पहिली ते बारावीच्या मैत्रिणी आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप म्हणजे “बालसखी”!! बऱ्याच वर्षानंतर जुलै २०१६ ला आम्ही देगलूरला पहिल्यांदा गेट-टुगेदर केलं होतं. त्यानंतर २०१८ मध्ये मी इंडियाला गेले होते, पण खूप कमी दिवसांसाठी आणि वेगळ्या कारणासाठी…. त्यामुळे त्यावेळी गेट-टुगेदर होऊ शकले नाही. पण बऱ्याच मैत्रिणी येऊन भेटून गेल्या होत्या. २०१८ नंतर मात्र काही ना काही कारणास्तव इंडियाला जाणेच झाले नाही. मध्यंतरी कोविड पँडेमिकमुळे काही वर्षे गेली. जवळपास सात वर्षांचा कालावधी लोटला होता आणि मला सगळ्यांची खूप आठवण येत होती. म्हणून सगळी कामे आणि कारणे बाजूला ठेवून २०२५ मध्ये इंडियाला जाण्याचा मनाशी निर्धार केला. मुलांना येणे जमणार नव्हते. नवरोबा पण आधी नाही म्हणत होते पण नंतर माझ्यासोबत येण्यास तयार झाले. मग काय! कामांना गती आली. आमच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना सलग तीन आठवड्यांची सुट्टी हवी असेल तर चेअरमनची परमिशन घ्यावी लागते. मला लगेचच परमिशन मिळाली. सप्टेंबर १२ ते ऑक्टोबर ४ असा प्लॅन ठरला, तिकिटे बुक झाली.

मग बालसखी ग्रुपमध्ये मेसेज आणि त्यानंतर ग्रुप व्हिडिओ कॉल झाला. सगळ्यांनी उत्साह दाखवला आणि सर्वानुमते नांदेडला शनिवारी २० सप्टेंबरला १० ते ५ यावेळेत गेट-टुगेदर करायचे ठरले. सगळ्यांना कामे सोपवली आणि मग सगळ्याजणी आपापल्या कामाला लागल्या. जवळपास २५ मैत्रिणींनी गेट-टुगेदरला येण्याचे कन्फर्म केले. इतर मैत्रिणी काही अडचणीमुळे येऊ शकणार नव्हत्या. त्यांना आम्ही मिस करणार होतो.
सुजाताने तब्येत बरी नसतानाही विसावा हॉटेल मध्ये AC हॉल बुक करणे, जेवणाचा (चहा, कॉफी, नाश्ता आणि लंच इत्यादी) मेनू ठरवणे अशी जिम्मेदारी घेतली. सकाळचा ड्रेसकोड साडी-फेटा आणि नथ असा होता. ज्योतीने फेटे आणि फेटे बांधून देणाऱ्या व्यक्तीची व्यवस्था केली. सीमाने लंच नंतर कोणते खेळ खेळायचे/खेळवायचे याचा छान प्लॅन केला आणि विजेत्यांना बक्षिसे पण घेऊन आली. तसेच तिने एका बुटीकवालीकडून सगळ्या बालसख्यांसाठी गिफ्ट म्हणून चौरंगावर टाकण्यासाठी सुंदर असे मॅट्स बनवून घेतले. एक एक करत सुजाता, सीमा, ज्योती, सुमन, मीरा, जयश्री (जयू), सुशीला, पुष्पा, निर्मला, संध्या, सरोज, स्वाती, प्रणिता, रजनी, अरुणा, राणी, माधुरी, कीर्ती, ऋता, छाया, वर्षा, आणि सुषमा अशा सगळ्या बालसख्या जमल्या. सगळ्यांच्या गळा भेटी झाल्या. इडली, दोसे, चटणी, चहा-काॅफी आमची वाटच बघत होते. सगळ्यांचा नाष्टा झाला. सर्वात आधी पुष्पगुच्छ देऊन माझे स्वागत करण्यात आले. मग सीमा, सुजाता, ज्योतीने सर्व बालसखींना गुलाबाचे फूल व गिफ्ट देऊन एकेकीचे स्वागत केले.

फेटा आणि नथ घातलेल्या सगळ्या बालसख्या रणरागिणी दिसत होत्या. हळूहळू सगळ्याजणी स्थानापन्न झाल्या आणि मग प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात झाली. ऋताने आपल्या प्रास्ताविकातून पहिल्या गेट-टुगेदरची आठवण करून दिली, जे मी माझ्या माहेरी अरेंज केले होते. देगलूर शहर, देगलूर येथील शाळा, कॉलेज आणि शिक्षकवृंद यांनी आपल्या सर्व बालसखींना परस्परांशी बांधून ठेवल्याचेही सांगितले. यावेळी शाळेतल्या अनेक आठवणींना तिने उजाळा दिला. यानंतर सीमाने हे स्नेहमिलन आयोजित करण्यामागची भूमिका सांगितली. सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत करून मैत्रीसंबंधी मस्त अशा काव्यपंक्ती वाचून दाखवल्या.
यानंतर एकेका बालसखीने स्टेजवर येऊन स्वतःचा थोडक्यात परिचय दिला (अर्थात लग्नानंतरचा😃). कितीतरी बालसख्या आता आज्जी झाल्या आहेत हे ऐकून आनंद झालाच पण दिवस किती भराभर जातात हे सारखे जाणवत राहिले. काही वर्षांपूर्वी शाळेच्या मैदानावर खो-खो, लंगडी, कबड्डी खेळणा-या आपण कधी जीवनाचा सारीपाट खेळायला लागलो कळलेच नाही….असे वाटले. माधुरीने दिलेला तिचा विस्तृत परिचय ऐकून नकळत डोळ्यांत अश्रू उभे राहिले. पुष्पाचे लग्न आठवीत असताना झालेले, मिलट्रीतल्या नव-याने बॉर्डरवरून पाठवलेली पत्रं वाचता येणारी बायको हवी म्हणून हिची निवड केली !! तिनेही तिचे अनुभव सांगितले. सगळ्यांच्या आग्रहामुळे मी सुद्धा अमेरिकेत आल्यानंतरचा प्रवास सांगितला.
यानंतर झाला विविध गुणदर्शन कार्यक्रम !! याची सुरुवात जयुच्या श्रीगणेश वंदनाने झाली. जयुने सुरेल आवाजात “ओंकार प्रधान रूप गणेशाचे” हे स्तवन म्हणून कार्यक्रमाचा श्रीगणेशा केला. माधुरीने संदीप खरे यांची ‘सायकल’ नावाची एक कविता सुंदर पद्धतीने सादर केली आणि तिच्या यूट्यूब चॅनल बद्दल सांगितलं. प्रणिताने स्त्रीशक्तीबद्दल सांगून “बेटी हू मैं बेटी, मैं तारा बनूंगी” ही कविता म्हणाली. आमच्या सगळ्यांच्या लाडक्या उत्तरवारबाई गेट-टुगेदरला येऊ शकल्या नव्हत्या. त्यांनी खूप सुंदर कविता करून पाठवली होती. त्याचे वाचन सीमाने केले व सोबतच तिच्या स्वतःच्या काव्यपंक्तीही सादर केल्या. सुषमाने आपल्या पाच मातांविषयी खूप छान माहिती सांगून एक वैश्विक प्रार्थना सगळ्या बालसखींकडून म्हणवून घेतली. ऋताने दोन कविता सादर केल्या व शाळेतील एकदोन आठवणी सांगितल्या. अरूणाने शाळेतल्या त्यावेळच्या उर्दु मुलींचे भाषण जशास तसे म्हणून दाखवले व बालसखींना खूप हसवले. पुष्पाने श्रीकृष्णाचे सुंदर गीत सादर केले.
सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. कितीतरीजणी आज्या झाल्या होत्या पण प्रत्येकजण वय विसरून धमाल-मस्ती करत होते. आठवी-नववीच्या वर्गासारखे वातावरण झाले होते. आम्ही पुन्हा एकदा शालेय जीवन जगत होतो. मी, सुमन आणि छाया असे SSC (१० वी ) मधल्या बेंच मैत्रिणी SSC (सावित्राचा S, सुमनचा S आणि छायाचा C) नावाने ओळखल्या जायचो. आम्ही पुन्हा आमचा SSC एका फोटोरूपी recreate केला.

मग सगळ्यांची जेवणे आटोपली. गरमागरम फुलके, नान, mix veg, हिरव्या मिरच्यांचा ठेचा, मुगाच्या डाळीचा हलवा, जिरा राईस, दालतडका, पापड, सॅलड असा मस्त मेनू होता. ज्योती, सुजाता व सीमाने खूप मेहनत घेऊन दिवसभरातील जेवण, नाष्टा, welcome drink अशी भारी व्यवस्था ठेवली होती. त्यानंतर आम्ही सगळ्याजणी साड्या बदलून ड्रेस घालून गेम्स खेळायला तयार झालो. गेम्सचे संयोजन सीमाकडे होते. संगीत खुर्ची सारखा एक गेम खेळताना मजा आली. यातले पहिले बक्षीस वर्षाला व दुसरे बक्षीस रजनीला मिळाले. नंतर फुंकर मारून पत्ते पाडायचे हा गेम खेळलो. याचे पहिले बक्षीस प्रणिताला व दुसरे बक्षीस सुमनला मिळाले. विजेत्यांना माझ्या हस्ते बक्षीसं देण्यात आली. मी सगळ्यांसाठी अमेरिकेहून चॉकलेट्स नेली होती ती दिली. वर्षाने सगळ्यांसाठी खणावर नथीचे डिझाईन असलेल्या पर्सेस आणल्या होत्या. ज्योतीने जनप्रियचे फेणी बॉक्सेस दिले. लातूरच्या चौकडीने (कीर्ती, मीरा, जयू , ऋता) सगळ्यांसाठी तिथला प्रसिद्ध असलेला पेढा आणला होता. सीमाने माझ्यासाठी नथ आणि बांगड्या असे गिफ्ट आणले होते. सुशीलाने नको म्हणत असतानाही मला एक हजार रुपये गिफ्ट म्हणून दिले.
मग आमचा चार वाजताचा चहा झाला आणि फोटो-व्हिडिओ-रिल्स असे सगळे करून झाले. शाळेत असताना वर्गावर सर किंवा बाई तास घ्यायला आल्या कि आम्ही एका सुरात “एक साथ नमस्ते” असे म्हणायचो. आताही तसे म्हणत आम्ही सगळ्या पन्नाशी उलटलेल्या मैत्रिणींनी रील बनवून दंगा केला. खूप मज्जा आली. सगळ्यांची बडबड सुरूच होती आणि थांबायचे नाव घेत नव्हती. आमच्या पहिलीच्या वर्गशिक्षिका, श्रीमती मालती बाई, आम्हाला म्हणायच्या कि, तुमचे तोंड जर खापराचे असले असते तर फुटून गेले असते. कित्ती बडबड करता! त्याची आठवण झाली आणि हसू आले.
बघता बघता पाच वाजले आणि आमच्या गेट-टुगेदरची वेळ संपली. लगेच हॉल रिकामा करायचा होता. कारण पाच वाजता दुसरा दुसऱ्या कोणाचा तरी कार्यक्रम सुरू होणार होता. सगळ्या मैत्रिणींना सोडून निघताना पाय जड झाले होते. कोणाचेही मन भरले नव्हते. असेच एकमेकींच्या सहवासात खूप वेळ घालवावा असे प्रत्येकीला वाटत होते. पण वेळेअभावी ते शक्य नव्हते. एकमेकींना निरोप देताना सगळ्यांचे डोळे पाणावले होते. प्रत्येकीच्या डोळ्यात भेटीचा आनंद तसेच विरहाची हुरहूर दिसत होती. “जपून जा ग”, “पोहोचल्यावर मेसेज टाक”, “काळजी घे”, “फोटो आणि विडिओ शेयर कर”, “पुन्हा लवकर भेटू” असे एकमेकींना सांगत सगळ्या बालसख्या आपापल्या दिशेने निघून गेल्या. मला तर अजूनही ते स्वप्नवत वाटत आहे. स्वप्न जरी म्हटलं तर ते नक्कीच एक गोड स्वप्न होतं!

”मैत्री म्हणजे शब्दांचा खेळ नाही,
ती हृदयाशी जोडलेली अमूल्य गाठ आहे”

गेट टुगेदर पुन्हा पुन्हा अनुभवतोय अशी फिलिंग तुझ्या लेखामुळे होते. नेहमीप्रमाणेच सुरेख लेख.
खूप छान सावित्रा नाव हि खूप छान दिलीस सगळ डोळ्या समोर येते
छान लिहिलीस चित्र डोळ्यासमोर येते
खूप सुंदर लिखाण….. प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहिला.
g2g parat anubhavlay ase aaj lekh vachun vatle savi…..khup detail n visrata sarv sundar lihiles..tq avi…sarvancha aathvnine ullekh kelas…
सावित्रा, खुपच छान छान लिहीलेले. कराव तेवढ कौतुक कमी आहे 🍬 आहे. वाचुन मला आंनद झाला आहे.
अप्रतिम लेखन शैली