भूल भुलैय्या!


हा लेख इंग्लिश मध्ये वाचण्यासाठी इथे क्लिक करा: A Little Reverse Psychology!

भूलतज्ज्ञ असताना मी मानसशास्त्राचा प्रभावीपणे कसा वापर केला याबद्दल सांगणार आहे. मी त्यावेळी मुंबईतल्या एका महानगरपालिका रुग्णालयात भूलतज्ज्ञ म्हणून काम करत होते. तिथे शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या बहुतांश रुग्णांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन शस्त्रक्रिया करून घेणे परवडत नसायचे. तश्या रुग्णांची संख्या खूप असल्यामुळे त्यांना त्यांचा नंबर येण्यासाठी बरीच वाट पाहावी लागायची. बरेच दिवस ते वेटिंग लिस्टवर असायचे.

ज्या ज्या रुग्णांना ऑपरेशन साठी निवडले जायचे, त्यांना भूलतज्ज्ञ आदल्या दिवशी तपासून ते भूल देण्यासाठी तयार आहेत का नाही ते ठरवायचे. भूल देण्यासाठी त्यांचे ब्लड प्रेशर, ब्लड शुगर इत्यादी नियंत्रित असावे लागते. त्याच बरोबर ऑपरेशनच्या आधी काही तास खायचे प्यायचे नाही त्याबद्दलही समजावून सांगावे लागते. हॉस्पिटल माझ्या घरापासून दूर असल्यामुळे मला आदल्या दिवशी जाऊन रुग्णांना भेटणे शक्य नव्हते. त्या ऐवजी मी सकाळी लवकर जाऊन त्या रुग्णांना तपासायचे आणि कोणाकोणावर शस्त्रक्रिया होणार ते ठरवायचे. म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही न खाता पिता आले का वगैरे वगैरे.


हळू हळू माझ्या लक्षात आले कि बरेच रुग्ण व्यवस्तिथ खाऊन पिऊन यायचे आणि प्रलंबीत शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येऊ नये म्हणून चक्क खोटं सांगायचे कि काहीच नाही खाल्लं म्हणून. मग भूल देताना मला ते सगळं निस्तरावे लागायचे. कधी कधी तसे रुग्ण सिरिअस पण व्हायचे. म्हणून मी एक उपाय शोधून काढला.

मी उलट्या मानसशास्त्राचा (रिवर्स सायकॉलॉजि) उपयोग करून त्यांच्याकडून खरी माहिती काढायला सुरुवात केली आणि ती यशस्वी पण होत गेली. त्यामुळे संभाव्य धोके टळले.
एक ६४ वर्षांचे काका त्यांच्या पाठीच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी आले होते. त्यांच्याशी झालेले संभाषण पहा:

मीः सुप्रभात, काका. तुम्ही कसे आहात?


रुग्ण: मॅडम. मी ठीक आहे.


मीः आज तुम्ही तुमच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी आलेले आहात ना?


रुग्ण: होय. मी गेल्या 3 महिन्यांपासून या शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादीमध्ये होतो. आत्ता नंबर लागला.


मीः सकाळपासूनच तुम्ही काही खाल्ले, प्यायले का?


रुग्ण: नाही, मुळीच नाही! मला काहीही खाऊ पिऊ नको असे सांगण्यात आले. काल रात्री 10 वाजेच्या सुमारास माझे जेवण झाले आणि पहाटे 4 वाजण्यापूर्वी थोडेसे पाणी घेतले. बस एवढेच!


मी: ठीक आहे. तुमची शस्त्रक्रिया बरीच मोठी आहे. ती संपायला बराच वेळ लागेल असे दिसतेय. तुम्ही एखादा कप चहा तरी घेतला असता तर तुम्हाला बरे वाटले असते.


ते काका चक्रावले. त्यांच्या गोंधळलेल्या चेहऱ्यावरून ते स्पष्ट दिसत होते. त्यांना काही क्षण काय बोलावे ते कळेना. पण माझे शब्द इतके आश्वासक होते कि त्यांचा माझ्यावर विश्वास बसला आणि त्यांनी कबुल केले कि अर्ध्या तासापूर्वी त्यांनी चहा घेतला. मग मी त्यांना अजून जास्त विश्वासात घ्यायला सुरुवात करायचे. 😉


मीः व्वा !! ऐकून छान वाटले कि आपण कमीतकमी एक कप चहा घेतला आहे. तुमचे वय पाहता मला असे वाटते कि तुम्ही जर नुसता चहा च न घेता काही खाल्ले असते तर तुम्हाला शस्त्रक्रियेच्या वेळी चक्कर आली नसती. अंगात थोडी शक्ती राहिली असती!

हे ऐकल्यावर त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली आणि विजयी स्वरात त्यांनी पुढची कबुली दिली.

अहो, मी अगदी पोटभर नाश्ता करून आलो. माझी सुनबाई पण हेच म्हणाली कि उपाशी गेलात तर चक्कर येईल. आणि तिने नाश्ता बनवून दिला.


मी: टाळ्या! टाळ्या! टाळ्या! 👏👏👏
पाहिलंत ना, त्या काकांनी आधी काहीच खाल्ले नाही म्हणून खोटेच सांगितले. रिव्हर्स सायकॉलॉजि वापरून खरीखुरी माहिती मिळवता आली आणि पुढचे धोके टळले.

एकदा मी रूग्णांकडून योग्य माहिती काढली कि माझे पुढचे काम म्हणजे त्यांना शस्त्रक्रिया करण्यापूर्वी उपवास कशासाठी आवश्यक आहे हे शिकविणे. मी त्याना समजावून सांगायचे की, शस्त्रक्रिया करताना पोट रिकामे असणे खूप गरजेचे असते. भूल दिल्यानंतर, अचेतन अवस्थेत पोटातले अन्नकण किंवा पाणी फुफ्फुसांमध्ये जाऊ शकते. त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो आणि जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. व्यवस्थित समजावून सांगितल्यावर त्यांना त्याचे महत्व कळायचे. मग त्यादिवसाची त्यांची शस्त्रक्रिया रद्द व्हायची. पण त्यांना माझ्याकडून हमी मिळायची कि त्यांना जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही आणि पुढच्या यादीत त्यांचे नाव असेल. जाताना ते मला सांगायचे कि त्यांना देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणार.
अश्या प्रकारे उलट मानसशास्त्राचा वापर करून मी बर्‍याच गोष्टी साध्य करू शकायचे. रूग्णां कडून खरी माहिती मिळवणे, त्यांना योग्य शिक्षण देणे, पुढील गुंतागुंत टाळणे आणि त्यांची शस्त्रक्रिया जास्त ताटकळत न राहता शक्य तेवढे लवकर घडवून आणणे. हे सगळं कोणाच्याही भावना न दुखावता, माझ्या वरचा रूग्णांचा विश्वास तसाच कायम ठेवून, हसत खेळत व्हायचे. तेही यशस्वीरीत्या!! 😊

One Reply to “भूल भुलैय्या!”

  1. खूप छान, ऑडिओ रूपांतर पण छान आहे,

Comments are closed.