बालसखीचें गेटटुगेदर : १७ जुलै, २०१६


माझे १० वी पर्यंतचे शिक्षण एका तालुकेच्या गावी कन्या शाळेत झाले. त्यानंतर १० वी च्या मैत्रिणी आपापल्या वाटेने निघून जाऊन त्यांच्या आयुष्यात गर्क झाल्या. असे वाटले नव्हते कि तब्बल ३४ वर्षांनी पुन्हा आम्ही सगळे एकमेकींच्या संपर्कात येऊ. टेकनॉलॉजिचे धन्यवाद. बऱ्याच जणींचे माहेर मूळचे तिथलेच असल्याने मला त्यांच्या माहेरच्यांकडून फोन नंबर्स मिळवणे जास्त कठीण गेले नाही. मी इथे अमेरिकेत असल्यामुळे माझ्या भावांच्या मदतीने बऱ्याच जणींचे नंबर्स मिळवून, त्यांना फोन करून बोलले. काही जणींना व्हाट्सअँप होते, काहीजणींनी नवीन शिकून घेतले आणि काही जणींनी सांगितले कि त्यांना ते जमणार नाही. मग व्हाट्सअप असलेल्यांचा बालसखी नावाचा ग्रुप तयार केला. मग काय, रोज गप्पा टप्पा सुरु झाल्या.

आम्ही २००९ च्या भेटी नंतर जुलै २०१६ मध्ये भारत भेटीचा बेत केला. खूप खूप उत्साह होता. याद्या बनवल्या कि कोणासाठी काय न्यायचे, खूप सारी खरेदी केली ई. ह्या भारत भेटीत आमचे गेटटुगेदर करायचे असे ठरले. या आधीच व्हाट्सअँपवर बालसखी ग्रुप बनला होता. ज्या सख्या ग्रुप वर नाहीत, त्या सगळ्यांना मी फोन करून बोलले. सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. सगळ्याजणी एकमेकींना भेटण्यासाठी आतुर झाल्या होत्या. गेटटुगेदरच्या कार्यक्रमाची जिम्मेदारी अप्रत्यक्ष रित्या माझ्याकडे आली होती.

माझ्या मनावर थोडेसे दडपण आले होते. माझ्या माहेरच्याना त्रास तर देत नाही ना असे वाटत होते. मी जेव्हा हे बोलून दाखवले, तेव्हा माझ्या भावजयीने मला सांगितले कि, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी सगळी व्यवस्था करते. तुम्ही फक्त मला सांगा काय काय करायचे ते. मला खूप बरे वाटले. मग आम्ही सगळा बेत आखला. रेखावार(माझे माहेरचे आडनाव) परिवारातील इतर सगळ्या सदस्यांनी उत्साहात पडेल ते काम करायची तयारी दाखवली. सगळ्यांच्या सहकार्याने १७ जुलै, २०१६ ला बालसखीचा गेटटुगेदर अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला. आदल्या दिवशी हातावर मेहेंदी लावून घेतली. कार्यक्रमाच्या दिवशी एका मुलीने येऊन सुंदर रांगोळी काढली. मधोमध दगडूशेठ गणपतीची मूर्ती आणि दोन्ही बाजूला चांदीच्या समया. किती सुंदर दिसत होते ते.

एकच ध्यास! एकमेकींना भेटण्यासाठी जीव तळमळत होता. सकाळचे ९ वाजले आणि एका एका सखीचे आगमन झाले. काही जणी तर १०-१२ तासांचा प्रवास करून आल्या होत्या. प्रत्येक सखी वेगवेगळा आनंद आणि वेगवेगळ्या आठवणी घेऊन आली होती. सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्यांच्या लाडक्या उत्तरवार बाई आवर्जून आल्या होत्या. त्यांना जेव्हा गेट टुगेदर बद्दल कळाले, तेव्हा त्यांनी सगळे बाकीचे बेत रद्द करून आम्हाला भेटायला यायचे ठरवले. त्यांनी येताना प्रवासात आमच्यावर एक सुंदर कविता पण केली. आम्ही सगळ्या जवळपास २१ मैत्रिणी, आमच्या बाई, माझी फॅमिली आणि माझ्या माहेरचा पूर्ण परिवार.

हॉल गच्च भरला होता. सगळ्यांनी भरपूर मिठाई आणि एकमेकींना देण्यासाठी गिफ्ट्स आणलेले होते. अगदी कलकलाट सुरु होता आणि तो खूप आल्हाददायक वाटत होता. दहावीचा वर्गच जणू भरला होता आणि इंटरव्हलमधील बडबड जणू सुरू होती. सग्गळ्या सख्या भेटल्या. गळाभेटी झाल्या. काहीजणी तर फार वर्षांनी भेटल्या. काहीजणी ओळखूच येत नव्हत्या इतक्या बदलल्या होत्या. काहींची नवीन आडनावं माहीत नव्हती. काहींची गावं माहीत नव्हती.  काही सख्या तर आज्जी झाल्या होत्या!! कुठं असतेस ? काय करतेस ? मुलं किती ? सगळ्याजणी परस्परांना इतके वर्षांनी एकत्र भेटल्यावर दुसरं काय होणार ? सगळे आपले वय विसरून भूतकाळात शिरल्या होत्या, जुन्या आठवणींना उजाळा देत होत्या. गैरहजर असणार्या बालसख्यांनी फोन करून भरभरून प्रतिसाद दिला. जणू काही काळ ३४ वर्षे मागे गेला. जरा वेळाने शांत झालो सगळ्याजणी. मग सगळ्यांची जेवणे झाली. सगळे पदार्थ अतिशय छान झाले होते. मग आम्ही सगळ्यांनी शाळा सोडल्यानंतर पासून ते आत्तापर्यंचा आपापला प्रवास (नोकरी, लग्न, नवरा, मुले, नातवंडे ई) सांगितला. उत्तरवार बाईंनी मनोगत व्यक्त केलं. वर्गात बाई शिकवायच्या तसंच वातावरण झालं होतं. एका मैत्रिणीने सुंदर कविता बनवली होती, तिचे वाचन केले. 
त्यानंतर केक कापणे, भरपूर फोटो काढणे, दंगा करणे, फोन नंबर जमा करणे असे सुरु होते. सगळ्यांनी अमेरिकेची चॉकलेट्स चाखून पहिली. माझी भाची, गार्गी चा छानसा डान्स झाला. माझ्या मुलीने अमेरिकन अक्सेंट मध्ये शुभंकरोती म्हणून दाखवले. मी प्रत्येकीसोबत फोटो काढून घेतले. मुधोळकर फोटोवाल्याने येऊन आमचा ग्रुप फोटो काढला. सगळा दिवस कसा आनंदात आणि पटकन संपला ते कळले च नाही. निरोपाची वेळ आली होती. डोळे पाणावत होते. पुन्हा पुन्हा भेटण्याची आश्वासनं दिली घेतली जात होती. मग एकमेकींचा निरोप घेऊन आपापल्या घरी निघून गेल्या पण जाताना एक आठवणींचा अमूल्य ठेवा घेऊन गेल्या जो कधीही संपणारा नाही. आता बघता बघता त्याला ३ वर्षे झालीत. आता दुसरा गेट टुगेदर लवकरात लवकर घडून येवो हिच इच्छा!

One Reply to “बालसखीचें गेटटुगेदर : १७ जुलै, २०१६”

 1. Nice poem written by one of the baalsakhi:)

  बघता बघता गेट टुगेदर ला 3 वर्ष पुर्ण झाले
  पण असे वाटते जणु हे सर्व आताच घडले 😄

  पाहता पाहता त्या दिवशी आपण 21 जणी झालो गोळा 👫👭👫👭👫👭👫👭
  सावित्री तुझ्या पराकाष्ठा नेच भरला हा आनंदाचा मेळा😃

  त्या दिवशी तुम्हा सर्वांना पाहून मन भरभरुन आले😂
  लग्नाच्या33 वर्षों नंतर मी पुन्हा बालपणात हरवले

  खुपच मस्त तैयारी केली होती रेखावार परिवार👨👦👧नीं🎉🎉
  सर्वाच मन मोहुन टाकल रेखीव गणपती च्या रांगोळी नीं 👋👋

  छोट्याशा गार्गीचा डान्स व विनोदीनी ची बाखरवडी
  😛
  जशी गरम गरम जेवणात आणली रसगुल्यानें गोडी😛😛

  खुप आठवणी उजळल्या मिळ्आला उत्तरवार बाईचां आर्शीवाद 🙏
  जणु काही परमपिता ने च ऐकली आम्हा सर्वाचीं फरीयाद🙏

  नुसता गलका खुप गप्पा
  सोबत फोटो सेशंन 😃
  सर्वानीं एकत्र 👫👭🎂केक कापला गोड
  गोड सेलेबेशन

  सगल्यानीं परीचय दिला
  बाईनीं रुतानी ऐकवली कविता 👌
  आम्हा सर्वाच्या जणु वाहिली आनंदाची सरीता

  3नातवाचीं मी आजी खरच पुन्हा लहान झाले
  बालपण देरे देवा या वाक्याचे खरे अर्थ कळले

  पहा उन्हातुन चालुन गेल्यावर जसा वाटतोAC वारा
  बालसखी ग्रूप ने च मिळतो आमच्या बैटरी🔋 चार्जिंग चा सहारा

  सुजु स्वाती हर्षा सुषमा ललिता गैरहजर होत्या खर्या😂
  त्याच निभावतील पुढच्या गेट टुगेदर ची जिम्मेदारी बर्या 😄

  शर्मिला शैलजा प्रणीता ने आता ग्रुप आपला फुलला 🌹🌹
  शर्मिला तुझ्या लेखनाने सर्व चिमण्या लागल्या किलबिलायला 👩‍👩‍👦‍👦

  तसा सख्यानों तुमच्या प्रेमाचा आहे सागर🌊
  कशी वर्णू मी? माझ्या कडे तर आहे छोटीसी घागर😊

  सौ रजनी मंत्री
  मानवत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *