आयर्न लेडीची भेट


माझी एकुलती एक मावशी सौ. सुमन. माझ्या आईला आम्ही सगळे माँ म्हणायचो. त्यानुसार माझी मुले मावशीला छोटी माँ असे म्हणतात. माझ्या आईच्या आणि तिच्या वयात अंतर होते. त्यामुळे माझी आई तिला मुलीप्रमाणे वागवायची आणि तिला सुद्धा तिची आक्का आईसमान वाटायची. तिचे गाव आमच्या गावाच्या जवळच असल्यामुळे तिचे आमच्याकडे सारखे येणे-जाणे असायचे. मला आठवते त्याप्रमाणे त्याकाळी स्त्रिया एकट्या प्रवास करत नसत. पण मावशी मात्र एकटी बिनधास्तपणे ये-जा करायची. मला भारी गम्मत वाटायची. आमच्या बस स्टँडच्या तिथे एक छोटीशी बेकरी होती. ती तिथून आमच्यासाठी चेरी घातलेल्या ब्रेडचे पॅकेट आणायची.आम्हाला ते खूप आवडायचे. नागपंचमी जवळ आली कि ती आमच्याकडे यायची. मला तिच्यासोबत शॉपिंगला घेऊन जायची आणि तिच्या मुलींसाठी बांगड्या, टिकल्या, मेहंदी, रिबिनी घ्यायची. माझ्या आजोळी मामींसोबत तिची थट्टा-मस्करी सुरु असायची.

तिला दान-धर्म आणि व्रत-वैकल्याची खूप आवड आहे. मी अमेरिकेत असून आणि डॉक्टर असून भारतीय सण-वार आणि काही पद्धती जपते ह्याचे ती तोंडभरून कौतुक करत असते. तिचे लग्न झाले तेव्हा तिच्या सासरी एकत्र कुटुंब होते. ती त्या घरची मोठी सून असल्यामुळे जबाबदार्‍या आणि कामाबद्दल वेगळे सांगायलाच नको. तिच्या सासू-सासऱ्यांच्या माघारी तिच्या नणंदांना अजूनही तेवढाच आदर-सत्कार आणि प्रेम मिळते. शाळेत असताना सुट्ट्यांमध्ये मी कधी कधी तिच्याकडे जाऊन राहायची. तिला काय करू अन काय नको असे व्हायचे. माझ्या आवडीचे पदार्थ करून वाढायची. वाटीभरून दुधावरची साय हळूच मला आणून द्यायची. माझ्या आवडीचे गुळाचे अनारसे बनवायची. माझी आजी म्हणजे तिची आई गेल्यानंतर माझ्या आईचे घर हेच तिचे माहेर होते. ती हक्काने माझ्या आईकडे यायची. माझी आई गेल्यानंतर आमच्यासोबत ती सुद्धा पोरकी झाली. तिचा परिपूर्ण परिवार आहे ज्यामध्ये तिचे पती, तीन मुली, एक मुलगा, जावई, सून आणि नातवंडे आहेत. आता सत्तरीची असूनही ती भरपूर कामे करते. कामाशिवाय तिला स्वस्थ बसवत नाही.

ही घटना १९८४ ची. मावशीच्या सासू-सासऱ्यांनी त्यांच्या परिवारासोबत काशी यात्रा करायची ठरवले. मावशीने येऊन माझ्या बाबांना खूप आग्रह करून त्या यात्रेला येण्याचे कबूल करवून घेतले. मग आई, बाबा, मी, आणि माझे तीन भाऊ असे सहा मेम्बर काशी यात्रेला जायचे ठरले. तब्बल २५ दिवसांची यात्रा, त्यात ४ ज्योतिर्लिंग, एक धाम, ५-६ स्टेट्स, ताजमहाल आणि बरीच प्रेक्षणीय स्थळे होती. त्या यात्रेचा अतिशय महत्वाचा भाग म्हणजे पंतप्रधानांची भेट. त्यासाठी खूप आधीच परमिशन घेऊन ठेवली होती. ताजमहल पाहुन आमचा पूर्ण ताफा दिल्लीला पोहोचला. रात्र झाली होती. सगळ्यांची जेवणे झाली आणि थकल्यामुळे सगळे गाढ झोपले. दुसऱ्या दिवशी आम्हाला भारताच्या पंतप्रधानांना भेटायचे होते. त्यासाठी सकाळची दहाची वेळ दिलेली होती. आपल्या पंतप्रधानांना भेटण्याच्या कल्पनेने मला झोप लागत नव्हती. बऱ्याच प्रयत्नानंतर झोप लागली. सकाळ झाली. अंघोळी-चहा-नाश्ता आटोपून आम्ही निघालो. सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्यावेळी श्रीमती इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान होत्या. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून त्यांच्याबद्दल मला खूप अभिमान आणि आदर होता. त्यांना आयर्न लेडी म्हणायचे. अश्या प्रभावी व्यक्तिमत्वाला भेटण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे साहजिकच आम्ही सगळे भारावलेले होतो.

ठरल्याप्रमाणे ठरल्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. सेक्युरिटी गार्डनी आमची कागदपत्रे तपासून आम्हाला आत सोडले. खूप मोठे मैदान होते. आमच्यासाठी सतरंजी घालून बसण्याची व्यवस्था केलेली होती. आमच्यासारखे बरेच ग्रुप्स पंतप्रधानांना भेटायला आलेले होते. सगळ्यांचे लक्ष त्यांच्या येण्याकडे लागले. दहा वाजले आणि दोन अंगरक्षकांसोबत तेजस्वी चेहऱ्याच्या श्रीमती इंदिरा गांधी रुबाबात चालत आमच्या जवळ आल्या. कॉटनची साडी, गळ्यात मोठ्या रुद्राक्षाची माळ, तेजस्वी चेहरा आणि चेहऱ्यावर स्मितहास्य. कुणी त्यांना नमस्ते/नमस्कार करत होते तर कुणी हस्तांदोलन. मग त्यांचा फोटोग्राफर आला. आम्हाला सगळ्यांना बसायला सांगितलं. आमच्या सगळ्यांच्या मागच्या रांगेत पंतप्रधान मॅडम त्यांच्या अंगरक्षकांसोबत उभ्या राहिल्या. आमच्या ग्रुपमधली लहान मुले-मुली त्यांच्या बाजूला जाऊन उभे राहिले. देशाच्या पंतप्रधानांसोबत माझा फोटो ही कल्पनाच खूप भारी वाटली. आमचा फोटो काढून झाला आणि सगळ्यांना टाटा करत त्या निघून गेल्या. माझी तशी पंतप्रधानांना एवढ्या जवळून पाहण्याची दुसरी वेळ होती. ह्यापूर्वी प्रचारासाठी त्या आमच्या भागात आल्या होत्या. त्यावेळेस त्यांना खूप जवळून पाहायला मिळाले होते. जेव्हा माझ्या हातातले ब्राऊन रंगाच्या बेल्टचे घड्याळ पंतप्रधान मॅडमच्या हातातल्या घड्याळासारखे असल्याचे माझ्या मैत्रिणीने माझ्या निदर्शनास आणून दिले तेव्हा लई भारी वाटले होते. त्यांच्यासोबत फोटो काढण्याचे भाग्य आत्ता लाभले होते. त्यामुळे तो क्षण खूप अविस्मरणीय झाला. मावशी मुळे हा मौल्यवान क्षण मला मिळाला. त्याबद्दल तिचे खूप आभार. आम्ही इंदिराजींना मे महिन्यात भेटलो आणि दुर्दैवाने त्याच वर्षी ऑक्टोबर मध्ये त्यांची हत्या झाली.

मा या सुंदर अक्षराने सुरुवात होते मावशीची. म्हणूनच तर मावशीला आईचे दुसरे रुप मानतात.

प्रिय मावशी, तुला दीर्घायुष्य मिळो. तू नेहमी निरोगी रहा. तुझ्या आयुष्यात दुःखाला जागा नसावी एवढीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.


2 Replies to “आयर्न लेडीची भेट”

  1. खुप छान आठवनी.!! कित्ती वर्षानंतर जुन्या आठवनी परीकथा आणी आपन त्यातली पात्रे… गम्मत वाटते.!!
    From childhood, I’m listening stories from you…enjoyed every time… now your articles do the job.!! ☺️Keep writing n posting.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *