न ठरले. आम्ही दोघी बहिणी पेक्षा मैत्रिणी जास्त होतो. लग्न होऊन ती सासरी गेली. तिच्याकडे हिंदी आणि मराठी उखाण्यांचा खजिनाच होता. सासरी तिचे उखाणे खूप गाजले होते. सगळ्यांची मेहफिल जमायची आणि उखाण्यांची स्पर्धा व्हायची. तिच्या उखाण्यांना भरपूर दाद मिळायची. त्याकाळी TV नव्हता. रेडिओवर सगळ्यांचा लाडका गाण्यांचा कार्यक्रम, बिनाका गीत माला दर आठवड्याला लागायचा. मला खात्री आहे कि आमच्या पिढीच्या लोकांच्या मनात अमीन सयानीचा तो भारदस्त आवाज अजूनही ताजा आहे. त्यावरून तिने हा उखाणा बनवला होता जो सगळ्यांच्या पसंतीस उतरलेला होता:
बिनाका गीतमाला लगती है हप्ते मे एक बार
अनिल की याद आती है दिन मे सौ बार…..
स्वच्छता आणि टापटीपपणा तिच्या अंगात भिनला आहे. कुकिंग मध्येही एक्सपर्ट आहे. तशीच स्पष्टवक्ती पण आहे. मनात आलेलं सरळ बोलून दाखवते. दिखावा न करता निमूटपणे सगळी कामे व्यवस्थित करायची. त्यामुळे सहाजिकच तिच्या सासूबाईंची तिच्यावर मर्जी होती. तिचे सासर नांदेडचे. नांदेड हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे विविध कारणांसाठी तिच्याकडे पाहुण्यांची सतत ये-जा चालू असायची. लग्न-समारंभ, दवाखाने, मुलगी दाखवण्या-पाहण्याचा कार्यक्रम, शॉपिंग इत्यादी कारणासाठी जवळचे-दूरचे पाहुणे नांदेडला तिच्याकडे जायचे. स्वतःचा संसार, लहान मुले आणि पाहुण्यांची वर्दळ यामध्ये ती गुरफटून गेली होती. त्यात माहेरी जाऊन राहावं म्हटलं तर तेही सहसा जमत नसे. त्यामुळे घरकामातून तिला कधी सुटकाच मिळाली नाही.
लहानपणी आम्ही दोघी एक खेळ खेळायचो. एकीने दुसरीला हसवण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरीने हसू कंट्रोल करून ठेवायचं. जी जास्त वेळ हसू कंट्रोल करू शकायची ती जिंकायची. ताई खूप हसरी होती. तिला हसू आवरता येत नसे. त्यामुळे सहाजिकच त्या खेळात मीच जिंकायची. अशी ही हसरी ताई एकदम कोशात गेली होती. हसायचं विसरून गेली होती. माझे एमबीबीएस औरंगाबादला झाले. त्या पाच वर्षांत औरंगाबादला जाताना आणि औरंगाबादहुन येताना माझा नांदेडला स्टॉप असायचा. त्यामुळे तिला माझं बरच कराव लागलं. माझे एमबीबीएस नंतरचे सहा महिन्याचे इंटर्नशिप नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (तेव्हा नांदेडचे मेडिकल कॉलेज सुरु झाले नव्हते) करायचे ठरले. त्यावेळी मी सहा महिने तिच्याकडे राहिले. हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर दिवसभराचा वृत्तान्त तिला सांगायची. लहानपणीच्या गोष्टी आठवायचो. सुखदुःख एकमेकींना सांगायचो. मी तिच्या मुलांना बालगीते आणि गोष्टी सांगायची. तसेच गप्पा, अंताक्षरी खेळणे, शॉपिंगला जाणे, फिरायला जाणे, मूवी पाहणे, दुधाच्या सायी पासून चॉकलेट बनवणे आणि तिच्या मुलांसोबत खेळणे यामध्ये वेळ कसा जायचा कळत नसे. अशाप्रकारे माझे तिच्याकडे सहा महिने राहणे हे तिच्या पथ्यावर पडले. हळूहळू ती कोषातून बाहेर आली आणि तिच्या चेहर्यावरचे हसू परत आले. माझी हसरी ताई मला परत मिळाली.
माझी अमेरिकेला येण्याची जास्त इच्छा नव्हती. तिने मला सल्ला दिला की संधी मिळत आहे तर बिनधास्त दूरदेशी निघून जा आणि तिथे मजेत राहा. तिचा सल्ला कामी आला आणि मी अमेरिकेला आले.
आम्ही आईला माँ म्हणायचो. माँ गेल्यानंतर ताईने तिच्या आठवणीवर एक लेख लिहिला होता: माँ-समईतील ज्योत. त्या लेखात आईची तुलना समईतील वातीबरोबर केली होती. तो लेख सकाळ ह्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला होता.
तिची दोन्ही मुले इंजिनीयर झालीत. जीवनाच्या या टप्प्यावर तिला आता स्वतःला वेळ देता येत आहे. अधून मधून लिखाण करते. वासवी क्लबच्या माध्यमातून समाज सेवा करते.
प्रिय ताई, आयुष्याच्या वाटेवर तुझ्या सर्व स्वप्नांना बहर येऊ दे, तुझ्या प्रयत्न आणि आशा-आकांक्षांना भरभरून यश मिळू दे.♥
छान आठवणी.!!
Thank you 🙂
आधीच्या सगळ्या आठवणी जागृत झाल्या नर्मदा ताई आधीसारखी च दिसते खूप छान
सगळं च खूप छान लिहलेस savitra
Thank you 🙂
खुप छान! ईतक्या वर्षांच्या आठवणी आणि फोटो डिजिटल केले ते खुप सुंदर पद्धतित👌🏻👌🏻
Thank you 🙂
Je kahi lihates tu savi te agadi rhidayala touch karun jaate
So sweet of you, dear Shaila. Thank you:)