पोटचा गोळा नव्हता, तो तर पोटातला गोळा होता!


हा लेख इंग्रजीत वाचण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा: A Big Belly Isn’t Always A Pregnancy!

परवा मी काहीतरी शोधत असताना जुन्या वर्तमानपत्रातल्या एका कात्रणाकडे लक्ष गेले आणि २५ वर्षांपूर्वीचा जुना प्रसंग आठवला. ती १९९४ मधली घटना. योगायोगाने तो ऑगस्ट महिनाच होता आणि मला ते कात्रणही ऑगस्ट महिन्यातच सापडले! मी देगलूर (इंडिया)ला भूलतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत होते. मला एका सर्जनचा फोन आला. ते म्हणाले, मॅडम, एक ऑपरेशन करायचे आहे आणि त्या पेशंटकडे पुरेसे पैसे नाहीत. मी लगेच त्यांना सांगितले कि, काहीही प्रॉब्लेम नाही. मी लगेच निघते आणि आपण ऑपरेशन करू(म्हणजे मी भूल देते). मी लगेचच त्यांच्या हॉस्पिटलला गेले आणि त्या पेशंटला भेटले.

ती एक ग्रामीण भागातली स्त्री होती. वय ३० च्या आसपास असेल. तिने मला सविस्तर माहिती सांगितली. तिला एका वर्षांपूर्वी एक मूल झाले. त्यानंतर तिला मासिकपाळी आली नाही आणि तिचे पोट हळूहळू वाढायला लागले. मासिकपाळी न येणे आणि पोट हळूहळू वाढणे हे तिच्या आकलनाने तिने असा समज करून घेतला कि ती पुन्हा प्रेग्नन्ट आहे. दुसरा काहीही त्रास नसल्याने ती डॉक्टरकडे तपासून घ्यायला गेली नाही. नऊ महिने होऊन गेले तरी डिलिव्हरीची लक्षणे काही दिसत नव्हती म्हणून ती ह्या हॉस्पिटलमध्ये आली.डॉक्टरांनी तिच्या पोटाची सोनोग्राफी करून तिला सांगितले कि तिच्या पोटात बाळ नसून एक मोठ्ठा मांसाचा गोळा आहे. ते ऑपरेशन करून लवकरात लवकर काढून टाकावे लागेल. ती ऑपरेशनला तयार नव्हती. ती म्हणाली कि ती परत तिच्या गावी जाऊन बाळाची व्यवस्था आणि पैशाची सोय करेल आणि मग ऑपरेशनसाठी येईल. त्यानंतर जवळपास दीड महिना ती आलीच नाही. तिचे पोट वाढतच राहिले आणि तो गोळा इतका मोठा झाला कि तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे ती परत हॉस्पिटलला आली होती. जेव्हा सर्जनने तिची अवस्था पहिली, त्यांनी ताबडतोब ऑपरेशन करायचे ठरवले आणि मला फोन केला. ती बोलत असताना तिला दम लागत होता. तो गोळा पोटातल्या मोठ्या रक्तवाहिनीवर दाब दिल्यामुळे तिच्या ब्लड प्रेशर आणि हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम झाला होता. तिला अन्न जात नव्हते आणि थोडेसे खाल्ले कि पोट भरून जात होते कारण तिच्या जठरावर दाब पडत होता. तिच्या अंगात रक्तही कमी झाले होते.

सर्जनसाठी तर ही केस आव्हानात्मक होतीच, त्याचबरोबर माझ्यासाठी सुद्धा एक आव्हान होते. तिच्या पोटातला तो गोळा तिच्या फुफ्फुसांवर दाब देत होता आणि तिला भूल देताना गुंतागुंत होण्याची शक्यता होती. त्या क्षणी आमचे एकच लक्ष्य होते कि तिच्यापोटातून तो गोळा यशस्वीरित्या काढून तिचे प्राण वाचवायचे. कितीही गुंतागुंत झाली तरीही त्याला सामोरे जायची मानसिकता तयार करून ठेवली होती. तिला ऑपरेशन टेबलवर घेतलं. मनातल्या मनात देवाची प्रार्थना करून भूल देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. नस सापडायला काही त्रास झाला नाही. सलाईन सुरु केलं आणि एकएक करत आवश्यक ती इंजेक्शनं दिली. तिला बेशुद्ध करून तिच्या श्वसन नलिकेत तोंडाद्वारे नळी घालून कृत्रिम श्वासोत्स्वास सुरु केला. तिचे ब्लड प्रेशर आणि हृदयाचे ठोके नियंत्रणात आल्यानंतर सर्जननी ऑपरेशन करायला सुरुवात केली.

सर्जन निष्णात असल्यामुळे त्यांची सूरी तिच्या पोटावर भराभरा चालत होती. गोळा खूपच मोठा असल्यामुळे त्यांना तिचे पोट वरपासून खालपर्यंत चिरावे लागले. तो गोळा तिच्या अंडाशयातून आलेला होता. त्याला वैद्यकीय भाषेत ओवॅरियन सिस्ट असे म्हणतात. त्याचे आवरण पातळ असते आणि त्यात एक प्रकारचे द्रव भरलेले असते. जेव्हा असे भले मोठे सिस्ट तयार होतात, ते बहुदा कॅन्सरचे असतात. तसे सिस्ट ऑपरेशन करताना फुटू नये याची दक्षता घ्यावी लागते. फुटल्यास त्यातील कँसरचे पेशी पोटात पसरण्याची शक्यता असते. तसेच ऑपरेशनच्या दरम्यान त्याचे पातळ आवरण हवा लागून कोरडे होऊन त्याला तडा जाऊ शकतो. सगळी आव्हाने पेलत पेलत आमचा ऑपेरेशनचा प्रवास सुरु होता. बघता बघता एक तास झाला आणि सर्जनला तो गोळा तिच्या अंडाशयापासून वेगळा करण्यात यश आले. सगळ्यांना हुश्श वाटले. मग बाकीचे ऑपरेशन संपले. टाके घालून तिचे पोट शिवण्यात आले. हळू हळू ती शुद्धीवर आली. आमचा जीव भांड्यात पडला.

आम्ही उत्सुकतेपोटी त्या गोळ्याचे वजन केले तर ते चक्क १६ किलो (३५ पौंड्स) भरले. तिथल्या त्या वेळच्या इतिहासातलेते सगळ्यात मोठे सिस्ट होते. गाव लहान असल्यामुळे बातमी वाऱ्यासारखी पसरली. सगळे गावकरी तो १६ किलोचा गोळा पाहायला धावले. दवाखान्यात तोबा गर्दी. त्यापाठोपाठ वार्ताहरही आले. आम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारून बातमी तयार केली आणि दुसऱ्या दिवशी ती बातमी पेपरात झळकली. तिच्या घरच्यांनी साश्रू नयनांनी आम्हाला खूप खूप धन्यवाद दिले. पैश्या अभावी तिचे ऑपेरेशन झाले नसते तर तिचे प्राण जाऊ शकले असते. तिच्या लहानग्या मुलाकडे पाहून त्याला पोरके होण्यापासून वाचवल्याबद्दल खूप धन्यता वाटली.


3 Replies to “पोटचा गोळा नव्हता, तो तर पोटातला गोळा होता!”

  1. लेख वाचताना जणू तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहीला, छान लिखाण

  2. अभिनंदन सावित्रा
    छान लेख आहे
    डोळ्यासमोर चित्र उभे राहिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *