दिवाळीचा वसा: भारतातून अमेरिकेपर्यंत !!


 

ह्या लेखाचे युट्यूब विडिओ आणि ऑडिओ क्लिप खाली दिलेले आहे.

दिवाळी…दीपावली….हा शब्द ऐकूनच मन प्रसन्न होऊन जाते. माझ्या लहानपणीची दिवाळी तर अविस्मरणीय आहे. मी एका तालुक्याच्या गावी लहानाची मोठी झाले. माझे बाबा सोन्या चांदीचे खूप प्रसिद्ध व्यापारी होते. त्याबरोबरच आमचे मोठे किराणा दुकान आणि जेनेरल स्टोर्स होते. जरी देगलूर सारख्या तालुक्यात ते सराफ होते, त्यांना मुंबईच्या झवेरी बाजारात सगळे ओळखायचे. त्यांनी तसे नाव कमावले होते. बाबांना मिडास राजासारखी दैवी देणगी असावी बहुतेक. कोणताही व्यापार किंवा कोणतेही काम हाती घेतले कि त्याचे सोने व्हायचे. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप लोक अतिशय यशस्वी झाले होते. सांगायचा मुद्दा हा आहे कि, बाबा लक्ष्मीपुत्र असल्यामुळे दिवाळी, विशेषतः लक्ष्मीपूजन खूप धूमधडाक्यात व्हायचे.

दिवाळीची तयारी अगदी दसऱ्याच्या आधीपासूनच सुरु व्हायची. घराची रंगरंगोटी व्हायची. जशी जशी दिवाळी जवळ यायची, तसे आमच्या स्वयंपाकघरातून रोज एका नव्या आणि खास पदार्थांचा वास दरवळायचा. सकाळ झाली कि आम्हा भावंडांना उत्सुकता लागायची कि आज आई काय बनवणार असेल! एक एक करत लाडू, चिवडा, चकली, करंजी, शेव, शंकरपाळे, अनारसे, गुलाब जामून चे डबे सजायचे. त्याचबरोबर सगळ्यांसाठी नवीन कपडे, काही दागिने आणि इतर वस्तूंची खरेदी सुरु व्हायची. तेव्हा मिक्सर नव्हते. मग आई उखळात सुगंधी उटणे बनवायची. चांगला मुहूर्त पाहून मोठी मंडळी दुकानाचे खाते वह्या हैदराबाद किंवा जवळच्या मोठ्या शहरातून विकत आणायचे. अभ्यंगस्नान, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज अतिशय उत्साहात पार पडायचे, पण विशेष आकर्षण असायचे ते लक्ष्मी पूजनाचे

सकाळपासून आईची लगबग सुरु असायची. तिला कित्ती कामे असायची! सडा, रांगोळी, देवपूजा, पुरणाचा स्वयंपाक, नैवेद्य, संध्याकाळच्या लक्ष्मी पूजनाची तयारी आणि बरेच काही. झेंडूची फुले गावातच मिळायची, पण  शेवंतीची फुले नांदेड किंवा हैदराबाद हुन मागवावे लागायचे. आमचे घर, शांतिकुंज, हि त्याकाळात गावातली एक दिमाखदार इमारत होती. तीन मजली आणि अतिशय सुंदर वास्तू. तिला वरून खालपर्यंत लाइटिंगने सजवायचे. त्यात फुलांच्या माळाही सोडायचे. घराला पाना फुलांची तोरणे लागायची. घरासमोर अगदी स्पेशल रांगोळी काढली जायची. चांदण्याच्या आकारातल्या मेणबत्तीच्या दिव्यांची आरास व्हायची. वास्तू कशी नटलेल्या नववधू सारखी दिसायची.

संध्याकाळ झाली कि एक एक करत गल्लीत सगळ्यांकडे लक्ष्मीपूजन सुरु व्हायचे. मग फटाके फोडणे सुरु असायचे. आम्ही नटून थाटून आईसोबत सगळ्यांकडे हळदीकुंकू आणि प्रसादाला जायचो. जवळपास रात्री १० पर्यंत सगळ्यांकडचे लक्ष्मी पूजन संपून गल्ली थोडी शांतता पसरायची. लहान मुले झोपायची. मोठ्यांना पेंग यायची. आणि मग आमच्या घरचे लक्ष्मीपूजन हळू हळू सुरु व्हायचे. त्यासाठी मोठा बॅण्ड पथक यायचा आणि गल्ली पुन्हा जागी व्हायची. आत आईची पूजेची तयारी सुरु असायची. एका खोलीत मध्यभागी लक्ष्मीचा मोठा फोटो ठेवलेला असायचा. बाजूला मोठ्या चांदीच्या समया असायच्या. आमच्या घराची नंदादीपाची परंपरा होती. एका चांदीच्या वाटीत सोन्याची अंगठी ठेवायची, आणि त्यात तुपाचा दिवा लावायचा. तो दिवा सकाळपर्यंत तेवत ठेवायचा. माझे आईबाबा रात्रभर डोळ्यात तेल घालून तो तुपाचा दिवा तेवत ठेवायचे. सगळी ठेवणीतली पूजेची भांडी त्या दिवशी कामाला यायची. पूजेचे ब्राह्मण येऊन सगळ्या नवीन खाते वह्यांवर कुंकवाचे स्वस्तिक काढून पूजा करायचे.
आमच्या तीन दुकानांचे खाते, आमच्या पार्टनरच्या दुकानांचे खाते आणि इतकेच नव्हे तर पार्टनरच्या पार्टनरचेहि खाते आमच्याच लक्ष्मीपूजनात असायचे. कारण सगळ्यांचा समज होता आणि कित्येकांना प्रचितीही आली होती कि माझ्या बाबांच्या हस्ते त्यांच्या खाते वहीची पूजा झाली कि त्यांचा व्यापार शंभर टक्के फुलणार!! मग काय, बघता बघता पूर्ण खोली खात्यांनी भरून जायची. आम्हा लहान मुलाना तर त्या खोलीत जायला पण मिळायचे नाही. आम्ही फक्त दारातूनच डोळे विस्फारून पाहायचो. मन तृप्त व्हायचे. मग यथासांग पूजा, मंत्र वगैरे आत सुरु असायचे. बाहेर बॅण्ड सुरु असायचा आणि मग मोठ्या शहरातून मागवलेले स्पेशल फटाके फोडणे सुरु व्हायचे. विशेष कुतूहलाची बाब म्हणजे भली मोठी फटाक्यांची माळ, जी घराच्या एका कोपऱ्यापासून ते जवळपास दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत लांब असायची. ती पूर्ण माळ संपायला काही मिनिटे लागायची. गल्लीभर कागदांचा सडा पडायचा. एकंदरीत लग्नासारखं वातावरण असायचे. भरपूर लोक असायचे पूजेला. सगळी गल्ली आपापल्या बाल्कनीत किंवा गच्चीत येऊन फटाक्यांचा आनंद लुटायचे. पूर्ण गल्ली दुमदुमून जायची. मग प्रसाद वगैरे घेऊन सगळे आपापल्या घरी निघून जायचे. हे सगळे संपायला रात्रीचा एक वाजायचा.

अश्याप्रकारे एक एक दिवाळी यायची आणि मन प्रसन्न करून जायची. आम्ही मोठे होत गेलो. माझे वडील गेल्यानंतर दिवाळीचे स्वरूप हि बदलले पण लहानपणीची आठवणीतली दिवाळी उराशी तशीच जपून ठेवलीआहे!

🛫लग्नानंतर दोन मुले झाल्यानंतर आम्ही अमेरिकेला 🗽आलोइथे आल्यापासून दिवाळीचा वारसा, आपली संस्कृती थोड्याफार प्रमाणात का होईना जपण्याचा प्रयत्न करत आहे. वेळात वेळ काढून जमेल तेवढे पदार्थ करते. एक दिवस पुरणपोळीही बनते आणि विशेष म्हणजे मुलांना आणि नवऱ्याला खूप आवडते. तसेच चकली, चिवडा, बेसनाचे लाडू, खव्याच्या करंज्या आणि शेव बनवते.

फार्मर्स मार्केट मधून भली मोठी शेवंतीची कुंडीच विकत आणते. मग काय! फुलेच फुले. मग कधी फुलांची रांगोळी, तर कधी रांगोळी आणि त्यात दिवे तर कधी दुसरेच काहीतरी. असे प्रत्येक दिवाळीला काहीतरी वेगळे डेकोरेशन करण्याचा प्रयत्न करते.

एका वर्षीची रांगोळी छान जमली आणि मी त्याचा फोटो लोकसत्ताला पाठवला आणि त्यांनी तो माझी रांगोळी ह्या सदरात अगदी पहिल्या पानावर छापला सुद्धा. त्यानंतर सतत वर्षे मी माझ्या रांगोळीचे फोटो त्यांना पाठवत राहिले आणि त्यांनी ते सगळे छापले पण.

मला विशेष आनंद झाला जेव्हा मी वेगवेगळ्या रंगांचे, वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या सुगंधाचे सुंदर सुंदर मेणबत्तीचे दिवे (त्याला इथे टीकॅण्डल असे म्हणतात) ऐकिया (Ikea) नावाच्या स्टोर मध्ये पहिले. मग काय, दरवर्षी शक्कल लढवून नवनवीन आरास करत दिव्यांची एक परंपरा सुरु केली.

लहानपणापासून खूप धार्मिक घरात वाढले म्हणून असेल, पण इथे जवळपास यथासांग लक्ष्मी पूजन घडते. नवरा आणि मुले शक्य तेवढी मदत करतात आणि सहभागी होतात. त्यामुळे मलाही सगळे करण्याचा उत्साह येतो. सकाळपासून स्वयंपाक आणि पूजेची तयारी सुरु असते. रांगोळी काढून मग दिवेलागणीच्या वेळेस आमची पूजा सुरु होते. लॅपटॉप किंवा मोबाईल वर गायत्री मंत्र आणि श्रीसूक्तम सुरु असते. व्यवस्तिथ पूजा, प्रसाद सगळे पार पडते.
मी जर दिवाळी साजरी केली नाही तर माझ्या मुलांना आपली संस्कृती, आपले सणवार, पदार्थ . कसे कळणार! माझ्या पालकांनी मला जो वसा दिला आहे, तो मी माझ्या मुलांना देण्याचा प्रयत्न करत आहे. पण काळ बदलतोय आणि त्यानुसार माणसांची मानसिकता आणि संस्कृतीकडे बघण्याचा दृष्टिकोन ही बदलत आहे. बघू या हा प्रयत्न कितपत सुरु राहतो! एक गाणे गुणगुणावेसे वाटते …..”आम्ही चालवू हा पुढे वारसा…!”

हा माझा लेख दैनिक देशोन्नतीच्या दीपावली २०१९ विशेषांकामध्ये प्रकाशित झाला, त्याचे हे कात्रण:
                     

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *