आता वाजले की…१०


टीव्ही मालिका महाभारत पहिल्यांदा जेव्हा दूरदर्शनवर प्रसारित झाली होती त्यावेळी घडलेला एक मजेदार किस्सा तुम्हाला सांगणार आहे.

बी. आर.चोप्रा यांची महाभारत ही भव्य मालिका 1988-89 च्या दरम्यान दूरदर्शनवर आली. दर रविवारी सकाळी दहा वाजता ही मालिका सुरू व्हायची. त्यावेळेस बऱ्याच जणांकडे टीव्ही नव्हता. ज्यांच्याकडे टीव्ही असायचे ते जास्त करून ब्लॅकअँड व्हाईट असायचे. बोटावर मोजता येतील एवढेच कलर टीव्ही असायचे. दहा वाजता ही मालिका सुरू झाली की सगळे रस्ते ओस पडायचे. टीव्ही नसणारे लोक जमेल तसे कुणाकडे तरी जाऊन मालिका पाहण्याची आपली व्यवस्था करून घ्यायचे. गल्लीत त्यावेळेस आमच्याकडे कलर टीव्ही असल्यामुळे आमचा टिव्ही हॉल गच्च भरून जायचा. लोक हक्काने यायचे. कधी कधी तर आमच्या घरच्या लोकांना टीव्ही हॉलमध्ये जागा न उरल्यामुळे टीव्ही हॉल आणि स्वयंपाक घराच्या मध्ये असलेल्या खिडकीतून महाभारत पाहावे लागायचे.

आमचे घर शान्तिकुंज. पंधरा खोल्यांचे तीन मजली घर. आम्हाला एवढ्या खोल्यांची गरज नसल्यामुळे अंगणा पलीकडचा ब्लॉक भाड्याने दिलेला होता. तिथे ललितावहिनी त्यांच्या फॅमिली सोबत राहायच्या. त्यांना दोन लहान मुले होती. त्यांच्याकडे टीव्ही नसल्यामुळे दहा वाजेपर्यंत स्वयंपाक करून त्या टायटल सॉंग सुरू झाले की लगबगीने आमच्या टीव्ही हॉलमध्ये येऊन महाभारत पाहायच्या. अंगणातून टिव्ही हॉल आणि प्रेक्षक दिसायचे. हॉलच्या दुसऱ्या बाजूला टीव्ही असायचा. त्यामुळे हॉलमध्ये येईपर्यंत टीव्ही दिसत नसे.

माझे दोन लहान बंधू म्हणजे रमेश आणि लक्षू. थोडक्यात राम-लखन सारखी जोडी. सगळे प्रताप एकत्र करायचे. त्यांच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली. एके रविवारी त्यांनी महाभारतचे टायटल सॉंग टेप रेकॉर्डर वर रेकॉर्ड केले आणि पुढच्या रविवारी ललिता वहिनींची गंमत करण्याचा प्लान आखला. त्या प्लानमध्ये आम्हा सगळ्यांना सामील केले. मग तो रविवार उजाडला. सकाळचे साडेनऊ वाजले. राम-लखनच्या प्लानप्रमाणे आम्ही सगळे टीव्ही हॉलमध्ये खुर्च्या टाकून प्रेक्षक बनलो. टीव्ही बंद होता पण आम्हाला गुंग होऊन टीव्ही पाहण्याचा अभिनय करायचा होता. एक-दोन-तीन म्हणत त्यांनी मोठ्याने टेप रेकॉर्डर ऑन करून महाभारतचे टायटल सॉंग सुरू केले. ललिता वहिनींना व्यवस्थित आवाज ऐकू जाईल याची दक्षता घेतली.

अथ श्री महाभारत कथा sss महाभारत कथा

कथा है पुरुषार्थ की ये, स्वार्थ की परमार्थ की….

तिकडे नेहमीप्रमाणे ललिता वहिनींचा स्वयंपाक सुरू होता. भाताच्या कुकरची फक्त एक शिट्टी झाली होती. भाजी अर्धवट शिजली होती. वरणाला फोडणी द्यायचे राहिले होते. आणि पोळ्या करण्यासाठी कणिक मळून तयार होती. टायटल सॉंग ऐकल्याबरोबर त्या गोंधळून गेल्या. त्यांना कळेच ना की आज अंदाज कसा काय चुकला. त्यांच्या हाताला किंवा भिंतीवर घड्याळ नव्हते. दुसऱ्या खोलीत जाऊन घड्याळ पाहण्याइतका वेळ नव्हता. त्याकाळी रेकॉर्ड करण्याची सोय नसल्यामुळे मालिका चुकवण्याची हिम्मत नव्हती. त्यातल्या त्यात महाभारता सारखी मालिका चुकवण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यांनी पटापटा गॅस बंद केला आणि धावत धावत आमच्या टिव्ही हॉल मध्ये आल्या. आम्ही ठरल्याप्रमाणे टीव्ही पाहण्याचा अभिनय करत होतो आणि हसू दाबत होतो. त्या आल्या आणि  त्यांनी टीव्हीकडे पाहिलं. टीव्ही तर बंद होता. त्या गोंधळल्या. 😲 क्षणभर त्यांना कळलंच नाही. आम्हाला हसू आवरणे कठीण जात होते. आम्ही सगळे हसायला लागलो. मग झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आला आणि त्याही हसायला लागल्या. त्या दिवशी त्यांचा भात कच्चा राहिला होता, भाजी अर्धवट शिजली होती, पोळ्या झाल्या नव्हत्या आणि वरणाला फोडणी द्यायचे राहिले होते. आम्हा सगळ्यांची पोटं दुखत होती ते त्यांच्या कच्च्या भातामुळे किंवा अर्धवट शिजलेल्या भाजीमुळे नसून खूप खूप हसल्यामुळे!

अशाप्रकारे आता वाजले की…१० म्हणत साडेनऊ लाच दहा वाजवून राम-लखनने त्यांचे बारा वाजवले होते. 🤣 😆


5 Replies to “आता वाजले की…१०”

  1. एकदम भन्नाट लिहिलेस, आम्हाला ही हसू आवरले नाही. वाचूनच प्रत्यक्षात तर तुम्ही खुपच ऐंजाय केले असणार.

  2. खुप छान वर्णन केल. साध्या आणि सोप्या शब्दात सर्व प्रसंग गमतीदारपणे व्यक्त केला. देव सरांची आठवण येऊन बर वाटल. I wish he was there.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *